भावनेला शब्द मिळताना...
By Admin | Updated: December 20, 2014 16:27 IST2014-12-20T16:27:10+5:302014-12-20T16:27:10+5:30
आपल्या मुलावरील मुकेपणाच्या संकटावर मात करताना भोगलेल्या यातना, घेतलेले कष्ट, केलेले संशोधन आणि त्यातून पदरात पडलेले यश, याला सामाजिक अधिष्ठान आणि नवा दृष्टिकोन देण्याचा निर्धार एका खेड्यातील भांगे या दाम्पत्याने केला. त्यातूनच मुक्याचा आवाज ठरणारी चळवळ महाराष्ट्रात बाळसे धरू लागली आहे.

भावनेला शब्द मिळताना...
राजा माने
अहो, प्रज्ञा हुशार आहे.. ती घडाघडा बोलू शकते.. तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्या हुशार लेकराचं नुकसान होईल.. तुम्ही फक्त आणून सोडा.. मी तिला बोलायला शिकविते.. तुम्हाला काहीच जमत नसेल तर.. माझ्या प्रसूनला बहीण नाही, मी प्रज्ञाला दत्तकच घेते..’ ही भावना आणि तळमळ आहे जयप्रदा योगेशकुमार भांगे यांची! एका वस्तीवरील गरीब कुटुंबातील मुलीला बोलता येऊ शकतं, ती बोलू शकते हा आत्मविश्वास घेऊन त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची जयप्रदा व योगेशकुमार भांगे या दाम्पत्याची जिद्द अनुभवत होतो. चुणचुणीतपणा आणि हुशारी नियतीनं या बालकांना बहाल केली, पण वरदानाच्या या जोडीला बहिरेपणाचा शापही दिला. बहिरेपणानं आपोआपच मुकेपण लादलं! याच मुकेपणाशी लढा उभा करून मुक्यांना बडबड करायला भाग पाडणारी चळवळ उभी करीत असलेल्या कुटुंबासोबत मी काही तास थांबलो. शेटफळ (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील जयप्रदा व योगेशकुमार भांगे यांचा मुलगा प्रसून मुका-बहिरा होता, पण ‘स्पीच थेरपी’ची अनेक नवी तंत्रे स्वत:च विकसित करून त्याचे प्रयोग आपल्या मुलावर करून त्यांनी त्याला बोलतं केलं. आजवरच्या प्रत्येक वर्गाच्या परीक्षेत त्याने ‘अ’ श्रेणी प्राप्त केली. त्याच्याबरोबर शिकणारी शाळेतील मुलं, नातेवाईक आणि समाजाशी सतत बडबड-संवाद करीत आज दहावीचा अभ्यास करण्यास प्रसून सज्ज झालाय!
आपल्या मुलावरील मुकेपणाच्या संकटावर मात करताना भोगलेल्या यातना, घेतलेले कष्ट, केलेले संशोधन आणि त्यातून पदरात पडलेले यश, याला सामाजिक अधिष्ठान आणि नवा दृष्टिकोन देण्याचा निर्धार एका खेड्यातील भांगे या दाम्पत्याने केला. त्यातूनच मुक्याचा आवाज ठरणारी चळवळ महाराष्ट्रात बाळसे धरू लागली आहे. विशेष शास्त्रशुद्ध चाचणीद्वारे बालकातील बहिरेपणाचे प्रमाण निश्चित झाले की, श्रवणयंत्र आणि स्पीच थेरपीच्या मदतीने उपचार सुरू करायचे. बालकाच्या आईला विशेष प्रशिक्षण जयप्रदा यांनी द्यायचे, असे या उपचाराचे सूत्र आहे.
