किंग ऑफ इंडियन रोड
By Admin | Updated: May 31, 2014 16:42 IST2014-05-31T16:42:09+5:302014-05-31T16:42:09+5:30
अँम्बेसीडर कार हे नुसते नाव नव्हते, तर तो एक स्टेटस सिम्बॉल होता. बडे मंत्री, अधिकारी, नेते आणि लष्करी अधिकारी यांची प्रतिष्ठा जपण्याचे काम या गाडीने इमाने इतबारे केले. पण, काळाच्या प्रवाहात, स्पर्धेत ही गाडी मागे पडली व आता तर तिचे उत्पादन बंद होऊन अॅम्बेसीडर युगाचा अस्त होत आहे..

किंग ऑफ इंडियन रोड
अनंत सरदेशमुख
किंग ऑफ इंडियन रोड’ २४ मेपासून भूतकाळात विलीन झाला. किंवा असे म्हणणे जास्त सयुक्तिक राहील, की भारतीय रस्त्यांवरील, सुमारे ६0 वर्षे भारतीयांच्या हृदयात घर करून राहिलेली, सर्वांची लाडकी बेगम आता खूप खंगल्यामुळे आपले हे साम्राज्य सोडून गेली आहे. तिच्या पाऊलखुणा अजून अनेक वर्षे भारतातील तिच्या या साम्राज्यात नक्कीच दिसत राहतील; पण त्यासुद्धा आता क्षीण होत जाणार आहेत. द्रौपदीच्या थाळीत अर्मयादपणे अन्न पुरवण्याचे सार्मथ्य होते, तसेच या बेगमकडेसुद्धा अनेकांना आपल्या पोटात सामावून घेऊन, भारतीय रस्ते (ज्यांची ख्याती ‘रस्त्यात खड्डे नाही, तर खड्डय़ांत रस्ते’ अशी आहे) पादाक्रांत करण्याचे सार्मथ्य होते. आपल्या कदाचित लक्षात आले असेल, मी असंख्य भारतीयांच्या प्रथम प्रेमाबद्दल म्हणजे अँम्बेसीडर या गाडीबद्दल बोलत आहे.
बहुतांशी पांढरी शुभ्र, सर्व मंत्री, न्यायाधीश, मोठे सरकारी बाबू, सैन्याधिकारी अनेक उद्योजकांना मोठय़ा दिमाखाने आपल्या शिरावर मानाचा तुरा म्हणजे लाल दिवा लेवून नेणार्या व त्यांची अनेक वर्षे सेवा केलेल्या या अँम्बेसीडर मोटारीचे (जिला प्रेमाने भारतीय ‘अँम्बी’ म्हणायचे) उत्पादन २४ मे २0१४पासून हिंदुस्तान मोटर्सने थांबवण्याचे ठरवले आहे. हिंदुस्तान मोटर्स ही सी. के. बिर्ला समूहातील एक खूप जुनी कंपनी. हिचे उत्पादन पश्चिम बंगालमधील उत्तरपारा या गावी होत असे. तसा या सम्राज्ञीचा दबदबा ८0च्या दशकात मारुतीचे साम्राज्य प्रस्थापित होऊ लागल्यापासून कमीच होऊ लागला होता. तशात १९९१नंतरच्या जागतिकीकरणाच्या लाटेत ही अँम्बी हेलकावे घेऊ लागली आणि खरे म्हटले, तर तिची शेवटची घरघर चालू झाली.
२00३च्या सुमारास माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सडपातळ, सुंदर, चपळ बीएमडब्ल्यूला पसंती दिली व त्यांच्या पाठोपाठ मंत्री, सरकारी अधिकारी इत्यादी वरिष्ठ लोकांनी तिच्याकडे पाठ फिरवली. अनेक उच्चभ्रू, श्रीमंत उद्योजक तर तिला आधीच सोडून गेले होते. तरीसुद्धा हिचे प्रेमी अजून आहेत व सर्वांनी बिदाई दिल्यानंतरसुद्धा तिचाच वापर करणारेसुद्धा अनेक आहेत. यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचासुद्धा समावेश होतो.
अगदी आत्ता आत्तापयर्ंत त्यांची पसंती अँम्बेसीडरलाच होती. ही भारतीय रस्त्यांवरची राणी जगातील नंबर एकची टॅक्सी म्हणूनसुद्धा बीबीसीच्या एका कार्यक्रमात प्रसिद्धीला आली.
हिंदुस्तान मोटर्स ही बी. एम. बिर्ला या सी. के. बिर्ला समूहाच्या सदस्याने स्वातंत्र्यपूर्व काळात १९४२मध्ये सुरू केलेली पहिली वाहन कंपनी. ही कंपनी प्रथम गुजरातमधील ओखा बंदर इथे फक्त मॉरिस १0 या ब्रिटिश गाड्यांची जुळवणी करत असे व त्या हिंदुस्तान १0 म्हणून विकत असे. १९४८मध्ये हा कारखाना पश्चिम बंगालमधील उत्तरपारा इथे हलला.
