शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

लक्तरे

By admin | Updated: March 1, 2015 15:30 IST

भारतातील वाईट प्रवृत्तींवर टीका जरूर हवी. सध्या चालू असलेला सांस्कृतिक अभिनिवेश हा ‘सॉफ्ट पॉवर’ कमावण्याचा मार्ग नव्हे. पण असंबद्ध गौरवगाथेला जसे स्थान नाही, तसे फक्त ‘शेपूट म्हणजे हत्ती’ अशा सार्वत्रिकीकरणालाही आपल्या मनात स्थान असता कामा नये

वैशाली करमरकर
 
भारतातील वाईट प्रवृत्तींवर टीका जरूर हवी. सध्या चालू असलेला सांस्कृतिक अभिनिवेश हा ‘सॉफ्ट पॉवर’ कमावण्याचा मार्ग नव्हे. पण असंबद्ध गौरवगाथेला जसे स्थान नाही, तसे फक्त ‘शेपूट म्हणजे हत्ती’ अशा सार्वत्रिकीकरणालाही आपल्या मनात स्थान असता कामा नये.
----------------
एकदा एका पाश्‍चिमात्य वार्ताहराने माओ-त्से-तुंग यांना प्रश्न केला होता,
 ‘‘तुमचा शेजारी भारत देश हा तुमच्या देशासारखाच आकाराने अवाढव्य आहे. या गोष्टीची तुम्हाला भीती किंवा काळजी वाटते का?’’ क्षणार्धात माओ-त्से-तुंग उत्तरले,
 ‘‘बिल्कुल नाही. कारण स्वत: भारतीय हेच भारताचे उत्तम शत्रू आहेत. त्यांना बाहेरच्या शत्रूंची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, बहुसंख्य भारतीय विकावू आहेत. स्वदेशहितसुद्धा ते सहज विकू शकतात.’’
आपल्या देशाचे ‘ब्रँडिंग’ थोड्याफार फरकाने हे असे आहे. याची मूळ सुरुवात आपल्या स्वत:पासून होते. आपल्या स्वत:ला ‘भारतीय’ असण्याचा आनंद नाही. भारतात अनेक गोष्टी चांगल्या आहेत, तशा कित्येक गोष्टी वाईट आहेत. परंतु प्रामुख्याने सर्व वाईट गोष्टींचा उदो उदो आपणच आपल्या तोंडाने करत असतो. स्वत:ने स्वत:कडे नीरक्षीरविवेकाने पाहिले नाही तर इतर बाहेरचे देश भारताकडे अशा विवेकाने का बघतील? 
भारताला आंतरराष्ट्रीय समुदायात स्थान मिळवायचे असेल तर आपल्याला प्रथम स्वत:च्या मनातल्या भारताच्या प्रतिमेवर काम करावे लागेल. वर्तणूकमूल्ये सांभाळावी लागतील, त्यासाठी इतरांनी चाटवलेली अफूची गोळी चाटवून घेणार नाही असा ‘पण’ करावा लागेल. माझ्या व्यवसायामुळे खूपवेळा युरोपियन देशातील अर्थतज्ज्ञांना, राजकीय मुत्सद्यांना, निवेशकांना भेटण्याची संधी मिळते. दोन आठवड्यांपूर्वी असे एक पश्‍चिम युरोपातले अर्थतज्ज्ञ मुंबईत आले होते. ते मोठय़ा तळमळीने आपले विचार मांडत होते. त्यांच्या सादरीकरणात त्यांनी भारताने आखलेल्या अर्थधोरणांची सुसंगती सादर केली. त्यामागचा विचार समजावून सांगितला. चीनपेक्षा भारतात निवेश करणे हे का सयुक्तिक आहे याची कारणे दिली. त्यानंतरच्या स्लाइडमध्ये भारतातील सर्व प्रमुख निवेशकांना खणखणीत शब्दांत बजावले- 
‘‘अभिजनहो, कृपया भारतातील वर्तमानपत्रे वाचून भारताबद्दल मत बनवू नका. भारताचे विद्रुपीकरण करण्याची ही पद्धत वसाहतवादी काळापासूनची परंपरा आहे. ती अजूनही चालू आहे. इतकेच मी सांगतो.’’
