..मिळालं त्यात सुख मानावं!
By Admin | Updated: January 16, 2016 16:37 IST2016-01-16T13:49:31+5:302016-01-16T16:37:05+5:30
- स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्याशी गप्पांची मैफल

..मिळालं त्यात सुख मानावं!
> ![]()
स्वरसम्राज्ञी आशा भोसलेंची राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत यांच्याशी रंगलेली गप्पांची मैफल...
स्वातंत्र्यपूर्व काळातील कोल्हापुरात गेलेलं मंगेशकर भावंडांचं बालपण आणि त्या काळातल्या गोष्टी ही सांस्कृतिक महाराष्ट्राच्या मर्मबंधातली ठेव आहे. शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा त्यांच्या घराण्याला लाभलेली. असं असूनही आशाताईंना त्या काळात पाहायला आवडायचे ते इंग्रजी चित्रपट. कोल्हापुरातील एका थिएटरमध्ये त्यावेळी इंग्रजी चित्रपट लागत असत. केवळ दोनच दिवस त्यांचे खेळ चालायचे. दहा-बारा वर्षाच्या आशाताई हे चित्रपट हट्टाने पाहत असत. त्यांच्या पाश्चात्त्य संगीताच्या प्रेमाचं मूळही हे असं त्यांच्या लहानपणाशी जोडलेलं आहे. आपणही तसे गाऊ शकतो असा विश्वास आला तो या चित्रपटांमुळे! गाणं गाणं असतं. आपण त्याच्यात संपूर्ण जीव ओतला, की ते जिवंत होतं, अशी त्यांची धारणा.
बालपणाचा विषय निघाला, की कितीही मोठी व्यक्ती असली तरी भावुक होतेच. आशाताई त्याला अपवाद नाहीत.
गप्पांच्या ओघात बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्या सांगत होत्या, ‘कोल्हापुरातले ते दिवस होते मोठे बहारीचे. आम्ही चारही भावंडं एकत्र खेळायचो. झाडावर चढणं, विटी-दांडू आणि गजगे / सागरगोटय़ा खेळायचो. मी तर अगदी गोटय़ासुद्धा खेळायचे. तेव्हाचं कोल्हापूर खूप लहान, नेटकं शहर होतं. गाडय़ा तर नव्हत्याच. रात्री चंद्राच्या प्रकाशात रस्त्यांवर आम्ही सगळी मुलं पकडापकडी, पळापळी खेळायचो.’
- नंतरच्या अख्ख्या आयुष्यात ही बहार अखंड टिकून राहिली.
आशाताईंच्या पाश्र्वगायनाचा बहारीचा काळ हा जनप्रिय भारतीय संगीताचा सुवर्णकाळच. त्याकाळच्या संगीताला आशाबाईंच्या स्वरांनी वेगळं वळण देण्याचं श्रेय संगीतकारांचं! ते मान्य करताना आजही आशाताईंचा स्वर ओलावतो. ज्यांनी ज्यांनी शब्दांना सूर दिले त्या संगीतकारांबद्दलच्या अनेक गुणवैशिष्टय़ांवर गप्पा झाल्या. अनेक संगीतकारांसोबत काम केलं, प्रत्येकासोबत एकाहून एक श्रेष्ठ गाणी गायिली; पण ओ. पी. नय्यर आणि आर. डी. बर्मन यांच्या सोबत मात्र त्यांचं टय़ुनिंगच वेगळं होतं. त्याबद्दल बोलताना त्यांना आजही शब्द पुरत नाहीत. त्या सांगतात,
‘भारतीय चित्रपट संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ओपींनी केलं, तर आर.डीं.नी मात्र संपूर्ण संगीताचा रिदमच बदलून टाकला. :िहदम, मेलडी आणि संगीत अशा तिन्ही बाबतीत आरडीची गाणी परिपूर्ण आहेत. दीदी, रफी, किशोरकुमार या सगळ्यांसोबत आरडीने काम केलं, मात्र सर्वात अवघड गाणी तो माङयासाठी जणू राखूनच ठेवायचा. एकदा सहज तक्रार केली, तर म्हणाला, तू जर हे गाणं गाणार नसशील तर मी अशा प्रकारचं संगीतच बनवणार नाही.’
