अहंकार येतो यशाच्या आड
By Admin | Updated: August 23, 2014 13:51 IST2014-08-23T13:51:51+5:302014-08-23T13:51:51+5:30
कोणत्याही स्पर्धेत जिंकणे महत्त्वाचे असतेच. मात्र, फक्त त्यालाच महत्त्व दिले, की त्या स्पर्धकाचा प्रवास अपयशाकडे वेगाने सुरू होतो. मी सर्वश्रेष्ठ आहे, अशी भावना त्याच्यात वाढीला लागते. कौशल्यांचा विकास करणे बाजूलाच, त्याला त्यांचा विसरच पडतो. अहंकार त्याच्यावर वर्चस्व मिळवतो व त्याचा पराभव घडवतो. असे होऊ नये यासाठी अहंकारावर ताबा मिळवणे शिकले पाहिजे.

अहंकार येतो यशाच्या आड
भीष्मराज बाम
प्रश्न : स्पर्धा म्हणजे स्वत:ला विसरणे असे तुमचे मत आहे का?
हा प्रश्न स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या एका उत्तम खेळाडूने विचारलेला आहे. याचे उत्तर अर्थातच हो आणि नाही असे दोन्ही आहे. अशी कल्पना करा, की तुम्ही पुणे किंवा मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात आहात. दोन-तीन किलोमीटर दूर असलेल्या एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे आणि तुम्ही जायला निघाला आहात. तुमच्या घरासमोरचा रस्ता ओलांडताना जिथे पोहोचायचे आहे, तिथला विचार तुम्ही करता आहात. ते अगदी शेवटचे वळण तुमच्या नजरेसमोर येते आहे. तुम्ही असे होऊ दिलेत तर लगेच अपघात होण्याचा धोका आहे. अध्र्या वाटेवर तुम्ही पोहोचला असाल आणि तुमच्या घराजवळची वळणे तुम्ही आठवत राहिलात तरी धोका तसाच असेल. अगदी ते शेवटचे महत्त्वाचे वळण आलेले असतानासुद्धा तुम्हाला त्या जागी काय चाललेले आहे त्याचा किंवा आताच घेतलेल्या वळणाचाही विचार करणे धोक्याचेच आहे. असे करत राहिलात तर तुम्ही अपघाताला निमंत्रण देत असता. याचा अर्थ असा, की तुम्ही कोण आहात, कोठे आहात आणि काय करता आहात याचे भान साधे रस्त्यावरून चालतानाही सतत ठेवावे लागते. मग वाहतुकीने गजबजलेल्या रस्त्याची गोष्टच निराळी. तिथे तर प्रत्येक क्षणाला सावध एकाग्रता आवश्यक असते.
स्पर्धांचेही असेच असते. स्पर्धेला सुरुवात करतानाच आपले अवधान शेवटी काय होणार याच्यावर असते. सुरुवात झाल्यावर आपली कामगिरी आतापर्यंत कशी झाली यावर अवधान राहायला लागते. नंतर आता काय होणार इकडे लक्ष जायला लागते. मुख्य मुद्दा हा की आपल्याला जिंकायचे असते. भाग घेताना आपले ध्येय हेच असते. ‘मी’ सर्वांत श्रेष्ठ आहे, हे सिद्ध करायची ती संधी असते. हा जो ‘मी’ आहे, त्यालाच स्पर्धा जिंकल्यावर सर्वांत जास्त आनंद होणार असतो. मग त्याला विसरून कसे चालेल? ज्याला आपली श्रेष्ठता सिद्ध करायची जास्त ओढ आहे, तोच आपल्या उत्तम कामगिरीच्या आड यायला लागतो. कारण त्याला जिंकण्याचे स्वप्न पाहायची सवय असते. प्रत्येक क्षणाला त्याची ओढ आपण जिंकतो आहोत की नाही ते तपासून पाहण्याकडे जायला लागते. काय झाले ते फार महत्त्वाचे वाटायला लागते. तेवढेच महत्त्व काय होणार आहे त्यालासुद्धा द्यायला हवे असे वाटत राहते. मग काय होते आहे त्याचे अवधान सुटते. असे झाले की कामगिरीचा दर्जा एकदम घसरतो. इंग्लंडमध्ये खेळत असलेल्या भारतीय क्रिकेट टीमने या मुद्दय़ाचे प्रात्यक्षिकच करून दाखवले.
