ठेवायचं? की टाकायचं?.

By Admin | Updated: June 13, 2015 13:46 IST2015-06-13T13:46:34+5:302015-06-13T13:46:34+5:30

40वर्षे एका घरात राहिल्यानंतर दुसरीकडे जाताना पावलं जड होणारच. शिवाय एवढं सामान उरापोटावर नेऊन करणार काय? काही जणांना म्हटलं, ‘या आणि उचला हवं ते. वर्षानुवर्ष न उघडलेले हे बॉक्सेसही घेऊन जा. आवडेल ते ठेवा, नाहीतर द्या टाकून. त्यात काय होतं ते मात्र मला सांगू नका.’ घर रिकामं होत गेलं तसं अंतकरण जड झालंच!

Keep it? Keep that key ?. | ठेवायचं? की टाकायचं?.

ठेवायचं? की टाकायचं?.

- दिलीप व्ही. चित्रे

 
 
जवळ जवळ 40 वर्षे वॉशिंग्टन परिसरातल्या ज्या घरात राहिलो ते सोडून फ्लॉरिडाला यायला निघालो तेव्हा पावलं जड होणार नाहीत तर काय!
नुसतं सामान-सामान आणि सामान.
‘घर पहावं बदलून’.
पण नुसतं बदलून नव्हे, तर दुस:या राज्यात, अगदी आयुष्याच्या गोरजवेळी. मोहावर विजय मिळवणं किती कठीण आहे ते अशावेळी कळतं.
शोभानं नेण्यासाठी काढून ठेवलेली मोठमोठी भांडी मी हळूच बाजूला काढून ठेवली; तर माङया सामानातले वूलन सूट्स, ‘‘आत्ता फ्लॉरिडाच्या गरम हवेत मी काय यांचं लोणचं घालू?’’ असं म्हणून शोभानं बाजूला काढले.
वॉशिंग्टनचं घर भलं मोठं. खाली मोठं तळघर. तिथं सुधीर फडक्यांच्या गाण्यापासून ते पु. ल. देशपांडय़ांच्या वाचनार्पयत 60-70 लोकांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम झालेले. त्याच तळघराच्या भिंतीजवळ मोठासा बार; पाहुण्यांना तृप्त करणारा, त्यांची ‘तहान’ भागवणारा. तर दुस:या भागात टेबल-टेनिसचं टेबल, लॉन्ड्री रूम वगैरे. मधल्या भागात फॅमिली रूम, लिव्हिंग रूम, डायनिंग रूम, किचन आणि मागच्या बाजूला परसदारी भला मोठा वूडन डेक व त्याला वेढणारे 80-100 फूट उंचीचे मेपल, ओक, मिमोसा (शिरीश) यांचे मोठाले वृक्ष. वरच्या मजल्यावर चार बेडरूम्स. सगळं घर इतक्या वर्षात हावरेपणानं जमवलेल्या सामानानं ठक्क भरलेलं.
त्या मानानं, ज्या घरात आता रहायला जाणार ते फ्लोरिडातलं घर, तसं मोठं असलं तरी, तुलनेनं खूपच लहान. मग झाली की पंचाईत? आता काय न्यायचं, काय टाकायचं, यावर वाद अटळ नाहीत का?
बरं, वॉशिंग्टनचं घर आणि फ्लॉरिडातलं घर यांच्यामधलं अंतर जवळजवळ 1700 किलोमीटर्सचं, हे काय कमी का आहे? त्यासाठी मोठी ट्रक भाडय़ानं आणली तरी त्यात सगळं मावणार नाहीच.
मग एकदम एक परवलीचा शब्द झटकन सापडला!
‘‘डाउन सायङिांग!’’
हो, डाउन सायङिांग नाही तर काय! पण पुन्हा प्रश्न तोच. यातलं काय टाकायचं?
मी म्हटलं, हे इतक्या वर्षाचं अवजड सामान उरापोटावर नेऊन करणार काय आपण? तिकडे गेल्यावर नवीन जागेला साजेसं दुसरं नवीन घेऊ या. ‘गराज सेल’वरून जुन्या वस्तू विकणं ही अमेरिकन समाजजीवनातली पद्धत माङया रक्तात नाही. सरळ उठलो आणि जवळची 1-2 चर्चेस, चिन्मय मिशनचे लोक आणि शिव-विष्णू मंदिरातले पुजारी यांना फोन केले. म्हटलं, या आणि उचला हवंय ते. मात्र लवकर हं! कारण ‘हाजीर तो वजीर.’’
