चित्रण करायचे कसे ?

By Admin | Updated: December 18, 2014 22:33 IST2014-12-18T22:33:56+5:302014-12-18T22:33:56+5:30

चित्रणाचे तंत्र वापरून आम्हाला पुष्कळ फायदा झाले, पण काही वेळा मनासारखे यश येत नाही असे का व्हावे?

How to illustrate? | चित्रण करायचे कसे ?

चित्रण करायचे कसे ?

 भीष्मराज बाम, (लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.) - 

चित्रणाचे तंत्र वापरून आम्हाला पुष्कळ फायदा झाले, पण काही वेळा मनासारखे यश येत नाही असे का व्हावे? हा प्रश्न खेळाडू, विद्यार्थी आणि इतरही अनेक क्षेत्रातील व्यक्तींकडून विचारला जातो. म्हणून तो मुद्दाम निवडला आहे. 
चित्रणाचे तंत्र काय आहे ते मुळापासून समजून घ्यायला हवे. ते अतिशय प्रभावी तंत्र आहे यात शंकाच नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळ्या संस्कारात वाढलेली असते आणि त्यातही काही संस्कार त्या व्यक्तीने मनापासून स्वीकारलेले असतात आणि काही नाकारलेले असतात. यातून त्या व्यक्तिमत्वाचा पाया घातला जातो. पुढेही कोणते संस्कार स्वीकारलेले असतात. यातून त्या व्यक्तिमत्वाचा पाया घातला जातो. पुढेही कोणते संस्कार स्वीकारायचे किंवा नाही ते या मुलभूत संस्कारावरुन ती ती व्यक्ती ठरवत असते. या त्या व्यक्तीच्या श्रद्धा असतात. आपण श्रद्धा हा शब्द फक्त धार्मिक बाबींमध्ये वापरतो. धार्मिक श्रद्धा हा श्रद्धेचा एक प्रकार आहे. सार्‍याच श्रद्धा धार्मिकच असतात असे नाही. अगदी नास्तिक असणे हाही श्रद्धेचाच एक वेगळा प्रकार आहे. आपल्या श्रद्धांमधुनच कोणती विचारधारा स्वीकारायची ते आपण ठरवत असतो. एका धर्माचेच नव्हे तर एका घरातले लोकही वेगवेगळ्या मुलभुत श्रद्धा बाळगून असतात. जुळ्या भावंडांच्याही श्रद्धांमध्ये फरक असू शकतो. 
आपला विश्‍वास या श्रद्धांवर अवलंबून असतो. कोणत्या विचारांवर, कोणावर विश्‍वास ठेवायचा तेही आपल्या श्रद्धा ठरवत असतात. आत्मविश्‍वासही या मुलभुत श्रद्धांमधूनच निर्माण होतो. या मुलभुत श्रद्धांनाच योगामध्ये ‘भाव’ अशी संज्ञा आहे. भाव आणि भावन या योगशास्त्रातल्या अतिशय महत्वाच्या संकल्पना आहेत. जी गोष्ट किंवा जो विचार या आतल्या श्रद्धांपर्यंत पोहोचून स्वीकारला जातो तो मला भावला असे म्हणण्याची पद्धत आहे. जो विचार भावत नाही तो स्वीकारला जात नाही. म्हणूनच एकाच घटनेबद्दल ती पाहणार्‍या निरनिराळ्या माणसांचे तिच्याबद्दल अगदी भिन्न भिन्न मत असू शकते. एखादी गोष्ट पारखून घेतलेली आहे याचा अर्थ तुमच्या आंतरिक श्रद्धांनी ती स्वीकारली आहे असा होतो. म्हणजे ती बरोबर आहे असा भाव तुमच्या मनात निर्माण झाला.
आपले ज्ञान आणि कौशल्य उत्तम दर्जाचे आहे आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याच्या वेळी ते मला उपयोगी पडणार आहे हा भाव मनात निर्माण होणे अत्यंत महत्वाचे असते. यामध्ये शाब्दिक विचारांचाही उपयोग होतो. जे विचार तुम्ही शब्दांच्या साह्याने मनात घोळवाल त्यांचे भाव मनात प्रकट होऊन स्थिर व्हायला लागतात. म्हणून मंत्रजप करायचा असतो. मंत्र हा एक प्रभावी विचार असतो. त्याच्या अर्थावर लक्ष ठेऊन त्याचे  भाव मनात प्रकट करीत म्हणजे त्या अर्थाचे भावन करीत तो करायचा असतो. म्हणून स्वसंवादाला सुद्धा मंत्रजपासारखेच महत्त्व आहे. 
