त्या विळख्यातून सोडवायचं कसं?
By Admin | Updated: July 5, 2014 14:36 IST2014-07-05T14:36:22+5:302014-07-05T14:36:22+5:30
बोलू नका, मनातही आणू नका असले विचार.. हे काय तुमचं असलं सगळं करण्याचं वय आहे.? काही तरी थेरं सुचतात तरी कशी.? संस्कार म्हणून काही राहिलेच नाहीत.. हे सगळं लग्नानंतर.. आताचं वय शिकण्याचं.. असं सांगून, ओरडून, दटावून, बंदी घालून कुतूहल थोडंच थांबणार? त्यासाठी हवेत थोडे वेगळे प्रयत्न..

त्या विळख्यातून सोडवायचं कसं?
- वासुदेव परळीकर
बोलू नका, मनातही आणू नका असले विचार.. हे काय तुमचं असलं सगळं करण्याचं वय आहे.? काही तरी थेरं सुचतात तरी कशी.? संस्कार म्हणून काही राहिलेच नाहीत.. हे सगळं लग्नानंतर.. आताचं वय शिकण्याचं..
मनाला न पटणारी, पण रेटून सांगितली जाणारी ही काही वाक्यं. आपणही कधी वयात आलो होतो, आपल्याही मनात काय-काय होत होतं, आपल्यालाही कुणाबद्दल तरी काही वाटू लागलं होतं आणि आपणही चोरून काही ना काही पाहत होतो, ऐकत होतो, वाचत होतो हे सगळं मनाआड करून कोरडं राहण्याची ही धडपड बहुतेक मोठी माणसं करत आली आहेत. प्रेम, आकर्षण, उत्तेजना, ओढ, संग करण्याची इच्छा अशा सगळ्या भावना नैसर्गिक, अनादिकाळापासून चालत आल्या आहेत. पण, तथाकथित समाजनियमांची पुटं चढायला लागली, की अशा निखळ मूळ भावनांनाही गंज चढू लागतो.
प्रेम, लैंगिक भावना, इच्छा, आकर्षण या विशिष्ट वयात मना-शरीरात होणार्या नैसर्गिक बदलांची ओळख आपली आपल्याला होतच असते. हे बदल काय आहेत, ते का होतात, ते समजून घ्यायचं हे सगळं कळो न कळो, उसळी मारून हे सगळं बाहेर येत असतं. लहान मुलाचं प्रौढामध्ये रूपांतरित होण्याचा हा अतिशय महत्त्वाचा कालखंड असतो. प्रत्येक प्रजातीत हे बदल घडतात. निसर्गाचा नियमच आहे हा. मनात वादळं निर्माण होत असताना हे कुणाला सांगायचं, कुणाशी बोलायचं, काय बोलायचं हे मात्र कुणी सांगितलेलं नसतं. हातात येतायत पण निसटून जातायत, अशा या भावना कुठं आणि कशा व्यक्त करायच्या, हे मात्र माहीत नाही, अशी ही अवस्था. जवळपास सगळे जण यातून जातात.
या सर्व भावनांविषयी एक प्रकारची चुप्पी आपल्या समाजात तयार झाली आहे. मग मिळेल तशी माहिती मिळवावी, त्यातून हे ‘ज्ञान’ पदरी पाडून घ्यावं आणि जमेल तसं मोठं व्हावं, अशी रीत समाजात पडून गेली आहे. पहिली पाळी साजरी करायची आणि नंतर विटाळ मानायचा, यातून वयात येणार्या मुली गोंधळणार नाहीत तर काय? शरीर वाढतंय, मन बदलतंय; पण त्याविषयी बोलायचं नाही, विचारायचं नाही. सगळं स्वत:हून शिकायचं ही अपेक्षा कितपत योग्य मानायची?
