कराची हल्ला आणि त्यानंतर...
By Admin | Updated: July 12, 2014 14:38 IST2014-07-12T14:38:39+5:302014-07-12T14:38:39+5:30
एखादा दुर्दैवी अतिरेकी हल्ला असे म्हणून पाकिस्तानातील कराची विमानतळ हल्ल्याची बोळवण करता येणार नाही. २0१४च्या पहिल्या पाच महिन्यांत घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला, तर त्यातून एक गंभीर चित्र समोर उभे राहते. पाकिस्ताननेच पोसलेला दहशतवादाचा राक्षस आता त्यांच्यावरच उलटला असून, भारतासाठीही असे प्रकार त्रासदायकच आहेत.

कराची हल्ला आणि त्यानंतर...
- शरदमणी मराठे
भारतात नव्या सरकारच्या शपथविधीला जावे की न जावे, याबाबतीत ज्या प्रकारे पाकिस्तानी पंतप्रधानांचे ‘तळ्यात-मळ्यात’ सुरू होते. ते पाहताच लक्षात आले होते, की भारतातील नव्या सरकारने अनपेक्षितपणे पुढे केलेला मैत्रीचा हात स्वीकारण्याचा निर्णय करणे पाक सरकारला आणि सैन्याला तितकेसे सोपे जाणारे नाही. काही दिवसांतच दहशतवादी संघटनांनीही कराची विमानतळासारख्या लक्ष्यावर ४८ तासांत दोनदा हल्ला करून, आपला मनोदय ठळकपणे स्पष्ट केला. नवाझ शरीफ यांचा पुढला प्रवास किती कटकटीचा आणि धोकादायक असेल, हेही या हल्ल्यानंतर स्पष्ट झाले.
ज्या ‘प्रोफेशनल’ पद्धतीने अतिरेक्यांनी हा हल्ला घडवून आणला ते पाहता पाकिस्तानी आर्मी, आय.एस.आय. आदी तथाकथित ‘प्रोफेशनल’ रचनांमध्येही अतिरेक्यांचे ‘गॉडफादर’ मोक्याच्या ठिकाणी बसले आहेत हेही जगाच्या लक्षात आले किंवा ते तसे लक्षात यावे, यासाठीच हा हल्ला घडविण्यात आला, हेही आता जाणकारांच्या लक्षात येऊ लागले आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपण भारताशी चर्चेला तयार असल्याचे दाखवायचे, आणि दुसरीकडे देशातल्या ‘निष्ठावान’ दहशतवादी प्रवृत्तींच्या कलाकलाने घ्यायचे, ही तारेवरची कसरत मागील पानावरून पुढे सुरूच राहणार हेदेखील आता स्पष्ट झाले आहे.
बलुचिस्तान, वजिरिस्तानसारखा प्रदेश, ख्वाजा पख्तूनवाला प्रदेश (म्हणजे जुना वायव्य सरहद्द प्रांत), आदी पाकिस्तानच्या पश्चिमेकडील भागात तसेही पाकिस्तानच्या मध्यवर्ती सरकारचे नियंत्रण बेतासबातच आहे. अनेक ट्रायबल भागात त्या-त्या टोळीवाल्यांचेच कायदे चालतात. मध्यवर्ती सरकारचे नियंत्रण असलेल्या सिंध आणि पंजाब प्रांतातही वाढलेले दहशतवादी हल्ले पाकिस्तान प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहेत. असेच सुरू राहिले तर तालिबानी वर्चस्व मजबूत होत पाकिस्तानचा ‘अफगाणिस्तान’ (किंवा नव्या संदर्भात इराक) व्हायला वेळ लागणार नाही, हे पाकिस्तानातील बुद्धिवंतांना आणि लोकशाहीवादी मंडळींना कळून चुकले आहे. कराची विमानतळाच्या अतिरेकी हल्ल्यानंतर सिंध प्रांताचे मुख्यमंत्री कईम अली शाह म्हणाले, की आलेले अतिरेकी सुसज्ज, प्रशिक्षित होते. त्यांच्याकडे ऑपरेशनची योजना तयार होती, सुरक्षा यंत्रणांतील ज्येष्ठ अधिकार्यांचे असेही म्हणणे होते, की अतिरेक्यांना विमानही ‘हायजॅक’ करायचे होते; पण तो प्रयत्न सिद्धीस गेला नाही. तहरिक-इ-तालिबान पाकिस्तान (टी.टी.पी) या अतिरेकी संघटनेच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार हा हल्ला पूर्वीच घडविण्याची योजना होती; पण त्यांच्याशी सरकारने सुरू केलेल्या शांती-वार्तांच्यामुळे हा त्या वेळी पुढे ढकलण्यात आला.
