जसे खाणार, जिथे जाणार, तसेच बोलणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 06:00 IST2019-04-14T06:00:00+5:302019-04-14T06:00:04+5:30
भाषेचा आणि आपल्या खाण्यापिण्याचा काय संबंध? शास्रज्ञांनी सिद्ध केलंय, माणसानं गहू-जवसाची शेती आणि गुरं पाळायला सुरुवात केल्यानंतर वेगवेगळी व्यंजनं त्याला बोलता यायला लागली ! आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आणि आपल्या जबड्याचा आकारही बदलला. माणूस अगोदर कठीण पदार्थ खात होता; पण मऊ पदार्थ खायला लागल्यावर एक ‘नवीनच’ भाषा त्याला सापडली. त्या त्या ठिकाणच्या हवामानानुसारही भाषेत, उच्चारांत फरक पडत जातो! त्यामुळेच मराठीतला कावळा ‘काव-काव’, हिंदीतला ‘कौआ’, तर इंग्रजीतला ‘क्रो’ आवाज काढतो!

जसे खाणार, जिथे जाणार, तसेच बोलणार!
- विनय र. र.
आपल्या खाण्यापिण्यामुळे आपल्या भाषेत काही बदल होऊ शकतो का? तात्कालिक नाही दीर्घकालिक ! काही जणांच्या बाबतीत मादक पेयांचे सेवन केल्यावर जीभ वळत नाही - त्यामुळे भाषापण बदलते आणि भावनापण बदलतात. पण मला त्याबद्दल काही बोलायचे नाही.
वैज्ञानिकांनी असे सिद्ध केले आहे की, इसवी सन पूर्व ६००० ते इसवी सन पूर्व २१०० या निओलिथिक युगामध्ये माणसाने गहू आणि जव यांची शेती सुरू केली आणि शेळ्या-मेंढ्या गायी-गुरे पाळायला सुरुवात केली त्यानंतर माणसाला वेगळ्या प्रकारची व्यंजने बोलता यायला लागली.
भाषा हा जीवशास्राच्या अभ्यासाचा विषय नाही; पण पुराजीवशास्र किंवा मानववंशशास्राचा तो नक्कीच विषय होऊ शकतो. आदिमानवाच्या काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यावर आपल्या जबड्याचा आकार बदलला. जेव्हा दाढांवर दाढा आणि पटाशीच्या दातांवर पटाशीचे दात बसत होते तेव्हा असणारी व्यंजने आणि जेव्हा खालच्या जबड्याचे दात वरच्या जबड्याच्या पटाशीच्या दातांच्या आत बसायला लागले त्यावेळेला माणसाच्या भाषेमध्ये असणारी व्यंजने यात बदल झाला असणार.
पटाशीच्या दातांवर दात पक्के बसत असतील तर अशा जबड्यातून *फ* आणि *व* असे उच्चार होणे अवघडच आहे. फुगडीतला ‘फ’ असो की फादरमधला ‘फ’, वजनातला ‘व’ असो की व्हर्जन मधला ‘व’.. कारण अशा उच्चारांमध्ये खालचे ओठ आणि वरचे दात यांची विशिष्ट रचना करावी लागते, असे झुरीच विद्यापीठातील संशोधक बाल्थासार बिकेल म्हणतात. १४ मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘सायन्स’ या संशोधनपर नियतकालिकात त्यांनी यासंदर्भात लिहिले आहे.
बिकेल यांचे सहकारी स्टीवन मॉरन म्हणतात - आदिमानव धान्यांची पेज, आळण, उकाळे किंवा सार हे खात होते. मात्र पशुपालन करायला लागल्यानंतरच्या काळात त्यात दूध, दही, चीज यांसारख्या पोषक, प्रक्रियायुक्त आणि मऊसर अन्नाची भर पडली आणि दात झिजण्याचे प्रमाण कमी झाले. जबड्याचा आकार बदलला आणि माणसाला नवीन भाषा सापडली.
अशा प्रकारे भाषा ही फक्त एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेला सांस्कृतिकच वारसा नाही तर जिवाच्या उत्क्र ांतीचासुद्धा तो वारसा आहे.
कोणतीही भाषा ही त्या मानवी समूहाचा एक हळूहळू वाढत गेलेला सांस्कृतिक आविष्कार असते. सुरुवातीला माणसाने फक्त आवाज करत एकमेकांशी संपर्क साधला असला पाहिजे. जसे पक्षी, प्राणी वेगवेगळे आवाज काढू शकतात तसे तर माणूस या प्राण्याला वेगवेगळे आवाज काढताच आले असतील. मग प्राण्यांना नावे ठेवताना माणसाने त्यांच्या आवाजाचा वापर करून त्या प्राण्यांचा उल्लेख करायला सुरुवात केली असली पाहिजे. मराठी माणूस कावळ्याला ‘कावळा’ म्हणतो. हिंदीत तो ‘कौआ’ होतो आणि इंग्लिशमध्ये ‘क्र ो’ होतो. म्हणजे तिथल्या तिथल्या प्रदेशांमध्ये कावळा वेगवेगळ्या आवाजात बोलत असला पाहिजे. माणसाने जेवढे स्थलांतर केले, तेवढे स्थलांतर कावळ्यांनी केले का? कल्पना नाही; पण नसावे. इथे आपण कल्पना करू शकतो की त्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार, वातावरणानुसार त्या त्या ठिकाणचा कावळा त्याला जसा जमेल तसा आवाज काढत असणार. मराठी प्रदेशात काव-काव तर हिंदी प्रदेशात तिथल्या वातावरणानुसार त्याचा आवाज ‘कौआ’ असा होत असणार. आणि इंग्रजी प्रदेशात जिथं बराच काळ थंडी, बर्फ असतं तिथं कावळ्याला आपली चोच पूर्ण उघडता येत नाही म्हणून छोटीशी चोच उघडून ‘क्र ो’ असा उच्चार करत असणार.
