राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने यंदा गौरवल्या जाणा-या विक्रम अडसूळ या शिक्षकाने बंडगरवस्तीतल्या शाळेत नेमकं काय केलं त्याची एक रंजक गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 07:00 IST2018-09-02T07:00:00+5:302018-09-02T07:00:00+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील बंडगरवस्ती़ डोंगरावर वसलेलं आणि जेमतेम दीडशे लोकवस्तीचं हे गाव. शाळाही फक्त चौथीपर्यंत. पण इथल्या शाळेत शिकवणा-या विक्रम अडसूळ या शिक्षकाला येत्या शिक्षकदिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जाणार आहे. पाड्यावरच्या या शाळेत त्यांनी असं काय केलं, मुलं स्वत:हून कशी शिकायला लागली, त्याची ही रंजक कहाणी.

An interesting story about Bandgarvasti school where students learns themselves. Vikram Adsul this Teacher help for this. | राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने यंदा गौरवल्या जाणा-या विक्रम अडसूळ या शिक्षकाने बंडगरवस्तीतल्या शाळेत नेमकं काय केलं त्याची एक रंजक गोष्ट

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने यंदा गौरवल्या जाणा-या विक्रम अडसूळ या शिक्षकाने बंडगरवस्तीतल्या शाळेत नेमकं काय केलं त्याची एक रंजक गोष्ट

-साहेबराव नरसाळे

बंडगरवस्ती़ अहमदनगर जिल्ह्यातील हंडाळवाडी (तालुका कर्जत) या दुर्गम गावातील जेमतेम दीडशे लोकसंख्येची वस्ती़ या बंडगरवस्तीत उंच टेकडीवरची शाळा़ पांदीपांदीतून मार्ग काढीत शाळेत पोहोचलो, त्यावेळी चार जणांचा एक गट कॅरम खेळत होता़ एकजण कॅरमची सोंगटी मारतो आणि वहीवर आकडे टिपतो़ पुन्हा दुसरा खेळतो आणि आकडे टिपतो़. शेजारीच दुस-या एका गटाने सापसिडीचा खेळ मांडलेला़ एका कोप-यात लॅपटॉपवर एक मुलगा टायपिंग शिकतोय तर त्याच्याच शेजारी बसलेली मुलगी शैक्षणिक व्हिडीओ पाहतेय़़. 

याच शाळेचे उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक विक्रम अडसूळ यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आह़े राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून पात्र ठरलेले ते एकमेव़ त्यांची शाळा, शिकविण्याची पद्धत अन् मुलांमध्ये मूल होऊन खेळण्याची त्यांची वृत्ती मुलांनाही आपसूक त्यांच्या आनंददायी शिक्षणाच्या खेळात ओढून घेत़े.


त्यांची शाळा पाहण्यासाठी मी अहमदनगरहून सुमारे 80 किलोमीटरचा प्रवास करून हंडाळवाडीत पोहोचलो़ हंडाळवाडीतून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर बनगरवाडी आह़े बनगरवाडीच्या दक्षिणेला डोंगरावर ही शाळा आह़े
‘डोंगरांमध्ये दूरवर पसरलेल्या हनुमाननगर, बिडगरवस्ती, पारखेवस्ती, भिसे वस्ती, हंडाळवस्ती या वस्त्यांमधून मुले बंडगरवस्ती शाळेत येतात़ या शाळेची पटसंख्या आहे 28़ येथील सर्व मुलं मेंढपाळांची़ पावसाळ्यात हे मेंढपाळ घराकडे येतात आणि पावसाळा संपला की मेंढय़ा घेऊन भरकटतात गावोगाव़ अख्खं कुटुंबच पाठीवर घेऊन रानोमाळ भटकंती करणा-या समाजाची ही मुलं.  ही मुलं शिकली पाहिजेत, शहाणी झाली पाहिजेत, समाजाच्या मुख्य प्रवाहात आली पाहिजेत, यासाठी अहोरात्र कष्टणारी कविता बंडगर आणि हसत-खेळत मुलांमध्ये शिक्षणाचे बीज अंकुरणारे विक्रम अडसूळ, यांची ही द्विशिक्षकी शाळा़ इथल्या चौथीपर्यंतच्या आनंददायी प्रवासाची वाट मोठी खडतर आह़े दगडधोंडे, काट्याकुपाट्याचा रस्ता तुडवीत ही मुले शाळेत येतात़ पावसाळ्यात चिखलाने माखतात़ या मुलांच्या पायात रुतलेला काटा काढण्यापासून ते चिखलाने माखलेल्या मुलांचे कपडे स्वच्छ करण्यापर्यंत हे शिक्षकद्वयी काम करतात़ म्हणूनच सरांना मुलं घरून आणलेली बाजरीची भाकरी आणि ठेचा आग्रहाने खाऊ घालतात़ सरांवर प्रेम करतात़.

