अविस्वमरणीय चित्रपट

By Admin | Updated: December 18, 2014 22:27 IST2014-12-18T22:27:08+5:302014-12-18T22:27:51+5:30

यंदाच्या इफ्फीमध्ये मी तुलनेने फारच कमी सिनेमे पाहिले. त्याचं कारण म्हणजे यंदा मी कान आणि कोरियातील बुसान महोत्सवाला जाऊन आलो होतो

Incredible movie | अविस्वमरणीय चित्रपट

अविस्वमरणीय चित्रपट

 अशोक राणे,  (लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.) -

यंदाच्या इफ्फीमध्ये मी तुलनेने फारच कमी सिनेमे पाहिले. त्याचं कारण म्हणजे यंदा मी कान आणि कोरियातील बुसान महोत्सवाला जाऊन आलो होतो. त्यातलेच बहुतांश सिनेमे गोव्यात होते. तरीही काही पुन्हा पाहायलाही आवडले असते. आम्हा फिल्म सोसायटीच्या शाळेतून आलेल्यांना महोत्सवात एका विभागाचे विशेष आकर्षण असते. तो म्हणजे एखाद्या दिग्दर्शकाचा रेट्रोस्पेक्टिव्ह - म्हणजेच पुनरावलोकन विभाग! यात जागतिक सिनेमात भरीव कामगिरी करणार्‍या एखाद्या दादा दिग्दर्शकाच्या अभिजात कलाकृतींचा समावेश असतो. ते सारे सिनेमे सलग आणि एकत्रितपणे पाहिले, की केवळ तो, त्याचे चित्रपट यांचाच नव्हे, तर त्याचा देश, तिथली चित्रपटसृष्टी, तिथलं सामाजिक-राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक वातावरण आणि याला असलेल्या जगभरच्या चित्रपट संस्कृतीचा संदर्भ असा भलाभक्कम अभ्यास होतो. यंदाच्या इफ्फीमध्ये इराणचे जगप्रसिद्ध दिग्दर्शक मोहसिन मखमलबाफ यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह होता. 
 जे  सिनेमे मी पाहिले त्यातला मला सर्वांत जास्त आवडला ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’. सर्वार्थाने ग्रेट चित्रपट ! त्याच्याविषयी बोलताना साहजिकच ‘बायोपिक’ म्हणजेच ‘चरित्रपट’ या जॉनरविषयी बोलणं ओघानेच आलं. कारण हा पण बायोपिकच आहे. स्टिफन हॉकिंग या जगप्रसिद्ध आणि विलक्षण, अभूतपूर्व इच्छाशक्ती असलेल्या वैज्ञानिकाची, एका माणसाची नव्हे, खर्‍या अर्थाने एका महामानवाची कहाणी आहे. त्यांचे संशोधन, त्यांची पुस्तके याविषयी जरी सर्वसामान्यांना फारशी माहिती नसली, तरी त्यांच्या ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ या पुस्तकाचं नाव अगदी याच सर्वसामान्यांच्या कानावरून गेलंय. त्यातल्या अनेकांनी हे पुस्तकही वाचलंय आणि म्हणून मग या महामानवाविषयी जमेल तेवढं जाणूनही घेतलंय. ही सर्वसामान्यांची टेप मी का लावलीय, हेही सांगतो. सिनेमा हे मासमीडिया आहे, असं सतत बोललं, लिहिलं जातं. परंतु, ते खरंच किती लोकांना कळलंय हा संशोधनाचाच विषय ठरेल.
‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’चा दिग्दर्शक जेम्स मार्श याला मात्र ते नेमकं कळलंय आणि म्हणूनच, कथानायकाचं वैज्ञानिक काम, संशोधन, त्यातली व्याप्ती आणि सबंध मानवसृष्टीच्या अस्तित्वाचा असलेला संदर्भ असा सारा घनघोर, अगदी क्लिष्टही ऐवज असताना जेम्स सर्वसामान्यांना त्यात गुंतवून ठेवतो. या मुद्दय़ावर सविस्तर काही बोलण्याआधी एक उदाहरण देतो. ‘महाभारत’ हे जसं बुद्धिवंतांपासून ते सर्वसामान्यांना एकाच वेळी आकर्षित करतं तसा हा ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ हा चित्रपट आहे. स्टिफन हॉकिंग यांचं वैज्ञानिक कार्य हे ज्यांना विज्ञान कळतं, त्याचा विज्ञानापलीकडचा आवाका कळतो त्यांना तर कळतंच, परंतु एका असाध्य आजारावर मात करीत त्यांनी काढलेला मार्ग हे विलक्षण प्रेरणादायी आहे. कथेचा हा स्तर सर्वसामान्यांना निश्‍चितच धरून ठेवेल आणि हा स्तर केवळ फिक्शनपुरता आलेला नाही, तर ‘स्टिफन हॉकिंग’ या कथेचा तो अविभाज्य भाग आहे.
 ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ या चित्रपटाचं म्हणजेच या चरित्रपटाचं सर्वांत मोठ्ठं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्याआमच्यात वावरणार्‍या या महामानवाकडे एक माणूस म्हणून पाहणं. कुणीही जन्मत: महामानव असत नाही. तो तसा घडत जातो आणि या प्रक्रियेत त्याच्यातल्या माणूसपणाचं जे दर्शन घडतं ते विलोभनीय असतं. त्याच्यात गुंतवणारं असतं. अलीकडच्या काळात आलेल्या अशा काही चरित्रपटांचं याक्षणी आवर्जून स्मरण होतं. त्यातला पहिला रिचर्ड अटेनबरो यांचा ‘गांधी’!  काही तपशील, काही व्यक्तिरेखा आणि काही घटना त्यात नव्हत्या, हे मान्य करूनदेखील गांधी कसे होते, याचं नेमकं दर्शन त्यातून घडतं आणि म्हणून मग हा चित्रपट सर्वार्थाने उत्तम चरित्रपट ठरतो. 
गांधी या महामानवाचा, त्यातल्या माणसाचा रिचर्ड अटेनबरो यांनी किती बारकाईने अभ्यास केला होता, ते आपल्याला ठाऊकच आहे. परंतु गांधींची भूमिका करणार्‍या बेन किंग्जले यांनी मला जी एक छोटीशी गोष्ट सांगितली होती, त्यातून एकूण या चित्रपटनिर्मितीमध्ये विचार किती प्रभावी होता ते कळेल. बर्लिन महोत्सवात माझी त्यांची एका छोटेखानी कार्यक्रमात ओझरती भेट झाली. मी त्यांना म्हटलं, की अनेकांनी विचारलेलाच एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही उत्तर दिलं नाहीत तरी हरकत नाही. ते हसले. मी विचारलं.. ‘‘गांधीच्या भूमिकेत आव्हानात्मक असं काय होतं?’’ ते म्हणाले, ‘‘त्यांचे डोळे ! त्यांच्यात डोळ्यांत करुणा होती आणि मिस्किल भाव ही होता. हे मिश्रण अजब तितकच विलक्षण होतं आणि ते मी माझ्या डोळ्यांतून दाखवणं हे आव्हान होतं. मी प्रयत्न केला.’’
 बेन किंग्जले यांनी केवळ प्रयत्न केला आणि त्यांना ऑस्करसकट सर्व थोरथोर पुरस्कार प्राप्त झाले. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते अंतर्बाह्य गांधी वाटले. दिसले. कारण वर म्हटल्याप्रमाणे संकल्पना ते चित्रपट या संपूर्ण प्रवासाच्या मागे विचार ठोकपणे उभा आहे. अटेनबरोंनाही गांधींविषयी प्रचंड प्रेम होतं, आदर होता, अगदी भक्तीही होती; परंतु मुळाशी विचारांची बैठक पक्की होती. तुमच्याकडे एक गोष्ट असते, मग ती काल्पनिक असो वा एखाद्याचे चरित्र - ती गोष्ट पडद्यावर मांडताना माध्यमाचं भान सुटून चालत नाही. ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’मध्ये ते अजिबात सुटलेलं नाही. मुख्य म्हणजे सिनेमा हे मासमीडिया आहे, याचीही दिग्दर्शकाला नेमकी जाणीव आहे. चरित्रपटात तर त्याची खास गरज असते. 
इंग्लंडच्या पंतप्रधानपदी फार मोठा काळ विराजमान झालेल्या आणि आपल्या कणखर नेतृत्व गुणाने जगाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या मार्गारेट थॅचर यांच्या जीवनावरचा ‘आयर्न लेडी’, दुसर्‍या महायुद्धाच्या त्या भीषण काळात आपल्या जीवावर उदार होत काही ज्यूंचे जीव वाचवणार्‍या त्या कुणा शिंडलरवरचा स्टिव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ‘शिंडलर्स लिस्ट’, गुलामगिरीची घृणास्पद पद्धत मुळापासून उपटून काढण्यासाठी सर्वप्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत संसदेत तसा कायदा पास करवून घेणारे अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा तो अभूतपूर्व लढा चितारणारा स्टिव्हन स्पिलबर्गचाच ‘लिंकन’, पु यी या एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलाचं चीनच्या राज घराण्यात दत्तक जाऊन त्याचं सम्राटपदावर विराजमान होणं आणि मग लाल क्रांतीनंतरची त्याची फरफट, असा सारा चरित्रात्मक कथाभाग असलेला बर्नांडो बर्तोलुची यांचा ‘द लास्ट एम्परर’, जॉन फॉर्ब्स नॅश ज्यु या गणितज्ञाच्या आयुष्यावरचा ‘अ ब्युटिफुल माइंड’ या सार्‍या चरित्रपटांचे नायक आणि त्यांचं काम तसं सर्वसामान्यांना गुंतागुंतीचं वाटलं, आकलनाच्या पातळीवर काहीसं क्लिष्ट वाटलं, तरी ते त्यांना आवडले. याचं कारण म्हणजे या सर्व चरित्रपटातून या महामानवांच्या आतला माणूस बारकाईने शोधला गेला आणि तसाच तो समोर ठेवला गेला आणि म्हणूनच हे सर्व चरित्रपट समजातील सर्व थरातील प्रेक्षकांना आवडले. एवढय़ाशा लेखात खूप काही लिहिता येत नाही. तरीपण ‘लिंकन’मधला एक प्रसंग सांगावासा वाटतो. गुलामगिरीचं कायमचं उच्चाटन करणारा कायदा संसदेत पास करून घेण्यासाठी लिंकन आपल्या सहकार्‍यांशी घरी घनघोर चर्चा करतात. सहकारी जातात. लिंकन आपल्या मुलाला शोधत घरभर फिरतात. एका खोलीत तो फरशीवर पसरलेला असतो. लिंकन येऊन त्याच्या शेजारी तसेच पसरतात. 
‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’मध्ये तर असे किती तरी प्रसंग आहेत. कॉलेजात असताना जेव्हा स्टिफनला कळतं, की कधीच बरा न होणारा असाध्य आजार त्याला जडलाय तेव्हा तो डॉक्टरांना विचारतो की नेमकं काय होईल? डॉक्टर म्हणतो, एकेक करीत तुझे बरेचसे अवयव निकामी होतील. तो विचारतो..आणि मेंदू? डॉक्टर म्हणतात, तुझ्या मेंदूला अजिबात काही होणार नाही.  त्याचे डोळे चमकतात. परंतु, तू केवळ दोनच वर्षे जगशील, असं त्याला सांगण्यात येत तेव्हा मात्र तो निराश होतो. वैफल्यगस्त होतो. खोलीत स्वत:ला कोंडून घेतो. त्याची मैत्रीण त्याला भेटायला येते तेव्हा तो टीव्हीवर सिनेमा पाहत असतो. ती विचारते, काय पाहतोयस? तो म्हणतो, दोन तरुण आहेत. एक तरुणी आहे. समज गैरसमज आहेत. भावनिक कल्लोळ आहेत. ती मध्येच विचारते, पण तू काय पाहतो आहेस? तो म्हणतो, मॅथेमॅटिक्स! स्टिफन हॉकिंगच तो! या चित्रपटात स्टिफन हॉकिंगचं अवघं आयुष्य दाखवलं आहे. कॉलेजात दाखल झालेला एक सळसळत्या उत्साहाचा तरुण ते तो आजार ते त्यामुळे त्याचं कमालीच्या वेगाने ढासळत गेलेलं शारीरिक आरोग्य, ते त्याचं एका खुर्चीत कायमचं येऊन बसणं आणि या दरम्यान विज्ञानाच्या क्षेत्रात त्यानं मिळवलेलं देदीप्यमान यश, असा हा आलेख अतिशय प्रभावीपणे या अवघ्या एकशेतेवीस मिनिटांच्या चित्रपटात मांडण्यात आला आहे. यात अर्थातच त्याची ती प्रेयसी, तीच पुढे सर्वार्थाने सहधर्मचारिणी, तिची हेवा वाटावा अशी साथ, त्यांचा संसार, मग घटस्फोट आणि मग दुसरा विवाहदेखील! परंतु या सर्वांतून दोन नायक ठोसपणे समोर येतात.
एक लोकविलक्षण वैज्ञानिक आणि एक माणूस, त्याची जिद्द, कल्पनातीत अशा संकटाशी त्याची यशस्वी झुंज!  हे दोन्ही नायक सर्वप्रकारच्या प्रेक्षकाला धरून ठेवू शकतात. आजवर आपण पाहिलेल्या उत्तमोत्तम चरित्रपटातील हे एक एक खणखणीत नाणं! 
 

Web Title: Incredible movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.