समलिंगी मायेकल
By Admin | Updated: August 2, 2014 14:56 IST2014-08-02T14:56:23+5:302014-08-02T14:56:23+5:30
आपण समलिंगी असल्याची प्रांजळ कबुली देणारा एक परदेशी तरुण अभिजात योगसाधना शिकण्यासाठी भारतात आला. योगविद्येने त्याच्या दृष्टिकोनात परिवर्तन होत गेला. इतकंच काय, भारतीय संस्कृतीचे खरे र्ममही त्याने जाणले. असे काय समजले होते त्याला?..

समलिंगी मायेकल
- डॉ. संप्रसाद विनोद
खास भारतदर्शनासाठी अमेरिकेतून आलेला मायकेल हा पेशाने जमीन आणि स्थावर मालमत्तेचे व्यवहार करणारा व्यावसायिक होता. वय साधारण ५0 वर्षे. ६ फुटांपेक्षा अधिक उंची, अंगाने सडसडीत, निळे डोळे, रबर बँड लावून मागे बांधलेले लांब केस. पुणं पाहून झाल्यावर भारतदर्शनाला जाण्यापूर्वी योगाभ्यासाची ओळख करून घेण्यासाठी तो माझ्याकडे आला. त्याचा एक मित्र पूर्वी येऊन गेला होता. प्राथमिक बोलणं झाल्यानंतर सुरुवातीला एक आठवड्याचं योगप्रशिक्षण घ्यायचं, त्यानं ठरवलं. मग आमचं विस्ताराने बोलणं झालं. लांबच्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा चालत येता येईल, असं जवळचं एक साधं पण स्वच्छ हॉटेल त्याने निवडलं. मला ही गोष्ट खूप भावली. त्याच्या इतर समस्या सांगण्यापूर्वी त्याने मला एक अनपेक्षित प्रश्न विचारला, डॉ. विनोद, मी समलिंगी आहे. समलिंगी संबंधांविषयी तुमचं काय मत आहे?
त्या वेळी हा प्रश्न मला जरा वेगळा वाटला होता. आर्थिक उदारीकरणापूर्वीचा तो काळ होता. स्त्री-स्वातंत्र्याचे पडघम वाजू लागले होते. स्त्री दाक्षिण्य म्हणून पुरुषांनी मोटारचं दार उघडणंही अमेरिकन महिलांना पसंत नसायचं. अमेरिकेतल्या काही महिलांनी एकत्र येऊन आपली अंतर्वस्त्रं जाहीरपणे फेकून सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्या चळवळीकडे वेधून घेतलं होतं. आपण या बंधनातही अडकून पडू इच्छित नसल्याचं त्यांनी या कृतीद्वारे जाहीर केलं होतं. महिला स्वातंत्र्याच्या मानाने समलिंगी संबंधांचं लोण अजून इकडे यायचं होतं.
समलिंगी संबंधांविषयी बोलताना मी काही गोष्टी मायकेलला स्पष्टपणे सांगितल्या, ‘निसर्गनियमानुसार विचार केला तर स्त्री-पुरुष संबंध हेच फक्त नैसर्गिक ठरतात. कारण, त्याद्वारे प्रजनन होतं आणि त्यामुळे पृथ्वीवरील माणसाचं अस्तित्व अबाधितपणे चालू राहतं म्हणून या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे लैंगिक संबंध अनैसर्गिक ठरतात. सध्याचा काळ धकाधकीचा, ताणतणावांचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा असल्यामुळे काही जणांना विरुद्धलिंगी व्यक्तींशी जुळवून घेणं कठीण जातं, त्यापेक्षा समलिंगी संबंध त्यांना कमी क्लिष्ट आणि सोपे वाटू लागतात. म्हणूनच अशा संबंधांचं प्रमाण हल्ली वाढत चाललं आहे; पण प्रमाण वाढलं म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही आणि जे अनैसर्गिक आहे ते नैसर्गिक ठरत नाही. तरीही, असं अनैसर्गिक वर्तन करणारे लोक मुळात माणसंच असल्यामुळे त्यांना योगविद्या शिकविण्यात मला काही अडचण वाटत नाही म्हणून केवळ तू समलिंगी आहेस, या कारणासाठी मी तुला योगप्रशिक्षण नाकारणार नाही. तसंच तुला शिकविताना मी तुझ्याकडे पूर्वग्रहदूषित भूमिकेतूनही निश्चितच पाहणार नाही.’
