मी गप्प बसणार नाही.. - तापसी पन्नू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:04+5:30

महिलांवर होणार्‍या अन्याय, अत्याचारानं  मी अस्वस्थ होते, महिलांना गृहीत धरलं जातं.  पण ‘टेकन फॉर ग्रॅण्टेड’  ही मानसिकता आता चालणार नाही.  माझ्या स्वत:च्या नात्यांत असं घडलं तर काय,  असा प्रश्न मला काही वेळा विचारला जातो.  माझ्या चित्रपटांतल्या आणि  प्रत्यक्ष आयुष्यातल्या  भूमिकाही तेच तर सांगताहेत.  असं काही घडलं तर मी ते सहन करणार नाही. त्या प्रत्येक नात्याचा मी फेरविचार करीन..

I will not be silent .. - Taapsee Pannu | मी गप्प बसणार नाही.. - तापसी पन्नू

मी गप्प बसणार नाही.. - तापसी पन्नू

Next
ठळक मुद्देआज जागतिक महिला दिन. त्यानिमित्त अभिनेत्री तापसी पन्नू यांनी लोकमतला दिलेली  विशेष मुलाखत.

- तापसी पन्नू 

प्रत्येकाला स्वत:चा सन्मान, आत्मसन्मान असतो. प्रत्येकासाठी तीच अतीव महत्त्वाची गोष्ट. महिलांचा विषय आल्यावर मात्र आपण सोयीस्करपणे हे विसरतो आणि आपल्या परंपरागत पुरुषप्रधान रोगट मानसिकतेचं दर्शन घडवतो. या गोष्टीची मला प्रचंड चीड आहे. 
मी काही हिंसक नाही. आजपर्यंत कधीच मी कोणावर हात उचललेला नाही. अगदी तसं वाटलं तरीही नाही. मी कॉलेजला असताना ‘याला धरून चोपावं’ या भावनेनं माझ्या मनात अनेकदा उचल खाल्ली, प्रत्यक्ष ती शारीरिक कृती मात्र मी कधी केली नाही. याचा अर्थ मी नेभळट होते, असा नाही. चित्रपट असो, त्यांतल्या व्यक्तिरेखा असो किंवा प्रत्यक्ष समाजातली माझी भूमिका, स्रियांना कमी लेखण्याच्या, त्यांना ‘गृहीत’ धरण्याच्या मानसिकतेवर थप्पड मारायला मात्र मी कधीच चुकले नाही. त्याबाबतीत मागे हटले नाही.
माझी जडणघडणच तशी झालीय. शाळेत असल्यापासूनच मी भयंकर जिद्दी. बास्केटबॉल सामना हरले तरीही चिडचिड व्हायची. कोणी काही चुकीचं वागलं तर त्याला धडा शिकवण्याची सुरसुरी यायची. प्रचंड संताप व्हायचा. हार पचवताच यायची नाही. आजही मी तशीच आहे. पण आता त्या उकळत्या भावनेला मी जरा उमदं वळणं दिलं आहे. सकारात्मक तेनं त्याकडे बघते.आता कुणी मला डिवचलं, नाकारलं, तर लगेच मी त्याच्यावर तुटून पडत नाही; पण स्वत:लाच विचारते, पुढे काय?.
महिलांना अपमानित करणं, त्यांना नाकारलं जाणं समाजात पदोपदी पाहायला मिळतं. महिलांचा असा अनादर करण्याचा अधिकार कोणालाच नाही, अगदी महिलांनाही नाही. महिलांच्या सन्मानासाठी उभं राहणं ही आजच्या काळाची गरज आहे. ‘एवढय़ाशा गोष्टीचा काय बाऊ करायचा?’ म्हणून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं; पण हीच मानसिकता मग ‘चलता है’चं रूप घेते.
दुर्दैवानं अनेकदा महिला स्वत:च आपल्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहू शकत नाहीत किंवा राहात नाहीत. त्यात उच्चभ्रू घरातील महिला जशा आहेत, तशाच सर्वसामान्य घरातल्याही.
गरीब घरातल्या महिला बर्‍याचदा आर्थिक आणि इतरही बाबतीत पुरुषावर. आपल्या नवर्‍यावर, बापावर नाहीतर भावावर, मुलांवर अवलंबून असतात. त्या स्वत: एकतर आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात आणि त्यांना कोणाचा आधारही नसतो. त्यामुळे त्यांना गप्प बसावं लागतं. जगण्याच्या लढाईत दुसरा पर्यायच त्यांच्याकडे नसतो.
