कट प्रॅक्टिस 'कट'

By Admin | Updated: July 12, 2014 15:10 IST2014-07-12T15:10:05+5:302014-07-12T15:10:05+5:30

डॉक्टर म्हणजे खरं तर देवाने धाडलेला दूतच!.. पण या डॉक्टरला एक डाग लागला; कट प्रॅक्टिसचा. मात्र, आता डॉक्टरांचीच शिखर संघटना असलेल्या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने या कट प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. कट प्रॅक्टिसच्या आहारी गेलेल्या डॉक्टरांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या ज्वलंत आणि सामान्यांच्या जीवनाशी निगडित विषयावर वैद्यक क्षेत्रातील जाणकार व प्रख्यात वैद्यकांनी मांडलेली परखड भूमिका

Cut Practice 'Cut' | कट प्रॅक्टिस 'कट'

कट प्रॅक्टिस 'कट'

 - डॉ. ह. वि. सरदेसाई

 
वैद्यकीय व्यवसायाला इंग्रजी भाषेत ‘मेडिकल प्रॅक्टिस’ असे संबोधले जाते. खरे तर प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे. ‘मेडिकल पॅ्रक्टिस’ हा एक व्यवसाय आहे. काही कालावधीच्या सरावानंतर प्राप्त झालेल्या कौशल्याचा रुग्णांना फायदा व्हावा, या हेतूने केलेला तो व्यवसाय असतो. या व्यवसायाकडे एक ‘सोशल ट्रान्झॅक्शन ’ (Social Transactio) या दृष्टीने पाहणे जरूर आहे. या देवाणघेवाणीचे (Transaction) दोन भाग पडतील. असेच दोन भाग इतर अनेक सामाजिक देवाणघेवाणीत असतात; जसे, वक्ता आणि श्रोते, शिक्षक आणि विद्यार्थी, दुकानदार आणि ग्राहक इत्यादी. सामाजिक स्वास्थ्यासाठी दोन्ही गटांत सामंजस्य असावे लागते. एकमेकांच्या रास्त गरजा जाणून त्यांची दखल घेतली गेली पाहिजे; तर समाज स्वस्थ राहील. 
या देवाणघेवाणीतील एक भाग किंवा बाजू म्हणजे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व्यावसायिक (डॉक्टरांचे सहकारी, तंत्रज्ञ, केमिस्ट, हॉस्पिटल, औषधे निर्माण करणार्‍या कंपन्या व त्यांचा स्टाफ) व दुसरा म्हणजे रुग्ण (व त्याचे नातेवाईक). रुग्णांची बाजू रुग्णांचा त्रास जावा या अपेक्षेने डॉक्टरांकडे येते व डॉक्टरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला (यात धनप्राप्ती, सामाजिक प्रतिष्ठा व समाधान व अनुभव प्राप्त होणे यांचा समावेश होईल) मिळावा अशी अपेक्षा असते. रुग्णाला त्याच्या त्रासातून मोकळे करण्यासाठी सल्ला, औषधे, शस्त्रक्रिया इत्यादींचा वापर करावा लागतो. या वापराची निवड करण्यासाठी रुग्णाच्या आजाराचे निदान होणे इष्ट असते. रुग्णाची तपासणी व इतर प्रयोगशाळेतील (Clinical Laboratory) किंवा क्ष किरण वापरून केलेल्या विविध तपासण्या, विविध प्रकारचे स्कॅन्स आणि अधिक अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेणे आवश्यकतेनुसार  गरजेचे पडू शकते. जेथे आवश्यक आहे, तेथे ते करण्याला रुग्णाच्या बाजूने सहकार्य मिळतेच; कारण ते अखेर रुग्णाच्या हिताचेच असते. उपरनिर्दिष्ट वाक्यातील ‘आवश्यक आहे तेथे’ या शब्दसमूहाकडे बारकाईने पाहणे गरजेचे आहे. ही आवश्यकता कोणी व कशी ठरवायची? सर्वोच्च न्यायालयाच्या काही प्रकरणातील निर्णयावरून हा निर्णय कोणी व कसा ठरवायचा याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन होत आहे. मात्र सर्वसामान्य वैद्यकीय व्यावसायिकांच्या बाबत असे मत होईलच असे मला वाटत नाही. उदाहरणार्थ, प्रत्येक ताप आलेल्या रुग्णाच्या किती व केव्हा तपासण्या कराव्यात हे ठरविणे वाटते तेवढे सोपे नाही. डॉक्टरांचा अनुभव आणि प्रचलित आजारांची जाण यावर अवलंबून राहणे आवश्यक पडते. तसे न होता सगळ्या रुग्णांच्या सरसकट सर्व तपासण्या करावयाच्या हे सुज्ञपणाचे होणार नाही हे स्पष्टच आहे. येथे डॉक्टरांच्या व्यावसायिक प्रगल्भतेचा आणि रुग्णाच्या वैद्यकीय व्यावसायिकावरच्या श्रद्धेचा भाग मानला पाहिजे.