सचिन देव बर्मन, सलील चौधरी, नौशाद, ओपी, आर.डी. ते अगदी आजच्या रहेमान, अनु मलिकर्पयत सर्वच संगीतकारांची काही ना काही वैशिष्टय़ं आशाताईंना महत्त्वाची वाटतात. मदनमोहनसारखा संगीतकार फार क्वचित पाहायला मिळतो. शास्त्रीय हरकती देऊनही सुरेल चाल कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं, असं त्या विनम्रतेने सांगत होत्या.
आजच्या संगीताविषयी मात्र आशाताई समाधानी नाहीत. त्यांनी अनेकदा ही नाराजी जाहीरपणो बोलूनही दाखवली आहे. आमच्याही गप्पांमध्ये हा विषय निघाला. त्या सांगत होत्या,
‘मुन्नी, शीला, हलकट जवानी हे असलं कानी पडायला लागल्यावर मी ही गाणी ऐकणंच सोडून दिलं. काय ऐकायचं? आणि कशाला? आजही किशोरकुमार, दीदी, रफी यांचीच गाणी माङया मनात वाजत असतात. त्यात मध्येच आजचा आरडाओरडा कानी आला की वाटतं, काय चाललंय हे?’
- अर्थात आजही आशाताईंना आनंद देणारे काही अपवादही आहेत. उदाहरणार्थ राहत फतेह अली खान.
त्यांचा मुख्य आक्षेप आहे तो आजच्या गाण्यांच्या शब्दांवर! हे असे फाजील, अगोचर शब्द जर असते, तर आज रसिकांच्या गळ्यातले ताईत असलेली अनेक गाणी टिकली नसती, असं आशाताई खात्रीने सांगतात. जुन्या गाण्यांमध्ये अर्थपूर्ण, मनाला भिडणारे शब्द असायचे. गाण्याच्या शब्दांना योग्य तो न्याय मिळावा म्हणून फार कलाकुसरीचं काम केलं जाई. अचूक उच्चारासाठी संगीतकार फार आग्रही असत.
ही शब्दांची हुकूमत आजच्या संगीतातून पार पुसली गेली, याचं शल्य आशाताईंच्या मनाला फार डाचतं. भावनांनी नेमके भिजलेले कधी मऊसूत तर कधी उफाळत्या ज्वाळेचे शब्दोच्चार ही आशाताईंची खासियत.
त्याबद्दल विषय निघाला तेव्हा त्या सांगत होत्या,
‘अचूक उच्चारासाठी गायकाला नुस्ता शब्द नव्हे, त्या शब्दाची अनुभूती असणं फार गरजेचं असतं तरच तो उच्चार काळजाला हात घालणारा होतो.’ भावगीतापासून कव्वालीर्पयत सर्व प्रकारची गाणी तितक्याच ताकदीने आणि तन्मयतेने गाणं यावर आशाताईंइतकी हुकूमत अन्य कोणाची असणार? यामागचं रहस्य विचारलं, तेव्हा त्या म्हणाल्या,
‘वाचन. मी वेडय़ासारखी वाचते. आता वयोमानाप्रमाणो कमी होतं वाचन, पण एकेकाळी मी कादंब:यांचा अक्षरश: फडशा पाडलेला आहे. कोणतीही नवी कादंबरी सोडायची नाही, असा माझा नियमच होता. हरी नारायण आपटे, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, रवींद्रनाथ टागोर असे सगळेच लेखक हे माङो आयुष्यातले शिक्षक. मी फ ार शिकलेली नाही; पण वाचनातून मला जग कळत गेलं. भावनांची तरलता, गंभीरता, व्यक्त-अव्यक्तपणा हे सारे बारकावे मला पुस्तकांनी शिकवले, जे मला गाताना कामी आले.
आजची पिढी वाचनापासून दुरावली आहे. जी मुलं वाचत नाहीत ती दुर्दैवी आहेत. मला फार वाईट वाटतं, की आता आपलं युग संपलं. या नवीन युगातील मुलांना कसं कळणार की डोळ्यांत पाणी आणणारी कविता म्हणजे
काय?’