हिंदुस्तान अँम्बेसीडरचा प्रवास इंग्लंडमध्ये मॉरिस ऑक्सफर्ड म्हणून सुरू झाला. मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज २ हे मॉडेल प्रथम हिंदुस्तान मोटर्सने लँडमास्टर या नावाने १९५४च्या सुमारास भारतात आणले. १९५८मध्ये जेव्हा बिर्लांना आपल्या लँडमास्टरच्या जागी नवीन गाडी हवी होती, तेव्हा त्यांनी मॉरिस ऑक्सफर्ड ३ ही अँम्बेसीडर म्हणून भारतीय बाजारपेठेत आणली. तेव्हापासून ही भारतीय रस्त्यांची राणी भारतीय रस्त्यांवर राज्य करीत होती. १९६३मध्ये हिची सुधारित आवृत्ती थोडा चेहर्यामोहर्यात बदल करून अँम्बेसीडर मार्क कक म्हणून बाजारात आली. या मार्क ककच्या पहिल्या उत्पादनातील काळ्या रंगाची गाडी हिंदुस्तान मोटर्स कंपनीने पंडित जवाहरलाल नेहरूंना भेट दिल्याचे सांगण्यात येते. १९७५मध्ये अजून थोडा चेहरामोहरा बदलून याच गाडीचे रूपांतर मार्क कककमध्ये झाले. मार्क कककमध्ये डिलक्स व रेग्युलर असे दोन प्रकार होते. यानंतर आली ती १९७९मधील मार्क कश्. यात पेट्रोल व डिझेल असे दोन प्रकार आले. भारतातील ही पहिली डिझेल गाडी होती व तिचे भारतात चांगलेच स्वागत झाले. सरकार हे या गाडीचे एक मुख्य गिर्हाईक होते.
मंत्रालये असोत, न्यायालये असोत किंवा मोठी सरकारी कार्यालये, या सर्व ठिकाणी या पांढर्या गाड्यांची रांगच रांग लागलेली दिसे. नंतर तिचे नामकरण नोव्हा म्हणूनसुद्धा झाले होते. याच गाडीला इसुझू कंपनीचे इंजिन बसवून १९९२मध्ये हिने अँम्बेसीडर १८00 आयएसझेड म्हणूनसुद्धा एक अवतार घेतला होता. नंतर आली अँम्बेसीडर क्लासिक, अँम्बेसीडर ग्रँड. इतके जरी अँम्बेसीडरचे वेगवेगळे मॉडेल बाजारात आले, तरी खरी गंमत हीच होती, की १९५0ची अँम्बेसीडर व १९९0ची अँम्बेसीडर यांत फारसा काही फरक नव्हता.
फक्त वरवरचे जुजबी बदल त्यात करण्यात येत होते. २00८मध्ये या गाडीने आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला, तरी या गाडीच्या दर्जाबद्दल नेहमीच सुरस गोष्टी ऐकण्यात येत. लोक मोठय़ा मजेने म्हणत, की या गाडीत हॉर्नशिवाय इतर सर्व गोष्टी वाजतात. स्वत: बिर्ला यांनी ही गाडी त्यांच्या मुख्य विक्री अधिकार्याने सांगूनसुद्धा कधी वापरली नाही. कारण, तिच्या दर्जाबद्दल ते खूप साशंक होते. तरीसुद्धा एका काळात या गाडीकरता प्रचंड मोठी प्रतीक्षा यादी होती. या गाडीच्या जमान्यात फियाट ही एकच प्रतिस्पर्धी होती. इतर काही गाड्या बाजारात आल्या, पण फार चालल्या नाहीत. रस्त्यावर चालायच्या, त्या फक्त फियाट आणि महाराणी अँम्बेसीडर. जो बाजार सुरक्षित आहे, ज्यात स्पर्धा नाही, त्या बाजारपेठेत ग्राहकाला जे मिळेल ते घ्यावे लागते; मग त्याचा दर्जा अगदी सुमार असला तरी. अशा या सुरक्षित बाजारपेठेत अँम्बेसीडर चालली. जेव्हा बाजार खुला झाला, मारुती, सुझुकी, हुंदाई, देवू, होंडा, टोयोटा यांसारख्या कंपन्या बाजारात आल्या, ज्यांचा दर्जा, तंत्रज्ञान खूप प्रगत होते, त्यांनी बाजाराचा कब्जा घेतला.
प्रीमिअर पद्मिनीसारख्या गाड्यांचे उत्पादन बंद पडले, अँम्बेसीडर रखडत रखडत चालत होती; परंतु ग्राहकांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती. ज्या मोटारीची वार्षिक विक्री १९८0च्या दशकात सर्वोच अशी २४,000 गाड्या इतकी होती, तीच विक्री २00५च्या सुमारास फक्त ६000च्या आसपास होती. जिथे मारुती सुझुकी कंपनी दिवसाला ५000 गाड्या उत्पादित करत आहे, तिथे हिंदुस्तान मोटर्सचे सुमारे २५00 कामगार शेवटी शेवटी दिवसाला फक्त ५ गाड्या बनवत होते. कंपनीने बदल घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कंपनीचे पुनर्वसन आता शक्य नाही. म्हणून हा भारतातला स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिला असा मोटारींचा कारखाना आता टाळा लागायच्या मार्गावर आहे.
(लेखक मराठा चेंबर ऑफ कॉर्मस, इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरचे महासंचालक आहेत.)