दंडकारण्य पॅटर्न
By Admin | Updated: August 9, 2014 14:10 IST2014-08-09T14:10:24+5:302014-08-09T14:10:24+5:30
नुसती जंगलतोड रोखून भागणार नाही. बकाल होत चाललेल्या शहरांसाठी झाडंही लावणं तितकंच गरजेचं आहे, हे संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात यांनी नेमकेपणाने ओळखलं होतं. त्यातूनच त्यांनी दंडकारण्याच्या आगळ्य़ावेगळ्य़ा मोहिमेचा पाया घातला होता. निसर्गाचा कोप दिवसेंदिवस वाढत असताना अशा विधायक प्रयत्नांची पुन्हा एकदा सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर गरज आहे. त्यांनी केलेले ते प्रयत्न आजच्या संदर्भात जाणून घ्यायलाच हवेत.

दंडकारण्य पॅटर्न
- विठ्ठल कुलकर्णी
स्वातंत्र्यचळवळीनंतर महाराष्ट्रातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी राजकारण न करता स्वत:ला सामाजिक चळवळींना जोडून घेतले. काहींनी सहकार चळवळ आपलीशी केली व त्यातून सुराज्यनिर्मितीचा प्रयत्न सुरू ठेवला. संगमनेरचे भाऊसाहेब थोरात ऊर्फ दादा त्यांच्यापैकीच एक. संगमनेर सहकारी साखर कारखाना, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र को-ऑप. बँकेच्या माध्यमातून त्यांनी सहकार चळवळीत बरेच मोठे योगदान दिले. त्यानंतर त्यांच्या अखेरच्या कालखंडात त्यांनी सुरू केलेली दंडकारण्य चळवळही नव्या पिढीसाठी आदर्श अशीच आहे.
घरामध्ये वर्तमानपत्र चाळत असताना त्यांच्या हाती एक पुस्तक लागलं. त्या पुस्तकाचं नाव होतं ‘झाडं लावणारा माणूस.’ या छोट्याशा पुस्तकाने ८३ व्या वर्षी दादांच्या मनात व शरीरातही प्रचंड ऊर्जा व उत्साह निर्माण केला. एक मेंढपाळ रोज वेगवेगळया ठिकाणी फिरत असे व फिरताना त्या ठिकाणी झाडाच्या बिया लावत असे. जेथे जाईल तेथे बिया लावण्याच्या त्याच्या या प्रयोगाने दुष्काळी असा प्रदेश कसा हिरवागार होतो, याचं वर्णन पुस्तकात होतं. ते वाचून प्रभावित झालेल्या दादांच्या डोळय़ांसमोर चित्र उभे राहिले ते झाडांच्या गर्दीत वसलेले हरित संगमनेर पाहण्याचे. डोंगराच्या छायेत लपलेले, प्रवरेच्या काठी वसलेले संगमनेर वाढत्या शहरीकरणामुळे बकाल होत चाललेलं दादांना दिसत होतं. पावलोपावली निसर्गावर अवलंबून असणारी व्यक्तीच निसर्गाच्या र्हासाला कारणीभूत ठरत होती. हा र्हास थांबविण्यासाठी नुसतं जंगलतोड थांबवून काम भागणार नव्हतं तर गरज होती ती नवनवीन झाडं लावण्याची. हेच दादांनी हेरलं. इथेच दंडकारण्य मोहिमेचा पाया रोवला गेला.
