'इभूनाशा'नंतरचे कलाम
By Admin | Updated: August 1, 2015 16:13 IST2015-08-01T16:13:33+5:302015-08-01T16:13:33+5:30
आर्थिक डबघाईतून नुकताच सावरणारा, उदारीकरणाला सामोरा गेलेला, जागतिकीकरणाच्या झोतात सापडलेला भारत. विदेशी वारे वाहू लागलेले. स्वत:ची ओळख, स्वत:चा सूर नेमका कुठला ते कळत नव्हतं. आयटी तंत्रज्ञांची फळी उभी होऊ लागली होती, पण पोटार्थी बुद्धिमत्ता विदेशी कंपन्यांची मांडलिक बनू लागली होती. अशावेळी कलामांनी देशभक्तीची नवी मुळाक्षरं आमच्यासमोर गिरवली. ही मुळाक्षरं वेगळी होती. कोटय़वधी खांद्यांवर कलामांचे अग्निपंख फुटू लागले होते.

'इभूनाशा'नंतरचे कलाम
>
योगेश दामले
नव्वदचं दशक संपता संपता वयात येणा:या पिढीवर आणि पर्यायाने आजच्या तरुणाईवर अब्दुल कलाम या माणसाचे उपकार कुठल्याही जवळच्या शिक्षकाइतके, सख्ख्या आजोबांइतके आहेत.
त्यांच्याबरोबरचा हा ऋणानुबंध 1998 साली आठव्या इयत्तेत सुरू झाला. त्यावर्षीच्या अभ्यासक्र मात अणुविज्ञानाची ओळख झाली आणि त्याच उन्हाळी सुट्टीत पोखरण-2 ही अणुचाचणी झाली.
चाचण्यांचे फोटो कृष्णधवल वृत्तपत्रंमध्ये, किंचित महाग पण चमकदार रंगीत इंग्रजी मासिकांत आणि नुकत्याच उगवलेल्या एकदोन खासगी वाहिन्यांवर पाहिले. त्यात वाजपेयींच्याच वयाचे वाटणारे कलाम पहिल्यांदा दिसले. तेव्हा विचित्र वाटलेल्या त्यांच्या केसांपेक्षाही या गोष्टीची अपूर्वाई वाटली, की हा वेगळा वाटणारा, झपझप चालणारा, निरागस चेह:याचा शास्त्रज्ञ माणूस गर्दीच्या केंद्रस्थानी होता. लष्करी अधिकारी सोडा, भारताचे पंतप्रधान आणि संरक्षणमंत्रीही या माणसाकडे लक्ष देऊन पाहत होते, त्यांचं बोलणं ऐकत होते, म्हणजे हे नक्कीच इथले कुणीतरी मोठे असावेत. किती मोठे, ते थोरामोठय़ांकडून कळलं आणि आम्ही शाळकरी पोरं कलाम फॅनक्लबचे लाइफ मेंबर होऊ लागलो.
‘समाज-देश’ या कल्पनांची ओळख इभूनाशाच्या पुस्तकापलीकडे जात असताना ही अणुचाचणी झाली होती. भारताने खरंच काहीतरी मोठ्ठं, मोठय़ा देशांना घाबरवणारं काम केलं आहे हे जाणवलं. भारत-पाकिस्तान वैर काय चीज आहे, हे दोनच वर्षांपूर्वी विश्वचषक सामना पाहून या पिढीला पहिल्यांदा कळलं होतं. भारताच्या पोखरण-2 ने पाकिस्तान किती बेचैन झाला आहे, हे दोनच आठवडय़ात तिथे झालेल्या चाचण्यांनी सांगितलं.
अमेरिकी उपग्रहांचा डोळा चुकवून, जगाने लादलेले निर्बंध झुगारून भारताने अणुचाचणी मिरवली. आंतरराष्ट्रीय दबावाकडे दुर्लक्ष करून कुठलाही चाचणी प्रतिबंधक करार स्वीकारला नाही. नव्या मिसरु डाबरोबर उगवणा:या देशप्रेमाला एक वेगळी किनार या घटनाक्रमाने दिली होती.
पुढल्या वर्षी कारगिल युद्ध झालं. पण या सगळ्यात जे मनोधैर्य भारताने कमावलं होतं, त्याचा कस लागला. भारत जगातल्या प्रत्येक ‘अरे’ ला ‘कारे’ करू शकतो, हे त्या दोन वर्षात अनुभवलं. कलामच या नव्या संस्काराचं प्रतीकचिन्ह होते.
