कर्तबगार प्राचार्य
By Admin | Updated: August 9, 2014 14:39 IST2014-08-09T14:39:19+5:302014-08-09T14:39:19+5:30
लक्ष्मीचे वजन वापरून सरस्वतीची आराधना होणार तरी कशी? दुर्मिळ सद्गुण अंगी असणारे प्राचार्य हल्ली अनेक ठिकाणी दिसून येतात. अशाच एका प्राचार्याने त्याच्यातील गुणांचा सदुपयोग करत महाविद्यालयामध्ये कसा धुमाकूळ घातला होता, त्याची परिणती पुढे काय झाली, त्याची ही कहाणी..

कर्तबगार प्राचार्य
प्रा. डॉ. द. ता. भोसले
एका राजकीय नेत्याने राजकारण, अर्थकारण, स्वसमाजसंवर्धन आणि नात्यातील लोकांचे बेकारी निवारण अशा उदात्त हेतूने आपल्या मतदारसंघात महाविद्यालय काढले. आपल्या नानाविध उद्योगांसाठी हक्काची राबणारी माणसे असावीत, शासनाच्या सवलतींचा फायदा घेता यावा आणि शिकणारी-शिकलेली चार पोरे उद्याच्या निवडणुकीला वापरता यावीत, असा तो व्यवहार होता.
‘विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे,’ असे त्यांच्या संस्थेचे ब्रीदवाक्य असले, तरी विद्यादान सोडून इतरच ‘दानांचा’ व्यवहार घडत होता. अशा या महाविद्यालयात आम्हा प्राध्यापक मित्रांचा चांगला परिचित असलेला एक प्राध्यापक प्राचार्य म्हणून रुजू झाला. ‘रुजू झाला’ असे म्हणण्यापेक्षा ‘सरस्वतीची’ सेवा करण्यासाठी त्याने त्या नेत्याच्या पायावर जाडजूड वजनाची ‘लक्ष्मी’ अर्पण करून ते पद मिळविले. ती रक्कम एवढी मोठी होती, की त्याला बाजारात विकले असते, तरी त्याला तेवढी किंमत कुणी दिली नसती. प्राचार्य झालेला आमचा हा मित्र तसा अभ्यासू, व्यासंगी आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक नव्हताच मुळी.
प्राचार्य म्हणून मिरविण्याची हौस, हाताखालच्या सेवकांवर हुकूम सोडण्याची हौस, या पदामुळे विद्यापीठाच्या चार-दोन कमिशनमध्ये घुसण्याची हौस आणि जादा चार पैसे मिळविण्याची अनावर हौस यांसाठी त्याला प्राचार्यपद हवे होते. शिवाय, शिकविण्याचा जन्मजात कंटाळा हे एक कारण होते. कारण, प्राचार्य झालेला माणूस कधी वर्गावर जात नाही. तो हातात खडू घेण्याऐवजी हातात छडी घेऊनच एखाद्या मुकादमासारखा वावरत असतो. आपल्या नावावरचे तास आपल्या खालच्या सहायक प्राध्यापकांना घेण्यास जो प्रेमळ हुकूम करतो, तोच आदर्श प्राचार्य मानला जातो. आमचा हा मित्र या कसोटीला पुरेपूर उतरणारा होता.
या गुणांबरोबरच आमच्या या मित्राकडे प्राचार्यपदासाठी लागणारे इतरही अनेक दुर्मिळ ‘सद्गुण’ मोठय़ा प्रमाणात होते. बारीकसारीक गोष्टींसाठी कमरेचा काटकोन करून कुणासमोरही झुकण्याची कला त्याने उत्तम प्रकारे साध्य केली होती. संस्थापक असलेल्या या राजकीय नेत्याने कोणतेही वैध-अवैध काम सांगितले, तरी ‘जी सरकार, जी साब,’ असे म्हणून तो कासोटा फिटेपर्यंत (सॉरी, पँटची बटने तुटेपर्यंत) धावाधाव करण्यात निष्णात होता. महाविद्यालयाचे हे ‘जी सरकार’ जेव्हा प्राचार्यांच्या खुर्चीत बसायचे, तेव्हा हे आमचे प्राचार्य कमरेचा मणका अधू झालेल्या माणसाप्रमाणे दोन्ही हात जोडून त्याच्या समोर रामभक्त हनुमानाप्रमाणे पोझ घेऊन आणि सार्या दुनियेची लाचारी चेहर्यावर आणून खोटे मंद स्मित करायचे. या राजकीय नेत्याने स्वत:लाच लागू पडणारी लाचार, मूर्ख, बिनडोक, अडाणी अशी विशेषणे ऊर्फ ‘पदव्या’ त्यांना बहाल केल्या, की त्यांना सन्मान झाल्यासारखे वाटायचे. आजचा दिवस चांगला सत्कारणी गेला, असा त्यांना आनंद व्हायचा. दोघांचे मेतकूट छानपैकी जमायचे आर्थिक व्यवहारावेळी. ते वरती आलेला लोण्याचा गोळा खायचे; हे प्राचार्य भांड्याला लागणारे लोणी चाटत बसायचे. असे लोणी कमी मिळाले, की नव्याने नोकरीस घ्यावयाच्या उमेदवाराकडून आधीच तोंडभरून लोणी खायचे आणि उरलेले लोणी ‘साहेबांसमोर’ ठेवायचे. आधी अर्पण केलेली लक्ष्मी व्याजासह लवकरात लवकर वसूल करणे एवढाच त्यांचा शैक्षणिक उद्देश असायचा.
