मुलांचा प्रोजेक्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 06:05 IST2019-06-23T06:05:00+5:302019-06-23T06:05:09+5:30

सुट्टी लागायच्या आधी मुलांनी स्वत:हून एक फॉर्म तयार केला होता. पालकांकडून तो भरून घ्यायचा होता; पण एकाही पालकानं तो भरून दिला नाही. पहिल्या दिवशी मुलं शाळेत आली तीच  रडवेली होऊन! मुलांना विचारल्यावर त्यांनी त्यांचा फॉर्म शिक्षकांना दिला. तो वाचल्यावर शिक्षकही अवाक् झाले! मुलांचं त्यांनी कौतुक केलं आणि  आपलीही चूक सुधारली!

Dream project by Children.. | मुलांचा प्रोजेक्ट!

मुलांचा प्रोजेक्ट!

ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘तुझे अण्णा काय म्हणाले?’
घालवून दिलं त्यांनी मला.. म्हणाले, ‘शाळेनं करायला सांगितलंय का?’ 
मी नाही म्हणालो. 
मग ते म्हणाले, तुला कोणी आगाऊपणा करायला सांगितला?
‘मी आईला विचारलं तर ती म्हणाली शाळेचे कागद वडिलांना दाखवायचे. मला घरचीच कामं आवरेना झालीयेत.’ 
आता माझे वडील कसे आहेत तुला माहितीये. त्यांच्याकडे कोण जाईल? 
‘पक्याकडे काय झालं?’
‘त्याच्या आईने सांगितलं, तुला काय पाहिजे ते लिहून घे, मी आंगठा देते. त्याने सांगितलं की हे शाळेतून करायला सांगितलेलं नाहीये. तर ती म्हणाली, मग कशाला वाढवा काम करतोयस? तुला येवढा टाइम आसल तर गुरांमागं जा. त्याला दिल्या त्यांच्या दोन म्हशी चारायला.’
‘अरे काय यार हे? कोणीतरी घरून फॉर्म भरून आणला का नाही?’
‘मला तर नाही दिला.’
‘मलापण नाही दिला..’
पांगरीच्या आर्शमशाळेच्या दारात पहिल्या दिवशी मुलं भेटली तेव्हा मित्न-मैत्रिणींना भेटणं, कोणी सुटीत काय केलं, कोण कुठे लग्नाला गेलं असल्या गप्पा चालल्या होत्या. त्यामध्ये आता पाचवीतून सहावीत गेलेल्या मुला-मुलींचा घोळका एका बाजूला उभा राहून चर्चा करत होता. आणि त्यातले सगळे जण नाराज होते. त्यांनी सु्टी लागायच्या आधी घरच्यांकडून भरून आणायला एक फॉर्म तयार केला होता आणि तो कोणाच्याच घरच्यांनी भरून दिला नव्हता. त्यामुळे सगळेच जण वर्गात गेले तेव्हा नाराज आणि गप्प गप्प होते. शाळेतल्या विद्यार्थ्यांचे सगळ्यात लाडके सर वर्गावर आले तरी मुलांनी अपेक्षेइतका आरडाओरडा केला नाही. तेव्हाच सरांच्या लक्षात आलं की मुलांचं काहीतरी बिनसलंय. पण सगळ्याच्या सगळ्या 40 मुलांचं काय बिनसलं असेल ते काही त्यांच्या लक्षात येईना.
शेवटी न राहवून त्यांनी मुलांना विचारलंच, की तुम्ही सगळे असे गप्प गप्प का? काय झालंय? तर सगळी मुलं एकमेकांकडे बघायला लागली. काय सांगणार होती बिचारी? त्यांनी पाचवी संपताना खूप विचार करून एक फॉर्म बनवला होता. तो त्यांना घरच्या लोकांकडून भरून घ्यायचा होता. ते सगळे भरलेले फॉर्म्स एकत्न करून त्यांचा एक छान प्रकल्प करायचा होता. आणि मग तो प्रकल्प दाखवून याच सरांकडून रुबाबात सगळ्या शाळेसमोर शाब्बासकी मिळवायची होती. आता काय सांगणार?. घरच्यांनी आम्हाला एक छोटासा फॉर्मसुद्धा भरून दिला नाही असं?
पण त्यांचे सर होतेच इतके लाडके की त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देणंसुद्धा त्यांना पटेना. शेवटी सरांनी चारचारदा विचारल्यावर प्रियांका मुसमुसत म्हणाली,
‘आम्ही आधी येऊन तुम्हालाच दाखवणार होतो. पण आता आमच्याकडे काही नाहीच्चे दाखवायला.’
‘हो ना सर..’
एकदा बांध फुटल्यावर सगळा वर्ग एकदम बोलायला लागला. त्यातून सरांच्या लक्षात आलं की आईवडिलांनी कसलातरी फॉर्म भरून दिला नाही म्हणून मुलं रु सली आहेत. ते म्हणाले,
‘एवढंच ना? एक काम करा, तुमचा काय फॉर्म आहे तो आम्ही शिक्षक भरून देतो. नाहीतरी निवासी आर्शमशाळेत आम्ही शिक्षकच तर तुमचे आईवडील होऊन जातो. मग तुमचा फॉर्मपण भरून देऊ.’
हे ऐकल्यावर मुलांचे चेहरे एकदम उजळले आणि मग मात्न वर्गात एकदम आरडाओरडा सुरू झाला.
‘खरंच सर?’
‘मी देऊ फॉर्म?’
‘नाही मी देणार!’
‘सर माझा फॉर्म भरा. मी लै भारी बनवलाय..’
‘अरे हो हो..’ सरांनी कसंबसं मुलांना शांत केलं. मग म्हणाले, ‘तुम्ही सगळे जण तुमचे फॉर्म आमच्याकडे द्या. आम्ही सगळे शिक्षक तो फॉर्म भरून देऊ. प्रत्येकाचा फॉर्म एकसारखाच आहे का वेगवेगळा आहे?’