 

‘मुलं शिकली पाहिजेत, टिकली पाहिजेत, हा अडसूळ सरांचा उद्देश़ म्हणूनच त्यांनी वेगवेगळे प्रयोग केल़े कोणत्याही सुविधा नसलेल्या या शाळेत त्यांनी सर्व सुविधा आणल्या़ लॅपटॉप, टॅब अशी आधुनिक साधनेही मुलांच्या हाती दिली़ मुले त्यांचा वापर करू लागली़ इतर राज्यातील अनेक शाळांमधील मुलांशी या शाळेतील मुलं संवाद साधू लागली़ एव्हढेच नव्हे तर परदेशातीलही काही शाळांशी या दुर्गम मुलांनी थेट संवाद साधला़. 

महाराष्ट्रात 2014 साली ज्ञानरचनावादाचा बोलबाला झाला़ पण बंडगरवस्ती शाळेत 2013 पासूनच ज्ञानरचनावाद पद्धतीने मुलांना शिकविले जात होत़े 

ज्ञानरचनावादाचा विषय येताच अडसूळ म्हणाले, ज्ञानरचनावाद म्हणजे कृतिशील स्वयंअध्ययऩ यात मुलांनी स्वत: कृतीतून शिकायचे असते आणि शिक्षकांनी त्यांना शिकण्यास मदत करायची़ एव्हढी सोपी ही पद्धत आह़े आम्ही मुलांना विविध शैक्षणिक साहित्य देतो़ मुलं खेळत-खेळत शिकतात़ यातून दोन उद्देश सफल होतात. एक म्हणजे खेळाचा आनंद मुलांना मिळतो आणि आपोआप मुलांचा अभ्यासही होतो़ .


मी शाळेत पोहोचलो तेव्हा मुले गणिती कॅरम खेळत होत़े एका सोंगटीवर लिहिलेला आकडा पुसला होता़ ही बाब मुलांनी सरांच्या लक्षात आणून दिली़ क्षणाचाही विचार न करता अडसूळ यांनी हातात कात्री घेतली़ कराकर एक कागद कापला़ त्यावर तो आकडा लिहिला आणि त्या सोंगटीवर गोलाकार पद्धतीने चिकटवलाही़ मुलांचा खेळ पुन्हा सुरू झाला़  अशाच पद्धतीनं मुलं शिकतात. शिकण्याची त्यांना गोडी लागते. त्याचा त्यांना जाच वाटत नाही.

विविध शैक्षणिक साहित्याची निर्मितीही त्यांनी केली आह़े हसत खेळत शिक्षण यावर अडसूळ सरांचा भर आहे आणि त्यामाध्यमातूनच त्यांनी आडवळणाच्या या गावातल्या, येथील मुलांच्या शिक्षणात, त्यांची समज वाढवण्यात खूप मोठा वाटा उचलला आहे. अशा प्रकारे मुलांना शिक्षण मिळालं तर ती नुसती आनंदानं शिकणारच नाहीत, तर शाळाबाह्य मुलंही फारशी दिसणार नाहीत.  

 

 

शाळेचा प्रवास

बंडगरवस्ती शाळेची सुरुवातही मोठी रंजक आह़े कविता बंडगर या हंडाळवाडीत दहावी शिकलेल्या एकमेव़ दहावीनंतर त्यांचे लग्न शेजारच्या बंडगरवस्ती येथील मुलाशी झाल़े लग्नानंतर कविता बंडगर यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल़े त्यांनी बंडगरवस्तीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला़ त्यांना वस्तीवर विरोध झाला़ हा विरोध झुगारून त्यांनी 2001 साली शाळा सुरू केली़ ज्या खोलीत शाळा भरायची, तेथून त्यांना बाहेर पडावे लागल़े शाळा उघड्यावर आली़ पण त्यांनी हार मानली नाही़ मुलांना झाडाखाली बसवून त्या शिकवू लागल्या़ पुढे त्यांची तळमळ, मुलांमध्ये आलेली हुशारी पाहून सरपंचांचे मनपरिवर्तन झाले आणि त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेसाठी एक छोटी इमारत दिली़ शासनाच्या आदेशाप्रमाणे या शाळेला वस्तीशाळेचा दर्जा मिळाला़ कविता बंडगर विनावेतन तेथे शिकवत होत्या़ 2008 साली या शाळेला जिल्हा परिषद शाळेचा दर्जा मिळाला अन् सुमारे आठ वर्ष सावित्रीच्या लेकीने केलेल्या संघर्षाला यश आल़े 2009 साली विक्रम अडसूळ हे उपक्रमशील शिक्षक आंतरजिल्हा बदलीद्वारे या शाळेत आल़े 2009 पर्यंत अडसूळ पारुंडी (ता़ पैठण, जि़ औरंगाबाद) येथील शाळेत होत़े त्या शाळेचा कायापालट करून ते बंडगरवस्ती शाळेत दाखल झाले होत़े त्यावेळी ग्रामपंचायतने दिलेल्या एका खोलीत शाळा भरत होती़.


