वाढले वाघोबा
By Admin | Updated: August 30, 2014 14:12 IST2014-08-30T14:12:33+5:302014-08-30T14:12:33+5:30
चित्र दाखवून वाघाची ओळख करून द्यावी लागेल अशी स्थिती काही वर्षांपूर्वी भारतात उद्भवली होती. त्यानंतर सुरू झालेल्या ‘वाघ वाचवा’ मोहिमेला मात्र आता चांगले यश मिळालेलं दिसतं आहे. वाघांची संख्या चक्क दुप्पट झाल्याचे व्याघ्रगणनेच्या ताज्या अहवालातून दिसून आलं आहे.

वाढले वाघोबा
अतुल धामनकर
मागील काही वर्षांतील वाघांच्या शिकारी व कमी होणार्या अधिवासाच्या वन्यप्रेमींमध्ये निराशा पसरवणार्या बातम्या सातत्याने येत होत्या. त्यामुळे एखाद्या गार वार्याच्या सुखद झुळुकीप्रमाणे भासणारी वाघाची संख्या वाढली. ही बातमी अनेक निसर्गप्रेमींच्या मनात इंद्रधनुष्याचे तरंग उठवून गेली.
नुकतेच राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण समितीने मागील काही महिन्यांमध्ये केलेल्या ताज्या व्याघ्रगणनेचा अहवाल केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाला पाठविला आहे. या गणनेनुसार सध्या भारतात वाघांची संख्या वाढून ३८४६ इतकी झाल्याचे त्यात दर्शवले आहे. ही प्रत्येकासाठी अतिशय उत्साहवर्धक बातमी आहे. भारतातील प्रचंड वाढणार्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी वेगाने वाढणारी शेते, कारखाने, खाणी या वाघाच्या उत्तम जंगलांचा घास घेतच वाढत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. तरीही या प्रतिकूल परिस्थितीत वाघ आपले अस्तित्व केवळ जंगलात टिकवून ठेवण्यातच नाही, तर वाढवण्यातही यशस्वी होतोय, या बातमीने सगळ्यांना उत्साह वाटणं साहजिकच आहे.
मागे वळून पाहताना उत्तम प्रकारे वाघांच्या वाढणार्या संख्येला पहिला ब्रेक १९९३ साली मोठय़ा संख्येत कातडी आणि हाडांचा साठा सापडल्यावर लागला होता. त्यानंतर २000 व २00५ साली असेच चोरट्या शिकारीचे भक्कम पुरावे मिळाले होते. २00५ साली तर याचा कळसच झाला होता. त्या वेळी चोरट्या शिकार्यांनी राजस्थानातील ‘सारिस्का व्याघ्र प्रकल्पा’तील एकूण एक वाघांना मारून टाकले होते. त्याच्याच पाठोपाठ मध्य प्रदेशातील पन्नाची पण तीच गत झाली. रणथंबोर या जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पातपण वाघ बरेच कमी झाले होते. त्या वेळी राजस्थान वन विभागाच्या निमंत्रणावरून मी रणथंबोरला व्याघ्र संरक्षणाच्या व अभ्यासाच्या कामासाठी गेलो होतो.
या दोन घटनांनी खडबडून जागे झालेल्या शासनाने त्वरित कठोर पावले उचलली. साहजिकच पुरेसे संरक्षण मिळाल्यामुळे वाघांची संख्या पुन्हा हळूहळू का होईना, वाढू लागली. २0१0 साली भारतात प्रथमच ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ या अत्याधुनिक पद्धतीने वाघांची गणना करण्यात आली. त्या वेळी वाघांची संख्या १७0६ नोंद करण्यात आली होती. त्या वेळी एका दूरदर्शन वाहिनीला दिलेल्या माझ्या मुलाखतीत मी सांगितले होते, की वाघांची संख्या नक्कीच २५00च्या आसपास असावी. कारण भारतात अनेक ठिकाणी जसे दुर्गम जंगलं नक्षलवादी बोडो चळवळीची जंगलं या जागी कॅमेरे लावणं शक्य झालेले नव्हते, अशा जंगलातही वाघांची संख्या बरीच आहे. त्यामुळे प्रत्येक वाघाचे कॅमेरा ट्रॅपमध्ये फोटो मिळणं शक्य न झाल्याने वाघांची संख्या त्या वेळी थोडीशी कमी आली होती. या वर्षी २0१४ साली डेहराडूनच्या ‘भारतीय वन्यजीव संस्थान’च्या शास्त्रीय सहकार्याने परत वाघांची ‘राष्ट्रीय गणना’ करण्यात आली. या वेळी जास्तीत जास्त दुर्गम जंगले व अगदी खोलवर जाऊन कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. यामुळे जिथे पूर्वी वाघ असूनदेखील पोचता आले नव्हते, ती जंगलेदेखील या गणनेत सहभागी करण्यात आली. त्याचे परिणाम म्हणजे वाघांची ३८४६ ही वाढलेली संख्या.
खरंतर मागील काही वर्षांत ताडोबासारख्या जंगलात पिल्ले होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेय. ताडोबाच्या ६२५ चौ.किमी. क्षेत्रफळाबाहेरचे जंगल बफर झोन घोषित केल्याचा फायदाही वाघांच्या वाढीला मिळाला. दक्षिण भारतातील काही जंगलेदेखील व्याघ्रवाढीत अग्रेसर असल्याचे दिसून येते. मात्र, महाराष्ट्रात अजूनही उत्तम वाघांची जंगले एफडीसीएमसारखे उत्तम वनाचे शिरकाव करून त्यात साग व नीलगिरीसारख्या वृक्षांची लागवड करणार्या विभागाकडे आहे. त्यांना वन्यजीव व्यवस्थापनाशी फारसं काही देणं-घेणं नसतं. नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यात नरभक्षक म्हणून गोळी घालून ठार मारलेला वाघ याच जंगलात होता. अशा जागी वाघ-मानव संघर्ष वाढल्याने वाघांचा घात होतो. त्यामुळे आतातरी शासनाने या व्यावसायिक कामांसाठी जंगलांचा विनाश करण्याऐवजी व्याघ्रांच्या वाढीसाठी जंगले संरक्षित करावी; तरच यापुढे भारतात वाघांच्या अशाच वाढीला उपयुक्त अधिवास मिळून त्यांची वाढ होऊ शकेल.
(लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत.)