पहिल्याच वर्ष-दीड वर्षात आपला मुलगा आवाजाला प्रतिसाद देत नाही, याचा अंदाज भांगे कुटुंबाला येऊ लागला. कमालीच्या दबावाखाली या कुटुंबाची आपल्या मुलाला ऐका-बोलायला यावं यासाठी धडपड सुरू झाली. या धडपडीतूनच मुलाची तपासणी केल्यानंतर त्याच्या नशिबी बहिरेपण आल्याचे स्पष्ट झाले. अनेक दवाखाने, अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स झाल्यानंतर त्यांना जीवनाचा खरा मार्ग सापडला तो पुण्याच्या ख्यातनाम स्पीच थेरपिस्ट डॉ. अलका हुदलीकर यांची भेट झाल्यानंतरच! डॉ. हुदलीकर यांनी जयप्रदा यांना स्पीच थेरपीचे धडे दिले. आपल्या मुलावर उपचार करताना जयप्रदा यांनी ते धडे निष्ठेने गिरविले. त्या धड्यांना स्वत:च प्रयोग केलेल्या अनेक हातखंड्याची जोड दिली. पाहता पाहता प्रसून बोलू लागला. प्रसूनच्या आवाजाने भारावून गेलेल्या जयप्रदा व योगेशकुमार यांनी मुक्या व बहिर्या असलेल्या बालकांच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रसूनची प्रगती होत असतानाच संपर्कातून अनेक मुकी बालके या कुटुंबाची सदस्य बनू लागली. शेटफळ येथील दहा बाय दहाच्या खोलीत मुक्यांना आवाज देणारी चळवळ उभी राहू लागली. जिल्ह्यात अशा प्रकारचे काम यशस्वीरीत्या सुरू असल्याचे अनेक जिल्ह्यांत समजू लागल्याने मुक्या-बहिर्या बालकांचे अनेक पालक शेटफळ या गावी भांगे दाम्पत्याची मदत घ्यायला येऊ लागले. हे काम राज्यच नव्हे तर देशपातळीवर पोहोचले पाहिजे, ही भावना जन्म घेऊ लागली.
जिल्ह्यातील तब्बल ८३ मुले या उपचारात सहभागी झाली. या वाढलेल्या कामाला व्यापक स्वरूप देण्यासाठी या कुटुंबाने आपल्या कामाला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी व्हाईस ऑफ दि व्हाईसलेस अभियान ही संस्था स्थापन केली. याच संस्थेतून आता मुकेपणावर मात करू पाहणारी अनेक बालके बडबड करताना दिसतायत. मोडनिंब या गावाजवळील प्रज्ञा सुर्वे ही पहिलीत शिकणारी दहा वर्षांची मुलगी आपली आई सुनंदा व आजोबा गोरख यांच्या मदतीने, मोडनिंब येथील ऋतुजा ठोंबरे ही बारा वर्षांची सहावीत शिकणारी मुलगी आपली आई स्वाती व वडील राजेंद्र यांच्या मदतीने बोलण्यात प्रगती करीत असल्याचे दिसले. अनिल व उज्जवला जाधव यांची मुलगी व मुलगा दोघेही मुके होते. दहा वर्षांची पाचवीत शिकत असलेली प्रिया तर तिच्यापेक्षा लहान असलेला मुलगा तेजस हेही बोलत असताना दिसत आहेत.
शासनदरबारी राज्यात दोन लाख पाच हजारांहून अधिक मूक-बधिर असल्याची नोंद आढळते. जन्माला येणार्या एक हजार बालकांपैकी सात बालके मूक-बधिर असतात, असे अनेक सर्व्हे सांगतात. पण ही संख्या देखील फसवीच आहे. कारण, शासनाकडे 0 ते ४ वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलांची या प्रकारची तपासणी करण्याची पद्धतच नाही.
मुंबईच्या कोरो या महिला सबलीकरण चळवळीत असलेल्या संस्थेच्या प्रमुख सुजाता खांडेकर यांच्या सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतानाच आपल्या गुरू डॉ. अलका हुदलीकर यांना तर भांगे कुटुंबिय देवच मानतात! अशा कुटुंबाच्या पाठीशी शासन उभे राहिल्यास मुक्यांचा आवाज गगनभेदी ठरल्याशिवाय राहणार नाही.
(लेखक लोकमत सोलापूर आवृत्तीमध्ये संपादक आहेत.)