पारनाका येथला जखमी कासवांचा दवाखाना.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:00 IST2018-07-29T03:00:00+5:302018-07-29T03:00:00+5:30

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पारनाका येथे भारतातलं कासव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र आहे. या केंद्राच्या जन्माची विलक्षण कहाणी

Hospital for injured tortoise in Parnaka | पारनाका येथला जखमी कासवांचा दवाखाना.

पारनाका येथला जखमी कासवांचा दवाखाना.

<p>
-अनिरुद्ध पाटील

देशातील पहिले कासव पुनर्वसन व उपचार केंद्र  महाराष्ट्रात आहे, याची कल्पना क्वचितच कुणाला असेल. पण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या पारनाका येथील उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारात असलेल्या या केंद्राची महती सध्या जगभर नावाजली जाते आहे.
 

पालघर जिल्ह्याला सुमारे सव्वाशे किमीचा किनारा लाभला असून, येथे ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी, लॉन्गरहेड आणि हॉक्सबील या चार जातींची कासवं आढळतात. जून ते जुलै या काळात कासवांचा विणीचा हंगाम असतो. पालघरच्या किना-यावर वाळूचे साठे आणि जमिनीची धूप रोखणा-या मर्यादावेल आणि केवडा यांचा आडोसा मिळत असल्याने या सुरक्षित पट्टय़ात कासवं अंडी घालण्यासाठी येतात. मात्न गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण सध्या खूपच कमी झालं आहे.
मान्सूनच्या आरंभीच्या टप्प्यात जखमी कासवं किना-यावर आढळण्याचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी, धाकटी डहाणू, पारनाका, नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी आणि तलासरी तालुक्यातील झाई या किनारपट्टीवरील गावांमधील हे चित्न पाहून डहाणू शहरातील काही युवकांचं लक्ष या समस्येकडे गेलं आणि त्यांनी हा विषय लावून धरण्याचं ठरवलं.
हे प्रयत्न सुरू झाले 2004च्या सुमारास ! धवल कन्सारा यांचा संपर्क चिखले गावातील सचिन मांगेला या तरु णाशी आला. या गावच्या किना-यावर अंडी घालून कासवाची मादी समुद्रात निघून गेल्याची माहिती त्यांनी दिली. भटकी कुत्नी आणि स्थानिकांच्या तावडीतून या अंड्यांचं संरक्षण करण्यासाठी ती मांगेला यांच्या घराच्या आवारातील जमिनीत सुरक्षित पुरण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यातून पिल्लं बाहेर आल्यावर ती समुद्रात सोडण्यात आली.  हा प्रयोग पुढील तीन वर्ष सुरू होता, या काळात सुमारे 480 पिल्लांना समुद्रात सोडण्यात या विशीतल्या तरु णांना यश आलं.

2006 नंतर मात्र ती मादी येईनाशी झाली. लगतच्या गावांमध्ये शोधमोहीम घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. पण तिच्या निमित्ताने सुरू झालेल्या कामाने तोवर गती घेतली होती.
सर्पमित्न अँनिमल सेव्हिंग या तरुणांच्या गटाने कासव संवर्धनाकरिता काम करण्याचा निर्धार केला. कासवांविषयी माहिती गोळा करून अभ्यास सुरू झाला. त्यावर ग्रुपमध्ये चर्चा झडू लागल्या. अंडी घालणारी कासवं आढळल्यास संपर्क साधण्याकरिता किनार्‍यालगतच्या गावांमध्ये जाऊन जनजागृती केली. . या जिवांचं समुद्री पर्यावरण सुरक्षित ठेवण्यामधलं महत्त्व आणि मासेमारी व्यवसायाला लागणारा त्यांचा अप्रत्यक्ष हातभार पटवल्यामुळे मच्छीमार समाज या तरुणांच्या मागे उभा राहिला.

