शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

दिलाची तार छेडणारी गोंयकारांची डुलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 6:02 AM

शांतताप्रिय गोवेकरांसाठी दुपारची डुलकी ही नितांत आवडीची गोष्ट. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘गोवा फॉरवर्ड’ या पक्षानं मतदारांना काय आश्वासन द्यावं?.. आम्ही निवडून आलो तर कर्मचाऱ्यांना दुपारी दोन तास हक्काची डुलकी घेता येईल!

- राजू नायक

निवडणुकांचा पूर्वकाल म्हणजे आश्वासनांचा सुकाळ. निवडणुकांसाठीच्या प्रचाराला आपल्या देशात प्रियाराधनेचे स्वरूप आले आहे. साहजिकच मतदारांच्या वशीकरणासाठी चंद्र-तारे आणून देण्याची वचनेही देण्यास उमेदवार आणि त्यांचे पक्ष मागेपुढे पाहात नाहीत. म्हणूनच तर दीडेक वर्षावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होणाऱ्या गोव्यातल्या ‘गोवा फॉरवर्ड’ या प्रादेशिक पक्षाच्या अध्यक्षांनी आपला पक्ष सत्तेवर आल्यास कर्मचाऱ्यांसाठी दुपारी २ ते ४ ही वेळ डुलकी घेण्यासाठी निश्चित करील, अशी घोषणा केली तेव्हा आश्चर्य वाटले नाही.

उत्पादनक्षम वेळेतून असे दोन तास वेगळे करणे सद्य:स्थितीत शक्य आहे का, असा प्रश्न घड्याळाच्या काट्यांमागे फरपटत जाणाऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. गोव्यातलेच एक प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. क्लिओफात आल्मेदा यांनादेखील ही कल्पना प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता दिसत नाही. या निमित्ताने समाजमाध्यमांवर जी चर्चा रंगली तिच्यात गोवेकरांचे ‘सुशेगाद’ असणेही ऐरणीवर आले. संथ, तरंगविरहित प्रवाहासारखे जीवन जगण्याची परंपरा असलेल्या गोमंतकियांसाठी वामकुक्षीचा हा प्रस्ताव हमखास आकर्षक ठरेल, असाही कुत्सित सूर काहींनी लावला.

ही डुलकी वा वामकुक्षी एकेकाळी गोमंतकीय जीवनाचा अभिन्न भाग बनली होती, हे मात्र नाकारता यायचे नाही. गोवा ‘राष्ट्रीय’ प्रवाहात सामील झाल्यावर तिच्या अनुयायांची संख्या झपाट्याने आक्रसू लागली. तरीदेखील दुपारची भोजनापश्चातची वेळ विसाव्यासाठी राखून ठेवणाऱ्या गोंयकारांची संख्या आजही लक्षणीय आहे. अनेकांसाठी ती पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आहे. या पूर्वजांचा दिनक्रम विशिष्ट असा असायचा. शेती आणि व्यापार उदिम हे जुन्या काळातले उदरभरणाचे उद्योग. पैकी शेतीत उतरायचा तो कष्टकरी समाज आणि वरल्या स्तरावरले व्यापारात शिरायचे. म्हणजे दुकाने थाटायचे. ही दुकाने उघडायची छान दिवस वर आल्यावर. सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास उकड्या तांदळांची ‘पेज’ खारवलेल्या बांगड्याच्या तुकड्यासमवेत भुरकावून हा व्यापारी घराबाहेर पडायचा. दिवस माथ्यावर आला आणि बाजारातले गिऱ्हाईक विरळ झाले की एक-दीड वाजण्याच्या सुमारास तो भुकेला होत्साता घरी यायचा. स्नानादी आन्हिकं उरकली की भाताबरोबर खाडीतल्या गावठी मासळीचे मस्त कालवण रिचवायचा त्याचा प्रघात. त्या कालवणात निगुतीने पेरलेला नारळाचा ‘आपरोस’ त्याच्या अंगापांगात सुस्ती आणायचा. आता त्या सुस्तीला न्याय द्यायचा तर मग वामकुक्षी ही आलीच.

