मित्र
By Admin | Updated: August 29, 2015 14:46 IST2015-08-29T14:46:51+5:302015-08-29T14:46:51+5:30
एकदा असाच तो आला, तिरिमिरीत असल्यासारखा. मीही थोडं रागातच म्हणालो, ‘बस इथं नीट. काय झालंय? असा काय वागतोयस अलीकडे? भेटत नाहीस, बोलत नाहीस, काय झालंय?’ म्हणाला, ‘चाललो अॅडमिट व्हायला!’ वा:यासारखा उठला, तसाच चालता झाला! मी मागेमागे धावत गेलो, तर हातात सापडला नाही!.

मित्र
रागची ही कहाणी वाचून पुष्कळ वाचकांचे ईमेल आले. बहुतेकांनी विचारलं. ‘‘पुढे काय झालं ह्या तुमच्या मित्रचं?’’
इतक्या संवेदनशील आणि सतत ‘कासावीस’ असणा:या माणसांचं काय होत असतं ह्या जगात? जे व्हायचं, तेच झालं! दुर्दैवानं! फार लवकर गेला तो हे जग सोडून! पस्तिशीसुद्धा ओलांडण्याएवढं आयुष्य लाभलं नाही त्याला त्या कासाविशीत!
खूप काम केलं, अतोनात चित्र काढली, मनसोक्त, पण कासावीस जगला! किंबहुना कासावीस जगणं हेच त्याचं मनसोक्तपण होतं! डिप्लोमाची परीक्षा झाल्यावर आमच्या वाटा ख:या अर्थानं वेगळ्या झाल्या. त्यानं वेगळी वाट धरली, शिक्षकाची, मी वेगळी!
सांगलीलाही बराच काळ तो होता. पुण्यात अभिनव कला विद्यालयातही त्यानं काही काळ काम केलं. त्याच्या लाघवी स्वभावामुळे, मोकळ्या वागणुकीमुळे विद्यार्थिगणात फार लोकप्रिय होता. सतत विद्याथ्र्याच्या गराडय़ात दिसे.
इतकं असूनही रमला मात्र कुठेच नाही हा बाबा. मी याआधी अनेकदा सांगितलं तसं, कुठेच लक्ष नसल्यानं प्रकृतीकडेही दुर्लक्ष होत असे त्याचं. आपल्या खाण्यापिण्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय हे मुळी लक्षातच न येण्याचंसुद्धा एक वय असतं. कामाच्या नशेत, आपलं सगळं ठीक चाललंय असंच वाटत असतं आपल्याला. ब:याच वेळेला ते तसं ठीक चाललेलंही असतं. पण ठीक चाललेलं नसतं तेव्हा?
निसर्ग अनेकदा घंटा वाजवतो, मेसेज पाठवतो. पण हे असले मेसेज ब:याचदा अनरीड होतात, मेसेज बॉक्समध्ये जाऊन साठून राहतात. त्याच्या प्रकृतीतल्या बिघाडासंबंधीचे असे अनेक मेसेजेस त्याला वेळोवेळी मिळत असत.
कधीतरी मध्येच अक्षरश: अचानक सायकल हाफत हाफत येऊन उभा राहायचा. बसायचा. अक्षरश: काहीच न बोलता झटक्यात निघूनही जायचा. त्याला काहीतरी विशेष बोलायचंय असं वाटून आपण उत्सुकता दाखवून बोलायला सुरुवात करावी, तोच हा पसारही व्हायचा!
कधीतरी बसनं यायचा. खांद्यावर कवींच्या खांद्यावर असते तशी झोळी घ्यायचा, बसायचा, कासाविशीनं उठायचा, निघून जाण्याच्या तयारीत असल्यासारखा!
एकदा असाच आला, तिरिमिरीत असल्यासारखा. मी हाताला धरून बसवलं खाली, नि थोडा रागातच म्हणालो, ‘‘बस बरं इथं नीट. काय झालंय? असा काय वागतोयस अलीकडे? नीट शांतपणानं येत नाहीस, भेटत नाहीस, भेटलास तरी बोलत नाहीस? काय झालंय?’’