उच्चभ्रू घरातील महिलाही बर्‍याचदा आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध ब्र काढत नाहीत, कारण आपल्या सोशल स्टेटसची भीती त्यांना वाटत असते. समाजातील आपल्या प्रतिमेला, ‘परफेक्ट फॅमिली’च्या प्रतिमेला त्यामुळे तडे जातील या भयापोटीही त्या गप्प बसतात. 
पण किती काळ असं चालणार?
माझ्या चित्रपटांच्या आणि भूमिकांच्या माध्यमांतून मी नेहमीच महिला सन्मानाचा आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडत असते. महिलांच्या अन्यायाला वाचा फोडतानाच पुरुषी मानसिकतेवरही कोरडे ओढत असते. अर्थात सगळेच पुरुष तसे असतात असं मला म्हणायचं नाही. अनेकदा महिलांच्या हक्कांना बळ देणारे पुरुषच असतात.
‘पुरुषसत्ताक, पितृसत्ताक पद्धती’ म्हणजे काय, हे मात्र अलीकडच्या काळात मला अधिकच प्रकर्षानं जाणवतंय. वडिलांनी जर मुलीला सांगितलं, तू घराबाहेर पडू शकत नाहीस, तर मुलीनं त्यावर प्रश्न विचारायचा नसतो, त्यावर प्रत्युत्तरही द्यायचं नसतं. वडिलांचं म्हणणं तिनं मुकाट्यानं ऐकायचं असतं. मुलीनं रात्री 8 च्या आत मुकाट घरी यायचं असतं. कारण तिला तसं वाटतं म्हणून नव्हे, तर पुरुष स्वत:वर कंट्रोल राखू शकत नाहीत म्हणून!
भले तुमचं म्हणणं मान्य असो किंवा नसो, लोक तुमचं ऐकतात. पण आजच्या काळात हे ऐकायला तरी लोकांकडे वेळ कुठे आहे? चित्रपटांच्या माध्यमातून का होईना, तुमचा हा अधिकार, तुमचा विचार योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत मांडला जायला हवं असं मला वाटतं.
एक कलाकार म्हणून पडद्यावर महिलांची प्रतिमा कशी रंगवली जाते, याची जबाबदारी प्रत्येकानं घेतलीच पाहिजे. चित्रपटांचा समाजावर होणारा परिणाम दुर्लक्षून चालणार नाही. आपल्या चित्रपटांची हॉलीवूडपटांशी तुलना केली जाते; पण चित्रपट अभिनेत्यांकडे पाहून त्याचं अनुकरण जितकं आपल्याकडे होतं, तितकं जगात कुठेच होत नाही. 
महिलांवर फक्त पुरुषांकडूनच अन्याय होतो असं नाही; पण त्यांना कायम ‘नियंत्रणात आणि काबूत’ ठेवण्याचा प्रय} सातत्यानं होतो. त्याविरुद्ध आवाज उठवणं आणि त्याबाबत सजगता निर्माण करणं हे मी माझं कर्तव्य समजते. त्यामुळेच माझ्या चित्रपटांतल्या भूमिका स्रीवादी असतात, दिसतात. या भूमिका संवेदनशील असल्यानं समाजातून त्याला पाठिंबा मिळू शकतो, तसाच विरोधही होऊ शकतो, हेही मला माहीत आहे; पण ती काळाची गरज आहे. आपण सर्वांनीच स्री सन्मानाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.
एक कलाकार म्हणून काही भूमिका तुम्हाला स्वच्छंद, मुक्तपणाचा अनुभव देतात, तर काही भूमिका तुम्हाला मानसिक घुसमटीचा, गुदमरीचा अनुभव देतात. कलाकार या नात्यानं मी कायम दुसर्‍या प्रकारच्या भूमिकांना प्राधान्य देते. या भूमिका केवळ एक कलाकार म्हणूनच नव्हे, तर एक महिला, एक व्यक्ती म्हणूनही आपल्याला मोठं करीत असतात. ‘मोठं’ म्हणजे प्रसिद्धी, पैसा  किंवा मानमरातब हा अर्थ मला इथे अभिप्रेत नाही. एक व्यक्ती म्हणून तुम्ही किती समजदार, मोठे होत जाता, हे माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे. 
‘यूथ आयकॉन’ असा माझा उल्लेख काही वेळा केला जातो; पण आपली बाह्य प्रतिमा कशी ‘दिसते’, यापेक्षाही आपण मुळात कसे आहोत, कसे व्हायला पाहिजे, माणूस म्हणून तुमचं व्यक्तिमत्त्व कसं सुधारत जाईल, त्या दिशेनं जाण्याकडे माझा कटाक्ष असतो. तसाच प्रय} मी कायम करीत असते. सोशल मीडिया किंवा इन्स्टाग्रामवर किती लाइक्स मिळतील आणि तुमचे फॉलोअर्स किती वाढतील याकडे मी आजवर कधीच लक्ष दिलं नाही, देत नाही. 
