मातकट राखाडी पसार्यातला एक निळसर तुकडा निवळशंख पँगाँगच्या काठी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 03:00 IST2018-07-01T03:00:00+5:302018-07-01T03:00:00+5:30
लडाखी भाषेत ‘ला’ म्हणजे खिंड. ‘त्सो’ म्हणजे जलाशय. या आठवड्याच्या प्रवासात ‘ला’ आणि ‘त्सो’ यांची रेलचेलच होती..

मातकट राखाडी पसार्यातला एक निळसर तुकडा निवळशंख पँगाँगच्या काठी..
वसंत वसंत लिमये
धुराचा त्रास होऊ नये म्हणून गाडीतला एसी सुरु होता. बंद काचातूनही हॉर्नचे कर्कश्श आवाज ऐकू येत होते. अंग आंबून गेलं होतं, धड झोपही येत नव्हती. गाडी मुंगीच्या वेगानं पुढे सरकत होती. अडीच तास होऊन गेले होते. तेवढ्यात लाइन तोडून एक हरियाणवी गाडी उजवीकडून पुढे गेली. सवयीनं तोंडून एक कचकन शिवी बाहेर पडली. चकित झाला असाल! पण नाही, आम्ही अजूनही हिमालयातच आहोत.
शनिवारी सकाळी अकराला रोहतांग पास पार करून आम्ही मनालीकडे उतरायला लागलो. गाड्यांची लांबलचक रांग. रोहतांग खिंडीतील बर्फावर खेळण्यासाठी पर्यटकांची अतोनात गर्दी जमलेली. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळी पाचपर्यंत मनाली बस स्टँड गाठणं भाग होतं. गेल्या आठवड्यातील धमाल सफर आटोपून अजित आणि मकरंद दिल्लीला निघाले होते. आम्ही कसेबसे सव्वापाचला स्टँडवर पोचलो. दुर्दैवाने बस निघाली होती! नशिबानं त्या दोघांना टॅक्सी मिळाली आणि पुढील दहा मिनिटातच त्यांनी कुल्लू रस्त्यावर बस गाठली. मी आणि अमितनं हुश्श केलं!
आम्ही सोलंग नाल्याकडे परत निघालो. ट्रॅफिक आता विरळ होता. पुढील पंधरा मिनिटातच आम्ही पलचानच्या अलिकडे वसिष्ठपाशी पोचलो. गरम चहाचा ग्लास हातात कुरवाळत, मी समोर पाहिलं तर ‘बसिष्ठ कुंड’ अशी पाटी दिसली. 1976च्या महिन्यात मी गिर्यारोहणातील बेसिक कोर्स करण्यासाठी मनालीला आलो होतो. बसिष्ठ कुंडापाशी त्याकाळी प्रेशर कुकर वापरून एक्स्प्रेसो कॉफी देणारी शकुंतलादेवी आठवली. गोरीपान, सफरचंदासारखे लाल लाल गाल आणि लुकलुकणारे निळसर डोळे असलेली, हिमाचली देखणी शकुंतलादेवी सार्या आयआयटी ग्रुपसाठी अतिशय ‘लोकप्रिय’ होती. गर्दीची बजबजपुरी झालेलं मनाली आता मागे पडलं होतं, मी पुन्हा हिमालयात पोचलो होतो.
सातव्या आठवड्यात लेह येथे संगणक त™ज्ञ मकरंद करकरे आणि बिर्ला उद्योग समूहाचे प्रमुख अर्थविषयक सल्लागार डॉ. अजित रानडे हिमायात्नेत सामील झाले. आम्ही पँगाँग आणि त्सो मोरोरी या सरोवरांच्या काठाने मनालीकडे जाणार होतो. वाटेत सहा/सात खिंडी आणि अनेक छोटे तलाव लागणार होते. लडाखसारख्या अतिउंचीवरील वाळवंटात अशी सरोवरं हा निसर्गाचा एक आश्चर्यकारक अविष्कार आहे. मक्या आणि अजित एक दिवस अगोदरच सरावासाठी लेहमधे येऊन पोचले होते. लेहपासून जवळच कार्तोक हॉटेलमध्ये आम्ही सारे भेटणार होतो. चांगली नोकरी सोडून, हिमालयातील भटकंती आणि छायाचित्नणाचा ध्यास घेऊन लेहसारख्या ठिकाणी हॉटेल चालू करणारा आत्माराम परब नावाचा अवलिया तिथे छान ओळखीचा झाला. असं काही करणार्या मराठी माणसाचं विशेष कौतुक.