जुना वर्ग मुलांना पुरेसा ठरत नव्हता़ त्यामुळे कविता बंडगर आणि विक्रम अडसूळ या शिक्षकद्वयींनी इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा सुरू केला़ सरकार निधी द्यायला तयार होत़े पण जागा नव्हती़ गावकरी शाळेसाठी जागा द्यायला तयार नव्हते आणि ग्रामपंचायतकडे पुरेशी जागा नव्हती़ शेवटी कविता बंडगर यांनीच आपली सुमारे आठ गुंठे जागा शाळेला दिली आणि प्रश्न सुटला़ शाळेच्या बांधकामासाठी निधी मिळाला़ काम सुरू झाल़े पाया खोदण्यापासून इमारत उभी राहीपर्यंत दोघेही श्रमत राहिल़े कधी लोखडांची गाडी शाळेपर्यंत आणण्यासाठी तर कधी विटा पोहोच करण्यासाठी़ दरम्यान कविता बंडगर यांनी पत्राद्वारे डी़एड़चे शिक्षण पूर्ण करून घेतल़े त्या सहयोगी शिक्षिका म्हणून तेथेच रुजू झाल्या़. 

हसत खेळत शिक्षण
 

गणिती कॅरम -  गणिती कॅरम खेळ मुलांना हसत-खेळत गणित शिकवतो़ त्यांना गणिती आकडेमोड करण्याची आवड लागत़े हा खेळ गटात खेळल्यामुळे ज्या मुलाला गणिती क्रिया येत नाही किंवा ज्याचे गणित चुकते त्याला इतर मुले मदत करतात. यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार मुले आनंदाने करतात़

गणित शिडी -  सापशिडी हा मुलांच्या आवडीचा खेऴ त्याच पद्धतीने गणित शिडी हा खेळ आह़े हा खेळ चार जणांमध्ये खेळला जातो. यातील सोंगटीवर आकडे असतात़ ते वाचून मुलांनी पुढील घरात ठेवायच़े यातून मुलांना आकडे ओळख होते आणि संख्यामापन ते अचूक करू लागतात़ 

शब्दडोंगर - यामध्ये मुलांना एक शब्द सांगितला जातो़ त्या शब्दाच्या अनुषंगाने मुले त्यांच्या मनात येईल ते लिहितात़ यामुळे मुलांची शब्दसंपत्ती वाढण्यास मदत होऊन मुले विचार करू लागतात. त्यांच्या विचारांना चालना मिळून लेखन क्षमता विकसित होते.
 

शब्दबँक - या उपक्रमामध्ये मुलांची शब्दसंपत्ती वाढवली जाते. शनिवारी दप्तरमुक्त शाळा असते. मुलांना वाचनालयातील पुस्तके वाचायला देऊन त्यातील नवीन शब्द शोधून त्यांना ते एका ठिकाणी संकलित करायला सांगितले जात़े नंतर ते मुलांच्या मदतीने कार्डशिटवर लिहून त्याचे संकलन डब्यात केले जात़े वेळेनुसार पुन्हा त्या शब्दांचे लेखन व वाचन करून मुले त्यांची शब्द साठा वाढवतात़.

कलेतून शिक्षण - मुलांना एखादा पाठ शिकविल्यानंतर त्याचे नाट्यीकरण केले जात़े विषयानुसार मुलेच त्यांचे संवाद ठरवतात़ पात्रेही तेच निवडतात़ नंतर मुले संभाषण करतात. यामध्ये प्रमाणभाषेचे बंधन नसते. त्यामुळे मुले आपल्या बोलीभाषेतून चांगल्या प्रकारे व्यक्त होतात. आशय समजून घेण्यासही त्यामुळे मदत होते.

(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आह़ेत.)

sahebraonarasale@gmail.com

Web Title: An interesting story about Bandgarvasti school where students learns themselves. Vikram Adsul this Teacher help for this.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.