नाते आकाशाशी

By Admin | Updated: August 9, 2014 14:13 IST2014-08-09T14:13:33+5:302014-08-09T14:13:33+5:30

बालपणी आकाशाशी असलेले नाते वय वाढले तरी तुटले नाहीच! आजही जरा निवांतपणा मिळाला, की पटकन नजर विरंगुळ्यासाठी आकाशाकडेच वळते. आकाशाचे रितेपण ही माझ्यासाठी भावजीवनातलीच जणू पोकळी ठरली आहे.

Kinship ascends | नाते आकाशाशी

नाते आकाशाशी

- डॉ. नीलिमा गुंडी

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. आकाश खूप भरून आले होते. गडगडाट होत होता. अधून-मधून विजा चमकत होत्या. अशीच एक वीज चमकली आणि घरात कॅमेर्‍याच्या फ्लॅशसारखा प्रकाश पडला. ‘‘आई, आई, आकाश कसं माझा फोटो काढतंय बघ!’’ त्या वेळी छोटी असलेली माझी लेक म्हणाली होती. तेव्हा तिच्या डोळ्यांत डोकावून पाहताना मला दिसत राहिले माझ्या मनातले बालपणीचे आकाश!
लहानपणी ऐकलेल्या गाण्यांतून, गोष्टींतून आकाशाशी माझे खास लडिवाळ नाते जडलेले होते. आकाशातला तो काळ्या ढगांचा बागुलबोवा, त्यातली ती न दिसणारी दळण दळणारी म्हातारी, तो दिवसा लपून बसणारा चांदोमामा. त्या आकाशातल्या सार्‍या रहिवाशांशी माझी लहानपणी गट्टी जमली होती. आकाशाबरोबर मनात बांधलेल्या स्वप्नसृष्टीत चमचमत्या चांदण्यांबरोबरच आणखीही अद्भुत गोष्टींना जागा होती. 
आकाशाच्या वर-अगदी-स्वर्ग असतो, हे तेव्हा मनात बिंबलेले होते. उंच इमारतीवरून उंच उडी घेऊन कधीतरी स्वर्गात जाता येईल, अशी त्या वेळची मनाची कल्पना असे. स्वर्गातल्या सदा सतेज असणार्‍या बागेचे-नंदनवनाचे फार आकर्षण वाटे. आपल्याला कधीही न दिसणारी; पण भूगोलाच्या तासाला शाळेत शिकवली जाणारी असंख्य देशांमधली असंख्य गावे जर जगात खरीखुरी असतात, तर मग स्वर्गही असणारच, असा साधा तर्क असे! दिवस, रात्र अशा वेगवेगळ्या प्रहरी, तसेच वेगवेगळ्या ऋतूंत कात टाकणारे आकाश एकटक पाहत राहण्याचा छंदच त्या वयात जडला होता. ढगांचे सतत बदलणारे रंग नि आकार पाहताना सार्‍या जगाचा विसर पडत असे. ढगांबरोबर मनाने प्रवास करणे म्हणजे मनाला जगप्रवासासाठी मुक्तद्वार मिळण्याचा सुखद अनुभव असे. आकाशात उडणार्‍या गोष्टींमध्ये सगळ्यात खाली नाजूक फुलपाखरे, त्यावर छोटे पक्षी, त्याच्यावर घार, गरूड असे मोठे पक्षी, त्याच्याहीवर विमाने आणि सर्वांत वर ढगांचे थवे असत आणि या सार्‍या दृश्यात माझेही कल्पनांच्या पंखांनी उडणारे मन सर्वांत वरच्या पातळीशी असे!
..मात्र कधी तरी एक दिवस माझ्या मनातल्या त्या आकाशाला तडा गेला. वाढत्या वयात विश्‍वाच्या स्वरूपाचे शास्त्रीय ज्ञान होत गेले. तेव्हा कळले, की आकाश ही एक निव्वळ पोकळी आहे. ‘आकाश’ म्हणून आपण जी मनात घुमटासारखी रेषा आखून घेतलेली असते, ती प्रत्यक्षात नाहीच आहे! सदैव मायेची पाखर करणारे, सनातन असे आकाश जेव्हा मायावी आहे, हे कळले, तेव्हा जमिनीत पाय घट्ट रुतले गेले. मनातली सारी स्वप्नसृष्टीच खचली. अवकाशाच्या त्या अजस्र पोकळीत जीव घुसमटू लागला. आकाशाचे रितेपण ही माझ्यासाठी भावजीवनातलीच जणू पोकळी ठरली.