पूर्वीच्या काळातल्या माणसांनी भाषा तयार करत असताना असे उच्चार केले असतील.. तसे उच्चार केले असतील.. अशी आपण केवळ कल्पना करू शकतो. कारण त्यांनी केलेले उच्चार रेकॉर्ड करून ठेवायची पद्धत कुठे होती? तेव्हा तशी उपकरणे कुठे होती?
समजा जुने शिलालेख सापडले किंवा आदिमानवाच्या गुहांमध्ये लिहिलेला मजकूर सापडला तरी तो वाचणार कसा? त्याचे उच्चार समजणार कसे? माणसाला लिपी सापडली. सापडली म्हणजे माणसाने हळूहळू एकेक चिन्ह शोधत वापरत तिचा विस्तार केला असणार.
सुरुवातीच्या काळात दगडावर लिहिण्याची पद्धत असल्यामुळे त्या दृष्टीने सोयीस्कर होईल अशी लिपी वापरली असणार. नंतर कधीतरी कागदाचा शोध लागल्यावर कागदावर काट्याने, रंगाने, काडीने लिहिता येते म्हटल्यावर लिपीत तसे बदल झाले असणार. किंवा कागदावर, कापडावर ब्रशने लिहिताना सलग सलग अक्षरे येतील अशी करली अक्षरे किंवा मोडी अक्षरे अशी सापडली असणार.
शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना ही अक्षरे लिहायला सोपी; पण छापायला अवघड असतील म्हणून बाळबोध लिपी सुरू केली असणार. पुढे खिळे जुळवताना कंपोझिंगसाठी ती सोपी करायला लागली. आता तर संगणकावर किंवा मोबाइलच्या पडद्यावर सहज दिसतील अशी अक्षरे रचली गेली.
भारतात अनेक भाषा आहेत. सगळ्याच भाषांना लिपी नाही. त्यामुळे काही भाषा एका पिढीकडून दुसºया पिढीकडे केवळ कानावर पडून पडून सरकल्या. काही भाषा आपापल्या लिपीतून सरकल्या. लिखाण करायला शिकावे लागते, वाचायला शिकावे लागते; पण बोलायला शिकावे लागते का? भाषा शिकणे आपोआप लहान मुलांच्या वातावरणात असलेल्या भाषेवरून शिकले जाते.
लहान मुलांचे भाषा शिकणेपण पोहायला शिकण्यासारखे असते किंवा सायकल चालवायला शिकण्यासारखे असते. लहान मुलाला व्याकरण येत नाही; पण जेव्हा त्याला भाषेची शब्दरचना कळते तेव्हा त्याला भाषा यायला लागते. त्यामुळे खरं तर भाषा शिकायची असेल तर त्या-त्या भाषिकांच्या सान्निध्यात राहून ऐकून शिकली पाहिजे.
त्या त्या भाषांच्या उच्चारांची खास वैशिष्ट्ये असतात. हिंदीत ‘ळ’ नाही, मराठीत आहे. तामिळ भाषेत दोन ‘ळ’ आहेत. एक मराठीत उच्चार करतात तो आणि दुसरा मराठी माणसाला कदाचित उच्चारता येत नाही तो म्हणजे तामिळनाडू शब्दामधला ‘ळ’. मूळाक्षरांमध्येच इतका फरक तर शब्दांमध्ये, शब्दांच्या अर्थांमध्ये वाक्याच्या रचनेमध्ये किती फरक असेल? त्या त्या भागातल्या हवामानानुसार, परिस्थितीनुसार, सजीव-निर्जीवनुसार किती फरक असेल? तसाच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीनुसारसुद्धा भाषांमध्ये काही बदल होत असेल..
भारतात असणाºया विविध हवामानाच्या प्रदेशातील भाषांमधले व्यंजनांचे उच्चार कसे मृदू किंवा तीव्र असतात याबद्दल आपण अभ्यास करायला पाहिजे - आपल्याकडे सगळ्याच गोष्टींमध्ये इतकी विविधता आहे आणि एकमेकांमध्ये सौहार्द आहे की हा अभ्यास आपण नक्की करू शकतो.
का नाही करत आपण?
(लेखक मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष आणि विज्ञान प्रसारक आहेत.)
vinay.ramaraghunath@gmail.com