मी सर्वोत्तम आहे, मला सर्व काही येतं, मी फार सुंदर आहे, ‘स्टार’ आहे. अशा कुठल्याच भ्रमात मी नाही. मी चारचौघींसारखी दिसते. कुणाही सामान्य तरुणीला माझ्याशी ‘रिलेट’ करता येतं, त्या माझ्यासारख्या दिसतात आणि मीही त्यांच्यासारखी दिसते. माझे सिनेमे पहायला म्हणून तर त्या येतात! मी ज्या ब्रॅण्डच्या जाहिराती करते, ते ब्रॅण्डही आता असेच मला सामान्य ग्राहकांशी जोडून घेताहेत.
मी चुका करते, काल केल्या, आजही करते. पण त्या सुधारण्याचा प्रय}ही करते.  प्रत्येक पाऊलावर मी अशी शिकत निघालेय. त्यासाठी ढोरमेहनत घेते. चित्रपटात येण्यापूर्वी अभिनय मी शिकलेले नव्हते; पण आता शिकतेय. चुकते, पुन्हा त्यातून शिकते. माझं शहाणपण मी केलेल्या चुकांतून कमावलं आहे. एक गोष्ट मात्र मनात पक्की ठरवलेली आहे. एकच, तीच चूक पुन्हा करायची नाही. केलेल्या सर्व चुकांची जबाबदारीही माझी स्वत:ची आहे. 
दिल्लीवाली, बाहेरची-आउटसायडर मुलगी मी. मला गर्दीचा भाग व्हायचा नाही. घाई करत या वतरुळातून त्या वतरुळात शिरायची स्पर्धाही करायची नाही. आय अँम नॉट अ सोशल क्लायंबर. मी माझ्या वाटेनं जाईन. कुणाची शिडी करून आणि कुणाच्या खांद्यावर चढून बांडगुळ होण्यात मला काही रस नाही. मी स्वत:ला कायम बजावत राहते, शिकत रहा. जे जे नवीन, जे जे वेगळं, जे जे येत नाही ते ते करत रहा. जो कोई न करना चाहता, वो तापसी कर लेती है, अशी माझ्यावर टीकाही होते; पण वाटलं ते ‘करून पाहण्यात’ हरण्याची भीती मला वाटत नाही.
हरण्यासारखं माझ्याकडे काय आहे? 
-समजा नाहीच चालले माझे सिनेमे, नाहीच मला मिळालं काम, तर माझं काय होईल? मी कुठं जाईन? असे प्रश्न मला पडत नाहीत. कारण सिनेमापलीकडेही मला माझं आयुष्य आहे. पोट भरण्याची, पैसे कमावण्याची साधनं आहेत, माझ्याकडे माझी डिग्री आहे अणि हे सारं कधीही सोडून त्या कामात झोकून देण्याची आजही माझी तयारी आहे.
आय जस्ट वॉण्ट टू लिव्ह लाइफ फुल! आय अँम नॉट सर्व्हायव्हर.
जे पिढय़ान्पिढय़ा, युगानुयुगे चाललं आहे, ते बदलणं, आपल्या मनासारखं जगणं यासाठी काही किंमत तर मोजावीच लागते. ती मी मोजतेय. लंबे चलन का रूख बदलना है, तो वक्त तो लगेगा ही!
.पण वेळ जातोय, जमत नाहीये म्हणून जे पत्करलं ते सोडून द्यायचं नाही! आपण जे करतोय त्याची फळं आज नसतीलही दिसत, वर्तमान ना सही, आपला भविष्यकाळ बदलावा म्हणून तर आपण चालत राहिलं पाहिजे, विचारत राहिलं पाहिजे स्वत:लाच ‘पुढं काय?’.
महिलांवर होणार्‍या अन्याय, अत्याचारानं मी आज अस्वस्थ आहे. त्यांना गृहीत धरलं जातं. कोणत्याही नात्यांत ‘टेकन फॉर ग्रॅण्टेड’ ही मानसिकता चालणार नाही. माझ्या स्वत:च्या नात्यांत असं घडलं तर काय, असा प्रश्न मला काही जण विचारतात. माझ्या चित्रपटांतल्या आणि प्रत्यक्ष आयुष्यातल्या भूमिकाही तेच तर सांगताहेत. असं काही घडलं तर मी गप्प बसणार नाही. त्या प्रत्येक नात्याचा मी फेरविचार करीन. 

(मुलाखत आणि शब्दांकन - मेहा शर्मा, लोकमत टाइम्स, नागपूर)

Web Title: I will not be silent .. - Taapsee Pannu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.