एखाद्या गोष्टीभोवती आपण मनातल्या मनात कल्पनांचे वेढे देत असतो. बघता-बघता पोकळीभोवतीही सुंदर कोश तयार होतो. तसेच माझे आकाशाबाबत झाले होते. आपणच भोवतालच्या अनेक गोष्टींना अर्थ देत राहतो आणि त्यांच्याशी आपले नाते जोडत असतो. हा आपला ‘संस्कृती’ रचण्याचा सुंदर खेळ त्या वयात मला कळणे शक्य नव्हते. त्यामुळे कल्पनांच्या कोषातून बाहेर पडताना मला त्या वयात त्रासच झाला.
हळूहळू समज येत गेली, तसतसे आणखीही धक्के पचवावे लागले. मग उत्तुंग इमारतींच्या मागून अधूनमधून चिरफळ्या उडालेले आकाश पाहता येऊ लागले. प्रदूषणामुळे धुराने कोंदलेले आकाश बघण्याची सवय झाली. आपण उदास असतानाही अंगभर चांदण्या मिरवत हसणारे आकाश शांतपणे स्वीकारता येऊ लागले.
इतकं होऊनही आकाशाशी असलेले, नाते पुरते तुटले नाहीच! आजही जरा निवांतपणा मिळाला, की पटकन नजर विरंगुळ्यासाठी आकाशाकडेच वळते. मध्यंतरी शीतल महाजनने पक्ष्याचा पोशाख चढवून उंच आकाशातून उडी मारल्याचे वृत्त तिच्या फोटोसकट पाहिले. सुनीती विल्यम्सने तर ‘स्पेस वॉक’ करून अवकाश अक्षरश: पादाक्रांत करायचा पराक्रम केल्याचे वाचले. तिची नि तिच्या आधीच्या कल्पना चावलाची अवकाशभरारी म्हणजे तर आकाशाच्या विराटपणाशी खेळ खेळण्याचाच थरारक प्रकार होता. एरवी आपल्या मनात आकाशाचे विराटपण दडपण आणत असते, अगदी विंदा करंदीकरांनी कवितेत म्हटलंय तसे - ‘आकाशाचे वजन भयंकर’! तेच खरे!
आकाशाचे ते विराटपण त्याच्या पोकळीसकट जणू फुलासारखे उमलून येत असल्याचा अनुभवही मला आला, तो मर्ढेकरांची एक कविता वाचताना! ‘या गंगेमधि गगन वितळले’ या त्यांच्या कवितेतून गंगेच्या काठी मर्ढेकरांना आलेला साक्षात्कारासारखा दुर्मिळ अनुभव व्यक्त झाला आहे. ‘शुभाशुभाचा फिटे किनारा’ असा अनुभव त्यांना आला. त्या अनुभवाचे अलौकिकपण सांगताना त्यांनी ‘गगनगंध’ हा सुंदर शब्द वापरला आहे. या शब्दामुळे आकाशाची नव्याच रूपात ओळख झाली. ‘गगन’ आणि ‘गंध’ या दोन शब्दांची अनुप्रासाने सहज वीण साधून तयार केलेला हा नवा शब्द म्हणजे एक प्रतिमाच आहे. अर्थाने भारलेली प्रतिमा! त्या शब्दासरशी आकाशाच्या विराट पोकळीलाही एक वेगळेच भरीवपण प्राप्त झाले. निराकाराचे अस्तित्व जाणवून देणारे, त्याच्या अणुरेणूत भरलेले, गंधाइतके तरल आणि सूक्ष्म दुसरे काय असणार? मर्ढेकरांच्या त्या ‘गगनगंध’ शब्दासरशी माझ्या मनातल्या आकाशाला एक नवेच परिमाण प्राप्त झाले. आकाश पुन्हा एकदा माझ्यासाठी भरून आले..
(लेखिका ज्येष्ठ समीक्षक आहेत.)

Web Title: Kinship ascends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.