2010च्या सुमारास किनार्‍यावर कासवाची जखमी मादी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला पारनाका येथील वनविभागाच्या कार्यालयात दुचाकीवरून आणण्यात आलं. यावेळी गजेंद्र नरवणे हे उपवन संरक्षक म्हणून कार्यरत होते. ऑलिव्ह रीडले जातीच्या या मादीचे दोन पंख मासेमारीच्या नायलॉनच्या जाळ्यात अडकून निकामी झाले होते. उपवन संरक्षक नरवणे यांनी मुंबईतील पशुवैद्य दिनेश विन्हेरकर यांना उपचाराकरिता बोलावले. त्यांनी उपचाराला सुरुवात केली मात्न साधनांची वानवा होती. दोन बाय दोन फुटाचा खड्डा खोदून त्यावर ताडपत्नी अंथरूण कृत्रिम हौद बनविण्यात आला. दर चार तासांनी लगतच्या समुद्रातील पाणी भरलं आणि बदललं जाऊ लागलं. हीच या कासव पुनर्वसन केंद्राची सुरुवात !

त्यानंतर उपचार देण्यासाठी प्रत्येक आठवड्याला विन्हेरकरांचा मुंबई-डहाणू-मुंबई असा सुरू झालेला प्रवास आजतागायत अखंड सुरू आहे. या अँनिमल सेव्हिंग ग्रुपने किनार्‍यावरून जखमी कासवं आणायची, त्यावर डॉक्टरांनी उपचार करायचे, मृत कासवं वनविभागाच्या समक्ष पंचनामा करून त्याची विल्हेवाट लावायची आणि त्याची लिखित नोंद ठेवायची. हा परिपाठ अखंड सुरू आहे. 

जखमी कासवांची संख्या दिवसागणिक वाढत होती. 2011च्या सुमारास डहाणू पर्यावरण प्राधिकरणाचे अध्यक्ष चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी उपवन संरक्षक कार्यालयाला भेट दिली. या ग्रुपची कळकळ पाहिल्यावर कासवांच्या शुश्रूषेकरिता  दोन तरणतलाव (वीस बाय दहा फूट), दोन हौद (सहा फूट व्यासाचे) आणि दोन उपचार खोल्या (बारा बाय बारा) बांधण्याची परवानगी मिळाली. 2013च्या सुमारास अँनिमल सेव्हिंग ग्रुप विसर्जित करून वाईल्डलाइफ कॉन्झर्वेशन अँण्ड अँनिमल वेल्फेअर असोसिएशनची स्थापना झाली आणि राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलं कासव पुनर्वसन व उपचार केंद्र अस्तित्वात आलं.

या केंद्रासाठी काही प्रसंग संधी घेऊन आले. 2015 साली स्वयंसेवक घटनास्थळाहून जखमी कासवाला दुचाकीवरून पुनर्वसन केंद्राकडे घेऊन जात असल्याचा फोटो माध्यमात छापून आला. तो पाहिल्यावर मुंबईस्थित फिजा नवनीतलाल शहा यांनी या केंद्राशी संपर्क साधून नवीन वाहन देण्याची इच्छा व्यक्त केली. या केंद्राने आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून सर्वच प्रकारच्या वन्यजीवांना उपयोगात आणता येईल, अशी रचना करून अँम्ब्युलन्स साकारण्याचा प्रस्ताव मांडला. या विभागाने परवानगी दिल्यावर प्राण्यांसाठीची अँम्ब्युलन्स साकारली. या पद्धतीची सेवा देणारी देशातील ही पहिली अँम्ब्युलन्स ठरली आहे. 
आज या संस्थेचा व्याप वाढला असून, तालुक्यातीलच नव्हे तर पालघर, ठाणे, मुंबई या किनारपट्टीवरील कासवं उपचाराकरिता केंद्रात आणली जातात. आतापर्यंत 150 पेक्षा अधिक कासवांवर उपचार करून त्यांना समुद्रात सुखरूप सोडण्यात आलं आहे. याकरिता सुमारे 150 स्वयंसेवक विनामूल्य काम करतात. घटनास्थळी जाऊन कासवांची सुटका करण्यापासून केंद्रात आणून त्याची शुश्रूषा करणं, त्यांना खाद्य देणं ही कामं गतीने चालतात. वनविभागाने आपले कर्मचारी या पुनर्वसन केंद्राकरिता दिले आहेत. 
या केंद्रात अत्याधुनिक साधनांचा अभाव असल्याने उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डॉ. विन्हेरकर यांनी अमेरिकेतील जॉर्जिया सी टर्टल सेंटर इथे प्रशिक्षण घेतलं आहे. तिथल्या साधनांच्या उपलब्धतेविषयी ते सांगतात, ‘प्रगत देशांमध्ये जखमी कासवांच्या उपचारासाठी क्ष-किरण, सोनोग्राफी, लेझर थेरपी, एण्डोस्कोप्स अशा आधुनिक तंत्नज्ञानाचा वापर केला जातो. आपल्याकडे या सुविधा नाहीत. काही वेळा कासवांच्या तोंडात मासेमारीचे हुक, रबर, लोखंडी खिळे अडकलेले असण्याची शक्यता असते. परंतु या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी सुविधा नसणं ही मोठी उणीव आहे’.
- पण तरीही काम थांबलेलं नाही.
पालघर आणि आसपासच्या किना-यावर येणा-या जखमी कासवांना इथे विसावा मिळतो. उपचार आणि प्रेमही मिळतं, हे महत्त्वाचं !
- या प्रेमाला निधीच्या मर्यादा कशा असणार?