माहितीच्या महाजालानं वयात येणार्या मुलांच्या मनातले किती तरी गुंते सोडवायला मदत केली आहे. पूर्वी लपूनछपून वाचलेल्या पुस्तकांची, पाहिलेल्या चित्रांची, खुसपुसत मारलेल्या गप्पांची जागा आता माऊसच्या मदतीने वेगळ्या जगात नेणार्या इंटरनेट आणि त्यावर उपलब्ध असणार्या लैंगिक स्वरूपाच्या साहित्यानं घेतली आहे. तोंड, कान, डोळे आणि मेंदूही बंद करून घेतलेल्या मोठय़ांच्या आणि जमेल तशी मदत करणार्या मित्रांच्या जागी आता संगणक, मोबाईल फोन आले आहेत. पोर्नोग्राफी, लैंगिक स्वरूपाची दृश्यं, चित्रपट अतिशय सहजी उपलब्ध झाले आहेत. मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि उत्सुकता शमवण्यासाठी या साहित्याचा वापर करणार्या मुलांची वयं दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि या सगळ्यात गोंधळ उडालाय तो मोठय़ांचा.
पोर्नोग्राफिक साहित्य छोट्या १0 ते १६ वयाच्या मुलांनी पाहावं का नाही, त्याचे त्यांच्या मनावर काय परिणाम होतात, असे अनेक प्रश्न आहेत आणि प्रश्नांप्रमाणेच उत्तरंही अनेक आहेत. कारण, ज्या सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीत हे घडतंय तीच अत्यंत वेगवेगळी आहे. मौनावर गाढ श्रद्धा असणार्या आणि कामेच्छा व वासना शत्रू मानणार्या संस्कृतीमध्ये अनेकदा मुलांसाठी सेक्सविषयी, लैंगिक संबंधांविषयी आणि लैंगिक सुखाविषयी माहिती मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पिवळी पुस्तकं आणि ब्लू फिल्म्स असं रंगीबेरंगी पोर्नोग्राफिक साहित्य. त्यातून उघडपणे अनेक प्रकारची माहिती मुलांपयर्ंत पोहोचत असते. लैंगिक संबंध, प्रणय, लैंगिक क्रिया, समागम, लैंगिक सुख अशा विषयांवर कुठलीही भीती न बाळगता मुलं माहिती मिळवू शकतात आणि आपली उत्सुकता शमवू शकतात.
अर्थात, यालाही काही पथ्यं आहेतच. उदा. जे दाखवलं जातंय, त्यातल्या विकृतींचा अर्थ लहान वयातली मुलं लावू शकतीलच, असं नाही किंवा कधी कधी हिंसेचा आणि अत्याचाराचा वापर करून चित्रित केलेले व्हिडिओ, त्यातील जबरदस्तीनं केलेलं लैंगिक इच्छेचं शमन पाहून लैंगिक संबंध असेच असायला पाहिजेत अशा चुकीच्या कल्पनाही अशा साहित्यातून तयार होण्याची शक्यता असते. बलात्काराचे व्हिडिओ करणं आणि ते प्रसारित करणं किंवा त्याचा ब्लॅकमेल करण्यासाठी वापर करून मुलींना पोर्नोग्राफीच्या जाळ्यात ओढणं या या व्यवसायाच्या काळ्या बाजू आहेत, हे आपल्याला नजरेआड करता येणार नाही. तिसर्या जगातल्या गरीब, शोषित स्त्रियांचं या व्यवसायासाठी शोषण होतं हे वास्तव आहे आणि लैंगिकतेचं, लैंगिक संबंधांचंदेखील हे बाजारीकरण आहे. वाढत्या शहरीकरणाचे जे अनेक दुष्परिणाम आहेत, त्यांतला हा एक. मोबाईल अन् इंटरनेटच्या क्रांतीमुळे हे व्यापारीकरण फार जास्त अन् लवकर होतं, हेही खरं. अन् ते सर्वांच्या हातात पडतं, हेही खरंच.
ही वस्तुस्थिती लक्षात न घेता हे साहित्य किंवा अशा प्रकारची माहिती मुलांच्या निरागस मनावर वाईट परिणाम करत आहे किंवा मनं करप्ट करत आहे; त्यामुळे ती समूळ बंद करावी, अशी ओरड नेहमीच केली जाते. अर्थात, जे दाखवलं जातंय किंवा जे मुलं पाहत आहेत, ते दर वेळी तितकं निकोप किंवा शास्त्रीय असेल, असं म्हणणंही धाडसाचं ठरेल. कारण अनेकदा अशा साहित्याचा खप वाढवण्यासाठी त्यामध्ये भडक, विकृत, हिंसक घटना, प्रसंगही असतात आणि त्याचा अर्थ सगळीच मुलं लावू शकतील, असं नाही. त्यामुळे त्यातली विकृती आणि हिंसा ओळखायला मुलांना शिकवावं लागेल. आणि त्यासोबतच आपण जे पाहतोय ते समजून घेण्यासाठी, त्याचे अर्थ लावण्यासाठी सोबती, सांगातीही हवेतच. आई-वडील, भावंडं, शिक्षक, समुपदेशक, डॉक्टर असे अनेक जण या भूमिका निभावू शकतात. किंबहुना त्यांनी त्या निभावयलाच पाहिजेत.
