शिस्तबद्ध,शास्त्रशुद्ध
By Admin | Updated: May 31, 2014 16:27 IST2014-05-31T16:27:05+5:302014-05-31T16:27:05+5:30
माधव मंत्री म्हणजे एक शिस्तबद्ध, वरून कठोर दिसणारं, पण जिव्हाळा, माया, प्रेम असणारं असं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा माझा संबध आला, तो अर्थातच क्रिकेटमुळं. कळत नकळत त्यांचा माझ्यावर, माझ्या खेळावर बराच प्रभाव पडत गेला.

शिस्तबद्ध,शास्त्रशुद्ध
चंदू बोर्डे
माधव मंत्री म्हणजे एक शिस्तबद्ध, वरून कठोर दिसणारं, पण जिव्हाळा, माया, प्रेम असणारं असं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा माझा संबध आला, तो अर्थातच क्रिकेटमुळं. कळत नकळत त्यांचा माझ्यावर, माझ्या खेळावर बराच प्रभाव पडत गेला. तो आजही आहे. नीटनेटकेपणा, जिथली वस्तू तिथं ठेवणं हे त्यांच्या स्वभावाचं आणखी एक वैशिष्ट्य. त्यांचं क्रिकेटचं कीट पाहिले, तरी त्यात बॅट, स्टंप अगदी व्यवस्थित ठेवलेलं असायचे. गबाळेपणा, गचाळपणा त्यांना मुळीच आवडायचा नाही. असं कोणी करताना दिसलं, तर ते त्याला हटकत. समजावून सांगत.
त्यांच्यावर कोणाचा प्रभाव असेल, याचा मी विचार करायचो. त्याचा शोध त्यांच्याबरोबर चर्चा करत असतानाच एकदा लागला. आपले पुण्याचे दि. बा. देवधर यांच्याबरोबर मंत्री काही काळ खेळत होते. देवधर म्हणजे त्या वेळचे आदर्श खेळाडू. सामना असेल, त्याच्या आधीपासूनच त्यांची तयारी सुरू व्हायची. म्हणजे खेळाचा सराव तर त्यात असायचाच; पण लवकर झोपणे, कमी आहार घेणे अशा आणखी काही गोष्टी त्यात होत्या. मंत्री यांनी या सगळ्या गोष्टी अंगवळणी पाडून घेतल्या. त्यांच्या वागण्याबोलण्यात त्या दिसायच्याच. खेळाडूंनी संघाची शिस्त पाळलीच पाहिजे, हा आग्रहही त्यातूनच आला होता.
त्या वेळच्या कसोटी संघावर मुंबईचे नेहमीच वर्चस्व असायचं. किमान ८ खेळाडू तर त्यांचेच असत व त्यात अर्थातच मंत्री असत. इतका मोठा खेळाडू, पण त्यांनी कधीही त्याचा बडेजाव मिरवला नाही. मला ते बरेच सिनियर होते. सन १९५४मध्ये आमचा संघ पाकिस्तानला जाण्याच्या आधी महिनाभर आमचं सराव शिबिर ब्रेबॉर्न स्टेडियमला होतं. तिथं ते येत असत. आमचा सराव पाहत. भांडारकर म्हणून आम्हाला प्रशिक्षक होते. त्यांना ते काही गोष्टी सांगत असत. आमच्या सरावावर त्यांचं बारीक लक्ष असे व आमचं, त्यातही प्रामुख्यानं माझं त्यांच्यावर लक्ष असे.
मार्गदर्शक म्हणूनही ते खूप मोठे होते. बरेचसे कोच खेळाडूंना त्याचे कोठे काय चुकतं, त्यात काय सुधारणा करायला हवी, ते सांगत असतात. मंत्री ते तर सांगायचेच, शिवाय त्याच्या अशा चुकीच्या खेळण्यामुळं त्याचं काय नुकसान होणार आहे, ते प्रकर्षानं त्याच्यासमोर उभं करत असत. त्याचबरोबर योग्य पद्धतीनं खेळला, तर त्याचा काय फायदा होईल, याचंही स्पष्टीकरण ते देत. साहजिकच खेळाडूवर याचा चांगला परिणाम होऊन त्याच्या खेळात कमालीची सुधारणा होई.
शिस्तीच्या बाबतीत मात्र ते अत्यंत कठोर होते. कोणतीही तडजोड ते मान्य करत नसत. संघातील प्रत्येक खेळाडू शिस्तीने बांधला गेलेला असावा, असं त्यांचं मत होतं. कोणासाठी एखादा नियम शिथिल वगैरे केल्याचं त्यांना चालत नसे. त्यांच्यात एक प्रकारचा स्पष्टवक्तेपणा होता. फारशी भीडभाड न ठेवता ते आपलं मत व्यक्त करत. त्यामुळे काही जण दुखावले जात. मात्र, त्यांचा दृष्टिकोन लक्षात आल्यावर हे दुखावलेपण निघून जात असे. त्यांच्या संपर्कात येणार्यांना बहुतेकांना हा अनुभव आला असेल. मात्र, हेच मंत्री खेळाडूंवर प्रेमही तेवढेच करत असत. चांगल्या, दज्रेदार खेळाचे ते मनापासून चाहते होते.
खुद्द त्यांचे खेळणे अत्यंत शास्त्रशुद्ध असे. तंत्राचा आविष्कार कसा करावा, हे त्यांचा खेळ पाहून समजे. नव्या मुलांनीही आंधळेपणाने फटके न मारता, धावांच्या मागे न लागता शास्त्रशुद्ध खेळावे असा त्यांचा आग्रह असायचा. सहवासात येणार्या प्रत्येक नव्या-जुन्या खेळाडूच्या मनावर ते ही गोष्ट बिंबवत. कोणता फटका कसा व कधी मारावा, याची अचूक माहिती ते देत. खेळाडूकडून त्याचा सराव करून घेत.
समीक्षक म्हणूनही त्यांची कारकीर्द लक्षात ठेवण्यासारखी आहे. कर्तृत्वाने ते मोठे होतेच, पण त्यांच्या वागण्यातून ते कधी हे मोठेपण जाणवू देत नसत. एक आठवण सांगण्यासारखी आहे. एकदा ते निवड समितीच्या काही कामासाठी म्हणून पुण्यात आले होते. संध्याकाळी लगेच मुंबईला निघणार होते. मध्ये मोकळा वेळ होता. सहज म्हणून त्यांना म्हटलं, ‘‘आमचं घर जवळच आहे, येणार का घरी?’’
ते नकार देतील, असं वाटत होतं. मात्र, त्यांनी चक्क होकार दिला. ते घरी आलेही. सर्वांशी छान गप्पा मारल्या. त्यादिवशी आमचा इस्टर सण होता. या दिवशी सजावट केलेली अंड्याची प्रतिमा भेट देण्याची प्रथा आहे. मंत्री यांना भेट देण्यासाठी तसं एक अंडं आणलं होतं. ते त्यांना दिलं. कुतूहलाने त्यांनी त्याची माहिती विचारली. घरात तशी आणखीही काही अंडी होती. त्यातील एक त्यांना आवडलं. माझ्या पत्नीच्या ते लक्षात आलं व तिने ते त्यांना घेऊन जायला सांगितलं. फार खूश झाले ते. साध्या स्वभावाचा पण, अत्यंत मोठा माणूस असं त्यांचं वर्णन करता येईल. चांगलं काही दिसलं, की त्याचे ते आवर्जून कौतुक करायचे. तिथे त्यांचा हात कधी आखडता नसायचा. त्यांच्या आठवणी मात्र कायम राहतील.
(लेखक भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आहेत.)