पराक्रम मैदानाावरचा

By Admin | Updated: September 6, 2014 14:52 IST2014-09-06T14:52:02+5:302014-09-06T14:52:02+5:30

खेळात काय किंवा अभ्यासात काय, एकाग्रता महत्त्वाची असते. आजूबाजूला मोहाच्या अनेक गोष्टी असतात, कधी कधी काही घटना मन:स्वास्थ्य खराब करतात, अशा वेळीसुद्धा एकाग्रता साधता आली पाहिजे. मग यश आपोआप मागे येते.

The Field of Plenty | पराक्रम मैदानाावरचा

पराक्रम मैदानाावरचा

 भीष्मराज बाम

 
प्रश्न :- भारतीय क्रिकेट संघ कसोटी क्रिकेट चांगले का खेळू शकत नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवणारे भारतीय खेळाडू कसोटी सामने इतके खराब का खेळले. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेम प्रकरणाचा हा परिणाम असावा का?
क्रिकेटचा खेळ पूर्वी खेळाडूंच्या कौशल्यासाठी खेळला जात असे. पैसे फारसे मिळत नसले, तरी खेळाडू मनापासून खेळत. पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीची गरज असते. खेळपट्टीवर टिकून राहणे, सामना जिंकता येत नसला, तर बरोबरीत सोडवणे, हेसुद्धा पराक्रम मानले जात. पण, आता पैसा हवा आहे. त्यासाठी प्रेक्षकांना आकर्षित करणे अवश्य असते. प्रेक्षकांना पाच दिवसांचे सामने बघत बसायला वेळ नाही आणि नुसते चेंडू अडवत बसणे पाहायला तर त्यांना मुळीच आवडत नाही, म्हणून तर र्मयादित षटकांचे सामने शोधून काढले गेले. फलंदाजांचे चौकार आणि षटकार प्रेक्षक खेचून आणू शकतात, पण गोलंदाजी चांगली पडायला लागली तर हे जमत नाही. मग खेळाचे नियमच बदलून टाकले. लेग साईडला चेंडू टाकला की तो वाइड ठरवला गेला. बम्पर टाकणेसुद्धा बाद ठरले. नो बॉलसाठी आधी फक्त एक रन विरुद्ध बाजूला मिळे. आता पुढल्या चेंडूला काहीही झाले, तरी विकेट पडत नाही म्हणजे तो चेंडू चोपून काढण्याची फलंदाजाला संधी. क्षेत्ररक्षणाचे नियमही बदलून टाकले. हे सारे फलंदाजाच्या सोयीसाठी. बिचार्‍या गोलंदाजाला चार किंवा दहा षटकेच टाकायला मिळणार. मग त्याचे कौशल्य विकसित कसे होणार?
भारतीय लोकांना आधीच क्रिकेटचे वेड होते. र्मयादित षटकांच्या सामन्यात धावांचा पाऊस पडायला लागल्यावर तर त्यांचे भानच हरपले. त्यातून सचिन, सौरव, सेहवाग, धोनी या सार्‍या भारतीय खेळाडूंनी र्मयादित षटकांच्या क्रिकेटशी जमवून घेतले आणि भारतीय संघ जिंकायला लागला. मग तर विचारायलाच नको, अशी गर्दी प्रेक्षक करायला लागले. आयपीएल लीगचे सामने सुरू झाले आणि त्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पैशांचा पाऊसच पडायला लागला. असे झाल्यावर प्रेक्षकांनी नाकारलेल्या कसोटी क्रिकेटकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे? ज्या त्या देशातल्या खेळपट्ट्या त्या-त्या देशातल्या खेळाडूंच्या सवयीच्या असतात. मग त्या आणखी अनुकूल बनवून घेऊन इथले सामने जिंकण्याची सोय करून ठेवली गेली. तीसुद्धा तज्ज्ञ मंडळींनी आरडाओरडा केला म्हणून! असेही भारतीय खेळाडूंचे कसोटी क्रिकेटमध्ये परदेशी पट्ट्यांवर नांगी टाकणे काही नवीन नाही. पण, या वेळी इंग्लंडमध्ये फारच दयनीय अवस्था झाली. एक कसोटी जिंकल्यामुळे चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण लगेच अतिशय खराब खेळ करून आपल्या खेळाडूंनी आपला कसोटी दर्जा काय आहे, त्याची जाणीव करून दिली. कसोटी सामने संपल्यावर लगेच फलंदाजांना सोयीस्कर बनवलेला र्मयादित षटकांचा खेळ सुरू झाला. मग मात्र भारतीय खेळाडू शेर झाले.