साहित्य-सेवक
By Admin | Updated: March 1, 2015 15:59 IST2015-03-01T15:59:52+5:302015-03-01T15:59:52+5:30
प्रा. शरच्चंद्र टोंगो हे मराठीतील एक चतुरस्र साहित्यिक व बहुप्रसव लेखक म्हणून सर्वदूर सुपरिचित होते.

साहित्य-सेवक
>डॉ. उत्तम रुद्रावार
प्रा. शरच्चंद्र टोंगो हे मराठीतील एक चतुरस्र साहित्यिक व बहुप्रसव लेखक म्हणून सर्वदूर सुपरिचित होते. आजपासून त्यांच्या जन्मशताब्दीला त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या यवतमाळ येथे प्रारंभ होत आहे ही आनंदवार्ता दिलासा देऊन गेली.
प्रा. टोंगो यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास हा माझ्या पीएच.डी.चा विषय होता. या अभ्यासाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण साहित्याचा साक्षेपाने अभ्यास करता आला आणि त्यांचे लौकिक जीवनही न्याहाळता आले.
त्यांची पहिली कथा ‘वीज’ ही जून १९३४ च्या ‘स्त्री’ मासिकात ‘शोभना देशपांडे’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. पुढे ‘वागीश्वरी’ या नियतकालिकात ‘रक्ताचा मोबदला’ ही टोंगो सरांची कथा वाचून प्रा. ना. सी. फडके यांनी मासिकाच्या संपादकांना मुद्दाम पत्र पाठवून कथा आवडल्याचे कळविले व ‘दुर्मीळ रत्न’ या शब्दात अभिप्राय कळविला. या प्रोत्साहनाने संपादकांकडून कथांना मागणी येऊ लागली. पुढील ५0 वर्षांच्या काळात २00 हून अधिक कथा त्यांनी लिहिल्या. त्या ‘स्त्री’, ‘किलरेस्कर’, ‘हंस’, ‘वागीश्वरी’ आदि दज्रेदार नियतकालिकांत प्रसिद्धही झाल्या. कथासंग्रहांमध्ये ‘पेशावरचा चाकू’ आणि ‘एक हळवी रात्र’ हे त्यांचे दोनच संग्रह प्रकाशित झाले आहेत.
कथांसोबतच त्यांनी नाटके व बालवाड्मयाचीही निर्मिती केली. मात्र कादंबरीचे माध्यम आपल्या लेखनधर्माशी अधिक अनुरूप असल्याचे त्यांना प्रकर्षाने जाणवले. कादंबरी लेखनासाठी जी एकटाकी व एकबैठकी वृत्ती लागते ती माझ्याकडे आहे म्हणून लेखन माझ्याकडून झाले असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटलेही होते.
‘हिरकणी’ ही त्यांची पहिली कादंबरी. स्वातंत्र्यपूर्व काळात विशेषत: द्वितीय महायुद्धाच्या काळात कादंबरी लेखनाला आरंभ केलेल्या शरच्चंद्र टोंगो यांनी सातत्याने सुमारे २0 वर्षे कादंबरी लेखन केले. १९३८ साली त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. त्यांच्या ‘स्वीकार’, ‘राजी’, ‘प्रत्यय’, ‘पुन्हा एकदा’ या तीन कादंबर्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध झाल्या, तर १३ कादंबर्या स्वातंत्र्योत्तर काळात प्रसिद्ध झाल्या.
कै. भाऊसाहेब माडखोलकर यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे टोंगो यांनी कादंबरीकाराला आवश्यक असलेल्या गुणांचा विकास साक्षेपाने केला व पुढे एक सिद्धहस्त कादंबरीकार असा लौकिक प्राप्त केला. रहस्यमय कथानकांचे त्यांना आकर्षण होते. त्यांनी शेकडो रहस्यकथा वाचल्या होत्या.
मराठी कादंबरीचे जे चार जोमदार प्रवाह आहेत त्यातील दुसर्या, तिसर्या व चौथ्या प्रवाहाशी समकालीन राहून टोंगो यांनी सातत्याने आपले कादंबरी लेखन केले. कादंबरी लेखनाच्या तीन प्रकारांचा त्यांनी अवलंब केल्याचे आढळते. ‘प्रादेशिक’ व ‘ग्रामीण’ कादंबरी हे शब्दप्रयोग पुरेसे रूढ व प्रतिष्ठित होण्यापूर्वीच यवतमाळ शहरालगतच्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारी ‘लकेरी’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. त्यांच्या इतर कादंबर्यांतूनही विदर्भ, प. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आदि विभागातील लोकजीवनाचे व लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.
बदलत्या स्त्रीरूपाचा वेध टोंगो यांनी त्यांच्या कादंबर्यात घेतला आहे. त्यातून त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन प्रत्ययाला येतो. प्रामुख्याने स्त्रीप्रधान कादंबर्यांचीच रचना टोंगो यांनी केलेली आहे. स्त्रियांच्या चित्रणात पुरुष व्यक्तिरेखांच्या चित्रणापेक्षा अधिक सूक्ष्मता व प्रत्ययकारिता जाणवते. टोंगो यांच्या कादंबरीचा घाट, त्यातील स्वभावचित्रे, वातावरण निर्मिती, रचनाकौशल्य, भाषाशैली याचा विचार करता प्रा. ना. सी. फडके यांच्या शैलीचा ठळक असा ठसा त्या लेखनावर उमटलेला दिसतो.
‘बालवाड्मयाचा विचार करणे व बालकांसाठी लिहिणे हा माझा अत्यंत आवडीचा व आनंदाचा विषय आहे’ असे टोंगो यांनी फेब्रु-मार्च १९६0 च्या दरम्यान वर्धा येथे आयोजित एका शिबिरात म्हटले होते. १९४७ च्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या पर्वकाळात टोंगो यांनी कुमारांसाठी ‘तिसरे राज्य’ हे नाटक एका रुपक कथेचा आधार घेऊन लिहिले.
साहित्याखेरीज त्यांचे आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर भाषणे, नाटके, मुलाखती आदि कार्यक्रमही झाले. जीवनावर व मानवी जीवन समृद्ध करणार्या ललित कलांबद्दल त्यांना प्रेम होते. या प्रेमापोटीच ते लिहायला लागले. हे प्रेम त्यांच्या लेखनाचा स्थायिभाव आहे. ‘लोकमत’च्या कुटुंबाचे सदस्य असलेले टोंगो हे सौंदर्यपूजक गृहस्थ होते. लेखक म्हणून मोठे असलेल्या आणि त्याहून माणूस म्हणून आणखी विशाल असलेल्या कै. शरच्चंद्र टोंगो यांना या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.