लाईफ इज ब्युटिफूल
By Admin | Updated: May 24, 2014 13:15 IST2014-05-24T12:43:34+5:302014-05-24T13:15:56+5:30
गिडो एक गमत्या माणूस. तो कुठलीच गोष्ट सिरियसली घेत नाही. हसावं, खिदळावं आणि मजेत राहावं, असा त्याचा दिलखुलास स्वभाव.

लाईफ इज ब्युटिफूल
- मोंताज
- अशोक राणे
गिडो एक गमत्या माणूस. तो कुठलीच गोष्ट सिरियसली घेत नाही. हसावं, खिदळावं आणि मजेत राहावं, असा त्याचा दिलखुलास स्वभाव. येताजाता कुणाच्या खोड्या काढाव्यात, त्यालाही हसवावं. गिडो काहीसा असा मस्कर्या वृत्तीचा. सभोवती दुसर्या महायुद्धाचे वातावरण तापू लागलेले. क्रूरकर्मा नाझी ज्यूंच्या जिवावर उठलेले. गिडोही ज्यूच आणि आणि तरीही त्याच्यात काही फरक नाही पडत. तो तसाच. नाझींच्याही नकला करणारा.
गिडोचं पुस्तकाचं दुकान आहे. नाझींनी त्याला ते बंद करायला लावलंय. गिडोला त्यानेही फरक पडलेला नाही. कुठल्याही परिस्थितीत चांगलं आणि हसतखेळत, मजेत कसं जगावं, याचं रहस्य जणू त्यालाच उलगडलेलं.
गिडोला प्रथमदर्शनीच पेशाने शिक्षिका असलेली डोरा मनापासून आवडली आहे. लव्ह अँट फस्ट साईट अशी त्याची अवस्था झालीय. तो तिच्या प्रेमात पडलाय. ती मात्र त्याला प्रतिसाद देत नाही. ती काहीशी गंभीर प्रकृतीची. तिला हा गिडो विदुषकी चाळे करणारा वाटणं स्वाभाविक आहे. त्याला ते कळतंय. जाणवतंय, पण वळतंय कुठं..? तो तसाच, आपल्याच दुनियेत मस्त रमलेला मनमौजी! ती दाद देत नाही तसा तो तिला पटवण्यासाठी नाना उपद्व्याप करतो. जेणेकरून तिला आपल्याकडे आकर्षित करू शकेल. आरंभी काय वेडा माणूस आहे, अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहणार्या डोराला आता तो आवडू लागतो. चाणाक्ष गिडोला ते सहजी कळतं. ज्या उद्धट आणि गर्भश्रीमंत सरकारी अधिकार्याशी त्याचं वाजलेलं असतं, त्याच्याशीच डोराचं लग्न ठरतं. तिचा साखरपुडा ठरतो आणि त्या साखरपुड्यातून गिडो सर्व पाहुण्यांसमोरून डोराला पळवून नेतो. डोराला पळवून नेणं सहजपणे फिल्मी वाटेलही; परंतु गिडोची व्यक्तिरेखा पाहता हे सारं असंच काहीसं गमतीशीर घडू शकेल, हे जाणवावं.
डोराच्या साखरपुड्याची पार्टी सुरू आहे. डोरा आणि तिच्या भावी पतीवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. वाईनचे ग्लास निनादत आहेत. हास्यविनोद चालला आहे.. आणि अगदी अनपेक्षितपणे गिडो तिथे येतो. असातसा नाही. चक्क घोड्यावरून.. आणि घोडा त्याचा हिरव्या रंगाने रंगलेला. स्लोमोशनमध्ये गिडो घोडा मेजवानीच्या टेबलावरून पलीकडे उडवतो. डोराला उचलून पुढय़ात बसवतो आणि निघून जातो. या अनपेक्षित आणि अजब हल्ल्याने सारीच मंडळी चाट पडतात.
घोडा डौलत पुढे जाताना दिसतो. मग समोर एक घर दिसतं. गिडो घोडा थांबवतो. बॅकग्राउंडला घर आणि फोरग्राउंडला थांबलेला घोडा. डोरा उतरते. घरात जाते. मागोमाग गिडोही जातो. कॅमेरा जाणवेल न जाणवेल, असा ट्रॉली शॉटच्या आधारे हलकेच पुढे जात राहतो. हळूहळू घोडा दिसेनासा होतो.. आणि मग आतून एक पाचेक वर्षांचा गोड मुलगा जिथे घोडा थांबला त्या दिशेने येतो. मघा कॅमेरा ज्या गतीने पुढे सरकला होता त्याच गतीने मागे सरकतो आणि घोड्याच्या जागी सायकल दिसते. मुलाच्या मागोमाग डोरा येते. मघा आत गेली तेव्हा ती साखरपुड्याच्या भरजरी वेषात होती. आता ती एखाद्या साध्या मध्यमवर्गीय गृहिणीच्या रूपात असते. मागोमाग गिडोही येतो. तोही आता मघाच्या सुपरहिरोच्या वेषात नाही. तो त्याच्या नेहमीच्या पोषाखात. तो सायकल उचलून वळवतो. पोरगा हँडलला लावलेल्या सीटवर बसतो. डोरा मधल्या दांडीवर आणि आपल्या सीटवर बसत गिडो सायकल हाणतो. तिघांचं ते छोटं कुटुंब सुखी कुटुंब सायकलवरून जाताना दिसतं.