जसजसं घर रिकामं व्हायला लागलं तसतसं हृदयावरती घणाचे धाव पडत असावेत असंच वाटायला लागलं. किती गुंतलेला असतो आपला जीव सगळ्या वस्तूंमध्ये! नुसतं मुला-बाळांवर, शेजा:यांवर, माणसांवर, घराभोवतीच्या फूलझाडांवरच आपलं मन जडलेलं असतं असं नाही; तर घरातल्या प्रत्येक वस्तूंभोवती आठवणींचा एक भुंगा भिरभिरत असतो.
हे डाउन सायङिांग म्हणजे वैतागच आहे. काही वस्तूंमध्ये जीव गुंतलेला, तर काही मोहापोटी जतन केलेल्या. माङो वडील टायपिंग उत्तम करायचे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही. बडोद्याच्या गायकवाड दरबारी त्यांनी टाइप केलेला कागद नुसत्या ले-आउटवरून ओळखू यायचा. त्यांचं अक्षरसुद्धा मोत्याच्या दाण्यासारखं सुंदर-टापटीप! ते इथं माङयाकडे अमेरिकेत आले तेव्हा सोबतीला ‘अल्झायमर्स’ घेऊनच. निदान टाइपरायटरच्या कि-बोर्डमुळे त्यांच्या आठवणींना कदाचित उजाळा मिळेल या आशेनं त्यांच्यासाठी मी नवीन टाइपरायटर घेतला. पण कसचं काय! ते नुसते टाइपरायटरकडे पहात बसायचे. ते गेल्यानंतरही मी कितीतरी र्वष तो नुसता जपून ठेवला होता. पण नंतर त्याचं करणार तरी काय? शेवटी, फ्लॉरिडाला येण्यापूर्वी, डाउन सायङिांगच्या निमित्तानं तो ‘डोनेट’ करावाच लागला.
एकेक वस्तू जसजशा कमी करायला लागलो तसतसं घर रिकामं व्हायला लागलं हे खरंय, पण तितकंच अंत:करण जड होऊ लागलं. कपडेलत्ते देऊन टाकणं हे सर्वात सोपं काम. कपडय़ांच्या छान-छोकीवर माझा कधीच जीव नव्हता. मी नेहमी म्हणत असे की, ‘माणसाच्या अंगावर कपडय़ांचं सौंदर्य असण्यापेक्षा अंगात कृतीचं सौंदर्य असायला हवं.’
वॉशिंग्टनच्या वास्तव्यात कितीतरी मोठमोठे पाहुणो आले-गेले, याची गणना करणंच कठीण. माझं घर म्हणजे एक सांस्कृतिक केंद्रच होतं. लेखक असोत, कवी असोत, राजकारणी असोत, रंगभूमी अथवा चित्रपटातील नट-नटी-दिग्दर्शक असोत; माङयावरच्या लोभामुळे आमच्या घरी त्यांची हजेरी असणारच! कितीतरी गायक-गायिकांचे कार्यक्रम केले. कितीतरी विद्वानांची भाषणो आयोजित केली. त्या सगळ्यांच्या कार्यक्रमांच्या टेप्सचा एक भला मोठा बॉक्सच एका साहित्य-संगीतप्रेमी मित्रला देऊन टाकला; तर दुस:याला (रील टू रील) टेपरेकॉर्डरसुद्धा. मग सगळ्याच वस्तू डोळ्यांपुढे नाचायला लागल्या. तळघरापासून ते थेट वरच्या छपराखाली असलेल्या असंख्य वस्तूंनी भरलेले बॉक्सेस. काय करायचं याचं? कशात काय आहे तेही जर आता आठवत नसेल, इतक्या वर्षात ते जर उघडले गेले नाहीत, अन् त्यातील वस्तूंची जर गरजच लागली नाही तर आता उघडून बघायचे कष्ट तरी का घ्यायचे? एक-दोन तरुण मित्रंना बोलावलं. म्हटलं, तुमच्या मदतीची गरज आहे. मी तसं सांगितल्यावर बिचारे धावत आले. ‘‘ही खोकी उचला इथून आणि घेऊन जा.’’
