प्रभाव... नेतृत्वाचा आणि शब्दांचा
By Admin | Updated: May 24, 2014 13:44 IST2014-05-24T13:44:31+5:302014-05-24T13:44:31+5:30
व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच शब्दांनाही करिष्मा असतो. बिल क्लिंटन यांचे बोलणे म्हणजे जणू एखादी मैफलच. मार्टीन ल्युथर किंग शब्दांनीच मने जिंकत. इंदिरा गांधींच्या भावनात्मक आवाहनांनी भारतीय माणूस हेलावून गेला होता. बराक ओबामांनी हृदयाला हात घालणारा येस, वुई कॅनचा मंत्र दिला. आणि आता नरेंद्र मोदींनी सब का साथ, सब का विकास हा नारा दिला आहे. जगाच्या पटावरचे हे सारेच नेते प्रभावशाली आणि तितकेच महत्त्व त्यांच्या शब्दांनाही..

प्रभाव... नेतृत्वाचा आणि शब्दांचा
- हेमंत देसाई
आज मी इथे आहे. कदाचित उद्या मी या जगात नसेन. मी जगणार आहे की मरणार आहे, याची तमा आता मला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत माझं सेवाव्रत चालूच असेल. काळाचा घाला माझ्यावर पडेल, त्या वेळी वाहणार्या माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला शक्ती आणि सार्मथ्य देईल.’
३0 ऑक्टोबर १९८४ रोजी ओडिशातील जाहीर सभेत इंदिरा गांधींनी काढलेले हे उद्गार. त्याच्या दुसर्याच दिवशी त्यांची निर्घृण हत्या झाली; परंतु त्यांच्या या शब्दांनी त्या क्षणी भारावलेले लोक त्यांचे कलेवर बघून अक्षरश: हळहळले..
भाजपाच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भाषण करताना नरेंद्र मोदी पक्षाविषयीच्या मातृभावामुळे हळवे झाले. ‘मी पक्षावर कोणतीही कृपा केलेली नाही. भारतमातेप्रमाणे भाजप ही माझी आईच आहे नि आईची सेवा करण्याला कृपा म्हणता येत नाही,’ असे भावनेने ओथंबलेल्या स्वरात ते म्हणाले, तेव्हा लालकृष्ण अडवाणी, रविशंकर प्रसाद, गिरिराज सिंह यांनाही गहिवरून आले..
त्यांच्यातील माणूसपण जागे आहे, हे पाहून बरे वाटले..
जनतेशी सोडाच, कदाचित स्वत:शीही न बोलणारे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आपण पाहिले आहेत. जनतेशी सुसंवाद साधण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली काँग्रेसचा प्रत्येक नेता देत असताना, ‘कम्युनिकेशन’मध्ये आपण मास्टर असल्याचा प्रत्यय नमो देत होते.. ४५0 सभा, रोड शो आणि व्हिडिओ-यू ट्यूब-सोशल मीडियातून करोडो जनांपर्यंत पोहोचलेल्या नमोंसाठी अनेक व्यूहरचनाकार व तंत्रज्ञ राबत होते. मात्र, विजयानंतर संसदेतील त्यांचा वावर उत्स्फूर्त व थेट हृदयाला स्पर्श करणारा होता. ‘‘इथे मी घटनाकारांचे फोटो बघतोय.. ते म्हणताहेत हा माझा विजय आहे.. पण, खरे तर तो स्वातंत्र्यवीरांचा, संघर्षवीरांचा व घटनाकारांचा आहे.’’ गुजरात दंग्यात घटना पायदळी तुडवली गेली असली, तरी तो काळा इतिहास मागे टाकून मी आता घटनात्मक मूल्यांचा आदर करणार आहे, असे जणू नमो सुचवत होते. स्वातंत्र्यसंगरात भाग घेण्याची संधी मिळाली नाही; पण आता देशसेवेची संधी मिळाल्याचे सांगताना त्यांनी राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण, या कल्पनेला स्वागतार्ह छेद दिला.
