अंधार हेच हत्यार!- अमोल पालेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 06:05 IST2019-02-03T06:04:00+5:302019-02-03T06:05:10+5:30

कसल्याही आधाराविना इतिहासामध्ये बदल करण्यापासून ते अवमानकारक मिथकं आणि असत्यं पसरवण्यापर्यंत बौद्धिक हननाची विविध रूपं आज सर्वत्र दिसत आहेत. अंधार गडद करण्यासाठी डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या जात आहेत. अशा वेळी आपण जास्तीत जास्त जागरूक राहायला हवं.

Eminent actor-director Amol palekar's views on current era.. | अंधार हेच हत्यार!- अमोल पालेकर

अंधार हेच हत्यार!- अमोल पालेकर

ठळक मुद्देअंधारनीतीचा भेद करणं आपल्या हातात आहे. आज त्यासाठी एकत्र येणं आपल्या हातात आहे.

अमोल पालेकर
‘‘रात्र जशी कधी एका क्षणात येत नाही, तशीच दडपशाहीसुद्धा हळूहळू पसरत जाते. दोन्ही घटनांमध्ये सामायिक असतो एक संध्याकाल, जेव्हा सर्वकाही अचल असतं ! आणि त्याच काळी हवेतल्या बदलाची चाहूल घेत आपण जास्तीत जास्त जागरूक असलं पाहिजे. नाहीतर एखाद्या बेसावध क्षणी आपण अंधाराचे बळी होऊन जाऊ.’’
- न्यायमूर्ती विलियम डग्लस यांनी शतकापूर्वी हे सांगूनसुद्धा २०१४ आधीचा संध्याकाल ओळखायला आपण चुकलो होतो. परिणामी आज आपण अंधाराचे बळी झालेलो आहोत. दहशतवादाच्या विळख्यात सापडलेलो आहोतच !
अंधार राज्यात अज्ञानाचं राज्य नसेल तरच नवल ! हजारो वर्षांपूर्वी आपण एका हत्तीचं डोकं एका मनुष्याच्या धडाला जोडलं, याचा अर्थ आपल्याकडे प्लॅस्टिक सर्जरी हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे; मोर संभोग करत नाहीत तर ते अश्रूंद्वारे प्रजनन करतात, माकडाचे मानवात रूपांतर झाले नाही कारण आपल्या आजी-आजोबांनी अशी गोष्ट सांगितली नाही, ए= ेू2 पेक्षा अधिक चांगले सिद्धांत वेदांमध्ये आहेत असा विश्वास स्टीफन हॉकिंग यांना होता, इ.इ. अज्ञानाचा अखंड मारा आपल्यावर चालू आहे.
कसल्याही आधाराविना इतिहासामध्ये बदल करण्यापासून ते अवमानकारक मिथके आणि असत्ये पसरवण्यापर्यंत या बौद्धिक हननाची विविध रूपं सर्वत्र दिसत आहेत. टाटा सामाजिक संस्थेत दलित-ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद झाली, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाविरुद्ध हल्ले सुरू झाले, मराठी शिकविणाऱ्या शाळा बंद होत आहेत. थोडक्यात काय तर अंधार गडद करण्यासाठी डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या जात आहेत. जे त्या पट्ट्या दूर करू बघत होते अशा विचारवंतांच्या हत्या झाल्या आणि त्याचा आजही तपास लागत नाही, लेखकांना निर्भयपणे लिहिता येत नाही, कवींना पोलीस संरक्षण दिले जाते, कार्यकर्त्यांवर नक्षली असल्याचे आरोप ठेवून तुरुंगात टाकले जाते. दहशत राखण्यासाठी अंधाराची गरज असतेच. म्हणूनच अंधार हे राजकीय हत्यार आहे जे पद्धतशीरपणे आपल्यावर सातत्याने चालवलं जात आहे.
डॉ. अमर्त्य सेन यांनी ‘डेव्हलपमेंट अ‍ॅज फ्रीडम’ असं म्हणून सुमारे दोन दशके उलटून गेली. ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारखे राजकीय हक्क, आर्थिक गरजांचे सामाजिक भान वाढवण्यासाठी केवळ महत्त्वाचे नाहीत तर ते आर्थिक गरजांचे निकष ठरवण्यासाठी आवश्यक असतात.’’ या मांडणीतले गांभीर्य आपण ओळखले नाही. सेन्सॉरशिपचा, दहशतीचा नवीन चेहरा आपण वेळेवर ओळखला नाही. सामाजिक काम करणाºया एनजीओंची नोंदणी रद्द करून त्यांचं अस्तित्वच संपवणं, विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचे खटले भरले जाणं, स्वतंत्र माध्यमांच्या मालकांवर आर्थिक दंडात्मक कारवाई करणं, ही सगळी अंधारनीतीची हत्यारं आहेत.
व्यक्ती आणि समूहाच्या विचारांना प्रतिबंधित करत जनमत नियंत्रित केलं नाही तर अंधार पसरणार कसा? राजकीय आणि सांस्कृतिक दहशतीचा हा नवा अवतार आहे. रोजच्या जीवनातली उदाहरणं घेऊन राष्ट्रवादाचे धर्माष्ठाधित राष्ट्रनिर्मितीचे वेगवेगळे पैलू किंवा प्रतीकं सार्वत्रिक करणं, उदाहरणार्थ राष्ट्रगीत, झेंडे, गोमाता, सणांचे स्तोम, भव्य पुतळे, जाहिराती आणि फलक ही सगळी प्रतीकं सांस्कृतिक हिंसा समाजाच्या अंगवळणी पाडून गळी उतरवण्यासाठी वापरली जात आहेत. ती हिंसा उघड होऊ नये म्हणून परिस्थितीला धूसर ठेवायचं. याविरुद्ध जरा ब्र काढला तर तुम्ही अर्बन नक्षल ठरवले जाता. तुमच्यावर अदृश्य फौजांचे हल्ले सुरू होतात..
२०१७च्या ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’च्या अहवालात ‘देशामध्ये लोकांना किती स्वातंत्र्य आहे’, या निकषावर भारताला १३६व्या क्रमांकावर ठेवले गेले. हे दारुण आहे.
मुद्दा असा आहे, पुढे काय?
पुढे २०१९च्या निवडणुका आहेत; निवडणुकीत मतदान करणं आपल्या हातात आहे, तेव्हा कोणाला मतदान करायचं आणि ती निवड करताना डोळे उघडे ठेवणं आपल्या हातात आहे; खोट्या प्रचारामागच्या अंतस्थ हेतूंना समजून घेणं आपल्या हातात आहे; अंधारनीतीचा भेद करणं आपल्या हातात आहे. आज त्यासाठी एकत्र येणं आपल्या हातात आहे.

(ख्यातनाम अभिनेते आणि सजग भाष्यकार)
(महाराष्ट्र फाउण्डेशनच्या पंचविसाव्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात केलेल्या भाषणाचा संपादित अंश)

Web Title: Eminent actor-director Amol palekar's views on current era..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.