तू जे करशील, म्हणशील त्याचा उपयोग काय?- विचारा स्वतःला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 03:00 IST2018-08-05T03:00:00+5:302018-08-05T03:00:00+5:30
इज इट यूजफुल? या प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर तोंड उघडलं जाऊच नये!

तू जे करशील, म्हणशील त्याचा उपयोग काय?- विचारा स्वतःला
धनंजय जोशी
खूप छान पुस्तक वाचनात आलं. त्याचं नाव आहे ‘टेन परसेंट हॅपिनेस’. लेखक आहे डॅन हॅरिस. अमेरिकेमध्ये नाइटलाइन आणि गुड मॉर्निग अमेरिका हे टीव्हीवरती प्रसिद्ध प्रोग्रॅम्स आहेत. डॅन हा त्यामध्ये अँकर आहे. आणखीही अनेक प्रसिद्ध प्रोग्रॅममध्ये तो भाग घेतो. काही वर्षापूर्वी टीव्हीवर कार्यक्रम सुरू असतानाच त्याला हार्ट अटॅक आला. आणि तो बोलू शकेना. लक्षावधी लोकांसमोर हा प्रसंग घडला! आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा असं काही घडतं तेव्हा पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ‘का असं झालं?’ मग जर आपण भाग्यवान असाल तर एक प्रवास सुरू होतो.
डॅनचा प्रवास सुरू झाला! त्याला अनेक गुरु भेटले किंबहुना तोपण त्यांना जाऊन भेटला. त्याला समाधान मिळालं नाही! प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही! मार्ग सरळ दिसेना!
त्याला एक मित्र भेटला - त्याचं नाव मार्क एपस्टाइन! मार्क हा प्रसिद्ध सायकोथेरपिस्ट आहे. मुख्य म्हणजे मार्कने अनेक ध्यान शिबिरांमध्ये भाग घेतला आहे. त्यात मिळालेली शिकवण तो आपल्या पेशंटसमोर मांडत असतो, त्यांचा उपयोग करत असतो. मार्कच्या सांगण्यानुसार डॅनने एका दहा दिवसाच्या ध्यान शिबिरामध्ये नाव घातलं ! शिबिराचा शिक्षक होता जोसेफ गोल्डस्टाइन. ध्यान शिबिरामध्ये आपल्याला स्वतर्च्या मनाचे खेळ बघायला मिळतात. त्यातूनच एक अमोल शिकवण मिळत जाते. शिबिरामध्ये संध्याकाळी जोसेफ भाषण देत असे. आता ज्यांनी अशा शिबिरामध्ये भाग घेतला असेल त्यांना आपलं मन किती भरकटत जातं त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असेलच ! दहा दिवसाचं शिबिर. आठव्या दिवसापासून डॅनचं मन विचार करत होतं.. दोन दिवस राहिले.. आपली फ्लाइट कधी - पॅक कधी करायचं, बॅग कोण नेणार, एअर पोर्टवर कोण नेणार.. उशीर झाला तर काय? कुठे आपण अडकणार की काय? एक ना दोन अनेक विचार डॅनच्या मनाचा कब्जा घेऊन बसले होते! ध्यानाला बसताना हेच विचार!
जोसेफ भाषण देत होता.. तो म्हणाला, ‘आपण ध्यानाला बसताना फक्त एक गोष्ट बघायची - ती म्हणजे आपला श्वास ! मग आपण कां वेळ वाया घालवतो इतर विचारांच्या मागे? ‘इट इज अ वेस्ट ऑफ टाईम!’
डॅननं हात वर केला. त्यानं विचारलं, ‘का म्हणून? माझी फ्लाइट आहे, मला नोकरीवर पोहचायचं आहे, मला सगळं वेळेवर करायचं आहे. मी जर प्लॅन नाही केलं तर कसं होणार? हाऊ कॅन यू कॉल इट वेस्ट ऑफ टाईम?’.
जोसेफ हसला आणि म्हणाला, ‘व्हेरी फेअर डॅन’; पण असा विचार कर ! एकदा दोनदा हे प्लॅनिंग विचार झाल्यानंतर आपण शिबिरामध्ये दहादा तोच तोच विचार करत राहतो - तेव्हा आपण स्वतर्ला प्रश्न विचारावा, ‘इज धीस यूजफूल’. मी ज्याच्या विचारांमध्ये गुंगलो आहे, अडकलो आहे, सापडलो आहे, त्याचा उपयोग काय?’’
- मला हे फार आवडलं !
दोन-तीन दिवसांपूर्वी घडलेली घटना !
माझी पत्नी गावाबाहेर गेली होती. ती येणार होती त्या दिवशी मी संबंध घर साफ केलं, भांडी घासली, ती कारवारी आहे म्हणून कालवण करून तयार ठेवलं, कोळंबी तळून ठेवली.. तिला एअरपोर्टवरून घरी आणलं.. जाता जाता तिनं माझ्या क्लोजेटमध्ये लक्ष दिलं आणि म्हणाली, ‘अरे, त्या कोपर्यामध्ये तो कपटा मी किती दिवस बघतेय !’
माझ्या मनामध्ये अनेक विचार उसळून आले (सगळं घर साफ; पण हा तुकडा?)
रागावून बोलावंसं वाटलंदेखील; पण एक प्रश्न विचारला गेला, सहज, आपोआप, ‘तू जे करशील, म्हणशील त्याचा उपयोग काय? इज इट यूजफुल’
जर उत्तर नाही असेल तर तोंड उघडलं जाऊच नये!
उत्तर आलं, ‘इट इज नॉट यूजफूल’
मी कपटा उचलला, टाकून दिला!