डिस्को स्टेशन
By Admin | Updated: September 26, 2015 14:10 IST2015-09-26T14:10:55+5:302015-09-26T14:10:55+5:30
हिंदी चित्रपटात रॉक, पॉप, जॅझसारखे अनुकरणाचे प्रयोग संगीतात झाले. पण डिस्कोइतके नावासकट मूळ शैलीचे अनुकरण कधीही झाले नव्हते आणि डिस्कोइतकी लोकप्रियताही अशा संगीताच्या वाटय़ाला आली नव्हती.

डिस्को स्टेशन
विश्राम ढोले
हिंदी चित्रपट संगीतामध्ये ऐंशीच्या दशकात काही महत्त्वाचे आणि व्यवस्थात्मक बदल घडून आले. स्वस्तातले टेपरेकॉर्डर आणि कॅसेट यांच्यामुळे संगीताची बाजारपेठ वेगाने विस्तारत गेली. गाणी ऐकण्यासाठी महागडे रेकॉर्डप्लेअर आणि तबकडय़ा बाळगण्याची किंवा रेडिओ केंद्रांच्या आवडीनिवडीवर विसंबून राहण्याचीही गरज उरली नाही. किमतीसोबतच वजनानेही हलक्या झालेल्या टेप आणि कॅसेटमुळे संगीत ऐकणो हा घराघरांतला आणि ब:यापैकी ‘मोबाइल’ अनुभव झाला. वैयक्तिक आवडीनिवडीनुसार गाणी भरून देणारी कॅसेटची दुकाने गल्लोगल्ली दिसू लागली. या सा:यांतून एक नवे ‘कॅसेट कल्चर’ निर्माण झाले. त्याचवेळी चित्रपटबाह्य संगीताचे अल्बमही मोठय़ा प्रमाणावर निघू लागले. त्यातून बाजारपेठेवरील चित्रपटसंगीताच्या वर्चस्वाला मोठे आव्हान मिळाले. स्वस्तातल्या रेकॉर्डिंगच्या सोयीमुळे कॅसेटची पायरसी वाढली. दुसरीकडे चित्रपटातील लोकप्रिय गाणी नवख्या कलाकारांकडून गाऊन घेऊन स्वस्तातल्या व्हर्शन कॅसेट काढण्याची लाट आली. तिनेक दशके चांगला स्थिरस्थावर झालेला चित्रपट संगीत उद्योग या सा:या व्यवस्थात्मक बदलांमुळे भांबावून गेला.
धामधुमीच्या याच काळात प्रत्यक्ष चित्रपटसंगीताच्या शैलीलाही एक तितकेच महत्त्वाचे वळण मिळाले. डिस्को त्याचे नाव. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये 1970 च्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या संगीतशैलीने हिंदी गाण्यांचा आणि नाचाचा ऐंशीच्या दशकात जणू ताबाच घेतला. ‘तिकडल्या’ संगीतशैलीपासून ‘प्रेरणा’ घेणो किंवा उलचेगिरी करणो हे हिंदी चित्रपटसंगीतासाठी काही नवे नव्हते. सगळ्यांची सरमिसळ करत नवेच रसायन तयार करणाची सवय असलेल्या हिंदी चित्रपट उद्योगाने याआधी असे प्रयोग रॉक, पॉप, जॅझ, लॅटिन, ब्ल्यू वगैरे संगीतशैलींबाबत केलेही होते. पण डिस्कोइतके नावासकट मूळ शैलीचे अनुकरण याआधी झाले नव्हते आणि डिस्कोइतकी लोकप्रियताही अशा संगीताच्या वाटय़ाला आली नव्हती. विशेषत: 1980 च्या पूर्वार्धात डिस्कोची लोकप्रियता इतकी होती की, त्यावेळी शाळकरी मुलांनीही ‘डी फॉर.?’ या प्रश्नावर ‘डॉग’ किंवा ‘डॉल’च्या ऐवजी ‘डिस्को’ किंवा ‘डान्सर’ असे उत्तर दिले असते. त्यांना डिस्कोची अशी बाराखडी ‘डिस्को डान्सर’मधील (1982) ‘आय अॅम ए डिस्को डान्सर’ या तुफान लोकप्रिय झालेल्या गाण्यानेच शिकविली होती. ‘डी से होता है डान्सर, आय से होता है आयटम’ असे करत करत या गाण्याने डिस्कोची खास फिल्मी व्याख्या केली होती आणि इंग्रजी बाराखडीच्या तक्त्यासाठी नवे पर्याय दिले होते.
