तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
By Admin | Updated: August 16, 2014 22:37 IST2014-08-16T22:37:26+5:302014-08-16T22:37:26+5:30
मानवतेचं अचूक भान आणि परंपरेतलं अस्सल सोऩं़ यांचा सुरेख मिलाफ म्हणजे गुलजार! ‘चित्रमय कविता’ आणि ‘काव्यमय चित्रपट’ असा उत्कट कलात्मक अनुभव तेच देऊ जाणो़ भावनांची प्राजक्तफुले कोमल हातांनी वेचून आपल्या हातात अलगदपणो ठेवताना हळुवार हृदयाची तार छेडणारा हा शब्दप्रभू उद्या (18 ऑगस्ट) 80 व्या वर्षात पदार्पण करीत आह़े त्यानिमित्ताऩे़

तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
अंबरीश मिश्र
गुलजारांमध्ये काही विसंगती आहेत. त्या मनाला भुरळ पाडतात. ते सिनेमात आहेत; परंतु फिल्मी नाहीत. कवी, साहित्यिक असूनही ते सभा-समारंभांत सहसा दिसत नाहीत. प्रत्येक विषयावर आपलं मत आपण मांडलं पाहिजे अन् ते लोकांनी ऐकलंच पाहिजे, असा सेलिब्रिटी थाट त्यांच्यात नाही. वर-वर पाहिलं तर ते गंभीर वाटतात, दिसतात; परंतु त्यांची विनोदबुद्धी तीव्र आहे. ते ऐंशीचा उंबरठा ओलांडण्याच्या तयारीत आहेत; परंतु मनाच्या खोल तळघरात त्यांनी एक लहान, निष्पाप मूल लपवून ठेवलंय. या लौकिक जगात वावरत असताना ते, सगळ्यांच्या नकळत त्या तळघरात अधनंमधनं लुप्त होतात. काही काळासाठी. त्या तळघराची चावी आपल्याला मिळावी, असं वाटणारे पुष्कळ आहेत. त्या रांगेत मीसुद्धा.
काळाची विभागणी आपण ािस्ताच्या संदर्भात करतो. हिंदी चित्रपटगीतांचा विचार गुलजारांना लक्षात ठेवून केला पाहिजे. गुलजारांच्या अगोदरची चित्रपटगीतं आणि गुलजारोत्तर अशी ही विभागणी आहे. गीतकार म्हणून ‘बंदिनी’ हा गुलजारांचा पहिला चित्रपट. हा 1962-63 चा काळ. अनेक दिग्गज, गुणवान गीतकार तेव्हा लिहीत होते. साहिर, मजरूह, शकील, शैलेंद्र, हसरत, राजा मेहंदी अली खान, राजेंद्र कृष्ण, कमर जलालाबादी ही त्या काळातली गीतलेखनातली प्रमुख नावं. ही मंडळी उर्दूच्या नज्मगजल परंपरेतून आलेली. सिनेगीताची रचना, आशय, मांडणी यांत हे कवी प्रवीण झालेले. प्रेम, विरह, ताटातूट, मीलन असे गाण्यांचे विषय. गीतलेखनाच्या तंत्रतली मातब्बरी या मंडळींकडे मुबलक होती. हे सगळे गुण गुलजारांमध्येदेखील होते. अन् आहेत; परंतु त्यांनी एकदम वेगळीच मांडणी केली. त्यांची प्रतिमासृष्टी एकदम वेगळी वाट चोखाळते. शब्दांच्या धमन्यांत नवं, ताजं रक्त ओतण्याची त्यांची
किमया थक्क करून टाकते. कधीही न ऐकलेली, एका प्रमाथी ऊज्रेनं लवलाहत शब्दांतून धावणारी, उजाळ अशी एक अनोखी लय घेऊन त्यांची गीतं आपल्याला रुपेरी पडद्यावर भेटली आणि आपण सारे हरखून गेलो.