कुठलीही मोहीम सुरू करायची म्हटलं की त्यासाठी पाहिजे असतात मोठय़ा प्रमाणावर उत्स्फूर्तपणे काम करणारे कार्यकर्ते. त्यासाठी लोकांना एकत्रित आणणे व आपली भूमिका पटवून सांगणे हे काही दादांना नवीन नव्हतं. साखर कारखाना परिसरात अमृतेश्वराच्या मंदिरात एक सभा बोलविण्यात आली. दादांनी आपली कल्पना विस्तृतपणे सर्वांसमोर मांडली. कल्पना सर्वांना आवडली. अगस्तीऋषींनी निर्माण केलेल्या अरण्यास पुराणात ‘दंडकारण्य’ म्हटलं आहे. त्यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून दादांनी आपल्या मोहिमेलाही ‘दंडकारण्य’ असंच नावं दिलं.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात संगमनेरपासून ५ कि. मी. अंतरावर असणार्या सर्व टेकड्यांवर झाडांच्या बिया लावण्याचे ध्येय ठेवण्यात आलं. दादांची कन्या दुर्गाताई तांबे संगमनेर नगर परिषदेच्या अध्यक्षा, मुलगा बाळासाहेब थोरात कृषी खात्याचे मंत्री, जावई सुधीर तांबे आमदार असे असूनही दादांनी शासकीय व कुठल्याही एन.जी.ओ.कडून मदत न घेण्याचे ठरविले. या मोहिमेत कुठल्याही व्यक्तीवर दबाव नव्हता. स्वयंस्फूर्तीने आलेल्या कार्यकर्त्यांना दादांनी आवाहन केलं, की घरात आणलेल्या फळांच्या बिया जपून ठेवाव्या व त्या या मोहिमेसाठी द्याव्यात. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या आवाहनाला मिळाला. बघता- बघता बियांचा ओघ वाढू लागला. आलेल्या सगळय़ा बिया जमा करून घेणे, त्यांचे वर्गीकरण करणे, प्लॅस्टिकच्या पिशवीत भरणे, बिया लावण्यासाठी लागणारी हत्यारं पुरविणे या सर्व कामांची जबाबदारी साखर कारखान्याच्या कर्मचार्यांनी स्वयंस्फूर्तीने उचलली. प्रत्यक्ष मोहिमेची आखणी होत होती. स्वयंसेवक, कामाचे तास, कामाची पद्धत याची चर्चा झाली. प्रत्येकाने ६ ते ७ तास काम करणं अपेक्षित होतं. स्वयंसेवकांचा व्यवसाय व नोकरीची, शाळा-कॉलेजची वेळ पाळून उरलेल्या वेळात काम करणं अपेक्षित धरलं गेलं. येताना प्रत्येकाने आपआपल्या जेवणाचा डबा बरोबर घेऊन येण्याचेही ठरले. पहिल्या टप्प्यात दादांनी १0 मिलियन झाडांच्या बिया लावण्याचे ध्येय पुढे ठेवले. संगमनेरसारख्या अत्यल्प पाऊस असलेल्या ठिकाणी हे शक्य होईल का? याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात साशंकता होती. मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची तारीख ठरविण्यात आली. तो दिवस होता १४ जून २00६. प्रत्येकाने येताना किमान ५ किलो बिया आणाव्यात, असं ठरलं व पाहता-पाहता ५ मिलियन झाडे लावता येतील एवढय़ा बिया जमा झाल्या. थोडक्यात, काय तर बियांचा प्रश्न सुटला होता. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेले व सहकार चळवळीचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे दादांना प्रत्येक गावन्गाव, नदी-नाले, डोंगर, वस्त्या यांची चांगली माहिती होती. स्वयंसेवकांचे गट तयार करून गावागावांत पाठविण्यात आले; परंतु केवळ स्वयंसेवकांनी काम होईल, असे दादांना वाटत नव्हते. भाषणं देऊन अशिक्षित व अर्धशिक्षित व्यक्तींना आपलं म्हणणं पटणार नाही, हे दादांनी हेरलं व त्यासाठी लोकसंगीताचा वापर करण्याचं ठरलं. अनेक लेखक व गायकांच्या माध्यमातून झाडांची महती पटवून देणार्या गीतांची निर्मिती करून घेण्यात आली. प्रत्येक ग्रुपने रोज पाच गावांत भेटी देण्याचे ठरले. दिलेल्या वेळेत ८ ग्रुपने जवळजवळ दोनशे गावांना व त्यापेक्षा जास्त वाड्यांना/वस्त्यांना भेटी दिल्या. मोहिमेची माहिती दिली. कामाच्या ठिकाणी येणार्यांना ड्रेसकोड ठरविण्यात आला. पुरुषांनी पिवळा शर्ट व हिरव्या रंगाची पँट व स्त्रियांनी पिवळी साडी यामागे दादांचा उद्देश होता तो असा, की ड्रेसकोड असला की आपण सर्व एकत्रित असल्याची भावना निर्माण होते.
