वादळी विद्वानाला अलविदा

By Admin | Updated: August 30, 2014 14:50 IST2014-08-30T14:50:33+5:302014-08-30T14:50:33+5:30

विचार आणि विद्वत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलेले हे विद्वान साहित्यिक नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला व आठवणींना दिलेला उजाळा..

Goodbye to the stormy scholar | वादळी विद्वानाला अलविदा

वादळी विद्वानाला अलविदा

 दामोदर मावजो 

 
अनंतमूर्ती गेल्याची बातमी धडकली आणि मन सुन्न झाले. एका पर्वाचा अंत झाला. भारतातील साहित्यिक जगताला हा एक धक्का होताच. शिवाय देशातील अवघ्या गुणी विद्वज्जनांमध्ये गणना होणारा एक विद्वान हरपला. नुसते कन्नड साहित्याचेच नव्हे, तर आज भारतीय साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
आज वर्ष उलटले असेल, नसेल यू. आर. अनंतमूर्तींची कादंबरी ‘भरतपुरा’ ही २0१३ मॅन बुकर अँवॉर्डसाठी शॉर्ट लिस्टेड झाली होती. नियुक्ती झालेल्या सार्‍या लेखकांना इंग्लंडमध्ये निमंत्रित केले होते. त्यामध्ये पाकिस्तानी लेखक इतिहासकार हुसेन हे अनंतमूर्तींचे दोस्तही होते. सतत डायलिसिसवर असतानाही अनंतमूर्ती त्या सोहळ्यासाठी इंग्लंडला गेले. पुरस्कार अमेरिकन लेखिकेला दिला गेला; पण अनंतमूर्तींची प्रतिक्रिया फार सुंदर होती. चाळीस वर्षांमागे लिहिलेली कादंबरी आजही वाचकांना मोहीत करते याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. भारतीय विशेषत: कन्नड साहित्याची आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दखल घेतली जात आहे, याचा अभिमान व्यक्त करताना कालपर्यंत इंग्रजीचे स्तोम माजवणार्‍या जगतात भारतीय भाषा साहित्य मुसंडी मारून पुढे जात आहे, असेही सांगितले. इंग्लंडला जाण्याएवढी प्रकृती ठीक नसतानाही इंतेझार हुसेनसारखे मित्र भेटतील एवढय़ासाठी आपण हा पल्ला गाठला, असेही ते म्हणाले.
डॉ. अनंतमूर्ती म्हणजे विचार, विद्वत्ता आणि विवेक यांचा सुरेख संगम. समता आणि समधर्मभाव यांचा सतत पाठपुरावा करीत आलेले. त्यांची ‘संस्कार’ कादंबरी वाचून त्यांच्या प्रेमात पडलेला मी. प्रतिगामी विचारांना कडाडून विरोध करणार्‍या प्रा. अनंतमूर्तींनी एका मठाधिपतींकडून स्वत:चा सत्कार करून घेतला याचे मला वैषम्य वाटले. दरम्यान, मडगावी चौगुले कॉलेजमधील एका कार्यक्रमासाठी- मला वाटते स्पीकमॅकेचा असावा- अनंतमूर्ती आलेले होते. कार्यक्रमानंतरची संध्याकाळ मी अनंतमूर्तींच्या सान्निध्यात कोलवेच्या समुद्रकिनार्‍यावर घालवली. संधी सापडताच मी माझ्या मनातील नापसंती स्पष्ट बोलून दाखवली. क्षणभर थांबून अनंतमूर्ती म्हणाले, ‘‘दामोदर, तुझ्या धिटाईचं मी कौतुक करतो. अनेक लोक मनात अढी ठेवून गप्प बसतात. त्यामुळे स्पष्टीकरण देण्याची मला संधी मिळत नाही. खरंच सांगतो, मी एखाद्या मठाधीशाकडून किंवा सांप्रदायिक संस्थेकडून सत्कार स्वीकारला नसता; पण त्या वेळी मला ती गरज भासली. माझा आंतरधर्मीय विवाह माझ्या समाजाला मान्य नव्हता. फार टीका झाली माझ्यावर. अर्थात, मी त्याची कधीच पर्वा केली नाही; पण आपली माणसे धार्मिक कडवटपणा बाळगून जगतात याचा खेद वाटत होता. जेव्हा मठाधिशांनी माझा सत्कार करायचं ठरवलं, तेव्हा मी विचार केला- मठाधीश माझा गौरव करतात याचाच अर्थ ते माझ्या आंतरधर्मीय विवाहासकट माझा स्वीकार करतात. म्हणजेच पर्यायाने मठानुयायांनाही आंतरधर्मीय विवाहाला अनुकूलता दर्शवावी लागेल, म्हणून मी तो स्वीकारला. त्याचा इष्ट परिणामही समाजाच्या मानसिकतेवर झालेला पाहिला’’. 