पुढील प्रवासात आम्ही आग्नेय दिशेकडे सरकणार होतो. लेह मनाली हायवेवरील ‘कारु ’ या ठिकाणी डावा फाटा घेऊन आम्ही दुर्बुककडे निघालो. वाटेत ‘चांग ला’ ही 17,688फुटांवरील खिंड ओलांडली. ‘ला’ म्हणजे लडाखी भाषेत खिंड. विरळ हवामानाचा कुठलाही त्नास न होता मक्या आणि अजित मजेत होते. खिंड उतरतांना ‘त्सोल्ताक’ नावाचा छोटा तलाव लागून गेला. लडाखी भाषेत ‘त्सो’ म्हणजे जलाशय. दुर्बुक हे अक्साई चीनच्या अगदी जवळ असल्यानं त्याचं लष्करी महत्त्व खूप मोठं आहे. चिक्कीच्या गरम सरबरीत मिश्रणातून उलथन्याने कोरून काढल्या प्रमाणे भासणारे हे रस्ते भल्याभल्यांच्या पोटात अनेकदा गोळा आणतात. हिमालयातील, विशेषतर् लडाखमधील रस्ते हे एक आश्चर्य आहे. ठिसूळ पर्वत, खोल दर्या , रात्न आणि दिवसाच्या तापमानातील प्रचंड फरक आणि हिवाळ्यामुळे सहा महिने बंद असणारे हे रस्ते मुळात बांधणं आणि त्याची सतत डागडुजी करत राहणं, हे अचाट काम इफड म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन वर्षभर विनातक्र ार करत राहतात. पूर्वी रस्त्यावरील ं इफड च्या गमतीशीर पाट्या वाचून मी हसत असे, पण या सार्या प्रवासात निमलष्करी इफड बद्दलचा माझा आदर अनेकपटीनं दुणावला. पडद्याआडचे कलाकार अनेकदा उपेक्षित राहतात, हे मात्न खरं!
मंगळवारी सकाळी दुर्बुकहून आम्ही पँगाँग सरोवराकडे निघालो. ‘मगलुब’ जवळ एक सुकलेलं सरोवर लागून गेलं. रस्ता आता दोन डोंगरातील दरीतून वर चढून उतरू लागला. आणि अचानक तो पँगाँगचा चमत्कार दिसला..
थक्क करणारं निवळशंख सौंदर्य!
पँगाँग सरोवराच्या काठाने वीसेक किमी प्रवास स्वप्नवत होता. त्या रात्नी चुशुल येथे मुक्काम करून आम्ही बुधवारी हानले येथील वेधशाळा पाहण्यासाठी निघालो. वाटेत ‘त्सागा ला’ पार केला. गुरूवारी ‘त्सो मोरोरी’कडे निघालो. पँगाँगच्या तुलनेनं ‘त्सो मोरोरी’ बराच लहान आहे. या आठवड्यात ‘ला’ आणि ‘त्सो’ यांची रेलचेल होती. सात/आठ तलाव आणि खिंडी आम्ही पार केल्या. ‘त्सो मोरोरी’ नंतर ‘त्सोकर’ तलाव लेह मनाली हायवेकडे जातांना वाटेत लागतो. तलाव खूपसा आटल्यासारखा दिसत होता. त्याच्या काठावर, चहूकडे हिमाप्रमाणे भासणारा सुकलेल्या क्षाराचा पांढरा थर होता. इथून पुढे आम्ही ‘पांग’ येथे ‘पद्मा’ ढाब्यावर तंबूत मुक्काम केला. पद्मा मालकीण आणि ‘त्सेरींग’ ही लहान बहिण, अशा दोघी मोठ्या तडफेनं अश्या आडवाटेच्या ठिकाणी ढाबा चालवतात याचं कौतुक वाटलं.
