जीवनस्पर्शी
By Admin | Updated: September 6, 2014 14:23 IST2014-09-06T14:23:05+5:302014-09-06T14:23:05+5:30
स्वत:ला अपूर्ण मानणार्या म. गांधीजींच्या नम्रतेने विनोबांना प्रभावित केले. बापू स्थितप्रज्ञतेच्या जवळ पोहोचले आहेत, असे त्यांना जाणवले. आश्रमात बापूंच्या सान्निध्याने, बापूंच्या जीवनाच्या स्पर्शाने विनोबा एका नव्या रूपात जन्माला आले. येत्या ११ सप्टेंबर रोजी त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने..

जीवनस्पर्शी
- वासंती सोर
सर्व आश्रमवासी महात्मा गांधींना प्रेमादराने बापू म्हणत आणि विनायक नरहरी भावे हा युवक साबरमती आश्रमात दाखल झाल्यावर बापूंनी प्रेमाने त्यांचे नामकरण विनोबा भावे केले. ज्ञानोबा, तुकोबा या संतपरंपरेत स्थान मिळवून विनोबांनी ते नाव सार्थ केले. विनोबा बापूंना कधी भेटलेही नव्हते. दर्शनही घेतले नव्हते, तरीही त्यांनी बापूंचे वेगळेपण टिपले आणि हे वेगळेपण पुढे अधिकाधिक प्रत्ययाला येत गेले.
आध्यात्मिक शांतीचा ध्यास घेऊन विनायक नरहरी भावे हा युवक घर सोडून हिमालयाच्या दिशेने निघाला होता. वाटेत त्याचा मुक्काम काशीला होता. तिथे त्याने काशी विद्यापीठाच्या उद्घाटनाप्रसंगी बापूंनी दिलेले व्याख्यान वाचले. बापूंचे वेगळेपण त्या व्याख्यानातूनच त्याला जाणवले. व्याख्यानाच्या संदर्भात त्याच्या मनात काही शंका निर्माण झाल्या. बापूंना पत्र पाठवून त्याने आपल्या शंका त्यांच्यासमोर ठेवल्या. बापूंचे सविस्तर पत्र आले. तरीही चिकित्सक विनायकाच्या मनात काही शंका शिल्लकच होत्या.
त्याने पुन्हा पत्र पाठविले. उत्तरात बापूंनी लिहिले, ‘‘पत्रानं तुमच्या शंकांचं समाधान करता येणार नाही. त्यासाठी जीवनाला स्पर्श हवा. समाधान चर्चेनं नव्हे, तर जीवनानं होईल. तुम्ही साबरमती आश्रमात या.’’ पत्रासोबत आश्रमाच्या नियमावलीचे पत्रक होते. इथेच जीवनाच्या स्पर्शाची सुरुवात झाली. नियमावलीत आश्रमवासींसाठी काही व्रतांचे पालन अनिवार्य मानले होते. भारतीय परंपरेत आध्यात्मिक साधनेसाठी, मुमुक्षूसाठी व्रतपालन आवश्यक मानले आहे. हे विनायकाला माहीत होते. त्याला वाटले, हा माणूस वेगळाच दिसतोय. अन्यायनिवारणासाठी करायच्या अहिंसक सत्याग्रहींसाठी हा व्रतपालन आवश्यक मानतोय. जीवनाला झालेला आश्रमी जीवनाचा पहिला स्पर्श विनायकाला चकित करून गेला. विनायक आश्रमाचा रहिवासी झाल्यावर आश्रमवासींचा व्रतपालनाचा प्रयत्न त्याने पाहिला. बापूंच्या जीवनात तर त्याने व्रतपालनाची पराकाष्ठाच पाहिली. जीवनाला होणारा स्पर्श अधिक गहिरा झाला.