दुपारी १ तास जेवणाची सुटी असायची. त्या वेळी गावातील व्यक्ती काही पारंपरिक मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करत असत. दादा प्रत्येक स्वयंसेवकावर वैयक्तिक लक्ष ठेवून असायचे. ते प्रत्येकाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असत. प्रत्येक ग्रुपला शूर वीरपुरुषाचे नाव देण्यात आले. एका स्वयंसेवकाने खड्डा करायचा, दुसर्याने बिया टाकायच्या तर तिसर्याने त्यावर माती पसरवायची. दादांची सहकाराची शिस्त येथे प्रकर्षाने दिसून येत होती. १९ जून २00६. स्थळ सायखिंडी टेकडी. ड्रेसकोडमध्ये आलेले स्वयंसेवक, गावकरी जवळजवळ सर्वच व्यक्तींची हजेरी होती. भाऊसाहेबांनी पहिले बी टाकून प्रकल्पाची सुरुवात केली. पूर्ण दिवसभर काम चालले. प्रत्येकाने सोबत जेवणाचा डबा आणला होता. जेवणाच्या वेळेला अन्नपदार्थांची देवाणघेवाण झाली. इतर स्वयंसेवकांची नावं, गावांची ओळख नसतानाही प्रत्येकजण एकमेकांशी आपुलकीने वागत होते. दिवस अगदी सुरळीत पार पडला. २३ जून ते २ जुलै २00६. स्वयंसेवक पुरुष, स्त्रिया, मुलं एवढंच नव्हे तर अंगणवाडी कामगार अशा ५0 ते ६0 हजार व्यक्तींनी या अभियानात भाग घेतला. वेगवेगळय़ा टेकड्या, मोकळे रान, जेथे-जेथे शक्य असेल अशा सर्व ठिकाणी झाडे लावली जात होती. वन व कृषी अधिकार्यांचे मार्गदर्शनही मिळत होते. २ जुलै २00६ रोजी निझर्णेश्वर मंदिर परिसरात या मोहिमेची त्या वर्षाच्या अभियानाची औपचारिक सांगता झाली.
अमृतेश्वराच्या मंदिरापासून सुरू होऊन हा प्रवास निझर्णेश्वरच्या मंदिरापर्यंत पोहोचला होता. १0 मिलियन बिया लावण्याचे जे ध्येय ठेवले होते, ते पाहता-पाहता ४५ मिलियनचा टप्पा पार करून पुढे गेले होते. सुरुवातीला काहीसं अशक्य वाटणारं ध्येय बघता-बघता कसं पूर्ण झालं, नव्हे-नव्हे त्याच्या ४ पटींनी अधिक पूर्णत्वास गेलं, हे स्वयंसेवकांना कळलंही नाही. एका व्यक्तीच्या सुयोग्य नियोजन व योग्य मार्गदर्शनाने काय होऊ शकतं याची कल्पना सर्वांनाच आली. या मोहीमकाळात अनेकांनी आत्मविश्वास कमावला, नवनवीन मित्र मिळविले. दादांच्या मते प्रकल्पाचे यश हे किती बिया जमिनीत पेरल्या गेल्या, हे नसून किती व्यक्ती स्वयंस्फूर्तीने चळवळीत जोडले गेले हे होते. पहिल्या वर्षी बरीचशी मेहनत वाया गेली. लावलेल्या बियांपैकी काही बिया उकरल्या गेल्या, काही गुरांच्या पायाखाली तुडविल्या गेल्या, काहींना वेळेवर पाणीच मिळालं नाही. दादांनी हे गृहीतच धरलं होतं; परंतु त्यामुळे हताश होऊन नवीन झाडं लावणं थांबविण्याचा विषयच नव्हता. सावली, फुलं, फळे, पाऊस, प्राणवायू या सर्वांसाठी झाडांचं असलेलं महत्त्व शाळा-शाळांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले गेले पाहिजे. ‘ग्लोबल वॉर्मिंंग’पासून वाचण्यासाठी झाडे लावणं हाच एक उत्तम पर्याय होऊ शकतो. या मोहिमेचा कुणी नेता नव्हतं. जे तरुण व विद्यार्थी आज येथे काम करत होते, तेच उद्याचे नेते होते. एकत्र आलेले अनेक हात काय जादू करू शकतात, हेच या मोहिमेतून दिसून आले. दादांनी किंवा त्यांच्या कुठल्याही सहकार्याने व्यावसायिक व्यवस्थापनाचे धडे घेतलेले जरी नसले तरी त्यांना स्वयंसेवकाचे कसे व्यवस्थापन करायचे, हे माहीत होते. आजच नियोजन करायचं व आजच त्याची अंमलबजावणी करायची, हे दादांचे धोरण. दंडकारण्यासारख्या मोहिमा प्रत्येक गावोगावी पार पाडणं ही काळाची गरज आहे.
दादांनी पेटविलेली ही ज्योत प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात अशीच तेवत राहणं ही काळाची गरज आहे. दादा गेल्यानंतर ही मोहीम दुर्गाताई तांबे यांनी बंद पडू दिली नाही. त्याचा वारसा जपला. आता पुन्हा तेच एकीचे बळ दाखविण्याची नितांत गरज आहे.
(लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)