वयाच्या दहाव्या वर्षी कामाला सुरुवात केलेली. फार कठीण दिवस पाहिले. सोसलंही पुष्कळ. वय आणि काळानुसार माणसाच्या प्रवृत्तीमध्ये बदल होत असतो, तसा आशाताईंमध्येही झाला. चंदेरी दुनियेच्या झगमगाटातलं पडद्यामागचं जग फार निर्दयी असतं. त्यात पाय फसून चांगुलपणा सुटणार नाही याबद्दल मी फार दक्ष राहिले, असं सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.
त्या सांगत होत्या, ‘आयुष्यात मी फार दु:ख आणि गरिबी पाहिली. त्याबरोबरच भरभराट आणि पैसादेखील पाहिला. पण आपले पाय सदैव जमिनीवर राहावेत हाच विचार ठेवून सदैव जगले. भगवद्गीता म्हणजे माङया जीवनाचं तत्त्वज्ञान. तुम क्या लेकर आये थे, तुम क्या लेकर जाओगे. जे गेले त्याची चिंता सोड. जे आज आहे त्याचा विचार कर. कारण भविष्य कोणाला माहीत नाही आणि भूतकाळ बदलता येत नाही. त्यामुळे हव्यास, लालुच, ईष्र्येला जीवनात कधीच थारा दिला नाही. जे मिळालं त्यात सुख मानावं, एवढं सोपं जीवनसूत्र मी पाळते.’
लतादीदींच्या वलयातून स्वत:ला वेगळं करून स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठीचा आशाताईंचा संघर्ष हा विषय त्यांच्याबरोबरच्या गप्पांमध्ये डोकावतोच. त्या म्हणाल्या, ‘अन्याय कोणावर होत नाही? आधी मला खूप राग यायचा; पण नंतर मी विचार करायला लागले की, विधिलिखितासमोर कोणाचं काय चालणार? देवाच्या मर्जीशिवाय काही होत नाही. त्यामुळे एखादं गाणं मला मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही झाले. माङया वाटय़ाला जे असेल ते मला मिळणारच. आपण प्रामाणिकपणो आपलं काम करावं, हेच बरं.’
जे चूक ते चूक, बरोबर ते बरोबर म्हणण्याचा आशाताईंचा रोखठोक स्वभाव. आजूबाजूच्या परिस्थितीवर त्या नेमकं भाष्य करत असतात. मात्र राजकारणात येण्याचा त्यांनी कधीच विचार केला नाही.
‘जिथे घरातल्या राजकारणामुळेच नाकीनव येतात, तिथे घराबाहेरच्या राजकारणात कशाला पडायचं?’ - असा प्रश्नच करून आशाताई खळखळून हसल्या.
सर्वच पक्षांतील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं मात्र त्यांनी मान्य केलं.
परिस्थितीसमोर कधीही हात टेकायचे नाहीत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आशाताई. सकारात्मक विचार करण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो.
गप्पांच्या ओघात त्या सांगत होत्या, ‘कोणत्याही परिस्थितीत हार नाही मानायची. मागे नाही हटायचं. आजचा दिवस तुमचा नसेल; पण मेहनतीने तुम्ही परिस्थिती बदलू शकता. प्रयत्न करत राहायचे. शेवटी काय उरणार? - तर ते फक्त प्रेम. गाण्यातून मी प्रेम वाटते. मी गेल्यानंतर हेच प्रेम मागे राहणार आहे. कोणाला दु:ख होईल असं बोलायचं नाही असं आता ठरवलं आहे.’
आजच्या पिढीला काय सांगाल, असं विचारलं तर आशाताई म्हणाल्या, ‘आजची पिढी कोणाचंच ऐकत नाही. मी त्यांना
सांगायला गेले तर ते म्हणतील, तुमचा
काळ गेला. तुम्ही म्हाता:या झाल्या आहात.
अशा वेळी आपण काय सांगणार?
कॉम्प्युटरच्या दोन-चार सॉफ्टवेअरवर
खेळणं म्हणजे संगीत नाही. त्यासाठी रियाज करावा लागतो. मी आजही नियमित रियाज करते. संगीत साधनेतूनच स्वरांचा आशीर्वाद मिळतो.’
