नि:स्पृह कोशकार
By Admin | Updated: July 5, 2014 14:26 IST2014-07-05T14:26:04+5:302014-07-05T14:26:04+5:30
मराठी शब्दकोशाचे प्रमुख संपादक असणारे, ज्ञानेश्वरीचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य रामदास डांगे यांचे नुकतेच निधन झाले. शब्दाचा अर्थ निश्चित करणे असो वा त्याची व्युत्पत्ती शोधणे असो, त्या शब्दामागची भूमिका कशी लक्षात घ्यायची, शब्दाच्या सांस्कृतिक इतिहासाचा धांडोळा कसा घ्यायचा हे सारेच शिकण्यासारखे होते. त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा..

नि:स्पृह कोशकार
- सुप्रिया महाजन
गेली सहा वर्षे कोशप्रकल्पांमुळे प्रा. डांगे सरांशी रोज संबंध येत होता. २00७च्या जून महिन्यापासून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी शब्दकोशाचे प्रमुख संपादक म्हणून काम पाहिले. गेल्या वर्षीच हा प्रकल्प पूर्ण झाला. सुमारे ४0-४५ वर्षे रखडलेला हा ‘मराठी शब्दकोश’ निर्विघ्नपणे पूर्ण करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी व्युत्पत्तिकोश’ या प्रकल्पाचेही प्रमुख संपादक म्हणून (सन २0११पासून) सर कार्यरत होते. हाही कोश पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाच ते आपल्यातून गेले. या सहा वर्षांच्या काळात सरांच्या मार्गदर्शनाखाली संपादनाचे धडे घेताना, ‘कोश’ या वाड्मयप्रकाराची माहिती घेताना मुद्रितशोधन कसं करावं यापासून ‘शब्दविचार’ यासारख्या गंभीर विषयापर्यंत अनेक विषयांचं ज्ञान मिळत गेलं. एखादा प्रश्न विचारला आणि उत्तर मिळालं नाही किंवा शंकेचं समाधान झालं नाही, अशी कधी वेळच आली नाही. कोशाचं संपादन करीत असल्यामुळे शंकांना जसं विषयांचं बंधन नसे आणि तसं सरांच्या विचारशक्तीलाही.
आता ते नाहीत.. खरं तर हे वाक्य खोटं आहे, असंच वाटतं आहे. कारण ‘अजरामश्वत्प्रा™ो विद्यार्मयंच साधयेत।’ हे सुभाषित त्यांचा जीवनमंत्र होता. चालती-बोलती ‘नवृत्ती’ त्यांच्यासोबत सतत होती आणि ‘नवीन’ या गोष्टीचं प्रचंड आकर्षणही त्यांना होतं. पुस्तकं घेणं आणि देणं याचं सरांना जबरदस्त व्यसन होतं. सहा वर्षांत हजारो पुस्तकं त्यांनी घेतली नि कैक पुस्तकं अनेकांना वाटून टाकली! पुस्तकाचा उपयोग होणार, पुस्तकाचं दान करता येणार, अशी संधी कोणा माणसाच्या रूपाने समोर दिसली, की त्यांचे डोळे लकाकू लागत! भोळेपणाने नोंद न ठेवता ‘देऊन टाकण्याच्या’ त्यांच्या या स्वभावामुळे अनेकांनी त्यांना आर्थिक बाबतीतही ‘या दुगरुणाची’ जाणीव करून दिली; पण कोणी पैसे परत केले नाही, तरी सरांना त्याची खंत नसे. ते म्हणत, की ‘जो परत देणार आहे, तो नोंद नाही ठेवली तरी पैसे परत करतो; पण जो परत न करण्यासाठीच घेऊन गेला आहे, तो नोंद ठेवली तरी देणारच नसतो!’