म्हणाला, ‘‘चाललो अॅडमिट व्हायला’’ इतकंच तीन शब्दाचं एकच वाक्य बोलला, अक्षरश: वा:यासारखा उठला, नि वा:यासारखाच चालता झाला! मी मागेमागे धावत गेलो. तर हातात सापडला नाही!
असं पुन्हा एकदा झालं, तेव्हा पकडून ठेवलं. मनगट हातानं गच्च धरूनच ठेवलं, नि गेलो कुठे जिथे तो अॅडमिट होणार होता, त्या दवाखान्यात. अॅडमिट व्हायचा, परत घरी जायचा. कुणाला काही सांगायचा नाही आणि धड काही बोलायचा नाही.
त्या दिवशी मग पकडूनच ठेवलं. हाताला धरून नेलं दवाखान्यात. मी त्याला नेलं म्हणण्यापेक्षा त्यानंच मला नेलं त्याच्या त्या दवाखान्यात.
मग सगळा उलगडा झाला.
ह्यानं एकटय़ानं दवाखान्यात जाण्याची ती बरीचावी वेळ होती. कुणाला ह्यानं तोर्पयत पत्ता लागू दिला नव्हता.
फार नुकसान झालेलं होतं.
तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये असा आजार होता तो.
निराशेनं पोटात बाकबुक होण्याचा काळ. सगळ्यांना सगळं कळलं. करू मात्र कुणीच काही शकत नव्हतं. घरात बसून राहण्याची वेळ येऊ नये अशा माणसावर घरात झोपून राहण्याची वेळ आली.
तरी, उठायचा.
सायकल काढायचा, कट्टय़ावर यायचा. आम्ही कुणी घरी गेलो, की हाताला धरुन घराबाहेर काढायचा, दारातल्या चपला पायात सरकवून म्हणायचा, ‘‘चल!’’
मी म्हणायचो, ‘‘अरे, कुठे जायचं?’’
निरुत्तर व्हायचा.
कधी कधी विकार कुठर्पयत पसरलाय, त्याचं चित्र काढून दाखवायचा. चहा पिता पिता हॉटेलातच्या चहाच्या बिलाच्या चिठो:यावर शरीरशास्त्र उभं करायचा.
तपशील न् तपशील चितारायचा, शरीरातली आता किती जागा शिल्लक राहलीय त्या रोगानं व्यापायची, त्याचे तपशील सांगायचा.
पुढे पुढे घरात झोपून राहण्याशिवाय गत्यंतर नाही अशी वेळ आली. तोंडातून शब्द फुटेनासा झाला, तेव्हा एके दिवशी झोपल्या झोपल्याच खोलीतल्या भिंतीकडे तोंड करून उघडय़ा ठेवलेल्या कॅनव्हासकडे बोट दाखवलं.
म्हणाला, ‘‘घेऊन जा घरी,’’
आपल्याकडचं जे आहे, ते इतरांना देऊन टाकण्याची भारी हौस. त्याप्रमाणो ते सगळे कॅनव्हासही मला देऊन टाकण्याची मला त्यानं फारदा आठवण केली.
खोल आवाजात म्हणायचा,
‘‘घेऊन जा’’
त्याच्या आग्रहाखातर काही कॅनव्हास मी आणलेदेखील. चेहरा किंचित उजळलादेखील होता काही क्षण त्याचा.
मला म्हणाला, ‘‘काम कर.’’
मी आजही काम करतोच आहे. तो आजही मला सोडून गेलेला नाहीये. मी काम करत असताना तो स्टुडिओतल्या खुच्र्यावर, सोफ्यावर बसलेला असतो.
कामाबद्दल बोलतो, बरंवाईट, चूक बरोबर सांगतो. हसत असतो.
हसत असतो. पण कासावीस असतो.
(या सदरातील ‘मित्र’ या भागमालिकेतील शेवटचा लेख)
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)
chandramohan.kulkarni@gmail.com