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेमप्रकरणाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. ते साहजिकच होते; कारण दोघंही ग्लॅमर वर्ल्डमध्ये गाजलेली. त्यातून लग्नाशिवाय एकत्र राहात असल्याने भारतीय लोकांना नवलाची गोष्ट. विराटला बीसीसीआयने अनुष्काला सोबत नेण्याची अधिकृत परवानगी दिलेली होती. त्यावरही चांगलाच ओरडा झाला. दोघांची एकत्र फिरत असल्याची बरीच छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. मला एका पत्रकाराने विचारले, की ती सोबत असल्यामुळे विराटचा खेळ इतका खराब झाला असावा, असे तुम्हाला वाटते का? त्यावर माझे उत्तर असे होते, की अनुष्का शर्मा भारतात राहूनसुद्धा विराटचाच नव्हे, तर भारतीय संघाचा खेळ बिघडवू शकते. त्यासाठी तिला इंग्लंडला जाण्याची गरज नाही.
स्पर्धात्मक खेळाची खेळाडूंची कारकीर्द फार थोड्या कालावधीची असते. १८ ते ३६ या वयात त्यांना आपला पराक्रम गाजवून दाखवावा लागतो. स्त्रीसहवासाची ओढ या वयात सर्वांत जास्त असते. तशीच समृद्धीची आणि प्रसिद्धीचीही ओढ सर्वांत बलवान असते. आतापर्यंत जेवढे मोठे खेळाडू झाले त्या सर्वांनी पराक्रम करून आपापली कारकीर्द गाजवलीच, पण त्याच वयात प्रसिद्धी आणि समृद्धीही कमावून दाखवली. त्यांचे विवाह झाले, त्यांना मुले झाली, संसार झाले. बर्‍याच जणांची लफडीसुद्धा खूप गाजली. पण क्रीडांगणावर त्यांनी जे पराक्रम केले त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले. क्रीडांगणावर उतरले, की इतर सारे विसरून जाऊन फक्त खेळावर एकाग्र होता आले पाहिजे, तरच उत्तम कारकीर्द करता येईल.
क्रिकेटच्या खेळात तर फार वरच्या दर्जाची एकाग्रता लागते. कारण फलंदाजाची एक चूकसुद्धा त्याचा डाव संपवून टाकते. पुढला चेंडूच त्याच्या वाट्याला येत नाही. ही एकाग्रता विराट कोहलीजवळ निश्‍चितच आहे. नाहीतर तो या दर्जाला पोहोचूच शकला नसता. पण, ती सतत जोपासून वाढती ठेवावी लागते. इंग्लंडच्या या दौर्‍यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्‍वर कुमार या तिघांनीच वरच्या दर्जाच्या एकाग्रतेचे प्रदर्शन करून कोणत्याही प्रकाराशी आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन चांगले खेळता येते, हे दाखवून दिले आहे. इतर सर्व खेळाडूंनी त्यांचा कित्ता गिरवायला हवा. याकरिता क्रिकेटच्या खेळाशी, ज्या खेळाने त्यांना इतके काही दिले त्याच्याशी पक्की निष्ठा असायला हवी. म्हणजे मग मैदानाबाहेरच्या गोष्टी मनाला त्रास देत नाहीत आणि उत्कृष्ट खेळ करता येतो.
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: The Field of Plenty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.