मंजील अभी दूर है...
By Admin | Updated: August 2, 2014 14:47 IST2014-08-02T14:47:09+5:302014-08-02T14:47:09+5:30
ऑलिम्पिक गाजवणारे अमेरिका, चीन, कोरिया, जर्मनी असे दिग्गज देश या राष्ट्रकुलमध्ये मोडत नाहीत. भारताची कामगिरी यात उंचावलेली दिसल्याने आनंद होणे स्वाभाविकच आहे, पण ऑलिम्पिकचे मोठे ध्येय गाठायचे, तर गुणवत्तेची आणखी मजल मारावीच लागेल.

मंजील अभी दूर है...
आनंद खरे
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर आता २0वी राष्ट्रकुल स्पर्धा होत आहे. खेळांच्या स्पर्धांचा विचार केल्यास ऑलिम्पिक ही सर्वात मोठी स्पर्धा होय. त्यानंतर आशियायी स्पर्धांचा क्रमांक लागतो आणि त्यानंतरची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धा (Commonwealth Games) होय. दि. २३ जुलै ते ३ ऑगस्ट २0१४ दरम्यान या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन स्कॉटलंड येथील ग्लास्गो शहरामध्ये करण्यात आले आहे. ऑलिम्पिक आणि आशियायी स्पर्धेप्रमाणेच या राष्ट्रकुल स्पर्धेचेही दर चार वर्षांनी आयोजन केले जाते. यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धा समितीने ठरवल्याप्रमाणे १0 अनिवार्य खेळ आणि त्यानंतर समितीने मान्य केलेले ७ ते ८ ऐच्छिक खेळ अशा १७-१८ खेळांचा समावेश असतो.
स्पर्धेचा इतिहास
या राष्ट्रकुल स्पर्धेलाही विश्वचषक फुटबॉल स्पर्धेप्रमाणेच ८४ वर्षांचा इतिहास आहे आणि विश्वचषक फुटबॉलप्रमाणेच या राष्ट्रकुल स्पर्धेलाही अधिकृतरीत्या १९३0 सालीच सुरुवात झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धा ही ७२ देशांपुरती र्मयादित आहे. इंग्लंडने ज्या देशांवर राज्य केले, त्या देशांसाठी ही स्पर्धा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या स्पर्धेला सुरुवात जरी १९३0 पासून झाली असली, तरी यामध्ये वेळोवेळी अनेक स्थित्यंतरे झालेली आहेत. १९३0 ते १९५0 या काळात या स्पर्धेला ब्रिटिश एम्पायर गेम्स असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर १९५४ ते १९६६ दरम्यान या स्पर्धेचे ब्रिटिश एम्पायर आणि कॉमनवेल्थ गेम्स असे नामकरण झाले, तर त्यानंतर १९७0 पासून याला कॉमनवेल्थ गेम्स (राष्ट्रकुल स्पर्धा) असे नाव देण्यात आलेले आहे.
तसे बघितले तर १८९१ साली जॉन कुपर यांनी अशा प्रकारच्या खेळांच्या स्पर्धेची कल्पना मांडली आणि त्यासाठी एक कमिटी तयार केली आणि ब्रिटनचे किंग जॉर्ज (पाचवे) यांचे नावाने १९११ मध्ये अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंगडम या चार देशांनी सहभाग घेतला. यामध्ये मुष्टियुद्ध (Boxing), कुस्ती (Wrestling), जलतरण (Swimming) आणि मैदानी स्पर्धा (Athlatics) या चार क्रीडा प्रकारांचा समावेश होता. मात्र, सन १९३0 पासून खर्या अर्थाने या राष्ट्रकुल स्पर्धेला नियमितपणे सुरुवात झाली.
आफ्रिकन देशांचा बहिष्कार
सन १९७८ च्या स्पर्धांवर नायजेरिया या आफ्रिकन देशाने बहिष्कार घातला होता, तर १९८६ च्या राष्ट्रकुल स्पर्धांवर पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ३२ आफ्रिकन देशांनी बहिष्कार घातला होता. हा अपवाद सोडला, तर १९९0 पासून बहुतेक सर्वच देश या स्पर्धेत सहभागी होत असतात.