आणखी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, की हा हल्ला सुरू असतानाच, बलुचिस्तान प्रांतातील इराणला लागून असलेल्या भागात इराणहून परतणार्या २३ शिया यात्रेकरूंची हत्या करण्यात आली आणि सुरक्षा व्यवस्थेतील फोलपणा आणखीनच अधोरेखित झाला. यामुळेच ‘एखादा दुर्दैवी अतिरेकी हल्ला’ असे म्हणत कराची विमानतळ हल्ल्याची बोळवण करता येणार नाही. या दोनही हल्ल्यांपूर्वी म्हणजे २0१४ च्या पहिल्या पाच महिन्यांत घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला, तर त्यातून एक गंभीर चित्र समोर उभे राहते.
इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्फ्लिक्ट मॅनजमेंट आणि साऊथ इंडिया टेररिझम पोर्टल या विख्यात अध्ययन गटांनी एकत्रित केलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात १८९५ नागरिक जाने. २0१४ ते मे २0१४ दरम्यान झालेल्या ५९३ दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेले. त्यातील ८५९ सामान्य निरपराध नागरिक होते, २७७ सुरक्षासैनिक होते आणि ७५९ दहशतवादी होते. त्यातील १८ आत्मघाती हल्ले होते. हे सर्व हल्ले मुख्यत: पंजाब सोडून सर्व प्रांतांत घडलेले आहेत. या सगळ्या प्रकारांमुळे टीटीपीशी सुरू केलेली शांतता चर्चा पाकिस्तान सरकारने थांबवल्या आहेत. असे असले तरी ख्वाजा पख्तूनवाला प्रदेश (म्हणजे जुना वायव्य सरहद्द प्रांत), फेडरली अडिमनीस्टर्ड ट्रायबल एरिया (फाटा) अशा प्रांतात, आर्मीने केलेल्या कारवाया थातूरमातूर स्वरूपाच्या आहेत, तर त्या उलट आर्मीला सलणारे ग्रुप्स - उदा. : बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी गट, यांच्या विरोधात आर्मीने सर्व ताकद लावून कारवाया केल्या आहेत. नॉर्थ वजिरिेस्तानमध्ये आर्मीने दहशतवाद्यांच्या विरोधात प्रचंड सैनिकी कारवाई केल्याच्या बातम्या जरी पाकिस्तानी माध्यमांतून येत असल्या, तरी त्या कारवाईच्या सत्यतेबद्दल किंवा कारवाईच्या तीव्रतेबद्दल काही निरीक्षकांच्या मनात साशंकता आहे. अमेरिकन काँग्रेसकडून लवकरच पास होणारी ३00 मिलियन डॉलर्सची मदत मिळविण्यासाठी हे कारवाईचे नाटक चालले आहे, अशीही शंका व्यक्त होत आहे. पाकिस्तान आर्मीचे नवृत्त जनरल मिर्झा अस्लम बेग यांनी, तर पाकिस्तानातील वाढत्या दहशतवादामागे सैन्य व मौलवी यांचे संगनमत असल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. पाकिस्तानाच्या बाहेरील निरीक्षक विशेषत: भारतीय मुत्सद्दी जी गोष्ट स्पष्टपणे सांगत होते त्यालाच एक प्रकारे दुजोरा देणारी वक्तव्ये पाकिस्तानातील काही सुजाण नागरिक स्पष्टपणे करीत आहेत, ही विशेष गोष्ट आहे.
स्वत:च्या पॅन-इस्लामिक महत्त्वाकांक्षांना मदतरूप ठरावे, भारतामध्ये छुपे युद्ध लढता यावे, पाकिस्तानातील अंतर्गत बाबींमध्ये त्रासदायक ‘समूहांचा’, ‘शक्तींचा’ परस्पर काटा काढण्यात उपयोग व्हावा, अशा विविध उद्देशाने पाकिस्तानने पोसलेला ‘निष्ठावान’ दहशतवाद आता अटळपणे मालकांवरच उलटला आहे. हे ‘अहि-रावण ‘मही-रावण’ एकमेकांशी लढताना भारताने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. ‘दहशतवादाला धर्म नसतो’ वगैरे अतार्किक आणि भोंगळ मांडणीतून बाहेर येत इस्लामी दहशतवादाच्या वाढीचा मुळापासून धांडोळा घेणे हे भारतीय संरक्षणविषयक विश्लेषकांना आता अपरिहार्य झाले आहे.
(लेखक सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत.)