त्यांनी ‘सब का साथ, सब का विकास’वर भर दिला. मी प्रथमच या ठिकाणी येत आहे, हे सांगताना आपली सामान्य पार्श्वभूमी त्यांनी अधोरेखित केली व ‘चायवाला’ अशी त्यांची हेटाळणी करणार्या मणिशंकर अय्यरपंथीयांना जागा दाखवून दिली. माझ्या वरिष्ठ नेत्यांनी मला खांद्यावर घेऊन या उंचीवर नेऊन ठेवले आहे, अशी विनम्र भावना नमोंनी व्यक्त केली.
गरीब, युवक, स्त्रिया व सर्व भारतीयांची सेवा करण्याचे वचन देताना त्यांनी लोकशाहीच्या गाभ्याला हात घातला. आपले धोरण गरीबवादी असेल, हे नमोंनी सूचित केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा उल्लेख करून, त्यांनी धर्मांधतेकडून एकात्म मानवतेकडे जाण्याचा इरादा स्पष्ट केला आणि रा. स्व. संघाला दिलासाही दिला. अगोदरच्या सरकारांच्या चांगल्या कामाचे आपल्याला कौतुक असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सोनिया व राहुल गांधी यांनी नमोंना फोन करून अभिनंदन करण्याचे सौजन्य दाखविलेले नाही.
आणीबाणीनंतरही जनतेने इंदिरा गांधींना माफ केले व त्या पुन्हा सत्तेवर आल्या, तशीच नमोंनाही देशाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. मागील चार वर्षांत धान्य-भाज्यांचे भाव ६५ टक्के वाढले, त्याची काँग्रेसला शिक्षा मिळाली. २00४मध्ये काँगेस-भाजपा यांच्यातील जागांचे अंतर फक्त नऊच होते. या जागाही काँग्रसने जेमतेम ३,५00च्या मताधिक्याने जिंकल्या होत्या. तेलुगू देसम व अण्णा द्रमुक यांना कमी जागा मिळाल्याने तेव्हा भाजपाची सत्ता गेली. २00९मध्ये काँग्रेस जिंकली, कारण २00७ ते २00९ दरम्यान शेतकर्यांच्या खिशात कर्जमाफी अनुदानाच्या माध्यमातून पाच लाख कोटी रुपये घालण्यात आले. ही निवडणुकीसाठी दिलेली शुद्ध लाच होती. त्यात अडवाणींनी गलथानपणे तिकीटवाटप केल्यामुळे भाजपाला ११८ जागाच मिळाल्या.
गेले आठ महिने मोदींनी लोकांची मने जिंकून प्रचार केला. आक्रमक, तडफदार प्रचारात ५६ इंची छाती फुगवून दाखविणारे नमो, मध्ये-मध्ये ‘व्होट फॉर इंडिया’सारख्या घोषणा वदवून घेत होते. व्यासपीठांवरून या टोकापासून त्या टोकापयर्ंत जात सुहास्य मुद्रेने लक्षावधींना अभिवादन करीत होते. निवडणुकीनंतर ते नेमस्त, उदार, समन्वयवादी आणि भावुक प्रतिमा पेश करीत आहेत. आपण पंतप्रधानच नाही, तर देशाचे नेते आहोत, ही जाणीव त्यांच्या मनात आहे, असे दाखवून देत होते.
सर्वच क्षेत्रांत ‘मी, मी, मी’ करणारे लोक असतात. नमोंमध्येही ही नार्सिसिस्ट वृत्ती आहे; परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्यांना खाटीक व दंगाबाबू संबोधले, त्या नमोंबद्दल सामान्यांना भीती वाटत नाही. उलट, त्यांचे स्फूर्तिदायक व प्रभावी भाषण ऐकण्यास लाखोंची गर्दी जमते. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी लोक उत्सुक असतात. भारत नैराश्यग्रस्त असताना जनतेला त्यांचा आधार वाटला. नमो सरकार परिणामकारक काम करील की नाही ते पाहावे लागेल; पण नव्या सरकारबद्दलचे लोकांचे पर्सेप्शन बदलले आहे. आम आदमी, दलाल, व्यापारी, उद्योगपती, नोकरदार यांच्यात एक आशा निर्माण करण्यात मोदी नक्कीच यशस्वी झाले आहेत.