महिला विद्यालय गंगाखेड येथे सर ३३ वर्षे प्राचार्य म्हणून कार्यमग्न होते त्यानंतर गेली सहा वर्षे कोशकार म्हणून कार्यरत होते; पण ही त्यांची पूर्ण ओळख नाही. कारण, त्याच्या जोडीला ते ‘ज्ञानेश्वरीचे अभ्यासक’ होते. त्यांच्या या ओळखीला वा अस्तित्वाला वेळेची र्मयादा नव्हती. महाराष्ट्र शासनाने गेल्यावर्षी ‘ज्ञानोबा-तुकोबा पुरस्कार’ देऊन त्यांनी केलेल्या ज्ञानेश्वरीच्या व मराठी भाषेच्या नि:स्पृह सेवेचा सन्मान केला; पण सर तेव्हा म्हणाले, ‘या पुरस्कारामुळे ज्ञानेश्वरी, तिची पाठचिकित्सा वगैरे अभ्यास लोकांपर्यंत जाईल, ज्ञानेश्वरीचं मोठेपण सगळ्यांना कळेल, तर उपयोग आहे. माझी नव्हे, ज्ञानेश्वरीची प्रसिद्धी व्हायला हवी!’ हेच सर दुसर्या अभ्यासकांचं मात्र भरभरून कौतुक करीत. वारकरी, एकादशी, विठोबा हे सारे त्यांना तल्लीन करणारे विषय होते. त्यांच्याच परिवारातील एक डॉक्टरीचं शिक्षण घेतलेल्या मीराबाई गरुड यांनी सासरच्या घरातील वारकरी परंपरेमुळे श्रद्धापूर्वक व प्रयत्नपूर्वक ज्ञानेश्वरीचा, यादवकालीन मराठी भाषेचा अभ्यास केला. आता सरांच्या मार्गदर्शनानुसार त्या ज्ञानेश्वरीचा शब्दकोश करीत आहेत. याबद्दल कौतुक करताना ते थकत नसत. या त्यांच्या स्वभावामुळे ब्रह्मनंद देशपांडे, कवी विठ्ठल वाघ, चित्रकार भास्कर हांडे, संतसाहित्याचे अभ्यासक रामभाऊ नगरकर, सत्त्वशीला सामंत (भाषातज्ज्ञ व कोशकार), नगरच्या विदुषी लीला गोळविलकर अनेक स्नेही जोडले गेले.
‘घरात कोणतीही सांस्कृतिक पार्श्वभूमी नाही. गरिबी आणि निरक्षरता तर होतीच. लहानपणीच आई गेली. माझे डोळे पूर्वीपासून फार अधू. आठव्या वर्षापर्यंत तर मी बोलत नव्हतो; पण वेळोवेळी महात्म्यांच्या कृपेने ती-ती शक्ती मिळत गेली, प्रश्न सुटत गेले,’ अशा आठवणी ते सांगत. ‘सगळ्या आयुष्यात संकटांची, दु:खांची तीव्रता जिने कमी केली, ती आमची बाई म्हणजे मोठं अजब रसायन आहे,’ असं ते डांगेबाईंचं वर्णन करीत. त्यांची सहनशीलता, समज, घरातली मुख्य व्यक्ती म्हणून जबाबदारी घेण्याचा स्वभाव, त्यांच्या हाताला असणारी चव या सगळ्याचं सर नेहमी कौतुक करत.
गेल्या आठवड्यात सरांनी मला भेटायला बोलावलं होतं; पण काही कारणाने ती भेट रद्द झाली आणि आता ते भेटणारच नाहीयेत..! सरांच्या ८0 वर्षांच्या आयुष्याची गेली सहाच वर्षें मी त्यांना ओळखते. अनेक वर्षांच्या अभ्यासाने, अनुभवाने परिपक्व झालेल्या पितृत्व सहृदय माणसाचा सहा वर्षांचा सहवास जीवनभराचा दृष्टिकोन देऊन गेला.
त्यांची एकच आठवण सांगते आणि थांबते. गेल्या वर्षीच ओळखीच्या एका व्यक्तीला दुर्धर रोग झाल्याची बातमी समजल्यानंतर मी सरांना विचारलं होतं, ‘सर आयुष्याचा इतका मोठा टप्पा ओलांडल्यावर काय वाटतं हो? गेलेला काळ पाहून सुख-दु:खं अधिक वाटतात, की समोरून जवळ येणार्या आयुष्याच्या शेवटाची जाणीव अधिक ग्रासते?’ दोन क्षण शांतपणे गेले. नंतर सर म्हणाले, ‘काय अधिक हे नक्की कसं सांगू? पण स्वत:च्या शेवटाचीच जाणीव अधिक अस्वस्थ करते, असं वाटतं. पण, दुसरी गोष्ट काय आहे सांगू का? तसं जेव्हा वाटतं, तेव्हा आपण वाचलेलं तत्त्वज्ञान आपणच आपल्याला पुन:पुन्हा सांगायचं. आपल्या कुवतीप्रमाणे आपलं मन आपली बुद्धी ते हळूहळू पचवत जाते. प्रयत्न करणं आणि शक्ती वाढवणं एवढंच आपण करू शकतो. ते करायचं! मरण स्वाभाविक आहे, हे केव्हातरी पटेलच मनाला!’
(लेखिका व्युप्तत्तिकोशाच्या कार्यकारी
संपादक आहेत.)