आजची मस्तानी
जरा जास्तच मस्तानी आहे
मराठी चित्रपटांना सुगीचा काळ आला आहे. ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ सारख्या कलाकृतींनी प्रेक्षकांना थिएटरची पायरी चढायला भाग पाडलं. आशाताईंनाही त्याविषयी समाधान आहे. मात्र, नाटक पाहण्यात त्यांना जास्त रस आहे.
‘बाजीराव मस्तानी’बद्दल झालेल्या वादावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘मी अजून तो चित्रपट पाहिलेला नाही. मात्र माङया मनातली ‘मस्तानी’ त्यात नाही. मस्तानी कशी नाजूक, सौंदर्याची खाण. तिचं वर्णन असं करतात की, तिने विडा खाल्ला तर तिच्या सुकुमार गळ्यातून लाल रंग खाली उतरताना दिसे. माङया मनात मस्तानीची ती प्रतिमा आहे. आजची (दीपिका) मस्तानी जरा जास्तच मस्तानी आहे, नाही का?’
डोळ्यांतल्या पाण्याची कविता
मी फार शिकलेली नाही; पण वाचनातून मला जग कळत गेलं. भावनांची तरलता, गंभीरता, व्यक्त-अव्यक्तपणा हे सारे बारकावे मला पुस्तकांनी शिकवले, जे मला गाताना कामी आले. आजची पिढी वाचनापासून दुरावली आहे. जी मुलं वाचत नाहीत ती दुर्दैवी आहेत. मला फार वाईट वाटतं, की आता आपलं युग संपलं. या नवीन युगातील मुलांना कसं कळणार की डोळ्यात पाणी आणणारी कविता म्हणजे काय?’
काय चाललंय हे?
‘मुन्नी, शीला, हलकट जवानी हे असलं कानी पडायला लागल्यावर मी ही गाणी ऐकणंच सोडून दिलं. काय ऐकायचं? आणि कशाला? आजही किशोरकुमार, दीदी, रफी यांचीच गाणी माङया मनात वाजत असतात. त्यात मध्येच आजचा आरडाओरडा कानी आला की वाटतं, काय चाललंय हे?’
शेवटी काय उरणार? - तर ते फक्त प्रेम. गाण्यातून मी प्रेम वाटते. मी गेल्यानंतर हेच प्रेम मागे राहणार आहे.
भटसाहेबांच्या कविता आणि ‘तो’ लेख
सुरेश भटांच्या कवितेला वेगळ्या अंगाने गाण्याचा नवा प्रकल्प आता आशाताईंनी हाती घेतला आहे. त्याबद्द्ल बोलताना सुरेश भटांचा विषय निघाला. सुरेश भट म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्त्व. बघता बघता शब्दांचं रूपच बदलून टाकायचे. ‘श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात’ अशी रचना केवळ तेच लिहू शकतात. त्यांच्या सोबत अनेक वर्षे काम करण्याची मला संधी मिळाली. काही दिवसांपूर्वी पुस्तकांचं कपाट साफ करताना मला त्यांनी लिहिलेलं एक पत्र सापडलं. एवढय़ा वर्षात मी ते पूर्णपणो विसरूनच गेलो होतो. त्यात लिहिलं होतं, बाबूजींच्या - म्हणजे माङो वडील स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या - पुण्यतिथीनिमित्त मी लेख पाठवत आहे, तो छापावा. त्यांचा तो लेख नजरचुकीने बाजूलाच राहिला. परंतु आता जेव्हा आम्ही बाबूजींची शताब्दी साजरी करू त्यावेळी तो लेख प्रसिद्ध होईल, असं मी आशाताईंना म्हणालो.
..आणि भटसाहेबांच्या आठवणीखातर या श्रेष्ठ गायिकेचे डोळे परत पुन्हा ओलावले.
लोकमत औरंगाबाद कार्यालयात आशाताईंना मी आणि संपादक चक्रधर दळवी यांनी सहका-यांची ओळख करून दिली व संपादकीय विभागातील कामकाज दाखविले तो सुरेल क्षण. त्यावेळी आशाताई म्हणाल्या, ‘तुम्ही लिहिता ते मी वाचते बरं का!’