पाहुणे

By Admin | Updated: February 21, 2015 13:44 IST2015-02-21T13:44:03+5:302015-02-21T13:44:03+5:30

जगाच्या कुठकुठल्या भागातून वेड्यासारखी भटकत भटकत माणसं गोव्यात येतात.आणि आपापल्या जखमा बांधत, व्यथा भोगत इथेच राहून जातात!

Guests | पाहुणे

पाहुणे

 सुजाता सिंगबाळ

 
जगाच्या कुठकुठल्या भागातून वेड्यासारखी भटकत भटकत माणसं गोव्यात येतात.आणि आपापल्या जखमा बांधत, व्यथा भोगत इथेच राहून जातात! - कसल्या ओढीने येत असतील ही गोरी-काळी-पिवळी माणसं? काय सापडत असेल त्यांना गोव्याच्या वाळूत?
---------------
‘‘तुझा गोवा फार छान आहे, डिअर. इथेच मला माझं हरवलेलं आयुष्य परत मिळालं’’ - लिलिया सांगत होती.
- गोव्यात आलेले आणि इथेच राहून गेलेले ‘पर्यटक’ हा काही गोव्यातल्या स्थानिकांच्या प्रेमाचा विषय नाही. गोव्याबाहेरही या ‘राहिलेल्यां’ची ओळख आहे ती बेकायदा वस्ती करणारे, गोव्यातल्या सुशेगाद शांततेच्या जिवावर उठलेले बेपर्वा पाहुणे म्हणूनच!
- मला माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने या  ‘पाहुण्यां’च्या आयुष्याच्या एरवी बंद खिडक्या आयत्या उघडून मिळतात आणि इतरांना क्वचित दिसणारं असं काही पाहायला मिळतं, त्याबद्द्ल थोडं सांगावं वाटतं आहे.
आता ही लिलिया. लीली. गोरी रशियन मुलगी.  श्रीमंत  बापाची एकुलती एक. तिच्या देशात, घरात तिचा जीव रमेना. सगळंच निर्थक वाटत होतं. हाताशी वाट्टेल तितका पैसा, पण समाधान नाही. जगण्याला उद्देश नाही. पर्यटक म्हणून गोव्यात आली आणि मग येतच राहिली. पैशासाठी माणसं वाट्टेल ते करतात, जे नाही ते मिळवण्यासाठी धडपडतात. हिच्याकडे पैसा आहे; पण त्यात रस नाही. गोव्यात आल्यावर इतर करतात, तेच हिनेही केलं. पैसे फेकून सुख मिळवण्याचा प्रयत्न. बियर, रम, व्होडका, ट्रान्स म्युझिकच्या तालावर बेभान होऊन नाचली, ड्रग्स घेतले; पण क्षणभरही शांत वाटेना. स्वतंत्र विश्‍व. फक्त दैनंदिन आयुष्याभोवती फिरणारं. रात्र उजाडली की अंथरुणातून उठायचं आणि सूर्य उगवला की झोपायचं. निव्वळ जिवंत राहणं आणि एन्जॉय करणं..
लीली सांगत होती, तिला जाणीवच नव्हती की ती अंधाराकडे जातेय! कारण दिवसच अंधारात उगवायचा. ड्रग्स सुरुवातीला घेतले तेव्हा वाटलं होतं,   टेन्शन सुटेल. एकाकीपणा संपेल. म्हणून मग त्या नादात नशेच्या दुनियेत बेफाम धावली. 
गोव्यात असे कित्येक असतात तिच्यासारखेच.. रात्री जगणारे, नशा हेच जीवन झालेले.. ते भेटले.  कित्येक वाईट अनुभवांतून सतत प्रवास करावा लागतो या नशेच्या विश्‍वातून. लीलीचं काही वेगळं नाही झालं. तिच्यासोबत ड्रग्स घेऊन धुंद होणारे घोळके भेटले. देश वेगळा, भाषा वेगळी, प्रांत वेगळा. सारे नशेसाठी एकत्र आलेले. ड्रग्स घेतल्यानंतर निपचित पडलेले! निपचित प्रेतासारखे भावनाशून्य चेहरे. एकमेकांना फसवणं, पैसे चोरणं (तेही व्यसनासाठी) सेक्स. समलिंगी संबंध. करता करता स्वत:चं अस्तित्वच संपून जातं. मग पूर्ण निष्क्रियता. या विश्‍वात मग कुणाला वॉटर डेथ मिळते, कुणाच्या नशिबी अपघाती मृत्यू! जो कोण ‘लकी’ असेल त्याला त्याची माणसं येऊन शोधतात. घेऊन जातात.. या काळ्या वाटेवरून परतणारे थोडे!