१९३0च्या दशकात महामंदी आली, तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी ‘न्यू डील’ची घोषणा केली. अनौपचारिक गप्पांच्या शैलीत रेडिओवरून भाषणे करून देशवासीयांना पाठबळ दिले. विख्यात कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट रिटर्ड ग्रीनने ‘वर्ड्स दॅट शुक द वर्ल्ड’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्याने रुझवेल्टच्या आवाजाचा पोत, शब्दवापर व देहबोलीचा उल्लेख केला आहे. जॉन केनेडींचा करिष्मा आणि चंद्रावर माणूस पाठविण्याची दूरदृष्टी याचे त्याने कौतुक केले आहे. दहा लाख र्जमनवासीयांसमोर केलेल्या भाषणात कूँ ्रुल्ल ी्रल्ल इी१’्रल्ली१ (मी एक बर्लिनकर!) हे उद्गार काढून टाळ्या घेतल्या. बिल क्लिंटन बोलत, तेव्हा ती जणू मैफल असे व त्यात ते लोकांना सहभागी करून घेत. ‘मि. गोर्बाचेव, टिअर डाउन धिस वॉल’ हे त्यांचे भाषण आव्हानात्मक होते. मार्टिन ल्युथर किंग यांनी ‘आय हॅव अ ड्रीम’ या शब्दांनी मने काबीज केली, तर ओबामांचे ‘येस, वुई कॅन’ हे शब्द धीर देऊन गेले. रोनाल्ड रेगन अध्यक्ष झाले, तेव्हा हा नट राजकारणात फ्लॉप ठरेल, असे वाटत होते. पण, टीव्हीसमोर ते इतके अधिकारवाणीने व धीरोदात्तपणे बोलत, की लोक आश्वस्त होत!
'Logos, ethos and pathos are true pillars of effective communication' असे अँरिस्टॉटलने म्हटले आहे; पण बहुतेक नेते एथॉस वा कॅरेक्टरमध्ये मार खातात. क्लिंटन उत्कृष्ट संवादक, पण मोनिका लेविन्स्कीमुळे त्यांचे प्रतिमाभंजन झाले. त्यांच्या उक्ती व कृतीतील अंतर समोर आले. उलट, ओबामांच्या भाषणांची सुरुवातीला रेगन यांच्या स्पीच रायटरने खिल्ली उडवली होती; पण त्यांचे सच्चेपण लोकांना भावल्यामुळे ते अध्यक्षपदी दोनदा निवडून आले.
चर्चिल यांची भाषणे भावनापूर्ण. ती ऐकूनच तर र्जमनीविरुद्धच्या लढाईत अमेरिका ब्रिटनच्या साथीला उतरली. नेल्सन मंडेला हा चारित्र्यसंपन्न, द्रष्टा नेता. १९६४मध्ये जन्मठेप झाली असताना ते म्हणाले होते, ‘‘मला गोर्यांचे वा काळ्यांचेही वर्चस्व मान्य नाही. मी लोकशाही व मुक्त समाजासाठी लढतो. सर्वांना समान संधी मिळण्याच्या आशेवर मी जगतो. त्याकरिता मी मरायलाही तयार आहे!’’ मंडेलांचे स्वप्न पूर्ण झाले, कारण त्यांनी समाजातला आशावाद जागवला होता.
लोकांना रुचेल ते बोलणारे राजकारणी खूप असतात; पण आपली भूमिका लोकांना आवडो न आवडो, ती सांगणारा व पटवून देणारा तो खरा नेता. नेता प्रामाणिक व तळमळीने सांगत असेल, तर लोकांना त्याचे म्हणणे पटते. मनमोहनसिंग यांनी १९९१मध्ये उदारीकरणाचा पुरस्कार मनापासून केला आणि व्यापार-उद्योग क्षेत्राला तरी त्यांची मते हळूहळू पटली.
आभा गांधी यांनी महात्माजींची एक आठवण सांगितली आहे. सेवाग्राम आश्रमात शरदिनी नावाची एक लहान मराठी मुलगी होती. तिचा कान खूप दुखत होता. तिचे वडील पारनेरकर मोठे गोभक्त होते. बापूंनी तिला आपल्या बाजूच्या झोपडीत राहण्यास सांगितले. रात्री कण्हणे ऐकून बापू तिच्याजवळ गेले व कानात औषध घालून, डोके मांडीवर घेऊन तिला थोपटू लागले. थोड्या वेळाने पारनेरकरजींना जाग आली. आपण झोपलोय व बापू तिला थोपटताहेत, हे बघून ते शरमिंदा झाले. ‘मला का नाही उठवलंत? एवढय़ा रात्री का तसदी घेतलीत?’ असे त्यांनी विचारले. बापू उत्तरले, ‘माझी झोप उडालीच होती; मग इतरांची का उडवू? म्हणून इथं गुपचुप आलो. नाही तरी मला आई बनायचंय ना?’
