मित्र
By Admin | Updated: August 8, 2015 13:15 IST2015-08-08T13:15:07+5:302015-08-08T13:15:07+5:30
विचारसरणीत फरक पडला, तो आम्ही दोघांनी निवडलेल्या करिअरच्या भिन्न शाखांमुळे. दोन्ही शाखांचे उद्देश भिन्न होते. त्याबद्दल थोडंसं नव्हे, तर बरंच काही सांगण्यासारखं आहे. तत्पूर्वी, हे लेख लिहीत असताना वातावरणात पोर्न फिल्मबद्दल चर्चा आहे.

मित्र
चंद्रमोहन कुलकर्णी
विचारसरणीत फरक पडला, तो आम्ही दोघांनी निवडलेल्या करिअरच्या भिन्न शाखांमुळे. दोन्ही शाखांचे उद्देश भिन्न होते.
त्याबद्दल थोडंसं नव्हे, तर बरंच काही सांगण्यासारखं आहे. तत्पूर्वी, हे लेख लिहीत असताना वातावरणात पोर्न फिल्मबद्दल चर्चा आहे.
त्यामुळे तीव्र आठवण झाली, ती आम्ही पाहिलेल्या पोर्न फिल्मची. त्याबद्दल.
अठराएकोणीस वर्षांचे होतो आम्ही तेव्हा.
आत्ताच्या अठराएकोणीस वर्षांच्या मुलांचं एवढय़ा वयापर्यंत एखादं ब्रेकअपसुद्धा झालेलं असतं. त्यांचा पोर्न साइटवरचा वावरही सढळ हातानं होत असतो. पोर्न साइट बघण्यासाठी फारशी काही विशेष हालचालही करावी लागत नाही हल्ली. कष्ट तर बिलकुलच पडत नाहीत. अगदीच एखाद्या लॅपटॉपवर किंवा खरंतर स्मार्ट फोन आणि एका वायफाय कनेक्शनवर किंवा नेटपॅकवर भागतं. शेजारच्या खोलीत अगदी पालक असले तरी आपल्या खोलीचं दार बंद करून घेतलं की झालं, इतकी सोपी आणि सहज साध्य गोष्ट!
आम्ही मात्र त्या वयात आजच्याइतकेच बावळट होतो. ‘पोर्न फिल्म’ हा शब्दसुद्धा ऐकला नव्हता. ‘ब्ल्यू फिल्म’ मात्र ऐकला होता. शॉर्टफॉर्मही पुष्कळ ऐकले होते. पण बघितली कधीच नव्हती.
एके दिवशी सकाळीच सायकल हाफत हाफत हा आला आणि म्हणाला, ‘‘रात्री पिक्चरला जायचंय.’’ कुठे, काय, कोणता वगैरेची मी चौकशी केली तर ‘माहीत नाही’, असं म्हणाला. आमच्यापेक्षा वयानं ब:यापैकी मोठय़ा असलेल्या आमच्या एका मित्रनं तो प्लॅन ठरवला होता, असं पुढं त्यानं सांगितलं. पिक्चरचं नाव, नटनटय़ा कोण, कुठं लागलाय वगैरे काही कळलं नाही, पण शो रात्री उशिराचा आहे, एवढं मात्र कळलं होतं.
‘‘साडेबारा वाजता? कुठं, मिलिटरी कँटिनला?’’
मिलिटरी कँटिनला असे अचानक कितीही वाजता शो होतात, हे माहिती असल्यानं मी त्याला तसं विचारलं.
तो म्हणाला, ‘‘नाही रे, कर्वे रोडला..’’
आता कर्वे रोडला कोणतं नवीन थिएटर झालंय, असं मी विचारणार, एवढय़ात तो जेवढय़ा वेगानं आला होता, तेवढय़ाच वेगानं निघूनही गेला.