लक्षात घ्यायला हवे की ही वामकुक्षी म्हणजे झोपणे नव्हे. घोरत पडणे तर नव्हेच नव्हे. ती खरे तर अत्यंत सजग अशी डुलकी असते. गोवेकर रात्र झाली की अन्य मानवांसारखा ‘झोपतो,’ पण दुपारच्या वेळी तो ‘आड पडतो’ किंवा ‘पाठ टेकवतो’. या दोन्ही संज्ञा काहीशी अपूर्णावस्था दर्शवतात, दुपारची गोंयकाराची डुलकी अशीच अपूर्ण असते; पण तेवढ्यानेही ती त्याची गात्रे चैतन्यमय करून जाते. डुलकीच्या दरम्यान थोडी शांतता लाभावी अशी त्याची माफक अपेक्षा असते; पण वेळ आलीच तर तो फटदिशी अंथरूणावरून उठून परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो.

ही डुलकी गोमंतकीय महिलांनाही प्रिय. पतीराजांची, मुलाबाळांची जेवणं होऊन स्वयंपाकघरातली आवराआवर संपली की गृहस्वामिनीलाही पाठ टेकवण्याची इच्छा होतेच. तिची डुलकी तर आणखीन सजग असते. चुलाणात कधी रताळी सरकवून ठेवलेली असतात तर कधी काकडीची ‘तवसळी’ वा फणसाचे ‘धोणस’ चुलीतल्या मंद आचेवर गंधयुक्त होत असते. नेमक्या क्षणी उठून हे जिन्नस चुलीपासून विलग करायचे असतात. त्याचे स्मरण मेंदूला देत ती बाय डुलकी घेते आणि अर्ध्याअधिक तासाच्या विसाव्याने ताजीतवानी होऊन कामाला जुंपून घेते.

आजही ग्रामीण गोव्यातली दुपार निर्मनुष्य असते. हुमणाचा धुतल्या हाताना चिकटलेला गंध हुंगत माणसे ‘आड पडतात’. एखादा टॅक्सीचालक वाहन घेऊन शहरात आला असेल तर सोबत आणलेली भूती संपवून तोही आपल्या आसनाचा कोन किंचित कलंडता ठेवून डोळे मिटून राहिलेला दिसेल. दुपारचा हा ‘ब्रेक’ आपल्या ऊर्जेला मोकळीक देण्याची प्रक्रिया आहे असे नीज गोंयकार मानतो.

काळाप्रमाणे दिनचर्या बदलूू लागल्या आहेत. हिरव्या कुरणांच्या शोधात गोमंतकीयांच्या नव्या पिढ्या सातासमुद्रापार जाऊन स्थिरावल्या आहेत. तेथील जीवनशैलीशी आणि धबडग्याशी जुळवून घेताना त्याने दुपारच्या डुलकीवर पाणी सोडले असल्याची शक्यताच अधिक आहे. गोवाही आता पूर्वीचा राहिलेला नाही. राजस्थानी मारवाड्यांनी व्यापाराची बरीच माध्यमे आणि कोपऱ्यांवरली दुकानांची जागाही ताब्यात घेतली आहे. सकाळी साडेसहा वाजता सुरू होणारा त्यांचा उदिम मध्यरात्रीपर्यंत चालूच असतो. या स्पर्धेची झळ गोमंतकीयाना जाणवते आहे. मात्र त्यावर तोडगा काढताना त्याने आपल्या डुलकीकडे तडजोड केलेली नाही. काहींनी आपली दुकाने मारवाड्यांना देत भाड्यावर समाधान मानले आहे तर उरलेले दुपारचा १ वाजताच दुकानांचे शटर ओढून घराची आणि डुलकीची दिशा तितक्याच निष्ठेने धरत आहेत. अर्थात साडेनऊ ते साडेपाचची ‘वर्किंग अवर्स’ असलेल्या कर्मचारीवर्गाला ते भाग्य लाभत नाही.

‘गोवा फॉरवर्ड’चे निवडणूकपूर्व आश्वासन कदाचित किंचित अतिशयोक्तीचेही असेल. पण त्यामागची अस्सल गोमंतकीय भावना मात्र अजूनही अनेकांच्या दिलाची तार छेडणारीच आहे.

(लेखक लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

nayakraju@gmail.com