बोलघेवड्या माणसांपेक्षा अशी पारदश्री माणसेच लोकांना जवळची वाटतात. गांधीजींनी कानपूरमधील काँग्रेसच्या ४0व्या अधिवेशनासाठी अध्यक्षपदी सरोजिनी नायडूंची निवड केली. तेव्हाचे त्यांचे खादी, ग्रामीण जीवनाची पुनर्रचना व धार्मिक ऐक्यावरचे भाषण ऐकून उपस्थित काँग्रेसजन मंत्रमुग्ध झाले. अहिंसा ही सबळांची असावी; नाइलाज म्हणून स्वीकारलेली नव्हे, असे त्या म्हणाल्या. सरोजिनीबाईंच्या शिपाईगिरीचा प्रत्यय मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी आला. धरसाणा येथील मिठाच्या कोठारावर शांततामय हल्ला करताना त्यांनीच नेतृत्व केले. शिपायांनी त्यांच्यावर अमानुष लाठीहल्ला केला; पण हूं की चूं न करता, सत्याग्रही बाण्याने त्यांनी तो सहन केला. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल ममत्व निर्माण झाले.
भारतात पहिल्यांदा लोकसभा निवडणूक झाली, तेव्हा नेहरूंनी ३00 जाहीर सभा आणि असंख्य नाकासभा घेतल्या. कामगार, शेतकरी, शेतमजूर त्यांच्या मोटारच्या मार्गाच्या दुतर्फा गर्दी करीत. काँग्रेसच्या एका पुस्तिकेत त्याचे वर्णन करताना म्हटले आहे, की लोक रात्र-रात्र नेहरूंच्या स्वागतासाठी उभे राहत. शाळा, दुकाने बंद व्हायची. गवळी दूध काढायला सुटी द्यायचे. नेहरूंच्या नावाने दुकानांतले खाद्यपदार्थ संपून जायचे. उत्साही लोक बसगाडीच्या टपावर बसून त्यांना बघायला जात. सभेच्या गर्दीत किती तरी लोक चक्कर येऊन पडत. त्यांचीच नातसून सोनिया गांधींचा आत्मविश्वास बघून १९९८मध्ये नंदुरबारच्या त्यांच्या पहिल्या प्रचारसभेत आदिवासींनी तुफान प्रतिसाद दिला, तेव्हा शरद पवारांचे धाबे दणाणले होते.
उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष व कट्टर मार्क्सवादी क्रांतिकारक हो चि मिन्ह १९४५मध्ये या पदावर आले तेव्हा म्हणाले, ‘‘माझी निवड झाली, कारण माझ्याजवळ बायको-मुले, घरदार, पैसे काही नाही. अंगावरचे कपडे तेवढे माझे आहेत.’’ असा त्यागी ‘अंकल हो’ गोरगरिबांत प्रिय होणे स्वाभाविक होते.
ज्या दीनदयाळजींचे स्मरण मोदींनी केले, त्यांचे नेतृत्व विधायक व कृतिशील होते. संघटनात्मक तसेच वैचारिक कार्यावर त्यांचा भर होता. असे दोन दीनदयाळजी मिळतील, तर देशाच्या राजकारणाचे चित्रच मी बदलून टाकीन, असे उद्गार जनसंघाचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काढले होते.
नेहरू व दीनदयाळजी यांच्या भूमिकांत महदंतर असले, तरी दोघेही मानवतावादी. आज नमोंची लाट आहे. लाटा येतात व जातात. जनतेच्या हृदयात चिरस्थान निर्माण करण्यासाठी मात्र नमोंना गुजरातप्रमाणेच देशात काही तरी ‘करून दाखवावे’ लागेल.
(लेखक आर्थिक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)