कधी कधी मनाला येईल ते हा बोलतो, गंमत करतो, नंतर विसरूनही जातो हे माहीत असल्यामुळे सकाळचं संभाषण मी संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवलं नाही; आणि सवयीप्रमाणो कट्टय़ावर गेलो. सगळे जमलेलेच होते. दोनतीन अर्धे चहा, तेवढय़ाच अध्र्या बिडय़ा फुंकून झाल्यावर तेवढेच तास टाइमपास करूनही पिक्चरचा विषय काही कोणी काढला नाही. साडेआठ-नऊनंतर घरी जाण्यासाठी पांगापांग झाली आणि ठरल्यासारखं दोघंतिघंजण चौकातून पुढे जाऊन परत फिरून कट्टय़ावर आले. कट्टय़ाच्या नेहमीच्या मीटिंगनंतर विशेष काही महत्त्वाची मीटिंग असली किंवा कुणाला कटवायचं वगैरे असेल, किंवा त्यातल्या काही जणांनाच फक्त एखादा पिक्चर बघायचा असेल तर, असं कधी कधी होत असे. आणि हे काही ठरवून होत नसे. आपोआप ज्याचं त्याला ते कळायचं आणि एक मीटिंग ‘आफ्टर कट्टा’ होत असे.
ह्या मीटिंगचा अजेंडा विशेष आहे, हे लक्षात आलं आणि डोक्यात एकदम टय़ूब पेटली : ‘कर्वे रोडला पिक्चर!’
सिनियर मित्र म्हणाला, ‘‘ब्ल्यू फिल्म!’’
आता ब्ल्यू फिल्म म्हटल्यानंतर ब्लॅक अॅण्ड व्हाइट फिल्म असते, तशी ब्ल्यू फिल्म असणार, असा सगळ्या ज्युनियरांचा काहीसा अंदाज. विशेष असेल, आर्टिस्टिक असेल, म्हणून एखाद्या फिल्म क्लबच्या लोकांसाठी विशेष शो होतो, तसा हा शो विशेष असेल आणि म्हणून उशिरा असेल, असं सगळं भाबडं भाबडं वाटलं होतं.
आता पिक्चर कोणता का असेना, कितीही वाजता का असेना, कोणत्याही भाषेतला का असेना, कलर नाही तर ब्लॅक अॅण्ड व्हाइट असो, किंवा निळा का असेना, बुडवायचा प्रश्नच नव्हता.
बारा-सव्वा बारापर्यंत फुल्ल टाइमपास करून पुन्हा कट्टय़ावर परतलो. सिनियर महाशय सिगरेट ओढत ओढत सायकलवरनं आले. अजून एखादा पंटर आणि आम्ही दोघं. एकदम कोअर ग्रुप!
पिक्चर कुठला आहे वगैरे चर्चा झालीच.
चर्चेत खूपच महत्त्वाची माहिती मिळून ज्ञानात
भर पडली. ती अशी की, ही ‘तसली’ फिल्म
आहे. तसल्या फिल्मला ‘ब्ल्यू फिल्म’ म्हणतात.
ही फिल्म ब्लॅक अॅण्ड व्हाइटप्रमाणो ब्ल्यू अॅण्ड व्हाइट नसते. पण ब्लॅक अॅण्ड व्हाइट नसते असंही नाही,
पण असूही शकते. कलर्डही असू शकते. त्यात
काम करणारे नटनटय़ा आपल्या ओळखीचे नसतात. डिरेक्टर, फोटोग्राफरही आपल्या माहितीतले नसतात. आणि यात गाणी नसतात. कॉश्च्यूम आणि ड्रेपरीही फारशी नसते!
*
कर्वे रोड.
मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची वेळ. पुण्यात पूर्वी साडेबाराएकला ब-यापैकी सामसूम झालेली असायची, हे सांगून आज कदाचित खरं वाटणार नाही. कर्वेरोडच्या कुठल्यातरी एका गल्लीच्या टोकाशी दोनतीन अनोळखी माणसं उभी होती, सायकली कडेला लावून आम्ही त्यांना जॉइन झालो. जॉइन झालो म्हणजे तरी काय, त्यांच्या रेंजमध्ये जाऊन अंग चोरून उभे राहिलो. ओळखीचं कुणी दिसलं नाही, म्हणून बोलण्याचा प्रश्न आला नाही आणि ती मंडळी ब:यापैकी वयस्करही दिसत होती; त्यामुळेही कुणी कुणाशी बोलत नव्हतं. आधी मला वाटलं होतं त्याप्रमाणो ते लोक एखाद्या विशेष फिल्म क्लबचे मेंबरही वाटत नव्हते.