हिंदीतील डिस्कोसाठी ‘डिस्को डान्सर’ हा कल्ट मुव्ही होता. मात्र डिस्को हिंदीत आणण्याचा आणि लोकप्रिय करण्याचा पहिला मान जातो तो फिरोज खानच्या कुर्बानी (1980) चित्रपटाला. त्यातले ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए’ हे पाकिस्तानी गायिका नाङिाया हसनने गायलेले गाणो हिंदीतले पहिले पूर्णपणो डिस्को गाणो. कुर्बानीचे संगीत कल्याणजी आनंदजींचे असले, तरी हे गाणो मात्र लंडनस्थित बिद्दू या डिस्कोशैलीतील बडय़ा संगीतकाराने केले होते. बिद्दू ऊर्फ बिद्दू अप्पैया मूळचा बेंगळुरूचा भारतीय. पण संगीताच्या वेडाने लंडनला गेला आणि तिथेच नाव काढले. त्याचे ‘कुंग फू फाईटिंग’ हे 1974 मधील गाणो तुफान लोकप्रिय झाले होते. डिस्कोच्या ऑल टाइम हिटमध्ये आजही ते अग्रक्र माने येते. बिद्दूचा खास टच लाभलेले ‘आप जैसा कोई’देखील प्रचंड लोकप्रिय झाले. डिस्कोच्याच वळणाने जाणारे ‘लैला हो लैला’ही गाजले. पुढच्याच वर्षी बिद्दूने नाङिाया आणि तिचा भाऊ झोहेब यांना घेऊन ‘डिस्को दिवाने’ हा गैरफिल्मी अल्बमही काढला. तोही गाजला. एका अर्थाने कुर्बानीने हिंदीत डिस्कोचा पाया घातला. पण पाया जरी बिद्दूने घातला तरी त्यावर कळस चढविला (किंवा केला) तो बप्पी लहरींनी. रंबा हो हो (अरमान- 1981), आय अॅम ए डिस्को डान्सर, जिमी जिमी आजा आजा, कोई यहॉँ आहा नाचे नाचे (डिस्को डान्सर- 1982), डिस्को स्टेशन (हथकडी- 1982), जवान जानेमन (नमक हलाल- 1982), ये डिस्को का बुखार है (सुगंध- 1982), डिस्को डिस्को (हम से ना जीता कोई- 1983), डिस्को डांडिया (लव्ह लव्ह लव्ह- 1989) अशी अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी दिली. त्यांच्याखेरीज कल्याणजी आनंदजी (लैला मै लैला- कुर्बानी- 1980), राजेश रोशन (मैं एक डिस्को- खुद्दार- 1982), आर. डी. बर्मन (आ देखे जरा- रॉकी- 1981), लक्ष्मीकांत प्यारेलाल (डिस्को 84- इन्कलाब- 1984) यांसारख्या आघाडीच्या संगीतकारांनीही डिस्को गाणी केली. त्यावेळी डिस्को या संगीतशैलीचाच नव्हे, तर नावाचाही महिमा असा होता की लोकप्रियतेसाठी गाण्याच्या बोलापासून ते चित्रपटांच्या नावापर्यंत डिस्को हा शब्द वापरला जायचा.
ऐंशीच्या उत्तरार्धात डिस्कोला उतरती कळा लागली. कयामत से कयामत तक (1988), मैने प्यार किया (1989) आणि आशिकी (1990) या तीन प्रेमपटांतील संगीताने डिस्कोची जागा पुन्हा जुन्या धाटणीच्या हिंदी गाण्याच्या सरमिसळ शैलीने घेतली. अर्थात हिंदीमधील डिस्कोदेखील मूळ डिस्कोशैलीशी पूर्णपणो प्रामाणिक होते, असे नाही. दांडिया, भांगडासारख्या देशी सांगितिक शैलींचा तडका मारण्याचे किंवा फ्युजन करण्याचे प्रयत्नही झालेतच. मात्र खर्जातील वेगवान इलेक्ट्रॉनिक ठेका, मधूनच वाजणारे यंत्रसदृश ध्वनी, इलेक्ट्रॉनिक सिथेंसायजरचा मुक्त वापर, इलेक्ट्रिक गिटार- पियानो, हॉर्न आदि वाद्यांचा सततचा वाद्यमेळ आणि उंच चढत जाणारे सूर ही डिस्कोशैली मात्र हिंदीत नव्याने प्रस्थापित झाली. केवळ सांगितिक शैलीच नव्हे, तर मूळ अमेरिकी किंवा ब्रिटिश डिस्कोथेकमध्ये असणारी प्रकाशयोजना आणि नाचाची शैलीही हिंदीत डिस्कोच्या निमित्ताने रूढ झाली. चमचमते डिस्को बॉल, छतावर