महेंद्रसिंह धोनीची टीम आतापर्यंत भारताकडून खेळलेल्या सर्वोत्तम टीमपैकी एक आहे. त्यांनी देशात आणि परदेशातही हे सिद्ध करून दिलेले आहे. आणि त्यांनी बर्याच काळानंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकूनही दाखवला. लगेच लागोपाठच्या दोन सामन्यांत त्याच टीमने इतका भिकार खेळ केला, की एखाद्या शाळेचा संघसुद्धा त्यांच्यापेक्षा चांगला खेळू शकला असता असे वाटावे. शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली हे नवे खेळाडू उत्तम खेळून धावा काढायला लागले, तेव्हा असे वाटले की आता भारतीय संघ येती काही वर्षे शिखरावर राहील; पण एका दौर्यातच हा भ्रमाचा भोपळा फुटला. गौतम गंभीरही स्थानिक सामन्यात सातत्याने धावा काढून संघात परत आला होता. इंग्लंडमधल्या धावपट्टीशी जमवून घेऊन बर्यापैकी धावा काढणे धोनीला आणि गोलंदाज म्हणून आलेल्या भुवनेश्वर कुमारलासुद्धा साधले. तेच जागतिक कीर्ती मिळवलेल्या या फलंदाजांना जमले नाही, दोन अंकी धावसंख्यासुद्धा गाठताना त्यांच्या नाकी नऊ आले. याचाच अर्थ हा, की येणार्या चेंडूवर त्यांना लक्ष एकाग्र करणे अशक्य झाले. मला काही पत्रकारांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले. आता त्या खेळाडूंनी काय करायला हवे हा त्याचा मुद्दा.
सार्याच स्पर्धांमध्ये खरी कसोटी असते, ती ज्ञानाची आणि कौशल्याची. पण आपला अहंकार गैरसमज करून घेतो की तो अजिंक्य ठरतो आहे. साहजिकच लक्ष मिळणार्या बक्षिसावर केंद्रित होत राहते आणि ते तर सारखे हातातून निसटतच राहते. मग तो अनुभवच आपला आत्मविश्वास खच्ची करून टाकायला लागतो. हे समजले तरी उमजत नाही. पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर टिकून राहणे महत्त्वाचे. सामना जिंकला नाही तरी चालेल; पण तो बरोबरीत तरी संपवायचा. खेळपट्टी कशीही असली, गोलंदाजी कितीही चांगली पडत असली तरी खेळतच राहायचे, आपल्या संघाची हार होऊ द्यायची नाही हे साधण्यासाठी आपल्या अहंकाराला मुरड घालावी लागते. संथ धावगतीबद्दल सचिन तेंडुलकरवर आणि राहुल द्रविडवर चाहत्यांनी अनेक वेळा कठोर टीका केलेली आहे. पण ती मनावर न घेता त्यांनी संघासाठी खेळ करण्याचे भान ठेवेलेले होते. म्हणूनच त्यांची उणीव आता प्रकर्षाने जाणवते आहे.
अहंकार जाता जात नाही म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणत असत, की त्याला दास बनवून टाकायचे. त्यांना अभिप्रेत होते ईश्वराचा दास. तुम्हाला ईश्वराचा दास होणे मान्य नसले तर स्वत:च्या ज्ञानाचे आणि कौशल्याचे दास तरी बनता यायला हवे. मग कामगिरी उत्तम व्हायला लागते. अहंकारच आपल्याला स्पर्धेत उतरायला भरीला पाडत असतो. पण, प्रत्यक्ष स्पर्धेत त्याची आपल्यावरची पकड निर्बल करून ज्ञानाला आणि कौशल्याला प्राधान्य द्यायचे. हेच स्वत:ला विसरणे आहे. त्याला पर्यायच नाही. हे जर साधले तर आताचा भारतीय संघसुद्धा उत्तम कामगिरी करून दाखवू शकेल.
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)