थोडय़ा वेळानं गल्लीतल्या एका सोसायटीच्या गेटमधून एक मनुष्य दबकत दबकत, पण धावत आमच्या दिशेनं आला आणि त्या लोकांना सोबत चलण्याचा इशारा केला. आम्हीही ती आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांच्या मागे मार्गक्रमण केलं. आमच्याकडे तोपर्यंत कोणी ढुंकूनही पाहिलं नाही किंवा आम्हाला कुणी रागावूनही बोललं नाही. आमची कुणी दखलही घेतली नाही.
सोसायटी अगदीच लहान होती. नेहमीप्रमाणो एक मोठं आणि एक छोटं फाटक असलेली आणि छोटं फाटक फक्त उघडत असलेली. दबकत दबकत आम्ही आत गेलो. कुठल्या मजल्यावर, कुणाच्या घरी आम्ही चाललो आहोत, ह्याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. त्याबद्दल आपापसात विचारण्याचं धाडसही होईना. वातावरण गंभीर गंभीर आणि गडद गडद होऊ लागलं होतं. आणि त्यामुळे मनावर एक प्रकारचं दडपणही येत चाललं होतं. एरवीच्या थिएटरमधल्या उल्हसित आणि प्रफुल्लित वातावरणाचा इथे मागमूसही नव्हता. पब्लिकचा आवाज, चहा-वडापावच्या गाडय़ा,
पूर्ण उजेड, आगामी सिनेमांची पोस्टर्स, चालू, मॅटिनी शोजचे शोकेसमधले फोटो वगैरै वगैरे काहीच नव्हतं. हे थिएटरच नव्हतं. तिकीटही काढलेलं नव्हतं, सायकल स्टँड नव्हता. मी खिन्न झालो. हा कसला पिक्चर? ब्ल्यू फिल्मबद्दल मनामध्ये अतिशय नकारात्मक भावना निर्माण झाली, तो हा क्षण.
चार जिने चढून आम्ही वर पोहोचलो ती जागा एका मोठय़ा हॉलसारखी दिसत होती. एकदोनच टय़ूबलाईट लागलेल्या होत्या. एखाद्या खासगी, छोटय़ा कार्यासाठी असलेल्या हॉलमध्ये गर्दी व्हावी, तेवढी गर्दी तिथे आधीच झालेली होती. उत्सवमूर्तीच्या ऐवजी इथं एक पडदा लावलेला होता. आणि उत्सवमूर्तींच्या समोर तोंड करून वायरींचं भेंडोळं असलेला एक छोटय़ा आकाराचा प्रोजेक्टर आणि व्हीसीआर ही दोन मुख्य पात्रं आणि आणखी काही तांत्रिक सामग्री एका टेबलावर ठेवली होती. सगळे जण पडद्याकडे तोंड करून बसले होते. सगळे पुरुष होते. एखाद्या विशेष समारंभाच्या ठिकाणी जाताना चपला बाजूला काढून ठेवतात, त्याप्रमाणो इथेही सगळ्यांच्या चपला, बूट एका बाजूूला काढून ठेवलेले; तिथल्या त्या दोन टय़ूबलाईटच्या क्षीण प्रकाशात
दिसत होते. आम्ही दबकत दबकतच दरवाजापासून पुष्कळ लांब, सर्वात मागे जाऊन उभे राहिलो. कुणीही तोंडातून चकार शब्द काढत नव्हता. थोडय़ा वेळानं आम्ही त्यातल्या त्यात रिलॅक्स झालो आणि खाली बसून घेतलं.
पुष्कळच वेळानं इतका वेळ बंद असलेल्या हॉलच्या एका दरवाजामधून एक माणूस घाईघाईनं आला आणि व्हीसीआरपाशी जाऊन त्यानं काहीतरी खुडबूड केली. त्याचबरोबर कुणीतरी ते दोन्हीही क्षीण, निर्जीव दिवे बंद केले. त्याचबरोबर अतिशय दबक्या आवाजातला अस्पष्ट असा एक सार्वजनिक ध्वनी आसमंतात पसरला आणि आत्तापर्यंत रिलॅक्स असलेले सगळे लोक अचानकच सावरून बसले.
