कटप्रॅक्टिसला आळा हवाच

By Admin | Updated: July 12, 2014 15:07 IST2014-07-12T15:07:09+5:302014-07-12T15:07:09+5:30

‘कट प्रॅक्टिस’ हा डॉक्टरांनाच लागलेला रोग आहे. असे वागणे चांगले नाही. जे कोणी कट प्रॅक्टिस करतात ते जसे चुकीचे असतात, त्याच बरोबरीने अशा पद्धतीने उपचार घेणारेपण चुकीचे वर्तन करत असतात.

The cutpractices should be avoided | कटप्रॅक्टिसला आळा हवाच

कटप्रॅक्टिसला आळा हवाच

>डॉक्टरांचा रोग 
‘कट प्रॅक्टिस’ हा डॉक्टरांनाच लागलेला रोग आहे. असे वागणे चांगले नाही. जे कोणी कट प्रॅक्टिस करतात ते जसे चुकीचे असतात, त्याच बरोबरीने अशा पद्धतीने उपचार घेणारेपण चुकीचे वर्तन करत असतात. कट प्रॅक्टिसमुळे रुग्णाचा डॉक्टरवरचा विश्‍वास उडतो, याचा डॉक्टरांनी विचार केला पाहिजे. एखादा माणूस चोरी करायचे ठरवतो तसेच हे वर्तन असते. याला आळा घालण्यासाठी ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने कडक कारवाई केली पाहिजे. त्यांची प्रॅक्टिस बंद केली तरच अशा डॉक्टरांना जरा वचक बसेल.
- डॉ. तात्याराव लहाने (अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय)
 
मूल्ये जपायला हवीत
डॉक्टर या एका शब्दावर लोकांचा किती विश्‍वास असतो. मात्र, काही डॉक्टर कट प्रॅक्टिसच्या आहारी जातात आणि प्रतिमा मलिन करून घेतात. कट प्रॅक्टिस नैतिकतेमध्ये बसत नाही. अशा वागण्यामुळे डॉक्टरी पेशातील नैतिक मूल्ये मागे पडून केवळ व्यावहारिकता उरते. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाने नैतिकता, वैद्यकीय क्षेत्रातील मूल्ये जपायला हवीत. शिक्षा झाल्यावर नीट वागण्याला काही अर्थ आहे का? डॉक्टरांनीच स्वत:ला बंधने घालावीत. प्रलोभनांच्या आहारी न जाता आपली वागण्याची पद्धत ठरवली पाहिजे. 
डॉ. शुभांगी पारकर (प्रभारी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय) 
 
कट प्रॅक्टिस कर्करोगासारखीच 
कट प्रॅक्टिस कर्करोगाप्रमाणे आहे. कर्करोग एकदा शरीरात शिरला की तो पसरत जातो. त्याचप्रमाणे कट प्रॅक्टिस करण्याचा एकदा मोह झाला, की तो इतका मुरतो की त्यातून बाहेर पडणे अवघड होते. डॉक्टरांनी आपल्या कौशल्यावर व्यवसाय करणे महत्त्वाचे आहे. ज्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान, कला आणि आत्मविश्‍वास यांचा अभाव आहे, त्यांनाच कट प्रॅक्टिससारख्या चुकीच्या गोष्टी करण्याची वेळ येते. सुरुवातीपासूनच चांगल्या रीतीने व्यवसाय केल्यास अशा चुकीच्या शिड्यांची आवश्यकता भासत नाही. डॉक्टरांनी स्वत:च्या कौशल्यावर काम मिळविणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला तर त्यांच्यावर ही वेळ येणार नाही. विमा कंपन्यांनी ठरविलेला मोबदला डॉक्टरला मिळणे, ही व्यवस्था बंद केली पाहिजे. सरसकट सगळ्या डॉक्टरांना एकच रेट ही पद्धत चुकीची आहे. डॉक्टरांची व्यावसायिक फी ही त्यांची त्यांना ठरविता आली पाहिजे. इतर कोणालाही ती ठरविण्याचा अधिकार असू नये. कट प्रॅक्टिसपेक्षाही सर्व रुग्णांवर योग्य रीतीने आणि आवश्यक असलेलेच उपचार होतात की हे पाहणे गरजेचे आहे. 
- डॉ. शैलेश पुणतांबेकर (कर्करोगतज्ज्ञ)
 