‘‘कुठे नेऊ?’’
‘‘तुमच्या घरी.’’
‘‘काय आहे त्यात?’’
‘‘मला काय ठाऊक! न्या इथून, उघडून पहा, आवडलेल्या वस्तू असतील तर ठेवा, वापरा नाही तर द्या टाकून. फक्त एक करा, मला त्यात काय होतं ते सांगू मात्र नका’’ ते माङयाकडे पहातच राहिले.
मन घट्ट केलं आणि पुन्हा कामाला लागलो.
‘‘काय करायचाय हा स्लाइड प्रोजेक्टर? मग तोच देऊन टाकल्यावर नुसत्या स्लाइड्स ठेवून काय करणार?’’
‘‘मग उशा, ब्लॅन्केट्स, चादरी आणायच्या की टाकायच्या? त्यापेक्षा त्या सरळ ‘होमलेस’ गरिबांना का देऊ नये?’’ या मनातल्या विचारावर मनातच कुणीतरी हळूच म्हणालं, ‘‘तथास्तु’’.
आयुष्याच्या गोरजवेळेनुसार सगळी जीवनशैलीच बदलते. बदलायला हवीच. आणि नवीन वस्तू जमवण्याचा मोह सोडाच, पण इतकी र्वष बाळगलेल्या जुन्या वस्तूंमधलं मनसुद्धा त्यातून मुक्त करायला हवं. मुख्य म्हणजे, आपल्या मागून हा सगळा पसारा आवरण्याचे कष्ट मुलांना- इतरांना का द्यायचे? त्यांना त्यांचे संसार-आवडीनिवडी आहेतच. आणि त्यांना हवं ते घ्यायला ते समर्थही आहेत. मग त्यांनी का निस्तरायचं नंतर आपलं सगळं? तरी जीव अडकलेला असतोच. आमच्या घरात असलेल्या, माङया वैयक्तिक वाचनालयातल्या 2क्क्क्पेक्षा अधिक पुस्तकांनी भरलेले 4क् पेक्षा जास्त बॉक्सेस मी काय वाट्टेल ते झालं तरी नेणार म्हणजे नेणारच याची सगळ्यांना खात्रीच.
नारळापेक्षा मोठय़ा आकाराचा, गोल गरगरीत, शाळीग्रामासारखा तुकतुकीत काळाभोर धोंडा खूप र्वष वॉशिंग्टनमधल्या आमच्या पुढील दारच्या बागेत विराजमान झालेला. उन्हातलं, पावसातलं त्याचं रूप मला नेहमी भुरळ घालणारं. तोही आता फ्लॉरिडात येऊन स्थिरावलाय. कुठे तरी आपली नाळ जोडलेली असते ती ही अशी.
पाय निघेना, पण निघायला हवंच होतं. शेवटी दाराला कुलूप घालण्यापूर्वी घराला चहूबाजूंनी मी व शोभानं प्रदक्षिणा घातली. आणि आता गाडीत बसणार एवढय़ात वरच्या मजल्यावरच्या एका बेडरूमच्या फडताळात अगदी कोप:यात राहिलेला एक बॉक्स रोहित धावत धावत घेऊन आला.
DAd What's this? मी म्हणालो, ‘‘उघडून बघ, तुङयासाठी ठेवलंय ते!’’ त्यानं उघडलं व म्हणाला, ‘‘डॅड सगळी चांदीची भांडी आहेत यात. मी याचं काय करू?’’
‘‘काय करू म्हणजे, Just melt it ! and then what  एक छान चांदीची वीट बनव आणि डोक्यात घाल माङया’’ - गाडी स्टार्ट करता करता मी वैतागून म्हणालो. But It will take some time तो हसत म्हणाला. मी मुकाटय़ानं काही न बोलता गाडी ड्राइव्ह वेमधून बाहेर काढली आणि रस्त्याला लागलो.
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम / संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक)

Web Title: Keep it? Keep that key ?.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.