माझा दृष्टिकोन समजल्यावर तो खूपच मोकळा झाला. मग त्याने त्याच्या आयुष्याची कहाणी मला सांगितली. त्याच्या आई-वडिलांचे प्रत्येकी तीन घटस्फोट झाले होते आणि प्रत्येकाला पहिल्या आणि दुसर्या लग्नांपासून एक-दोन अपत्येही झाली होती, त्यामुळे तो लहानपणी कायम ८-१0 बहीण-भावंडांमध्ये वाढला; पण त्यांच्यापैकी कोणीही त्याला कधी जवळचं, जिवाभावाचं वाटलं नाही. साहजिकच, त्याचं सगळं बालपण एकटेपणात गेलं. वाईट संगतीमुळे शाळेपासूनच धूम्रपान, दारू, एल.एस.डी., गांजाची व्यसनंही लागली. दोन-तीनदा आत्महत्येचाही प्रयत्न केला.
योगाविषयी आवश्यक ती माहिती दिल्यानंतर त्याला अभिजात योगसाधना शिकवायला सुरुवात केली. हळूहळू तो योगाभ्यास करण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ अक्षरश: ३-३ तास आमच्या योग केंद्रात-शांती मंदिरात येऊ लागला. योगसाधनेविषयी त्याचे प्रश्न खूप मूलभूत स्वरूपाचे असल्यामुळे त्याच्याशी माझं जवळजवळ रोज अर्धा-पाऊण तास बोलणं होऊ लागलं. विशेष म्हणजे नियोजित एक आठवड्याचे योगप्रशिक्षण संपल्यानंतर आणखी एक, आणखी एक असं करत तो तब्बल महिनाभर पुण्यात राहिला!!
या महिन्याभरात खेड्यातल्या लोकांची साधी राहणी, शेणाने सारवलेली घरे, चुली, वेशभूषा, चालीरीती समजून घेतल्या. त्यावर चर्चा केल्या. वाचन केलं.
एकदा, योगकेंद्रात आला असता त्याचे डोळे पाणावलेले दिसले. त्याबाबत विचारलं तर म्हणाला, की सकाळी संस्थेत येताना त्याने कचराकुंडीतले कागद उचलणार्या एका अत्यंत गरीब कुटुंबाला पाहिलं. त्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या - विशेषत: एका लहान मुलीच्या चेहर्यावरचं निर्मळ हास्य पाहून तो फार हेलावला. एवढय़ा प्रचंड गरिबीत जगणारी ही माणसं इतकी छान हसू कशी शकतात, असा त्याला प्रश्न पडला. बहुसंख्य भारतीयांच्या रक्तात अध्यात्म मुरलेलं असतं, त्यामुळे जगताना येणार्या प्रश्नांकडे कसं पाहायचं, याचं प्रशिक्षण त्यांना लहानवयातच मिळून जातं म्हणूनच ती इतकी छान हसू शकतात, असं मी त्याला सांगितल्यावर तो अगदी कळवळून मला म्हणाला, तुमच्याजवळचं हे आंतरिक वैभव सोडून तुम्ही आमच्याकडच्या बाह्यवैभवाच्या मागे अजिबात पळू नका. आमच्या चुकांमधून काहीतरी शिकून त्या तरी निदान तुम्ही पुन्हा करू नका. तुमची कुटुंबव्यवस्था तर इतकी छान आहे, कोणत्याही परिस्थितीत ती तुम्ही बिघडू देऊ नका.’
प्रतिकूल परिस्थितीमुळे तो स्वत: कधी खर्या कुटुंबसुखाचा अनुभव घेऊ शकला नव्हता; पण भारतातल्या एक-दोन सुखी कुटुंबांमध्ये मी त्याला घेऊन गेलो असल्यामुळे त्याला ही बाब फारच महत्त्वाची वाटली.
शेवटच्या दिवशी निरोप घेताना गहिवरून तो मला म्हणाला, मी तुला आणि या कागद वेचणार्या कुटुंबाला कधीच विसरू शकणार नाही. तू शिकविलेली योगसाधना आणि मैत्रीपूर्ण आत्मभान या संकल्पनांचा मी निश्चितपणे मनापासून अभ्यास करीन.
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)