सकाळी दहा वाजता आपल्या कार्यालयात आले, की ते चतुर्थ श्रेणीतल्या चार-पाच सेवकांना बोलावून घ्यायचे. त्यांची भाषाही अतिशय नम्र आणि मृदू असायची. ते म्हणायचे, ‘‘पांड्या, तू आधी घरी जा आणि मुलीला सायकलवर शाळेत सोडून ये.’’ ‘‘विठय़ा, तू आपल्या शेतात जाऊन मळ्यातली भाजी बाजारात विकायला घेऊन जा. जमले तर तूच तिथे विकत बस.’’ ‘‘राम्या, आधी तू दूध डेअरीला घाल आणि मग घरी बाईसाहेबांना हाताखाली मदतीला थांब.’’ ‘‘भीम्या, तू अमक्या अमक्याच्या दुकानात जाऊन एक डझन झाडू, अर्धा डझन बल्ब, सहा दस्ते कागद, फिनेलच्या बाटल्या अशा वस्तू आण आणि येतानाच दोन झाडू, दोन बल्ब, एक बाटली आमच्या घरी ठेव. आपल्या घरातल्या या वस्तू संपल्या असाव्यात.’’ अशी महत्त्वाची कामे सांगून झाल्यावर आणि हे सेवक कामासाठी निघून गेल्यावर दारावर उभ्या असलेल्या शिपायाला बोलावून घ्यायचे. तो आल्यावर या खिशात हात घाल, त्या खिशात हात घाल, टेबलाचा ड्रॉवर शोध असे करायचे आणि मग नाटकी हसत त्याला म्हणायचे, ‘‘सदोबा, घाईत आल्यामुळे माझा ऐवज घरीच विसरला वाटते. दे आता तुझ्या जवळचा.’’ सदोबाला हे रोजचे नाटक पाठ होते. तो मोठय़ा आनंदाने साहेबांना तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी काढून द्यायचा. चुना-तंबाखूचा गरगरीत लाडू एकदा तोंडात टाकला, की प्राचार्यांचा आत्मा गार व्हायचा आणि बधिरही व्हायचा. साहेबांचे व्यापच एवढे, की आठवड्यातले पाच ते सहा दिवस ते तंबाखू-चुना घरी विसरायचे. खरे कारण होते, दुसर्याच्या पैशांवर फुकट चैन करता येईल तेवढी करावी हे.
या आमच्या प्राचार्यांना कधी-कधी लहर यायची आणि ते कॉलेज परिसराला फेरी मारत मारत कॉलेजच्या कँटीनमध्ये घुसायचे. त्यांना बघताच तिथली मुले खालच्या मानेने पळून जायची. मग कँटीनमालकाला वरच्या सुरात म्हणायचे, ‘‘तुझ्याविषयी मुलांच्या, स्टाफच्या तक्रारी येतात, तू खाद्यपदार्थ चांगले देत नाही म्हणून. तेल चांगले वापरत नाही म्हणून. आता मीच त्याची परीक्षा घेतो.’’ असे म्हणून समोरच्या परातीतील गरम गरम भजी मुठीने घेऊन उभ्या उभ्याच गिळायचे. तोंड खवळले म्हणून पुन्हा बचकभर भजी ते मालकाला न विचारताच चापायचे. एक तर भजी हा त्यांचा ‘वीक पॉइंट’ होता. दुसरे म्हणजे सपाटून भूक लागलेली असायची आणि मुख्य गोष्ट म्हणजे बिल द्यायचा प्रश्न नसायचा. उलट पोटभर भजी खाऊन झाल्यावर रुचीपालट म्हणून गोड पदार्थाची एक प्लेट स्वत: मालक या साहेबांना खाऊ घालायचा. वरती ‘मुलांच्या आरोग्याची मला काळजी असते; म्हणून मला अनिच्छेने हे करावे लागते,’ हे भाष्य असायचे.
एकदा कॉलेजच्या एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना या कामाचा ठेकेदार या राजकीय नेत्याला भेटला आणि त्याने त्यांची तक्रार केली. तो म्हणाला, ‘‘साहेब, मला एकाच वेळी मानमोड अशी दोन दोन ओझी झेपणार नाहीत. ठरल्याप्रमाणे मी या कामाचे कमिशन आपणाला देत आहेच. पण, आता तुमचे प्रिन्सिपलसाहेबही तुमच्याएवढाच प्रसाद मागायला लागलेत. मला हे झेपणारे नाही.’’ चिडलेल्या या नेत्याने प्राचार्यांना बोलावून घेतले आणि कडक शब्दांत सुनावले, ‘‘हे बघा, मी तुमचा मालक आहे. तुम्ही नोकर आहात. तुम्ही तुमच्या कॉलेजची रद्दी विकताना पैसे खाता; खडूचे बॉक्स घेताना पैसे खाता; विद्यापीठाच्या चार लोकांच्या भोजन बिलामध्ये दहा लोकांचे बिल लावून पैसे खाता; पायपुसणी घेतानाही तुमची हाव थांबत नाही. या वेळी मी कधी बोललो का? तुमची ही हाव आवरा; नाही तर तुम्हाला घरी बसावे लागेल. बिनप्राचार्यांचे कॉलेज मी चालवतो.’’ घाबरलेल्या या आमच्या मित्राने या नेत्याचे पादत्राणासह पाय धरले नि आपल्या अश्रूंनी चिंब करून टाकले.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व
नवृत्त प्राचार्य आहेत.)