आशियामध्ये आयोजन
१९९८ मध्ये आशियायी खंडामध्ये मलेशिया येथे क्वालालंपूर शहरामध्ये प्रथमच या १६व्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मलेशियातील या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण ७0 देशांच्या ३६00 खेळाडूंनी सहभाग घेतला होता, तर गेल्या वेळी सन २0१0 मध्ये भारतात दिल्ली येथे आयोजित केल्या गेलेल्या १९व्या राष्ट्रकुल स्पर्धेचे १७ वेगवेगळ्या क्रीडा प्रकाराचा समावेश होता आणि यामध्ये ७१ देशांच्या एकूण ६७00 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गेल्या वेळच्या दिल्ली येथील १९व्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १७७ पदकांची कमाई करत पहिले स्थान कायम सुवर्णपदक जास्त मिळवले असल्यामुळे इंग्लंडला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावं लागले होते. मागील स्पर्धेत यजमान असल्यामुळे भारताने सर्वच क्रीडा प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे भारताला आपला गतवेळचा दुसरा क्रमांक टिकवण्यासाठी चांगलाच जोर लावावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे कायमच वर्चस्व
राष्ट्रकुल स्पर्धेच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीवर नजर टाकल्यास या स्पर्धेवर कायमच ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखलेले आहे. आत्तापर्यंतच्या १९ राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाने १२ वेळा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे आणि या वेळच्या २0व्या स्पर्धेवरही ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे १९७८ पासून सुरू झालेल्या कॉमनवेल्थ नावाने सुरू झालेल्या आत्तापर्यंतच्या ९ स्पर्धांंपैकी ७ वेळा विजेतेपद मिळविले आहे अािण १९९0 पासूनच्या प्रत्येक स्पर्धेवर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व राहिलेले आहे आणि आता राष्ट्रकुल स्पर्धेचा विजेता हा ऑस्ट्रेलियाच असणार हेदेखील स्पष्टच आहे. त्यामुळे या स्पर्धेत दुसरा कोण एवढीच चर्चा कायम होताना दिसते.
भारताची कामगिरी चांगली; परंतु पहिल्या तीन क्रमांकासाठीची लढाई कठीण
गेल्या वेळची सन २0१0 ची १९वी राष्ट्रकुल स्पर्धा भारताने आयोजित केली होती आणि यजमान असल्यामुळे भारताने या स्पर्धेआधी चांगली तयारीही केली होती. शिवाय राष्ट्रकुल स्पर्धेच्या नियमाप्रमाणे १0 अनिवार्य खेळांव्यतिरिक्त ७ खेळ निवडण्याची मुभा यजमान भारताला असल्यामुळे भारताने आपल्याला चांगली संधी असणारे खेळ निवडले होते. तसेच यजमान असल्यामुळे जास्त खेळाडूही या स्पर्धेमध्ये सहभागी करता आले होते. या सर्वांचा परिपाक म्हणून भारताला दुसरा क्रमांक मिळविण्यासाठी या सर्व बाबींचा फायदा झाला होता. मात्र या वेळी तशी परिस्थिती नाही. गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत यजमान भारताने हमखास पदके मिळवून देणार्या आर्चरी आणि लॉन टेनिस या क्रीडा प्रकारांचा समावेश केला होता आणि अर्चरीमध्ये भारताला आठ पदके (३ सुवर्ण, १ रौप्य, ४ कांस्य) मिळाली होती, तर टेनिसमध्येही १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्यपदकांसह एकूण चार पदके मिळाली होती. तसेच अँथलेटिक्समध्येही भारताची चांगली कामगिरी करत २ सुवर्ण, ३ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह १२ पदकांची कमाई केली होती. या राष्ट्रकुल स्पर्धेत आर्चरी आणि टेनिस हे खेळ समाविष्ट नसल्यामुळे भारताचे नुकसान होणार आहे.
मैदानी प्रकारामध्ये कस लागणार
गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने अँथलेटिक्समध्ये १२ पदकांची कमाई करत चांगली कामगिरी केली होती. मात्र, या वेळी त्याच्या निम्मी पदके मिळाली तरीही चांगलेच समजावे. कारण छोट्या पल्ल्याच्या शर्यतीत भारताला पुरुष आणि महिलांमध्येही पदकांची आशा नाही. १00 मीटर आणि ४00 मीटर रिले प्रकारामध्ये एखाद्या पदकाची आशा आहे. मध्यम पल्ल्याच्या शर्यतीत टिंटू लुका ही पी. टी. उषाच्या अँकॅडमीमध्ये तयार झालेली खेळाडू ८00 मीटरमध्ये कांस्यपदकापर्यंंत मजल मारूशकते, इतकीच आशा आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत गेल्या वेळी कांस्य पदकांची कमाई करणार्या धावपटू कविता राऊतसह कोणीही सहभागी झालेलं नाही. त्यामुळे ५000 आणि १0000 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताची पाटी कोरीच राहणार हे निश्चित. थाळी फेकमध्ये भारताच्या विकास गौडकडून मागील स्पर्धेप्रमाणे पदकाची आशा आहे, तसेच थाळीफेकमध्ये गेल्या राष्ट्रकुलमध्ये भारताच्या कृष्णा पुनीया, सीमा अंतील आणि राजबीर कौर यांनी पहिले तीन क्रमांक मिळवून इतिहास रचला होता, तशीच अपेक्षा या वेळीही कृष्णा पुनीया आणि सीमा अंतील यांचेकडून पुन्हा केली जात आहे.