प्रेम, ताटातूट, मीलन, प्रेमाचे लवलवणारे, तेज:पुंज क्षण अल्लद, अतिशय कोमल हातांनी गुलजार वेचत असतात. ‘‘इस मोड़ से जाते हैं / कुछ सुस्त कदम रस्ते..’’ या ओळीतला ‘सुस्त’ हा शब्द अतिशय वेधक वाटतो. प्रेमाच्या गाण्यात सर्वसाधारणपणो वर्दळीवर येणारे दिल, आहें, सनम, मुहब्बत वगैरे शब्द गुलजार कटाक्षानं टाळतात आणि ‘पत्थर की हवेली’ अशी एक अनुपम प्रतिमा तुमच्या तळहातावर हळुवारपणो ठेवतात. शंकर-जयकिशन, नय्यर, नौशाद यांच्या काळात या अशा प्रतिमा चालल्या नसत्या. त्या गुलजारांनी सिनेमासृष्टीत हट्टानं रुजवल्या अन् त्या लोकांनी स्वीकारल्या हे विशेष. हे गुलजारांचं फार मोठं काम आहे.
‘मेरे अपने’मध्ये ‘चांद कटोरा लिए भिखारिन रात, रोज अकेली आए, रोज अकेली जाए’ असं गाणं आहे. सिनेमात हे नाहीये. लताबाईंच्या आवाजातली रेकॉर्ड आहे. एकेकदा रेडियोवर ऐकू यायची. खरंतर उदास, खिन्न रात्र हा हिंदी सिनेमाचा जिव्हाळ्याचा विषय. अनेक लोकप्रिय गीतांत तो सांगून झालाय आणि हा विषय गाण्यात कसा मांडायचा, तेसुद्धा आधीच्या दिग्गज कवींनी नक्की करून टाकलं होतं. ‘रात ने क्या-क्या ख्वाब दिखाए’, ‘रात भर का है मेहमां अंधेरा’, ‘रात और दिन, दिया जले/ मेरे मन में फिर क्यूं अंधियारा है’ ही काही पट्दिशी सुचणारी गाणी; परंतु ही सिनेमातली गाणी आहेत, आणि सिनेमात दाखवलेल्या रात्रीचं वर्णन करणारी आहेत. ‘चांद कटोरा लिए भिखारिन रात’ हे गीत तुमच्या-माङया ख:याखु:या रात्रीचं गीत आहे. ते सिनेमात योगायोगानं आलं इतकंच. गुलजार असे रोजच्या जगण्यातले, वर-वर पाहता मामुली वाटणारे काही क्षण आपल्या वर-वर साध्या, मामुली वाटणा:या शब्दांत ओवतात. त्या शब्दांत मृदंगाची थाप असते.
गुलजारांनी सिनेमातल्या गीतांना एक नवी, रसरशीत अनुभूती बहाल केली. मीर तकी मीर, मिङर गालिब, जाैक, मोमिन यांची काव्यपरंपरा शिरोधार्य मानणारी गुलजारांची प्रतिभा 197क् च्या दशकातलं भेदक सामाजिक-राजकीय वास्तव मनोज्ञपणो टिपते, ही मोठी गोष्ट आहे. हे बळ तिला कॅमे:याच्या तिस:या डोळ्यानं दिलं असावं असं वाटतं. गुलजारांच्यातल्या दिग्दर्शकानं त्यांच्यातल्या कवीचं पालनपोषण केलं अन् कवीनं दिग्दर्शकाचं संगोपन केलं. म्हणजे ‘एक झाड आणि दोन पक्षी’सारखंच की़ म्हणूनच लाखो रसिक म्हणतात, की गुलजारांची कविता चित्रमय आहे आणि त्यांचे सिनेमे म्हणजे रुपेरी पडद्यावरची कविता.