स्वसंवाद आणि त्याच्या पुढचा टप्पा असणारे चित्रण हे आपल्या अनुभवावर अवलंबून असले तर त्यांना  आपल्या आंतरिक श्रद्धा सहज स्वीकारतात म्हणजे आपल्याला हे साधते आहे आणि पुढेही साधू शकेल असा भाव मनात निर्माण व्हायला लागतो. म्हणूनच चित्रण आधी स्मृतीचे करायचे असते. जे-जे उत्तम आपल्याला साधले असेल ते त्याची आठवण जागी करुन मन:चक्षुसमोर परत जसेच्या तसे उभे करायचे हा चित्रणाचा एक भाग झाला. याचा खूप मोठा फायदा असतो. कारण भूतकाळात अनुभवलेले सहज आठवते आणि चित्रणाची सवय होऊन जाते. परत आपल्या मनाची एक अतिशय वाईट सवय असते ती म्हणजे वाईट अनुभव पुन्हा-पुन्हा आठवत रहायची. त्याने त्यांचे चित्रण होत रहाते आणि आपल्या आंतरिक शक्तींचा असा गैरसमज होतो की, ते अनुभव आपल्याला आवडले आहेत आणि त्या तसेच पुन्हा घडवण्याचा प्रयत्न करीत रहातात. चांगल्या अनुभवांचे चित्रण करीत राहण्याने आत्मप्रतिमा सुधारते आणि आत्मविश्‍वास वाढीला लागतो. हे इथे परत स्पष्ट करायला हवे की भूतकाळातल्या आपल्या कृतींचे चित्रण करायचे असते. त्यात मिळालेल्या यशाचे चित्रण आपोआपच येऊन जाते. ते वेगळे करायची गरजच पडत नाही. 
आता भविष्यातले जे चित्रण करायचे असते, त्यातला महत्त्वाचा भाग हा की, ज्या आव्हानाला आपण सामोरे जाणार असतो, त्यावेळी आपले ज्ञान आणि कौशल्य सहज प्रगट होत आहे असे चित्रण करायचे असते. सर्वांचा असा गैरसमज असतो की यश मिळते आहे असे चित्रण करायचे. ते चुकीचे आहे. आव्हानाच्या वेळी आपल्यावर दडपण असतेच, पण त्यावेळी घडत असलेल्या घटनांनी दडपणांच्या मोठाल्या लाटच येऊन अंगावर आदळायला लागतात. मग सुचणे आणि त्याप्रमाणे करणे हा क्रियांचा जो महत्त्वाचा भाग असतो तोच अवघड होऊन जातो. त्यामुळे आपल्याला वर्तमानात रहाता येणेच अशक्य होते. मग कामगिरी सवरेत्तम कशी होणार आणि यश पदरात कसे पडणार? 
यश आणि अपयश आपल्या हातात नसतात. आपले अवधान आणि आपले प्रतिसाद यांच्यावरच आपले नियंत्रण असू शकते. ते योग्य प्रकारे नियंत्रित केल्यास यश मिळण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. आपण जर यशाचे चित्रण करायला लागलो तर आपली वर्तमानावरची पकड सुटते. मग अवधान आणि प्रतिसाद आपल्या ताब्यात रहात नाहीत. मग त्याचा अनिष्ट परिणाम कामगिरीवर होतोच. इतर सर्वजण अंतिम यशाचीच चर्चा करुन आपल्या मनावरचे दडपण वाढवतच असतात. त्यात यशाचे चित्रण करुन आपण भर घालत असतो. चित्रण करायचे ते दडपण असतानाही अवधान नियंत्रित करुन योग्य प्रतिसाद प्रगट करण्याच्या आपल्या कौशल्याचे. 
फळाची अपेक्षा धरुन कर्म करायचे नसते असे गीतेत सांगितलेले आहे ते याचसाठी. कारण मग लक्ष फलावर केंद्रित होऊन कर्मातले कौशल्य हव्या त्या दर्जाचे होऊच शकत नाही. आपला प्रयत्न यशस्वी ठरण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत असतात त्या सर्वांवर आपले नियंत्रण कधीच असू शकत नाही. आपला अवधान आणि आपला प्रतिसाद यावरच आपले नियंत्रण असायला हवे. ते योग्य चित्रणाने शक्य होते आणि यशाची शक्यता वाढते. मला  वाटते सुज्ञ माणसाला एवढे पुरेसे व्हावे.  
 

Web Title: How to illustrate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.