पुढे मोठय़ा प्रमाणात ज्यूंची धरपकड होते. त्यांना मोठाल्या वॅगन ट्रेनमधून कॉन्स्ट्रेशन कॅम्पवर नेलं जातं. गिडोबरोबर त्याचा मुलगा योशुआही असतो. छोट्या योशुआला अजून नेमका प्रकार कळलेला नाही आणि गिडो त्याला तो कधीच कळू देत नाही. तो योशुआला सांगतो, हा एक खेळ चाललाय. यात ज्याला एक हजार पॉइंट्स मिळतील त्याला टँक मिळणार आहे. रडलास, तक्रार केलीस, आईची आठवण काढलीस, तर दर वेळी एकेक पॉइंट कापला जाईल. म्हणजे मिळवलेले पॉइंट्स कमी होतील. योशुआ मनापासून सगळं ऐकतो आणि तसाच वागतो. गिडो एकेक हिकमती करीत योशुआपासून भोवतालचं वास्तव दूर ठेवतो. त्याच्या निरागस बालमनावर किंचितसाही चरा उमटू देत नाही. अखेर महायुद्ध संपत येतं. परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, हे लक्षात येताच नाझी बिथरतात. गिडो योशुआला एका बॉक्समध्ये लपून राहायला सांगतो. इकडे इतर काही ज्यूंबरोबर गिडोला फाशी द्यायला नेलं जातं. त्या वेळी तो योशुआ लपून बसलेल्या बॉक्सकडे पाहतो. योशुआदेखील त्याला पाहत असतो. योशुआ दिसेनासा होईपर्यंत तो त्याच्या नेहमीच्या पद्धतीने गमत्याजमत्या करीत राहतो. इकडे योशुआला हसू येतं. ते त्यांचं एकमेकांना अखेरचं पाहणं. नंतर अमेरिकन सैन्य येतं. ज्यूंची सुटका करतं. एक अमेरिकन सैनिक योशुआला टँकच्या पुढच्या भागात टपावर बसवतो. मुक्त झालेल्या ज्यूंच्या गर्दीत योशुआला त्याची आई दिसते. मायलेकाची भेट होते.
इटालियन सिनेमात कामे करत जेमतेम तिथेच थोडीफार लोकप्रियता मिळवणार्या रोबटरे बेनिग्नी याने दिग्दर्शित केलेल्या ‘लाईफ इज ब्यूटिफुल’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाने जगभर नाव मिळवलं. त्याला सवरेत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर प्राप्त झाला. शिवाय सवरेत्कृष्ट परदेशी सिनेमा आणि सवरेत्कृष्ट संगीत असेही दोन ऑस्कर या चित्रपटाने मिळवले. एकूणच जगभर त्याचा गाजावाजा झाला.. आणि काही प्रमाणात कठोर टीकाही झाली. पहिला आणि मुख्य आरोप होता, की त्याने दुसरं महायुद्ध आणि नाझींनी केलेलं ज्यूंचं निर्दयी हत्याकांड याचं विडंबन केलं. त्याची खिल्ली उडवली.
दुसरं महायुद्ध आणि नाझी यावर आजवर असंख्य चित्रपट बनले. सत्तर वर्षं होत आलीत आणि अजूनही चित्रपट बनताहेत. ते भयाण वास्तव पुन्हा पुन्हा या चित्रपटातून समोर येतंय. परंतु, एखाद्या रोबटरे बेनिग्नीला याच भयाण वास्तवाकडे वेगळ्या नजरेने पाहायचं असेल, तर कुणी हरकत का घ्यावी. बेनिग्नीचे वडील या युद्धात तीन वर्षे लढत होते. ते कधी घरी आले, की आपल्या मुलांपासून हे सारं वास्तव दूर ठेवत. त्यांच्या कोवळ्या, निरागस मनावर कसलेही ओरखडे पडू नयेत, याची ते दक्षता घेत. बेनिग्नीने वडिलांच्या याच भूमिकेवर आपला चित्रपट बेतलाय. त्यात तो कुठेही ना युद्धाची ना दुर्दैवी ज्यूंची चेष्टा करतो. काही गोष्टी त्याने हलक्या फुलक्या पद्धतीने दाखवल्या. परंतु, त्याचा कुठेही कुणाची कणभर खिल्ली उडवण्याचा हेतू नव्हता.. आणि तरीही काहींनी तशी टीका केली. कारण त्यांनी सतत भयानक अस्वस्थ करणारेच चित्रपट पाहिले.