इथून पुढे कलाम कायमच दिसत राहिले. त्याच वर्षी हाती आलेल्या त्यांच्या आत्मचरित्रने भौगोलिक, आर्थिक, शैक्षणिक, बौद्धिक, सामाजिक अशा कित्येक न्यूनगंडांची जळमटं धुवून काढली. चाचा चौधरी आणि शक्तिमान पोरकट वाटू लागलेल्या मुलामुलींना नवा नायक मिळाला होता.
हा नायक खराखुरा होता. आरंभी त्याच्याही रॉकेट्सने अपयश चाखलं होतं, थट्टा ङोलली होती. त्याची सुरुवात परिकथेप्रमाणो नसल्यामुळे तो अजूनच आपला वाटत होता.
त्यांच्या रूपाने भारताने एक लढाऊ वैमानिक थोडक्यात गमावला हे कळल्यावर वाटलेली हळहळ आज डाचत नाही, कारण कलाम सैनिकांच्या रांगेत हरवले असते, तर नव्या पिढीचं तारुण्य कदाचित नव्वदच्या दशकासारखं झाकोळलेलं राहिलं असतं.
आर्थिक डबघाईतून नुकताच सावरणारा, उदारीकरणाला सामोरा गेलेला, जागतिकीकरणाच्या झोतात सापडलेला भारत.
विदेशी वारे वाहू लागलेले.
स्वत:ची ओळख, स्वत:चा सूर नेमका कुठला ते कळत नव्हतं.
आयटी तंत्रज्ञांची फळी उभी होऊ लागली होती, पण पोटार्थी बुद्धिमत्ता विदेशी कंपन्यांची मांडलिक बनू लागली होती.
आपला पारिजात बहरून शेजारच्या अंगणात फुलं सांडत होता.
अशावेळी कलामांनी देशभक्तीची नवी मुळाक्षरं आमच्यासमोर गिरवली.
ही मुळाक्षरं वेगळी होती.
ज्या देशात गांधी, भगतसिंग, शास्त्री आणि नेहरूंनंतर देशभक्तीची नवी उदाहरणं विरळच होती. वर्षातून दोन दिवस ङोंडावंदन करून, समूहगीतं गाऊन आम्ही आमचं कर्तव्य उरकत होतो.
नेतृत्वगुण म्हणजे खुशमस्करी आणि लाचारी असं चित्र देशात होतं.
कलामांनी आधुनिक, डोळस देशभक्तीचा वसा आम्हाला दिला. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा द्यावा, पण तो मन लावून द्यावा ही नवी शिकवण आम्हाला मिळाली.
कोटय़वधी खांद्यांवर कलामांचे अग्निपंख फुटू लागले होते.
नव्वदच्या दशकाने आर्थिक अस्थिरतेबरोबर राजकीय अस्थिरताही अनुभवली होती. बाहेरच्या पाठिंब्यावर चालणारं आघाडी सरकार, माजी पंतप्रधानांची हत्त्या, युतीची गणितं घालून सत्तेवर आलेले कमकुवत पंतप्रधान, पुढे एका मताने पडलेलं अल्पजीवी सरकार, या सगळ्या उलाढालीनंतर कणा असलेलं एक सरकार आलं. आधीच्या गदारोळात कलामांचं कर्तृत्व कुणाला दिसलं नसतं, ते या सरकारने वाखाणलं. आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एक शास्त्रज्ञ, एक अ-राजकीय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदाची उमेदवार म्हणून मुक्रर झाली.
कलाम राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होत आहेत म्हटल्यावर सत्तापक्ष, विरोधी पक्ष अशा भिंती गळून पडल्या.
तप्त, गलिच्छ राजकारणात असं काहीतरी पाहायला मिळणं हीसुद्धा एक अपूर्वाईच होती. ज्या पदाकडे सोनेरी गजांचा वृद्धाश्रम, राजकीय निष्ठेचं सर्वात गोमटं फळ म्हणून पाहिलं जाई, तिथे खरंच कुठल्याही हायकमांडचा मिंधा नसलेला, द्रष्टा, देशाला आधुनिक वाघनखं दिलेला माणूस येतोय ही कल्पनातीत गोष्ट होती.
