शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

खट्ट..खडखट्ट..

By अोंकार करंबेळकर | Published: August 20, 2017 1:00 AM

हृदयात आणि इतिहासाच्या पानांत स्वत:ला अमर करून एक आवाज कायमचा शांत झाला..

किती वर्षं झाली?.. व्यावसायिक स्वरूपात टाइपरायटरचा उपयोग सुरू झाला, त्याला आता जवळपास दीड शतक उलटलं. या यंत्रानं किती सर्वसामान्य आयुष्यं सावरली, किती उभी केली, किती जणांमध्ये विश्वास निर्माण केला आणि किती जणांना जगण्याचं एक साधन मिळवून दिलं, त्याची तोड नाही. अगदी कालपर्यंत हे यंत्र रोजगार निर्मितीचं साधन होतं.

१८७४ला टाइपरायटरची खडखड सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सुरू झाली, त्यावेळी हे एक छोटंसं यंत्र इतकी वर्षं आपल्या आयुष्याची सोबत करेल आणि हृदयाच्या ठोक्याप्रमाणे त्याचीही टिकटिक आपल्या जीवनाशी एकरूप होईल याची कोणालाही कल्पना नव्हती.हातात पेन घेऊन लिहिण्याची आपली सवय संगणकांनी आज जवळपास संपुष्टात आणलीय; पण याची सुरुवात केली ती टाइपरायटर्सनी. टाइपरायटर्स आले आणि सगळ्यांनी, विशेषत: सरकारी कार्यालयांनी, तिथल्या कर्मचाऱ्यांनी हातातले पेन बाजूला सारून टाइपरायटर्सच्या की बोर्डशी सलगी केली.

त्याकाळी ही यंत्रं म्हणजे नुसताच चमत्कार नव्हता तर तो हजारो, लाखोंचा पोशिंदाही होता. ज्यांना टाइपरायटर चांगला चालवता येतो, अचूकपणे जो टायपिंग करू शकतो, त्याच्यासाठी सरकारी नोकऱ्यांची दारंही आपोआप खुली व्हायला लागली. गल्लोगल्ली टायपिंग इन्स्टिट्यूट्स उघडल्या गेल्या त्या यामुळेच.

खडखड करत चालणाऱ्या या यंत्रांनी देशातल्या लक्षावधी लोकांना मग आपल्या मागे पळायला लावलं. सरकारी नोकरी जरी नाही मिळाली, तरी हे यंत्र चालवता येणाऱ्या तरुणांसाठी हक्काचा रोजगारही निर्माण केला. घरात मुलगा किंवा मुलगी कोणीही मॅट्रिक झालं की पालकही त्यांना सांगू लागले, ‘जा अगोदर टायपिंगचा कोर्स पूर्ण कर.’

हातानं लिहायच्या ऐवजी टाइपरायटरवर कामं सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात टायपिस्टची गरज निर्माण झाली. बँका, इन्शुरन्स आॅफिस, एक्सपोर्ट-इम्पोर्टच्या कंपन्या, सरकारी ऑफिसं सगळीकडेच प्रत्येक टेबलावर या यंत्रांनी जागा मिळवली आणि टायपिंग येणाऱ्या लोकांनी त्याच्या समोरची जागा पटकावली. या टाइपरायटर्सनंही सगळ्यांनाच आपला लळा लावला. पण संगणक आल्यावर त्यांची अडगळ वाटू लागली. हळहळू संगणकांनी त्यांची जागा व्यापलीच. टंकलेखक जागा अडवतायत असं वाटायला लागल्यावर मग आपोआपच कोठे कोपऱ्यात, माळ्यावर त्यांची रवानगी व्हायला लागली आणि नंतर संगणकांनी टाइपरायटर्सना पूर्ण हद्दपारच केलं; पण तरीही जागोजागी स्थापन झालेल्या टायपिंग इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांचा खडखडाट ऐकू येतच होता. सर्व व्यवहार संगणकावर व्हायला लागले तरी टायपिंग शिकवणाऱ्या या संस्थांमध्ये तरुण मुलं येतच होती.पण तेही आता संपलंय..महाराष्ट्र सरकारने टायपिंगची परीक्षा फक्त संगणकावरच घेण्याचा निर्णय परवा घेतला आणि टाइपरायटर्सचा खडखडाट आता खऱ्या अर्थानं थांबला.

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना टायपिंगसाठी टंकलेखक उपलब्ध करून देणारी टाइपरायटरवरची शेवटची परीक्षा मागच्या शनिवारी, १२ आॅगस्ट रोजी झाली आणि ही टकटक थांबली. टायपिंग शिकवणाऱ्या ३५०० संस्था महाराष्ट्रात अजूनही आहेत आणि सुमारे १० हजार लोक त्यांमध्ये शिकवण्याचे काम करत आहेत. टाइपरायटर आता गेला, त्याची टकटक थांबली; पण टंकलेखन सुरूच राहणार आहे. टाइपरायटरचं पार्श्वसंगीत संपून तरुण मुलांच्या हातांची बोटं आता संगणकांच्या की बोर्डवर अलगदपणे उतरतील. चार-पाच पिढ्यांना रोजगार देणाऱ्या टाइपरायटर्सची जागा आता पूर्णपणे संगणक घेतील. काळाच्या ओघात टाइपरायटर्सनंही आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला. त्याचा आकार कमी झाला, इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर्स आले, तरीही काळाचा वेग त्यांना पकडता आला नाही.

आपल्या हृदयात स्थान मिळवलेल्या रेडिओ, फोन, तार.. यासारख्या अनेक गोष्टींना या स्थित्यंतरातून जावं लागलं. ‘तार’ कायमचीच नामशेष झाली, तर रेडिओनं नवीन रूप घेऊन आपलं अस्तित्व पुन्हा प्रस्थापित केलं. एफएम रेडिओच्या रूपात रेडिओने टीव्हीशी लढत आपलं स्थान टिकवलं. भले त्यासाठी त्यांना लहान आकारात लोकांच्या खिशात जाऊन बसावं लागलं, पण रेडिओ नव्या रूपात अस्तित्वात राहिले. मोबाइल, फोन, एसएमएस आणि इ-मेलच्या माऱ्यापुढे तारसेवेचं अस्तित्व मात्र पूर्ण नष्ट झालं. आता टाइपरायटरचा नंबर लागला आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे हे सत्य असलं तरी टाइपरायटरने आपल्याला केलेल्या मदतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.आपला एक अमीट ठसा उमटवून सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये आणि इतिहासाच्या पानांमध्ये त्यांनी आता स्वत:ला अमर करून घेतलं आहे. कायमचं..