विनायकाला लहानपणापासून दोन गोष्टींचे आकर्षण होते. बंगालची क्रांती आणि आध्यात्मिक शांती. क्रांती व शांतीचे दर्शन त्याला एकाच ठिकाणी बापूंमध्ये झाले आणि शंकानिरसनासाठी बापूंच्या भेटीला आलेला विनायक साबरमती आश्रमाचा रहिवासी होऊन विनोबा झाला. आश्रमातील त्या दोघांच्या पहिल्या भेटीतून जीवनाला होणार्या स्पर्शाने याला एक वेगळेच दर्शन झाले. विनोबा बापूंच्या भेटीला गेले, तेव्हा बापू स्वयंपाकघरात सुरीने भाजी चिरत होते. आफ्रिकेतील सत्याग्रहात सफलता मिळवून आलेला एवढा महान पुढारी भाजी चिरतोय, हे बघून विनोबा पुन्हा चकित झाले. विनोबांचा गीतेचा अभ्यास होता. त्यातून कर्माची अनिवार्यता त्यांना कळली होती; पण इथे बापूंच्या जीवनात त्याचे दर्शन झाले. बापूंनी एक सुरी त्यांना दिली. विनोबा म्हणतात, की आजपर्यंत त्यांनी अभ्यासाशिवाय कुठलेच काम केले नव्हते. त्यांना भाजी चिरता येणे शक्यच नव्हते. बापूंनी तेही शिकवले. न बोलता, जीवनातून ज्ञानयोगी विनोबांना बापूंनी कर्मयोगाची दीक्षा दिली. शंकानिरसनासाठी आलेले विनोबा बापूंजवळच राहिले. दोघांमध्ये अनोखे सौहार्द निर्माण झाले. आश्रमवासी होण्याच्या संदर्भात विनोबा म्हणतात, ‘‘मी बापूंना भेटलो आणि त्यांच्यावर मुग्ध झालो. बापूंच्या सत्यनिष्ठेत मला कुठलीही उणीव, न्यूनता, कमतरता दिसली असती तर मी त्यांच्याजवळ टिकलोच नसतो.’’
स्वत:ला अपूर्ण मानणार्या बापूंच्या नम्रतेने विनोबांना प्रभावित केले. बापू स्थितप्रज्ञाच्या लक्षणांच्या जवळ पोहोचले आहेत, असे त्यांना जाणवले. ते म्हणतात, ‘‘बापूंच्या आश्रमात जे काही मला मिळालं, ते आजवर माझ्या उपयोगाला आलं. बापूंचा आश्रम मला दृष्टी देणारं मातृस्थान आहे.’’ आश्रमात बापूंच्या सान्निध्याने, बापूंच्या जीवनाच्या स्पर्शाने विनोबा एका नव्या रूपात जन्माला आले. बापूंनी विनोबांच्या शारीरिक स्वास्थ्याचीही काळजी त्यांनी केली. त्यांचा विश्वास विनोबांनी संपादन केला म्हणून तर व्यक्तिगत सत्याग्रहाच्या वेळी पहिला सत्याग्रही म्हणून बापूंनी विनोबांची निवड केली.
विनोबांनी कधीच कोणाला गुरू मानले नाही. त्यांनी बापूंनाही गुरुपद बहाल केले नाही. त्यांनी बापूंना पितृपद बहाल केले. तसा उल्लेख त्यांनी एका पत्रात केला. त्या पत्राच्या उत्तरात बापू लिहितात, ‘‘तुझी श्रद्धा आणि भक्ती माझ्या डोळ्यांत पाणी आणते. तुझ्यासारख्याचा पिता होण्याची पात्रता माझ्यात नाही. ती पात्रता प्राप्त करण्याचा मी प्रयत्न करीन.’’ बापूंच्या नम्रतेचा हा स्पर्श मोलाचा होता.
आश्रमात आल्यानंतर विनोबा सर्वार्थाने घडत गेले. या घडण्याबद्दल ते स्वत: म्हणतात, ‘‘मी जंगली जनावर होतो. बापूंनी मला पाळीव प्राणी केलं. मी एक ओबडधोबड पाषाण होतो. बापूंनी त्यावर कारागिरी केली आणि मला माणूस केलं.’’ हे घडणे पत्रव्यवहारातून किंवा उपदेशातून झाले नव्हते. ते घडले जीवनाच्या स्पर्शातून.
(लेखिका ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्या आहेत.)