धंदेवाईकपणाची लाट
वैद्यकीय क्षेत्रात सुरू झालेली कट प्रॅक्टिस म्हणजे इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रात असलेला धंदेवाईकपणा आहे. एजंटप्रमाणे आता डॉक्टरही कमिशन घेतात, ही आमच्या क्षेत्राच्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर व्यवसाय चालला नाही तर रुग्ण मिळविण्यासाठी अशा प्रकारचे कमिशन घेण्याची वेळ येते. एकदा अशी वाईट सवय लागली तर त्यापासून दूर जाणे अवघड होते. सोनोग्राफी, एक्स-रे यांसारख्या चाचण्या करणारे जर आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमावतात, तर ते मला का नको? या मानसिकतेतून कमिशन घेण्याची सुरुवात होते. सुरुवातीपासूनच ही मानसिकता निर्माण होऊ न देणे अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात कट प्रॅक्टिसची सुरुवात मुंबईत झाली. ते पाहून आपणही असे करू शकतो, असे वाटल्याने पुण्यासह इतर शहरांतही याचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. आता तर ते इतके वाढले, की त्यावर निर्बंध घालण्याची वेळ आली आहे. रुग्णाला गरज नसताना दिले जाणारे उपचार यामुळे मोठय़ा प्रमाणात वाढले. त्यामुळे कट प्रॅक्टिसपेक्षाही यामध्ये रुग्णाची होणारी फरफट जास्त धोकादायक आहे. पैसे खाण्यापेक्षाही डॉक्टरांच्या अप्रामाणिकपणामुळे रुग्णाला पोहोचणारी हानी ही निंदनीय गोष्ट आहे
- डॉ. के. एच. संचेती (अस्थिरोगतज्ज्ञ)
 
अंमलबजावणीचे काय? 
कट प्रॅक्टिसचे सर्मथन करणे अत्यंत चुकीचे आहे. तरीही इतर सर्व क्षेत्रांत कमिशन घेतले जात असताना केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच लक्ष्य केले जात आहे. इतर व्यवसायांमध्ये सर्रास कमिशन घेतले जात असताना वैद्यकीय क्षेत्रच याला अपवाद असावे, अशी भूमिका का आहे? नवीन कायद्यानुसार डॉक्टरांविरुद्ध ग्राहक न्यायालयात (कन्झ्युमर कोर्ट) जाता येते, म्हणजेच वैद्यकीय क्षेत्र हाही एक  व्यवसाय आहे हे मान्य आहे. असे असताना कमिशनच्या बाबतीतच त्याकडे व्यावसायिक दृष्टीने का पाहिले जात नाही, हा खरा प्रश्न आहे. डॉक्टरांनी कोणत्याही चाचण्या करायला सांगितल्या आणि त्याचा सगळा व्यावसायिक फायदा चाचणी केंद्रांना होतो. असे असताना रुग्णाचे नुकसान तर होतेच आणि फायदा मात्र केवळ या केंद्रांना मिळतो. मग यातील हिस्सा डॉक्टरांनी घेतला तर ते चुकीचे आहे असे कसे काय? कट न घेण्याचा फायदा थेट रुग्णाला होणार असेल तर डॉक्टर निश्‍चितच कमिशन घेणार नाहीत. डॉक्टर शिक्षण घेऊन बाहेर पडले, की साधारण ५ ते ७ वर्षांत त्यांचा व्यवसाय स्थिर होतो. अशा वेळी त्यांना व्यावसायिक फी मिळत असताना इतर गोष्टींची फारशी आवश्यकता नसते. तसेच हे निर्बंध घालताना त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होणार आहे का?
- डॉ. जगदीश हिरेमठ (हृदयशल्यचिकित्सक)
 
समाजही तितकाच जबाबदार 
हल्ली सगळ्याच क्षेत्रांत कमिशन घेणे हे सामान्य समजले जाते. दुर्दैवाने मागील काही काळापासून वैद्यकीय क्षेत्राचाही त्यात समावेश झाला आहे. समाजाच्या एकूण आर्थिक स्थितीवर हा बदल अवलंबून आहे. यशाचं मोजमाप पैसा हेच झालं असून, जो डॉक्टर जास्त चांगल्या गाडीतून येईल तो जास्त चांगला, अशी अनेकदा धारणा असते. अशा वेळी त्या डॉक्टरच्या कौशल्याकडे पाहिले जात नाही. तसेच दुसरीकडे रुग्णाच्या डॉक्टरकडून असणार्‍या अपेक्षा वाढत आहेत. कमी पैशात रुग्णांना जास्तीत जास्त सोयीसुविधा हव्या आहेत. मेडिकलच्या शिक्षण पद्धतीपासून यामध्ये बदल करायला हवा. डॉक्टरांना लवकरात लवकर आणि बिनकष्टाचा पैसा मिळविण्याची सवय लावण्यास समाजही तितकाच जबाबदार आहे. जोपर्यंत समाजातील सर्व घटकांमध्ये बदल होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे निर्बंध घातल्यास परिस्थितीत फारसा बदल होईल असे वाटत नाही. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही; पण कोणत्याही व्यवसाय करणार्‍यांना अशा प्रकारचे कमिशन घ्यावे लागणे ही त्या समाजाच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. होणार्‍या परिणामांची सर्वतोपरी जबाबदारी त्यामुळेच त्या समाजाची आहे.- डॉ. वैजयंती पटवर्धन (स्त्रीरोगतज्ज्ञ)
 
(शब्दांकन : पूजा दामले, सायली जोशी)

Web Title: The cutpractices should be avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.