- हे एका गोर्‍या अर्थशास्त्रज्ञाला आणि जगप्रसिद्ध बँकरला भारतात येऊन सांगावे लागणे हा दैवदुर्विलास आणि सुदैव.  म्हणजे माओ-त्से- तुंगपासून आज २0१५ पर्यंत ‘भारतीय लोक हे भारताचे उत्तम शत्रू आहेत. त्यांना बाहेरच्या शत्रूची गरज नाही’ हे विधान अजूनही सार्थ आहे!
गंमत बघा - न्यूयॉर्कला भेट देणारे जगभरातले टुरिस्ट एम्पायर स्टेट बिल्डिंग किंवा ट्वीन टॉवरची जागा इत्यादि ठिकाणी प्राधान्यक्रमाने जातात. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स इथली झोपडपट्टी त्यांच्या लिस्टवर नसते. लोक जकार्ता आवडीने बघतात, पण तेथील सिपीनांग ही झोपडपट्टी दर्शनीय स्थळांच्या यादीत नसते. टुरिस्ट लोकांच्या यादीत अशा झोपडपट्टय़ा येत नाहीत, कारण अमेरिका, इंडोनेशिया, मेक्सिको, ब्राझील, चीन अशा कोणत्याही देशांच्या पर्यटनासंबंधी संकेतस्थळावर त्यांना स्थान नसते.
आता जरा ‘मुंबई दर्शन’ या पर्यटनासंबंधीच्या संकेतस्थळावर जा. मुंबईतील पर्यटनाचा पहिला आकर्षणबिंदू धारावी आणि दुसरा आकर्षणबिंदू धोबीघाट. आपल्या देशातील संकेतस्थळांनी पहिल्या प्रथम ‘हे पहा आमचे फाटलेले अंतर्वस्त्र’ अशी जाहिरात केल्यावर इथे बनू शकणार्‍या पैठण्या आणि कांजीवरम याबद्दल कुठल्याही परदेशी नागरिकाला भारताबद्दल काय म्हणून विश्‍वास वाटेल? 
- आता कुठल्याही परदेशी पर्यटन कंपनीच्या संकेतस्थळावर जा. ‘मुंबई दर्शन’मध्ये धारावी आणि धोबीघाट हे प्रथम क्रमांकावर आले नाहीत तरच नवल. भारताला फार पूर्वीपासून हत्तीची उपमा देण्यात आली आहे. हत्तीची मंद चाल, जडशीळ हालचाली इतके म्हणजेच हत्ती असे आपण स्वत: मानतो. म्हणून जग हीच गोष्ट दसपटीने मानू लागते. हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टीतील ज्या आंधळ्याने फक्त शेपटी हातात धरली आणि ‘हत्ती’ म्हणजे फक्त एक सुतळी असे ठामपणे म्हटले, तसेच आपण स्वत: करीत आहोत. 
धारावी आणि धोबीघाटामुळे आणखी काही गोष्टीसुद्धा होतात. परदेशी जाऊन विषयांचे सादरीकरण करू पाहणार्‍या अनेक मुंबईकरांना परदेशी उच्चपदस्थ वर्गाकडून ‘गमतीदार’ प्रश्न केले जातात, विधाने ऐकायला मिळतात. एक शाहरुख खान सोडला तर प्रत्येक मुंबईकर ‘बिच्चारा’ झोपडपट्टीत राहतो असे त्यांना वाटत राहते. धोबीघाट बघून आलेला माणूस पुढच्या व्यावसायिक दौर्‍याच्या वेळी आपापले बेडशीट्स आणि टॉवेल घेऊनच भारतात येतो. 
- ‘आरोग्य आणि स्वच्छता’ यातल्या कुठल्याही पाश्‍चात्त्य परिमाणात ‘धोबीघाट’ बसत नाही ही साधी कॉमनसेन्सची गोष्ट आपण कशी विसरतो? र्जमनीतील एक आठवण इथे सांगितल्याशिवाय राहवत नाही. हिटलरच्या काळात चालवलेल्या अनेक छळछावण्यांपैकी एक छळछावणी आहे डाखाव् या गावी. ते गाव म्युनिकपासून जवळ आहे. 
- काम संपल्यावर विकएंडला डाखाव्ला जाऊन यावे असे एकदा ठरवले. म्युनिकमधल्या सरकारी माहितीकक्षात बसच्या येण्या-जाण्याची विचारपूस करायला गेले. एरवी अत्यंत सौजन्याने वागणारी मंडळी एकदम वेगळी वागू लागली. 
‘‘कशाला तिथे जाता? म्युनिकमध्ये अजून किती छान छान गोष्टी आहेत’’ 