‘एकसारखाच आहे सर.’
‘आम्हाला ना, पाहणी करायची होती.’
असं म्हणत सगळ्या मुलांनी आपापले फॉर्म्स सरांच्या टेबलवार नेऊन ठेवले. काही फॉर्म्स वहीच्या पाठकोर्‍या कागदावर लिहिलेले होते, काही छान रेषा मारून नीटनेटके लिहिलेले होते. काही पेनने लिहिले होते, तर एक रंगीत खडूने लिहिलेला होता. ते फॉर्म शिक्षकदालनात बसून बघताना सरांची चांगलीच करमणूक झाली; पण जेव्हा त्यांनी त्यातला एक फॉर्म वाचायला सुरु वात केली तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या अंदाजापेक्षा मुलं फारच हुशार होती. त्या फॉर्म्सच्या वर एक छोटं निवेदन होतं.
‘तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याकडे वातावरणाचे तापमान फार वाढलेले आहे. पाऊसदेखील कमी झालेला आहे. तसेच पाणी आणायला फार लांब जायला लागत आहे. आमच्या शाळेत शिकवले की या सगळ्याला काही प्रमाणात आपणदेखील जबाबदार आहोत. तर ते खरे आहे का? आणि आपली त्यातली जबाबदारी किती आहे हे आम्हाला मोजायचे आहे. म्हणजे मग आपल्या ज्या चुका होत असतील, त्या आपल्याला 
दुरुस्त करून घेता येतील. म्हणून हा फॉर्म तुम्ही आम्हाला भरून द्यायला पाहिजे, अशी आमची विनंती आहे.
1. आपल्या शेतात ठिबक सिंचन आहे का?
2. आपल्या शेतात जर ठिबक नसेल तर आपल्याला शेताला किती जास्त पाणी द्यायला लागत असेल?
3. आपण मागच्या वर्षात किती झाडं तोडली?
4. कशाकरता तोडली?
5. आपण मागच्या वर्षभरात किती झाडं लावली? (कृपया तुळस, सदाफुली, वांगी अशी छोटी छोटी झाडे लिहू नयेत. मोठी मोठीच झाडे लिहावीत)
6. आपण मागच्या वर्षभरात बाजारात किती वेळा कापडी पिशवी न घेता गेलात?
7. कापडी पिशवी न नेल्यामुळे तुम्ही किती प्लॅस्टिकच्या पिशव्या आणल्यात?
8. त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या सध्या कुठे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
9. आपण मागच्या वर्षभरात रानातून कुठले कुठले प्राणी मारून खाल्लेत?
10. यातले काही प्राणी नामशेष होत आहेत हे आपल्याला माहिती आहे का?
11. याशिवाय तापमानवाढीसाठी तुम्हाला काही सांगायचे आहे का?
इतर शिक्षक शिक्षकदालनात आले तेव्हा मुलांचे लाडके सर तो फॉर्म हातात धरून सुन्न बसून होते. ते बघून मुख्याध्यापक म्हणाले, अहो सर, इतके कसल्या काळजीत आहात? सरांनी न बोलता तो फॉर्म मुख्याध्यापकांच्या हातात दिला. मुख्याध्यापकांनी तो फॉर्म वाचला. मग सरांनी त्यांना सहावीच्या वर्गात काय चर्चा झाली ते सांगितलं. ते ऐकून मुख्याध्यापक म्हणाले,
‘याचा अर्थ काय आहे तुमच्या लक्षात येतंय का सर? मुलांनी चक्क आपली परीक्षा घेतली आहे.’
‘हो. आणि त्या परीक्षेत आपण सरळ सरळ नापास झालोय. हे प्रश्न वाचल्यावर माझे डोळेच उघडले. या सगळ्या गोष्टी आपणच गेलं वर्षभर मुलांना शिकवल्या आणि आपण मात्न सुटीत या सगळ्या आघाड्यांवर नापास झालो.’
‘बरोबर आहे तुमचं. पण आपण आपली चूक सुधारूया.’
असं म्हणून मुख्याध्यापकांनी संध्याकाळी सगळी शाळा पटांगणात बोलावली आणि सगळ्या शाळेच्या समोर सहावीच्या मुलांनी तयार केलेला फॉर्म वाचून दाखवला. आणि म्हणाले,
‘मुलांनो, आपल्यापैकीच काही मुलं पर्यावरणाचा खूप विचार करत आहेत. आपण आपल्याच पर्यावरणाचं किती नुकसान करतोय ते आपल्या लक्षात यावं यासाठी त्यांनी एक फॉर्म तयार केला आहे. माझी सगळ्या मुलांना विनंती आहे की हा फॉर्म तुम्ही सगळ्यांनी भरा. आणि पुढच्या वर्षीही आपण हाच फॉर्म परत भरून घेऊ. म्हणजे आपल्या वागण्यात किती सुधारणा झाली आहे ते आपल्या लक्षात येईल. हा प्रकल्प सुरू करून आमचे डोळे उघडल्याबद्दल सहावीच्या मुलांचं अभिनंदन आणि आभार. आणि बरं का मुलांनो, यावेळी घरी जाल तेव्हा सांगा की हा फॉर्म शाळेतून भरून आणायला सांगितला आहे. मग बघूया तुम्हाला कोण उत्तरं देत नाही ते!’
यावर सहावीच्या मुलांनी सगळ्यात जोरात टाळ्या वाजवल्या. कारण त्यांना तरी दुसरं काय हवं होतं?
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

lpf.internal@gmail.com

Web Title: Dream project by Children..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.