‘डहाणू फ्लिपर’
कासव संवर्धन आणि उपचार पद्धती याबाबत आधुनिक संकल्पना आत्मसात करताना अपंग कासवांना पोहण्यास उपयुक्त असे कृत्रिम पंख लावण्याची कल्पना विन्हेरकरांना सुचली. जयपूर फूट प्रमाणेच त्याची रचना आणि कार्य आहे. ज्या कासवाचा एक कल्ला निकामी झाला असेल, त्याच्या सांध्यात प्लॅस्टिकचा कृत्रिम कल्ला बसवल्यास त्याच्या वापराने अन्य सुदृढ कल्ल्यांना आराम मिळतो आणि त्यांची पोहण्याची क्षमता अबाधित राहते. पण हा कल्ला कायमस्वरूपी नसून फक्त कृत्रिम तलावात वापरता येतो. तो लावून कासवांना खोल समुद्रात सोडता येत नाही, असं डॉ. विन्हेरकर सांगतात. या प्रयोगाला ‘डहाणू फ्लिपर’ या नावाने ओळख मिळाली आहे.
अनिरुद्ध पाटील, बोर्डी

कासवांचे आजार आणि उपचार
रेस्क्यू केलेल्या कासवाला पुनर्वसन केंद्रात आणल्यावर प्रथम   ‘आयसोलेटेड टॅँक’मध्ये 24 तास ठेवले जाते. त्या नंतर  ‘ट्रीटमेंट टॅँक’ मध्ये उपचार सुरू होतात.
कासवांमध्ये आढळणारे विविध आजार आणि त्यावरचे उपचार :
1परजीवी संक्रमण : मायक्रोऑर्गन, बुरशी आणि शरीरातील जंत यामुळे ग्रासलेल्या कासवाला अन्नातून अँन्टीबॉयोटिक्स दिली जातात. 
2फ्लोटिंग सिण्ड्रोम : ही कासवं पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहतात. पाण्याच्या तळाशी जाऊ शकत नाही. अपघात, फुफुसातील विकार अथवा पोटात निर्माण झालेल्या अतिवायूमुळे हा आजार होतो.  
3 जखमा : मासेमारीची जाळी, नायलॉन दोरे यामध्ये अडकून आणि जहाजांच्या पंख्यावर आदळून कासवांना तीव्र जखमा होतात.  रक्तस्राव होणं, हाडं तुटणं यामुळे झालेल्या जखमांमधील संसर्ग विविध 
प्रकारची अँण्टीबायोटिक वापरून नष्ट केला जातो. मोठय़ा जखमा शक्य असल्यास शिवल्या जातात. 
4ऑइल स्पील : जहाजातून मोठय़ा प्रमाणात बाहेर पडून पाण्यावर तरंगणार्‍या तेलामुळे कासवांना डोळ्याचे तसेच श्वसनाचे विकार जडतात. अशावेळी औषधी साबणाने त्यांचं शरीर धुतलं जातं.
5 प्रदूषण :थर्माकोल, प्लॅस्टिक वस्तू, रसायनं यामुळे कासवांना सर्वाधिक अपाय होतो.

(लेखक ‘लोकमत’चे बोर्डी येथील 
वार्ताहर आहेत)

 anirudhapatil82@gmail.com

 

Web Title: Hospital for injured tortoise in Parnaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.