‘पांग’हून निघाल्यावर गाडी एका खोल दरीच्या कडेनं जाऊ लागली. दोन्ही बाजूस उंच पहाड आणि त्यापाठीमागून डोकावणारी चमकदार हिमाच्छादित शिखरं. मातकट उतारावर पहारेकर्याप्रमाणे, कधीही कोसळतील असं वाटणारे सुळके उभारलेले. तांबूस, काळसर, लाल आणि जांभळ्या कुंचल्यांनी रंगविलेले भयावह कडे, कपारीतून फेसाळत उतरणारे प्रपात. हे सारं अनुभवत असतांना वाटेत अनेक ठिकाणी फुटक्या बाटल्या, प्लॅस्टिकचा कचरा नजरेवर आघात करून गेला. शासकीय प्रयत्न फारच दुबळे आणि तोकडे आहेत. प्लॅस्टिकच्या वेष्टणातील पदार्थाचा आनंद घेतल्यावर तेच वेष्टण कसलाही विचार न करता कुठेही फेकून देताना, आपण काहीतरी चुकतोय हा विचारच अनेकांच्या मनाला शिवत नाही. तीस वर्षांनंतर भेट देत असलेल्या अनेक ठिकाणी या ‘प्रदूषणा’च्या भस्मासुरानं घातलेलं थैमान पदोपदी जाणवलं. हिमालयात, विशेषतर् लडाखमध्ये जाणवलेली गोष्ट म्हणजे हा निसर्ग नाजूक आहे, क्षणभंगुर तकलादू आहे. हिमालयाच्या मी प्रेमात होतोच, पण या ‘हिमयात्ने’त प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे आपण भारतीय किती भाग्यवान आहोत! क्वचित हलगर्जीपणानं माझ्या हातूनही प्लॅस्टिक गाडीबाहेर फेकून देण्याचा प्रमाद नकळत घडला आहे. माझ्यासाठी ‘हिमयात्रे ’च एक फलित म्हणजे हे ‘पाप’ माझ्या हातून पुढे कधी घडणार असा मी केलेला निश्चय!
हिमालयाचं सौंदर्य अनुभवण्यासाठीच आपण हिमालयात येतो. हिमालयाचं अप्रतिम सौंदर्य, हे अलौकिक भाग्य हा आपल्याला मिळालेला ठेवा आहे आणि तो जपून ठेवून पुढल्या पिढ्यांच्या हाती देणं नितांत गरजेचं आहे!
***
भारत चीन सीमेवर, वायव्येकडून पूर्वेकडे सुमारे 155 किमी पसरलेलं पँगाँग सरोवर म्हणजे जणू समुद्रच आहे. त्यातील 40 किमी भारतात तर बाकी चीनमधे. त्याच्या भेटीची आस लागलेली असताना अचानक दूरवर आजूबाजूच्या मातकट राखाडी पसार्यात एक निळसर तुकडा दिसला. पंधरा मिनिटात आम्ही निळ्या विस्तीर्ण पँगाँग सरोवराच्या काठी होतो. जवळ पोचताच ‘निवळशंख’ या शब्दाचा अर्थ प्रथमच पुरेपूर उमगला. 15000 हजार फुटांवर, त्या शुष्क वाळवंटात, क्षारयुक्त जलाशय असणं हे आश्चर्यकारक आहे. हिमालय समुद्रातून उद्भवला याला पुष्टी देणारं हेही एक कारण असू शकेल.
काठावर खूप गर्दी होती. उन्हाळी सुट्यांमुळे लोकप्रिय ठिकाणी हे अपेक्षितही होतं. लाल, निळ्या, हिरव्या कुल्ल्यांच्या अनेक खुच्र्या, दोन पिवळ्या व्हेस्पा आणि लाल हेल्मेट्स आणि ‘तसे’ फोटो काढून घेण्यासाठी अहमहमिकेनं सरसावणारे अनेक ‘इडियट्स’. अजित, मक्या आणि मी आयआयटीचे आणि तसे वेगळ्या अर्थानं ‘इडियट्स’च, पण बॉलीवूडचा हा प्रभाव थक्क करणारा होता. मागे पसरलेलं अफाट सौंदर्य विसरून स्वतर्तच मश्गुल असलेली गर्दी पाहून थोडी खंत वाटली, पण मी मात्न त्या निळाईच्या, अनेक रंगछटांच्या विस्तीर्ण आविष्कारात हरवून गेलो होतो!
(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)