- असे वारंवार आग्रहाने सांगू लागली. माझे मन वळविण्याचा अटोकाट प्रयत्न केला, पण मी आग्रही आहे म्हणताना अत्यंत अनिच्छेने हातात काही नकाशे कोंबले. डाखाव्ला पोहोचले. तेथील अमानवी क्रूरकांडाची मालिका बघता बघता दिवस कधी मावळला कळले नाही. परतीचे वेध लागले. म्युनिककडे परतणारी शेवटची बस सव्वासहालाच निघून जाते असे कळले. तेथून जवळच्या स्टेशनकडे जाण्यासाठी कुठलेही वाहतूक साधन उपलब्ध नव्हते. दाटणार्‍या अंधाराबरोबर मनही गारठून गेले. हायवेवर उभे राहून अंगठे दाखवत कशीबशी स्टेशनपर्यंत लिफ्ट मिळाली.सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत युरोपात प्रथम क्रमांक असलेल्या र्जमनीत फक्त डाखाव्ला अशी कनेक्शन्स नसावीत याचा खूप खूप मोठा अर्थ ध्यानात आला. 
- आपल्या देशातील लक्तरे दाखविण्याची हौस हा ‘नेॅशन ब्रँडिंग’मधला केवढा मोठा अडसर आहे हे ध्यानात आले. ‘सॉफ्ट पॉवर’ नावाच्या शस्त्रागारातले हे सर्वात मोठे अस्त्रच भारताकडे नाही. मग जग आपल्याकडे अपूर्वाईने का बरे पाहील? याचा अर्थ - हा नीरक्षीरविवेक - आपण भविष्यवेधी दृष्टीने पाहणे महत्त्वाचे आहे. भारतातील वाईट प्रवृत्तींवर टीका जरूर हवी. सध्या चालू असलेला सांस्कृतिक अभिनिवेश हे त्यावर खचितच उत्तर नाही. असंबद्ध गौरवगाथेला जसे स्थान नाही, तसे फक्त ‘शेपूट म्हणजे हत्ती’ अशा सार्वत्रिकीकरणालाही आपल्या मनात स्थान असता कामा नये. भारतातला प्रत्येक तरुण नागरिक हत्तीच्या शेपटीच्या रूपातला देश बघत आणि ऐकत मोठा झाला, तर तो सळसळत्या उत्साहाने का अभ्यास करेल? का काम करेल? अशी अपेक्षा आपण तरुणाईकडून कशी करू शकतो? ही तरुणाई मग परदेशी वकिलातींपुढेच रांग लावणार. 
युरोपातील परदेशी मंचावर २0१0 साली असाच एक ‘वैचारिक करमणूक’ करणारा प्रश्न विचारला गेला होता. तो प्रश्न होता- ‘‘भारतातील अल्पसंख्याकांना क्वीझमधे भाग घेऊन जिंकण्याची मुभा मिळत नाही का?’’
विचार करून ठेवा पुढच्या रविवारपर्यंत. - काय उत्तर द्यावे यावर? कुठून आला हा प्रश्न?
------------
न्यूयॉर्कला भेट देणारे जगभरातले टुरिस्ट एम्पायर स्टेट बिल्डिंग किंवा ट्वीन टॉवरची जागा इत्यादि ठिकाणी प्राधान्यक्रमाने जातात. न्यूयॉर्कमधली ब्रॉन्क्स इथली झोपडपट्टी त्यांच्या लिस्टवर नसते. कारण अमेरिकेसारखे देश आपल्या  ‘प्रतिमे’बद्दल जागरूक असतात.
-------------
आणि मुंबई? परदेशी प्रवाशांसाठी इथल्या  पर्यटनाचा पहिला आकर्षणबिंदू धारावी आणि दुसरा धोबीघाट. धारावी पाहिली की, एक शाहरुख खान सोडला तर प्रत्येक मुंबईकर ‘बिच्चारा’ झोपडपट्टीत राहतो असे या परदेशी पाहुण्यांना वाटते. धोबीघाट बघून आलेला माणूस पुढच्या व्यावसायिक दौर्‍याच्या वेळी आपापले बेडशीट्स आणि टॉवेल घेऊनच भारतात येतो. 
 
(लेखिका आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ असून, ग्योथे इन्स्टिट्यूट मार्क्‍स म्यूलर भवन येथे विपणनप्रमुख (कॉर्पोरेट ट्रेनिंग) म्हणून कार्यरत आहेत.)