किंवा पाश्र्वभूमीवर उघडमिट करणारे दिवे किंवा निऑन साइन्स, खाली डान्स फ्लोअरवरवरही उघडमिट करणारे दिवे, चमचमते ग्लॉसी कपडे घातलेले नर्तक, त्यांच्या झटके-खटकेबाज हालचाली आणि चित्कारत किंचाळत त्यांच्यात सहभागी होणारे डिस्कोथेकमधले प्रेक्षक हा साचाही हिंदीत आक्र मकपणो प्रस्थापित होत गेला डिस्को गाण्यांमुळेच. नव्वदीनंतर डिस्को नावाच्या विशिष्ट शैलीची लोकप्रियता कमी झाली तरी डिस्कोच्या या साच्यांचे दृक आणि श्रव्यसंस्कार काही पुसले गेले नाहीत. म्हणूनच पश्चिमेकडे डिस्कोचे दिवे जरी विझले असले, तरी हिंदीत मात्र विविध पाश्चात्त्य संगीत आणि नृत्यशैलींना सामावून घेत डिस्कोचे दिवे अजूनही उघडमिट करतच आहेत. म्हणूनच अजूनही इट्स दी टाइम टू डिस्को (कल हो ना हो- 2003), दर्दे डिस्को (ओम शांती ओम- 2007), नकद वाले डिस्को उधारवाले खिसको (देली बेली- 2011), अनारकली डिस्को चली (हाऊसफुल- 2011), तमंचे पे डिस्को (बुलेट राजा- 2013), डिस्को दिवाने (स्टुडंट ऑफ दी इयर- 2015) अशा अनेक गाण्यांमधून डिस्को या नावाच्या प्रभावाचे संदर्भ येतच राहतात.
डिस्कोचा हा प्रभाव फक्त एका सांगितिक शैलीचा प्रभाव नाही. तो गाण्यांकडे बघण्याच्या एका विचारव्यूहाचा प्रभाव आहे. इथे गाण्यातील मानसिक आनंद किंवा सौंदर्य दुय्यम आहे. इथे आवाहन आहे ते मुख्यत्वे शरीराला आणि शरीरासोबत येणा:या नैसर्गिक प्रेरणा व उपभोगाला. वेगवान आणि बदलत्या अशा दृक आणि श्रव्य कल्लोळात शरीराला झोकून देण्याला. ‘ताल पे जब झुमे बदन हिचकिचाना शरमाना क्या. खुल के झुमो खुल के गाओ. इट्स द टाइम टू डिस्को’ असे डिस्कोचे आवाहन आहे. तिथे शब्दांची मातबरी नाही. ठेक्याचे वर्चस्व आहे. तिथे गाण्यातून काही सांगायचे आहे असे नाही. गाणो फक्त ध्वनिरूपाने ऐकायचे आहे. संगीताला बुद्धी किंवा भावनेने सामोरे जाणो अपेक्षित नाही. शरीराने शरण जाणो अपेक्षित आहे.
रंग, रूप, गंध, रस आणि ध्वनी यांना शारीरपातळीवर उपभोगण्याची हक्काची जागा म्हणजे डिस्कोथेक आणि डिस्को हा त्याचा सांगितिक आविष्कार. उपभोगाच्या आवाहनाला हिंदी गाण्यांची कधी ना नव्हती. पण त्यातील असा खुलेपणा आणि उघड शारीरता खूप नवी होती. त्यातील असा वेग आणि दृकश्रव्य कल्लोळ नवा होता. परदेशी सुरावटी आणि शैलीची गुंफण करण्याला हिंदी चित्रपटसंगीताची कधी ना नव्हती. चाळीसच्या दशकातील न्यू थिएटरपासून ते सत्तरीच्या दशकातील आर. डी. बर्मनपर्यंत अनेकांनी ते केले. पण डिस्कोने हिंदी गाण्यांमध्ये जग आणण्यापेक्षा हिंदी गाण्यांना जागतिक सुरावटीकडे ढकलले.
‘टीन कनस्तर पीट पीट के गला फाड के चिल्लाना यार मेरे मत बुरा मानना ये गाना है न बजाना’ (लव्ह मॅरेज- 1959) अशा शब्दात तिकडच्या सांगितिक शैलीला नावे ठेवणा:या हिंदी चित्रपटसंगीताने त्याच प्रकारच्या शैलीचा ऐंशीच्या दशकात स्वीकार केला होता. म्हणूनच हिंदी चित्रपटसंगीताच्या प्रवासात ऐंशीच्या दशकामध्ये लागलेले हे डिस्को स्टेशन काही साधेसुधे नव्हते. या डिस्को स्टेशनने हिंदी गाण्यांचा ट्रॅकच चेंज केला होता.
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती
या विषयाचे अभ्यासक आहेत.)
vishramdhole@gmail.com