गुलजार नवता आणि परंपरा यांतला तोल उत्तम सांभाळतात. परंपरेतलं अस्सल सोनं ते अचूक ओळखतात अन् दुसरीकडे नवतेचा घायकुता सोस निक्षूून टाळतात. त्यांचं सगळं लिखाण उर्दूत आहे. उर्दू भाषेचा एक पेच आहे. एका समृद्ध, सर्वसमावेशक परंपरेच्या आधारानं ती लहानाची मोठी झाली; परंतु ती वाढली सरंजामशाहीच्या दरबारी राजकारणाच्या काळात. एखादा कमकुवत, सुमार दर्जाचा लेखक किंवा कवी हुस्न-इश्क, शमा-परवाना, बुलबुल-सैयाद वगैरे मलिन, गिळगिळीत प्रतिमांत अडकून पडतो. उर्दूत असे पुष्कळ कवी आहेत. उर्दूची सांकेतिकता गुलजारांनी शंभर कोस दूर ठेवली. यासाठी विचारांची ताकद लागते. मंटोनंतर उर्दू कथा ख:या अर्थानं आधुनिक झाली, असं जाणकार मंडळी मानतात. तिला आधुनिकतेच्या प्रशस्त मार्गावर पुढं घेऊन जाण्याचं काम गुलजारजी आणि कुर्रतुलैन हैदर यांनी समर्थपणो केलं यात वाद नाही. हे मी खास करून उर्दू कथेविषयी बोलतोय. कुर्रतुलैनबाई आणि गुलजार यांच्या कथांमधून स्वातंत्र्योत्तर भारताचं, भारतीय समाजाच्या एकूण स्थितीगतीचं चित्र पाहायला मिळतं.
गुलजार यांचे सिनेमेसुद्धा ख:या अर्थानं आधुनिक आहेत. 197क् च्या दशकात ते हिंदी चित्रसृष्टीत दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आले. त्यांची पात्रं अनेक पातळ्यांवर झगडत असतात. कधी स्वत:शी, कधी आपल्याच माणसांशी, समाजसत्तेशी किंवा विषम परिस्थितीशी. गुलजारांनी रोजच्या जगण्यामधून माणसं निवडली. सभोवताली निरंतर धगधगणा:या, अस्वस्थ करणा:या सामाजिक-आर्थिक-राजकीय वास्तवांचा एक जिवंत, रसरशीत असा संदर्भ गुलजारांच्या सिनेमांना आहे; परंतु या वास्तवाकडे केवळ कच्चा माल म्हणून त्यांनी पाहिलं नाही, म्हणून ‘मेरे अपने’ किंवा ‘हुतुतू’मधली हिंसा प्रेक्षकांना अस्वस्थ करते, अंतमरुख करते. हिंसेचं समर्थन करण्यासाठी गुलजारांनी सामाजिक-राजकीय वास्तवाची सबब पुढे केली नाही. ते सलीम-जावेदनं केलं, म्हणून ‘दीवार’ आणि ‘शोले’मधली हिंसा पाहून लोकांना उन्माद चढला. सलीम-जावेद यांची सगळी मांडणी ‘फिल्मी’ होती. मग कालांतरानं त्यांचा एक फॉम्यरुला तयार झाला. मग वापरून-वापरून तो ङिाजला आणि मोडीत निघाला. गुलजारांच्या सिनेमांना एक गहिरी चिंतनशीलता आहे. कारण आयुष्याच्या अपूर्व धकाधकीत ते मानवी मूल्यांचा शोध घेत असतात. ही मांडणी संपूर्णपणो आधुनिक आहे, म्हणून गुलजारांच्या कथा, कविता आणि सिनेमे चिरंतन, कलात्मक अनुभव देतात. हाच आधुनिक विचार घेऊन गुलजार कबीर, लाल देढ़, मीरा, बुल्ले शाह, मिङर गालिब, प्रेमचंद, रवींद्रनाथ ठाकूर आणि कुसुमाग्रज या पूर्वसुरींकडे जातात आणि भारतीय संस्कृतीतल्या लोकपरंपरेचं एक वतरुळ पूर्ण करतात. गुलजार हे मुळातले कवी. लौकिक अर्थानं त्यांनी ऐंशीचा उंबरठा ओलांडलाय; परंतु ते केवळ लौकिक अर्थानंच. कवी हा काळाच्या वृक्षाखाली उभा असतो. सरत्या दिवसांची, वर्षाची पानं त्याच्यावर नित्य पडत असतात. त्या पानांवर तो कविता लिहीत असतो, अन् ती सगळी पानं वा:यावर उधळून तो निघून जातो. स्वत:च्या आत. खोल-खोल भुयारात. ओंकाराच्या गाभा:यात.
कवी असा असतो,
गुलजार असा असतो.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत़)