झालंही तेच.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांनी ‘‘आय, अवुल पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम’ म्हणताच टाळ्यांचा असा कडकडाट झाला, की खुद्द शपथविधी दहा सेकंद थांबला.
अनेक चाहत्यांनी याला रामेश्वरम ते राष्ट्रपती भवन अशा प्रवासाचा शेवट मानला, पण एक नवीन सुरु वात इथे घडत होती.
दोन सुटकेसेसमध्ये मावेल एवढंच सामान आणि दोन खोल्यांपेक्षा जास्त पसारा न मांडणा:या या राष्ट्रपतींनी विद्याथ्र्याशी संवाद साधायला सुरुवात केली. व्हीआयपी गाडय़ांच्या ताफ्यामागे अडकलेल्या माणसांना, मुलांना पत्रचं उत्तर पाठवणारा राष्ट्रपती मिळाला होता.
खुद्द राष्ट्रपती भवनाची दारं सामान्यांसाठी किलकिली झाली होती.
ज्यांना प्रत्यक्ष भेटीचं भाग्य लाभलं नाही, त्यांच्यासाठी कलामांनी ई-चावडी उघडली होती. इंटरनेट नुकतंच
परवडण्याजोगं होऊ लागलं होतं. कलामांना ईमेल केल्यास आठवडाभरात उत्तर येतं अशा गोष्टी आणि बढाया मित्रंमध्ये रंगू लागल्या होत्या. मनाने चिरतरु ण असल्यानेच कलाम मुलांमध्ये रमत असावेत.
कलामांबरोबर चालणा:या अंगरक्षकांना संधिवाती पुढा:यांप्रमाणो चाल मंदावून फिरावं लागलं नाही. विज्ञान प्रदर्शनं असोत, युवक मेळावे असोत कलामांच्या चेह:यावर आंतरराष्ट्रीय दौ:यावर असावी तशीच झळाळी असायची.
‘‘या वयात हे शोभतं का?’’
‘‘मुलांना भेटून काय मिळणार?’’
वगैरे पोक्त प्रश्न विचारणारेही आम्हा मुलांच्या अवतीभवती असायचे. पण कलाम आणि त्यांचा भारत 2क्2क् कार्यक्र म त्यांनी भेटलेल्या प्रत्येक तरु णाच्या मनावर बिंबवला.
‘पुढा:यांचं मुलांशी हितगुज’ म्हणजे आधी तासन्तास प्रतीक्षा आणि मग रटाळ भाषणं हे समीकरण बदललं. मुलांशी संवाद साधणं, भोळ्या-वेडसर वाटणा:या प्रश्नांनाही उत्तरं देणं, आणि मुख्य म्हणजे रुक्ष विषयांमध्ये रसाळ संवादाचं कसब कलामसरांकडे होतं.
‘‘हृदयात सचोटी असेल, तर चारित्र्य सुंदर होईल. चारित्र्य सुंदर झालं, की परिसर सुंदर होईल. परिसर सुंदर झाले की देश सावरेल. आणि देश सावरले, तर जगात शांतता नांदेल. म्हणा माङयामागून..’’ असं म्हणून मुलांकडून हे सूत्र कलाम घोकून घेत.
कलामांचा आवाज, त्यामागे शेदीडशे चिमण्या आवाजांतला कोरस - हे दृश्य टीव्हीवर पाहताना मोठी माणसंही नकळत तो मंत्र पुटपुटताना मी पाहिली आहेत.
आपल्या ‘म्हणा माङयामागून’ च्या लकबीमुळे कलामसर विशेष आवडते झाले होते. रॉकेट आणि अणवस्त्रं बनवणा:या या अवलियाने मिसाईल तंत्रज्ञानातली हलकीफुलकी पण दणकट सामग्री वापरून कित्येक अपंगांना तीनचार किलोंच्या लोखंडी कॅलिपर्समधून सोडवलं. हृदयरुग्णांना परवडतील असले हार्ट स्टेंट्सही बनवले. कलामांनी जे कार्य सुरू केलं, त्याला 83 वय हे पुरेसं नव्हतं. त्यांचे हे शोध अशा समाजात झाकोळले जिथे वैद्यकीय सामग्रीत नफेखोरी मोठमोठय़ा कंपन्यांना आवरत नाही.