माणूस हाही प्राणीच आहे. इतर प्राण्यांना वयात आल्यावर संयम ठेवायची गरज पडत नाही. एकट्या माणसालाच वयात आल्यापासून जवळजवळ तितकीच वर्षं थांबावं लागतं. जन्मल्यापासून शारीरिक अन् बौद्धिक विकास जास्त-जास्त काटेकोरपणे मोजले जात आहेत. भावनिक विकासाचं तसं होत नाही. काळजीपूर्वक लक्ष ठेवणार्या पालकांनाच अन् शिक्षकांनाच थोडा अंदाज येऊ शकतो. लैंगिक विकासाबाबत तर ही शक्यता आणखीनच दूर. हा विकास बहुतेक सारा पडद्याआडच होतो. शिवाय, स्पर्शाला वयाबरोबर येणारी वेगळी संवेदना अन् तिचा अर्थ लावण्याचं काम हे त्या-त्या मुलामुलींचीच जबाबदारी असते. त्यामध्ये आजूबाजूची माणसं अन् त्यांच्यातले संबंध यांचं निरीक्षण करून आपले आपण निष्कर्ष काढायचे. वृत्तपत्रं आणि इतर माध्यमं यातनं येणार्या संदेशांची उकल करून ते आत्मसात करणं हे काम मोठं जटिलच. एकूणच संस्कृती बदलतेय म्हणजे काय, या गोष्टीवर नेमकं बोट ठेवता येतच नाही. पुरुषत्व आणि स्त्रीत्व या गोष्टीचं चाकोरीतलं बांधणं कधी बदलणार? कामोत्तेजनेस पात्र झालेल्या, पण कुठेच वाट मिळत नसलेल्या युवा पिढीसाठी सुरक्षित समाधानाचे मार्ग कुठं आहेत? मग अशा चित्रांना बघून समाधान मानणारे असतील, तर त्यांना व्यवहारात समाजमान्य वागणूक शिकवण्यात आपण कमी पडतोय का? त्यांना प्रलोभनं बघूनही संयम ठेवण्याचा विचार कोणी शिकवायचा, हे प्रश्न मोलाचे असू शकतील.
तसं पाहिलं तर अन्नपाण्याइतकी लैंगिकतेची गरज जीवनावश्यक नसते, हे खरंच आहे. फक्त शिक्षणाच्या बारकाव्यांचा अन् ते अमलात आणायचा प्रश्न आहे. वर म्हटल्याप्रमाणे प्रौढ होताना या सगळ्या गोष्टी ‘लाईक’ तर होणारच, त्या ‘शेअर’ करायला निवडलेली व्यक्ती हितकर, क्षमाशील अन् असायला हवी. नाही तर वडील घरात टीव्ही लावू देत नाहीत, म्हणून शेजारच्या घरात जाऊन बघणं जितकं नैसर्गिक आहे, तितकंच अश्लील साहित्यावर बंदी घालून त्याचा चोरटा दुरुपयोग वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासारखं आहे. पुन्हा हाही एक मुद्दा आहेच, की तथाकथित अश्लील गोष्टींपेक्षा साध्या, पण सूचक भाषेतून अधिक परिणाम साधता येतो. तेपण थांबवणार? मग मुलांनी लैंगिकता शिकावी कशी? त्यापेक्षा पौगंडावस्थेत बर्याचदा अपघातानं किंवा एकदम अनपेक्षितपणे सामोर्या आलेल्या उत्तेजनेला तोंड देताना किंवा देऊन चुकलेल्या अन् भांबावलेल्या मुलामुलींना समजून घेण्याची आपली तयारी अधिक चांगली हवी. आपली मुलं एकदमच अनभिज्ञ आहेत, असं समजाल तर आपणच अल्पज्ञ आहोत, हे ध्यानात यायला वेळ लागणार नाही.
(लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
(शब्दांकन : मेधा काळे)