हैदराबाद येथे भरलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा समारोपाचा चित्रपट म्हणून दाखविण्यात आला. मी तिथेच तो पाहिला. बाराशे आसनव्यवस्था असलेलं रामकृष्ण थिएटर हाऊसफुल्ल होतं. वर वर्णन केलेला साखरपुड्यानंतरचा प्रसंग जेव्हा पडद्यावर पाहिला, तेव्हा सबंध थिएटरमधून ‘व्हॉव’ अशी प्रतिक्रिया उमटली होती. चित्रपट भाषेच्या त्या विलक्षण आविष्काराला ती तमाम प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद होती. क्वचितच येणारा तो अनुभव होता.
खूप वेळ गेलाय हे दाखवण्यासाठी कधी अनेक शॉट्स घेतले जातात आणि इथे पाचसात वर्षांचा काळ एकाच शॉटमध्ये दाखवलाय. घोड्यावरून उतरून डोरा आणि गिडोचं घरात जाणं आणि काही वेळात योशुआसह बाहेर येणं. एकच शॉट. फक्त ट्रॉलीचा वापर करून त्याद्वारा थोडा वेळ वापरणं आणि नाटकात जसं ब्लॅकआऊट मध्ये पात्रं विंगेत जातात आणि काही वेळांत गेटअप बदलून बाहेर येत काही काळ पुढे सरकल्याचा फील देतात. तोच प्रकार इथेही करण्यात आलाय. सिनेमा आणि नाटकाचं तंत्र वापरून त्यांच्या संयोगातून काही सेकंदांत, एकाच शॉटमध्ये काही वर्षं गेल्याचा आभास निर्माण करणं हे खरोखरंच विलक्षण आणि तितकंच कौतुकास्पद! रामकृष्णमधल्या प्रेक्षकांची एकत्रित आणि एकजिनसी दाद या कलात्मक आविष्काराला न मिळती तरच नवल! कुठला कोण रोबटरे बेनिग्नी, कसली कमाल करून गेला. चित्रपटभाषेचा सुंदर वापर म्हणून हा प्रसंग आणि म्हणून ‘लाईफ इज ब्युटिफुल’ कायम स्मरणात राहील.. कायमचा!
वर म्हटल्याप्रमाणे काहींनी जो आक्षेप या चित्रपटावर घेतला तो मला कधीच पटला नाही. असतो एखाद्याचा गमत्या स्वभाव आणि पाहतोही एखादा त्या नजरेतून! म्हणून काय ते कमी प्रतीचं ठरतं! जी ती गोष्ट तिच्या अशा चौकटीत पाहिली तर नको ते प्रश्न पडत नाही, हेच खरं!
गेले वर्षभर मी या सदरातून देशातल्या, तसेच जगभरच्या सिनेमाविषयी लिहितो आहे. बर्याच वाचकांनी वेळोवेळी मला फोन करून त्यावरच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. एक प्रतिक्रिया मला फारच बोलकी आणि आश्वासक वाटली. फोनवर ते गृहस्थ म्हणाले, ‘तुमच्या लेखांमुळे इतर अनेक गोष्टींबरोबरच सिनेमा असाही असतो, हे फार महत्त्वाचं असं काही तरी कळलं.’ मला बरं वाटलं. कारण वयाच्या तेविसाव्या वर्षी जेव्हा मी पोलंडचे थोर प्रतिभावंत दिग्दर्शक आंद्रे वायदा यांचा ‘प्रॉमिस्ड लँड’ पाहिला, तेव्हा माझी अशीच प्रतिक्रिया झाली होती आणि गेल्या चाळीस वर्षांत वेळोवेळी होत आली. हा लेख लिहून होताच मी कान आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निघणार आहे. आणि तुम्ही जेव्हा हा लेख वाचाल तेव्हा तिथे अशीच एखादी कलाकृती पाहून मी पुन्हा तेच म्हणणार आहे..’ ‘चित्रपट असाही असतो!’
तुम्हा सर्व वाचकांचे आणि ‘लोकमत’ परिवाराचे मन:पूर्वक आभार!
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे
व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)
(‘मोंताज’ या सदरातील हा अखेरचा लेख असून हे सदर समाप्त होत आहे.)