- पण लिलिया परतली.
त्याला कारण झालं प्रेम. गोव्यातल्या या बेपर्वा, बेधुंद प्रवासात तिला तिच्यावर प्रेम करणारा तरुण भेटला. एका क्लबमध्ये ट्रान्स म्युझिकच्या बीटवर नाचताना त्याची आणि तिची ओळख झाली.. मग मैत्री. 
- तो इटलीचा. शांतीच्या शोधात भारतात आला. भिरभिरल्यासारखा सारा भारत फिरला. गिरनार पर्वतावर नागा साधूंबरोबर राहून आला. इथे आल्यावर परत जावंसं त्याला वाटलं नाही. आपली  ‘रुट्स’ इथेच आहेत भारतात. मग योगा शिकला आणि शिकवूही लागला. व्हायोलिन वाजवण्यात तरबेज. त्याने व्हायोलिन शिकवण्याचे क्लासेस सुरू केले. जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी काम सुरू झालं.
लिलिया भेटल्यावर त्याला उमेद आली आणि तिच्याही उडत्या पावलांना जमिनीचा आधार. ती रशियातून आलेली. तो इटलीचा. त्या दोघांनी गोव्यात आपलं घर केलं. त्याच्या प्रेमामुळे लिलिया ड्रग्समधून बाहेर पडली आहे.
- तिची नजर स्वच्छ दिसते आता. असे कितीजण भेटले मला गेल्या काही वर्षांत! 
माझं लहानपण गोव्याच्या किनारपट्टीवरल्या गावांमध्ये गेलं. ते सुंदर दिवस आजही मनात सरसरत असतात, गोव्याच्या पावसासारखे. त्यानंतर गोव्याच्या किनारपट्टीवरील गावं बदलत गेली. विशेषत: उत्तर गोव्यातील.  रेंदेरांची कातारा (गाणी), रस्त्याच्या बाजूने ऐसपैस पसरलेली पोर्तुगीज पद्धतीची मोठ्ठी घरं,  बागेतले माड, आंब्या-फणसाची झाडं, बल्कावावर सोफा नाहीतर आलतर (आराम खुर्ची) टाकून विसावलेले वृद्ध, बिनगजांच्या मोठ्ठय़ा खिडक्या, मोठ्ठी सालं (दिवाणखाने), लाकडाची करकरती जमीन असलेले वरचे मजले, छताला टांगलेली झुंबरं आणि कुठे तरी कोपर्‍यात एखादा पियानो, गिटार, व्हायोलिन.. आज ते वाजवणारं कोणी नाही. आलतरापुढे येशूच्या वा मदर मेरीच्या मूर्तीला वंदन करून प्रार्थना करणारे फक्त आहेत. दूर गेलेल्या आपल्या जवळच्या माणसांची वाट पाहत बसलेल्या थकल्या नजरेत एकच प्रश्न : ‘माझ्यानंतर कोण?’ घरावर त्यांचा खूप जीव. आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे घर उभं राहणार; पण नंतर काय? कोण करणार देखभाल? आणि मग माय-पायच्या मृत्यूनंतर त्या घराला मोठ्ठं कुलूप लागणार. बागेत वाढलेलं गवत. पुढे घराच्या भल्या मोठय़ा कवाडालाही कुलूप! अशी कित्येक घरं आपल्या माणसाची वाट पाहात मोडकळीला आली, मोडूनही गेली.. शिवोली, हणजूण, वागातोर या भागात अशी घरं खूप दिसत.