लोकांच्या नजरेचा फोकस पडद्याकडे!
पडद्यावर टायटल म्युङिाक किंवा अमुकतमुक फिल्म्स, बॅनरचं नाव वगैरे काही न येता, काळ्यापांढ:या अस्पष्ट आणि अतिशय धूसर आकारांची जोरजोरातली हालचाल अनमानधपक्याच सुरू झाली. थोडय़ा वेळानं आकार स्पष्ट होऊन ते रंगीतही झाले होते. मानवी देहाचं आतापर्यंत न पाहिलेलं रूप अचानक मोठय़ा आकारामध्ये माङया दृष्टीसमोर बटबटीत स्वरूपात ठणठण करीत आदळू लागलं. अचंबित होऊन मी थोडा वेळ गप्प (खरंतर सुन्न) बसून राहिलो. मनात कसलीतरी प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. माझ्या नकळत मी परागकडे पाहिलं, तर तो गुडघ्यात डोकं घालून डोळे मिटून बसला होता. त्याचं कुठेच लक्ष नव्हतं. त्याच्या त्या हावभावावरून त्याला बहुतेक ओकारीची भावना होत असावी, असं मला वाटलं. मलासुद्धा कसल्यातरी एका विषण्ण भावनेनं ग्रासलं होतं, अचानकच. छातीत धडधडत होतं आणि किंचितसा घामही आला होता. परागच्या भाषेत मी ‘कासावीस’ झालो होतो! आजूबाजूच्या मंडळींपैकी दोघातिघांनी आता सिगरेटीही पेटवल्या होत्या. तो धूर वातावरणात पसरून माझ्या पोटात आणखीनच ढवळायला लागलं. मलाही ओकारीची भावना व्हायला सुरु वात झाली. परागचं लक्ष माझ्याकडे वेधण्यात एकदाचा मी कसाबसा यशस्वी झालो. माझ्याकडे बघताच तो आणि आमच्याबरोबरचा आमचा आणखी एक मित्र क्षणात उठून उभे राहिलो. आम्हाला बाहेर पडायचं होतं. आम्ही हॉलच्या खूप मागे भिंतीजवळ बसलो होतो म्हणून बाहेर पडायला चान्स होता. एक शब्दही न बोलता आम्ही तिघं भिंतीला मागे हात लावून भिंतीचा आधार घेत घेत सरकत सरकत शक्यतो कुणालाही धक्का लागू नये, अशी काळजी घेत हॉलच्या मुख्य दरवाजापाशी आलो. आम्ही बाहेर पडताना आमच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. सगळेजण एक्साइट होऊन फिल्म बघण्यात मग्न होते. आम्हीच बावळटासारखे निघून चाललो होतो. हॉलच्या मुख्य दरवाजापाशी आम्ही आलो तर, दरवाजाला आतून कडी घातलेली होती. पण आमची अवस्था बघून तिथल्याच कुणीतरी एकानं कडी काढून आम्हाला दार उघडून दिलं. अजिबात आवाज न करता, तिथल्या त्या चपलांच्या ढिगा:यातून आपापल्या चपला कशाबशा पायात सरकवत, झटझट झटझट पाय:या उतरून, ओकारीची उबळ कशीबशी दाबत आम्ही एकदाचे खाली ग्राउंडमध्ये आलो. पोटात आणि डोक्यात गरगरल्यासारखं होत होतं, तरी जिथं सायकली लावल्या होत्या त्या दिशेनं जिवाच्या आकांतानं भरभर, काहीतरी गुन्हा केल्यासारखी भावना पोटात ठेवून सायकलीवर टांग टाकून एकमेकांशी एकही शब्द न बोलता त्या तिस:या मित्रच्या रूमवर पसार झालो!
(क्र मश:)
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)
chandramohan.kulkarni@gmail.com