साहित्य अकादमीचे अध्यक्ष असताना डॉ. अनंतमूर्ती गोव्यातील कला अकादमीच्या कृष्णकक्षात व्यासपीठावरून बोलतेवेळी कोणीतरी कोकणीतील इतर लिपींतील साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार लाभत नाहीत, असा सूर काढला. अनंतमूर्ती हसत हसत म्हणाले, ‘पुरस्कारांना कुणी अवाजवी महत्त्व देऊ नये. तुमच्या माहितीसाठी सांगतो- मला अजून साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभलेला नाही. ‘ज्ञानपीठाने पुरस्कृत या महान साहित्यकाराला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला नाही, हे साहित्य अकादमीसाठी खेदजनकच आहे. अर्थात, साधक बाधक विचारांनी बनलेले नियम त्याला कारणीभूत आहेत, हे अलाहिदा. 
सामाजिक स्वास्थ्यासाठी व्यापक दृष्टिकोनातून विचार मांडणारे अनंतमूर्ती हे त्यांच्या स्पष्टोक्तीसाठी सुप्रसिद्ध होते. पुरोहित घराण्यात जन्माला येऊनही ते नेहमीच ब्राह्मण्यवादविरोधी होते. देशातील प्रतिगामी शक्तींना ते सतत व उघड आव्हान देत राहिले होते. त्यामुळे त्यांना अनेकदा समाजकंटकांचा रोषही सहन करावा लागत होता. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी असो, शिखांची कत्तल असो, बाबरी मशीद पाडणे असो वा गुजरातेतील दंगल असो- समाजद्रोही कर्मकांडांचा त्यांनी नेहमीच निषेध केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बहुतेक कारवाया भारतीय समाजस्वास्थ्याला प्रतिरोध करणार्‍या आहेत. भारतातील सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक विविधता म्हणजे आपल्या सांस्कृतिक समृद्धीचे लक्षण आहे. ती जपली तरच भारत एकसंघ राहील, असे त्यांचे स्पष्ट मत होते. 
गेल्या निवडणुकीत त्यांनी मोदींविरोधी जे विधान केले त्यामुळे अनेक भाजपा व मोदीनिष्ठ दुखावले गेले. ‘‘मोदी पंतप्रधान झाल्यास हा देश राहण्यालायक राहणार नाही, मी देश सोडून जाईन,’’ अशा अर्थाचे त्यांचे- मोदी व भाजपा बहुमताने जिंकणार हे स्पष्ट दिसत असतानाही केलेले विधान अत्यंत निर्भीड व धाडसी होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी खेद व्यक्त करून स्पष्टीकरण दिले-‘हा देश माझा आहे, तो सोडून जाण्याचा विचारच मी करू शकत नाही, भवितव्याच्या काळजीपोटी केलेले ते विधान मी भावूक झाल्यामुळे केले गेले.’ मोदी पंतप्रधान झाले व भारत-पाक क्रिकेट सामन्यात भारत जिंकताच मुसलमानांच्या वस्तीत फटाके उडवणार्‍या हिंदुत्ववाद्यांनी व मोदी ब्रिगेडच्या माणसांनी अनंतमूर्तींना आता जा पाकिस्तानात राहायला, असे सांगत कराचीची तिकिटे पाठवून दिली. त्यावरही कळस म्हणजे बंगळुरूच्या राजरस्त्यावर फटाके वाजवत, नृत्य करीत व घोषणा देत या लोकांनी अनंतमूर्तींच्या निधनाचे स्वागत केले. भारतीय समाजात माजणार्‍या या अपप्रवृत्तींची वाढ अनंतमूर्तींनी अगोदरच हेरलेली होती. भारतीयत्व टिकवून ठेवण्यासाठी झटणार्‍या या महापुरुषाच्या निधनानंतर अतिरेकी हिंदूराष्ट्रवाद्यांनी जो नंगानाच केला तो आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ठरो, ही अपेक्षा. प्रा. यू. आर. अनंतमूर्तींंचा पार्थिव देह पंचत्वात विलीन झाला; पण त्यांची साहित्यसंपदा व विचारवेध आम्हास सदैव साथ देत राहील.
(लेखक कोकणीतील ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Web Title: Goodbye to the stormy scholar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.