आज हीच घरं जुनी कात टाकून ‘मॉडर्न रेस्टॉरंट’, ‘कॉफी हाउस’ वा गेस्ट हाउसच्या रूपाने नवी झालेली पाहायला मिळतात. विदेशातून गोव्यात आलेल्या आणि इथे राहूनच गेलेल्या पर्यटकांना या जुन्या घरांनी निवारा दिला आहे. माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने ही काळी-गोरी-पिवळी माणसं मला भेटतात. त्यांच्या आयुष्यात डोकावू देणार्‍या खिडक्या उघडतात.  इथं पर्यटक म्हणून आलेले आणि मग इथेच राहाणारे हे विदेशी वा देशी नागरिक इथल्या ‘लोकल’ लोकांपेक्षा इथे जास्त रुळलेले आहेत. जणू या भूमीतले असावेत  असे फिरतात. त्यांचं जीवन सुरळीत चालतं.  
 सूर्य मावळतो आणि किनार्‍यावरचं ‘नाइट लाइफ’ सुरू होतं. दारू, डान्स, ट्रान्स म्युजिक.. नाइट बाजार चालवणारे, रेस्टॉरंट चालवणारे विदेशी असतात. रशियन रेस्टॉरंटमध्ये रशियन पर्यटक जाणार, फ्रेंच मालक असेल तर फ्रेंच! या लोकांच्या गूढ जगात काय नाही? .कोण नाही?
- ‘बघूया गोवा’ म्हणून एकटीच हिंडायला आलेली तरुणी आहे.. आपल्याच कलेत झोकून देऊन केवळ चित्र रेखाटणारे आहेत. हलके-फुलके प्रणयाचे चाळे करून स्वत:ची भूक भागवणारे आहेत. केवळ वेळ मजेत घालवायचा म्हणून देशी बिट्सवर भारतीय टुरिस्टांसोबत बिनधास्त नाचणार्‍या विदेशी युवती आहेत.. त्यांना ना भीती, ना लाज! नाचून झाल्यानंतर ‘बाय. सी यू.’ म्हणत चटोर पुरुषांच्या बुभुक्षित घोळक्यातून त्या सरळ उठून निघून जातात! जाताजाता सहज कुणाला मीठीही मारतात. नको असतील तर प्रलोभनांना बळी न पडता स्वत:ची अशी ‘स्पेस’ ठेवणार्‍या या विदेशी स्त्रिया. आपल्या इच्छेने वागतात. कोणत्याही भयगंडाशिवाय.
हरमल वा वागातोर या भागात किनारपट्टीवरून चक्कर मारली, श्ॉकमध्ये डोकावलं तर आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, गल्फ.. सारं जगच सामावलेलं दिसेल. कांदोळीमध्ये तर संपूर्ण गावातच वेगवेगळी विश्‍वं सामावली आहेत. वाटतं, सारं जगच गोव्याच्या किनारपट्टीवरच्या भागात वास्तव्याला आलं आहे. 
काही तरुण.. काही म्हातारे. काही जोडपी.. काही वैफल्यग्रस्त झालेले.. काही गिटार हातात घेऊन आपल्याच विश्‍वात रमलेले..
काही आपलं सारं जीणंच फोल आहे याची खोल जाणीव होऊन घरदार सोडून आलेले..
एक गूढ, अनिश्‍चित; पण तरीही बिनधास्त जग!
- त्यांच्यामध्येही त्रासलेले आहेत, अस्वस्थ आहेत. संशयाने पछाडलेले आहेत आणि बोल्ड- बिनधास्त पण आहेत!!
- स्वत:च्या धुंदीत जगणारे हे विदेशी.. बियर पित पुस्तक वाचत शांत वाळूत पहुडलेला एखादा आणि सिगारेट ओढत स्वत:च्या धुंदीत न बोलता बसलेली त्याची जीवन संगिनी, असंही विदेशी सहजीवनाचं चित्र दिसतं. गोव्यातल्या त्यांच्या जगण्याला आणि वास्तव्याला आणखीही एक किनार आहे, त्याबद्दल पुढच्या रविवारी!
 
(गोव्यात दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या लेखिका सामाजिक जीवनात सक्रिय आहेत.)

Web Title: Guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.