ते अशा समाजातून गेले आहेत जिथे श्रद्धांजलीतही धर्माच्या कसोटीतून लोकांनी त्यांना सोडलं नाही.
ते अशा समाजातून गेलेत जिथे त्यांना न ओळखता जिवंतपणीच हार घालणारी मंत्री एका राज्याचं शिक्षणखातं चालवते.
ते अशा समाजातून गेले आहेत जिथे ‘विरोधाचे पूर्वनियोजित मोर्चे कलामांच्या दुखवटय़ात रद्द’ केल्याची सौजन्यपूर्ण सूचना नेते करत आहेत.
ते अशा शासकीय इतमामाचा निरोप घेऊन जात आहेत जिथे काही राज्यांनी त्यांच्या स्मृतीत एक तास जादा सेवा देण्याच्या त्यांच्याच इच्छेऐवजी प्रोटोकॉल नामक गोंडस सबबीखाली सुट्टी जाहीर केली आहे.
आमच्या पिढीत देशाबाहेर कारकीर्द करणारे जास्त आहेत, पण देशात परतून स्वत: काहीतरी करू इच्छिणारेही तुलनेने जास्त आहेत.
‘कलामांनी मुलांमध्ये मिसळून काय साधलं?’ - असं विचारणा:यांसाठी हे उत्तर आहे.
शरीराबरोबर मनाचं वय झालं की माणसं सहज आनंद विसरतात. या अशा लोकांनी कलामांच्या उत्साहाला अनाठायी आणि उथळ असं लेबलही दिलं. आज त्या वयोगटात येऊन अशा माणसांची हतबलता कळते, कारण त्यांच्या लहानपणी त्यांना कलाम लाभले नाहीत. आमच्या पुढच्या पिढीलाही कलामांसारखं कुणी लाभेल याची शक्यता आज तरी धूसर आहे.
कलामांची निष्ठा म्हणूनच लहान मुलांमध्ये गुंतली असावी. चांगलं-वाईट हे दोनच भेद जाणणारं लहानपण, जात-धर्म या विषमतेच्या डागांनी मळलं की त्याचा ‘समाज’ होतो. स्वातंत्र्याच्या 68 वर्षांत ज्या मोजक्या पिढय़ांना कलामांनी अग्निपंख दिले, त्यांच्यातून पुढे काही कलाम निघाले तर पुढल्या पिढय़ांना सकस भविष्याची खात्री देता येईल. नाहीतर आम्ही, आमच्या पूर्वसुरींसारखेच निराश आणि नकारात्मक होऊन इतिहासजमा होऊ. नेमकं हेच घडू नये, 2क्2क् नंतर कलामांना अभिप्रेत भारताचं चित्र साकार व्हावं, हीच कलामांना श्रद्धांजली ठरावी.
एरवी मोबाइलवरून वाहिलेली श्रद्धांजली आणि थर्मोकोलच्या पुष्पचक्र ांचं मोल देणा:यापुरतंच असतं.
ज्या कलामांनी आपल्याला इतकं दिलं, त्यांना आपण काहीतरी चांगलं द्यायला हवं.
‘म्हणा माङयामागून’
रुक्ष विषयांमध्ये रसाळ संवादाचं कसब कलाम सरांकडे होतं.
‘‘हृदयात सचोटी असेल, तर चारित्र्य सुंदर होईल.
चारित्र्य सुंदर झालं, की परिसर सुंदर होईल.
परिसर सुंदर झाले की देश सावरेल.
आणि देश सावरले, तर जगात शांतता नांदेल.
म्हणा माङयामागून..’’ असं म्हणून मुलांकडून हे सूत्र कलाम घोकून घेत. कलामांचा आवाज, त्यामागे शेदीडशे चिमण्या आवाजांतला कोरस -
हे दृश्य टीव्हीवर पाहताना मोठी माणसंही नकळत तो मंत्र पुटपुटताना मी पाहिली आहेत.
आपल्या ‘म्हणा माङयामागून’च्या लकबीमुळे कलामसर विशेष आवडते झाले होते.
(गेली आठ र्वष राष्ट्रीय वृत्तवाहिनीत
पत्रकारिता केलेले लेखक सध्या
कॉर्पोरेट कम्युनिकेशन क्षेत्रत कार्यरत आहेत)
damle.yogesh@gmail.com