बॅडमिंटन व हॉकीमध्ये पदकांची आशा
गेल्या राष्ट्रकुलमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताने ४ पदके मिळवली होती. मात्र, या वेळी भारताची शटल क्वीन सायना नेहवाल दुखापतीमुळे खेळत नाही, त्यामुळे पी. व्ही. सिंधू आणि परुपल्ली कश्यपकडून एकेरीत तर ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांचेकडून दुहेरीमध्ये पदकांची आशा आहे. मिश्र सांघिक स्पर्धेत मात्र भारताला पदक मिळवता आले नाही, ही बॅडमिंटनसाठी विचार करण्यासारखी बाब आहे.
हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि भारताने एकेकाळी या खेळाच्या माध्यमातून जगावर राज्य केले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक असो वा हॉकी याच्या कोणत्याही स्पर्धेत भारताच्या संघाकडून अपेक्षा बाळगल्या जातातच. सध्या भारताचे हॉकीमधील स्थान हे ९वे, १0वे आहे आणि या स्पर्धेमध्ये हॉकीमधील नंबर १ चा ऑस्ट्रेलिया वगळता र्जमनी, हॉलंड आणि आशियाचे कोरिया, पाकिस्तान हे संघ नसल्यामुळे भारताने निदान ऑस्ट्रेलियाखालोखाल दुसरा क्रमांक मिळवावा, ही अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी भारताला आपल्या गटामध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल आणि त्यानंतरही उपांत्य सामन्यामध्ये इंग्लंड अथवा न्यूझीलंड यापैकी एकाला हरवावे लागेल, तरच भारताचा किमान दुसरा नंबर मिळेल. महिलांमध्ये न्यूझीलंडने पराभूत केल्यामुळे त्रिनिदादसारख्या संघावर १२ गोल करूनही फारसा उपयोग होणार नाही. महिलांनाही दक्षिण आफ्रिकेला पराभूत करूनच बाद फेरीत प्रवेश मिळू शकतो, अन्यथा महिलांना बाद फेरी गाठणेही अवघड आहे. टेबल टेनिसमध्ये सांघिक प्रकारामध्ये पुरुष आणि महिला या दोघांनाही कांस्यपदकाच्या शर्यतीत पराभूत व्हावे लागल्यामुळे पदक मिळाले नाही. वैयक्तिक स्पर्धेत शरथ कमलकडून पदकाची आशा करायला हरकत नाही.
भारताने अव्वल येण्यासाठी प्रयत्न करावेत
खरंतर ऑलिम्पिक गाजवणारे अमेरिका, चीन, कोरिया, र्जमनी असे दिग्गज देश या राष्ट्रकुलमध्ये मोडत नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन देश खर्या अर्थाने जागतिक स्तरावर पुढारलेले आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणामध्ये आफ्रिकन देशांचा सहभाग असला, तरीही या सर्व देशांची आर्थिक स्थिती लक्षात घेता, हे आफ्रिकन देश नेमबाजीसारख्या प्रकारामध्ये अद्यापही मागेच आहेत, तर कुस्तीमध्ये इराण, रशियासारखे देशही या स्पर्धेमध्ये नाहीत. अँथलेटिक्समध्ये केनिया, जमैकासारखे आफ्रिकन देश गेल्या काही वर्षांंत प्रगती दाखवत आहेत. या स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व राखणारा ऑस्ट्रेलियादेखील आपले सर्वच चांगल्या दर्जाचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी करताना दिसत नाही आणि तरीदेखील ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी ही कायमच आहे; म्हणूनच भारताने या स्पर्धेमध्ये चौथ्या, पाचव्या क्रमांकावर खूष न राहता यामध्ये अव्वल येण्यासाठीचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, हीच अपेक्षा.
ने म बा जी, कु स्ती, वे ट लि फ्टिं ग, बॉ क्सिं ग, ज्यु दो म ध्ये स र स का म गि री
गेल्या १0-१२ वर्षांंच्या भारताच्या क्रीडास्पर्धांंमधील प्रगतीमध्ये नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये भारताने राष्ट्रकुल आणि आशियायी स्पर्धांंमध्ये तर चांगली कामगिरी केलेलीच आहे; परंतु त्यापेक्षाही पुढे जात थेट ऑलिम्पिकमध्येही भारताच्या खेळाडूंनी आपला तिरंगा फडकावण्याची मोठी कामगिरी केलेली आहे. भारताच्या कुंजुराणी आणि राजवर्धन राठोड यांनी भारतासाठी दुर्मीळ असणार्या ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालून भारतीयांमध्ये विश्वास निर्माण केला, तर २00८ च्या बीजिंगमधील ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अभिनव बिंद्राने थेट सुवर्णपदकालाच गवसणी घातली आणि त्यानंतर कुस्तीमध्ये सुशीलकुमारने लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई केली, तर त्याचाच सहकारी योगेश्वर दत्तनेही त्यामध्ये भर घातली.
बिंद्रानंतर गगन नारंग, विजयकुमार, यांनीही ऑलिम्पिकचे पदक आवाक्यात आणले, तर जागतिक स्तरावर आयोजित नेमबाजीच्या विश्वस्पर्धांंमध्ये हिना सिद्धू, राही सरनोबत, अनीशा सय्यद, तेजस्विनी सावंत आणि इतरही नेमबाजांनी चांगलाच दबदबा निर्माण केलेला आहे. या पार्श्वभूमीवर या राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्ती, नेमबाजी आणि बॉक्सिंग यामधील कामगिरी ही अपेक्षितच धरावी लागेल. या राष्ट्रकुल स्पर्धेतही कुस्तीमध्ये सुशीलकुमारबरोबरच अमीतकुमारनेही ५७ किलो वजन गटात सुवर्णपदकाची कामगिरी केली, तर राजीव तोमरने रौप्यपदक पटकावले. ऑलिम्पिक पदकविजेता योगेश्वर दत्तकडूनही तीच अपेक्षा आहे. भारतीय महिला कुस्तीपटू दिनीशा पोगटने इंग्लंडच्या रिटीगेला पराभूत करून सुवर्ण कामगिरी केली, तर ललिता, बबीताकुमारी, गीतीका जाखड, नवज्योत कौर यांच्याकडूनही पदकांची आशा आहेच. नेमबाजीमध्ये अपेक्षेप्रमाणे अभिनय बिंद्राने सुवर्णपदकाला गवसणी घालून चांगली सुरुवात केली आणि त्याचीच री ओढत मग जितु रॉय, अपूर्वा चंडेल, राही सरनोबत यांनीही सोन्यालाच गवसणी घातली. ऑलिम्पिक विजेता विजयकुमारला अंतिम फेरी गाठता आली नाही; मात्र गगन नारंग, संजीव राजपूत, प्रकाश नांजप्पा, गुरप्रित सिंग, हरप्रित सिंग, आयोनीका पाल, मलाईका गोयल, श्रेयसी सिंग, अनिसा सय्यद यांनी रजत पदकाची कमाई केली, तर गगन नारंग, मानवजितसिंग संधू, मोहमद असाब, लज्जा गोस्वामी यांनी कांस्यपदकाची कमाई केली.
वेटलिफ्टिंगमधील भारताची कामगिरी फारच वाखाणण्याजोगी आहे. कारण मागील काही वर्षांंमध्ये भारताच्या या खेळाकडे संशयाने पाहिले जात होते. डोपिंगमुळे या खेळाच्या भारतीय संघटनेवर बंदीही होती आणि त्यासाठी त्यांना आर्थिक दंडही भरावा लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या वेटलिफ्टर्सनी केलेली १0 पदकांची कमाई ही बोलकी म्हणावी लागेल. सुखेन डे, सतीश शिवलिंगम, कुमकुम संजिता चानू, यांचे सुवर्ण, रविकुमार, विकास ठाकूर, मीराबाई चानू यांचे रौप्य आणि गणेश माळी, ओंकार ओतारी, चंद्रकांत माळी, संतोषी मत्सा, पूनम यादव यांचे कांस्य यामुळे भारताच्या वेटलिफ्टिंगमध्ये नवसंजीवनी संचारली आहे, असेच म्हणावे लागेल. ज्युदो या प्रकाराच्या समावेशामुळे भारताच्या ज्युदोकांना आपलं कसब दाखविण्याची चांगली संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा घेत भारताच्या नवज्योत चाना आणि सुशीला लुकाबीन यांनी रजत पदकांची कमाई केली, तर राजबीर कौरने कांस्यपदक जिंकले.
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत.)