आपले डॉक्टर निवडताना डॉक्टरांचे ज्ञान आणि अनुभव यांच्या जोडीला त्यांची रुग्णाबद्दलची कणव आणि रुग्णाची आर्थिक आणि आजाराबद्दलची समज याचे ज्ञानही पडताळता आले तर ही निवड योग्य ठरेल. भारतात विविध पद्धती व प्रथा (पॅथीज) वैद्यकीय उपचारासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक पद्धतीचा पाया व तत्त्वज्ञान वेगवेगळे आहे. एका पद्धतीने केलेले निदान दुसर्‍या पद्धतीतील व्यावसायिकांना समजेल किंवा पटेल असे नाही. त्यामुळे एका पद्धतीचा अभ्यास केलेल्या व्यावसायिकाला दुसर्‍या पद्धतीला अनुसरून केलेले निदान, उपचार व सल्ला समजेल व पटेल असे नाही. ही झाली वैद्यकीय व्यावसायिकांची कथा.
रुग्णांना कोणत्याच पध्दतीचे ज्ञान असण्याची शक्यता कमीच कोणाचे तरी कोणत्यातरी संदर्भात मत ऐकून ज्ञान प्राप्त होत नाही. त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांच्या निर्णयाबद्दल मत प्रदर्शित करणे धाडसाचे होईल. हे जरी खरे असले तरी वैद्यकीय व्यावसायिकांचा हेतू प्रामाणिकच असला पाहिजे याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. 
कट प्रॅक्टिस म्हणजे एका व्यावसायिकाने दुसर्‍या व्यावसायिकाकडून केवळ तपासणी, मत, शस्त्रक्रिया करण्याकरता देवू केलेले धन स्वीकारणे. असा प्रकार कोणत्याही प्रमाणिक व्यक्तीकडून क्षम्य मानला जाणार नाही. असे ज समाजात होत असेल तेथे देणारा आणि घेणारा दोघांनी आपली नैतिकता तपासून घेणे आवश्यक आहे. एकदा अशी पध्दत सुरु झाली की ‘आवश्यक तेथे’ या शब्द समुहाचा अर्थ बदलून जाईल. ‘रुग्णांना बरे होण्याकरता’ असा अर्थ पुसट होत जाईल व तेथे ‘संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांच्या पथकासाठी’ असा अर्थ होईल. रुग्णाचे हितसंबंध गौण व हद्द वागती. वैद्यकीय व्यावसायिकांवरचा विश्‍वास उडेल. वैद्यकीय व्यवसायावरील श्रध्दा डळमळू लागेल ही श्रध्दा रुग्णांच्या दृष्टीने नितांत गरजेची आहे, फायद्याची आहे. औषधोपचारांचा फायदा व्हावयाचा अता तर औषधावर, उपचार पध्दतीवर आणि उपचारकरणार्‍यावर नितांत श्रध्दा असणे फार महत्वाचे ठरते. असा श्रध्देच्या अभावी उपचार योग्य असेल तरी फायदा होत नाही. नोसीबो परिणाम) फायदा न झाल्यास पुन्हा उपचारावर अविश्‍वास आणि त्याचे दुष्परिणाम याचे दुष्टचक्र चालू राहते. 
व्यवसाय आणि व्यावसायिकांवरील विश्‍वास डळमळणे हा जरी या कट प्रॅक्टीसचा सर्वात मोठा तोटा असला तरी अनावश्यक खर्चाचा देखील मोठा तोटा संभवतो. ज्या तपासण्यांची मताची किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता संशयास्पद आहे ती करण्याचा खर्च रुग्णाने का करावा? येथे समाजात असे अपप्रकार घडत असले तर ते निंदनीय आहेत यात शंकाच नाही. चटकन पैसा मिळावा एवढय़ाच हेतूने कोणी व्यावसायिक हे कुकर्म करीत असेल तर ज्याने त्याने त्याच्या मनाचा ठाव पाहणे आवश्यकच आहे. संस्काराची जागा कायदा घेईल किंवा कसे याचा विचार सर्वांनीच करावा. जेथे नीती थांबते तेथे कायदा सुरु होतो. कायद्याची गरज पडणे हे समाजाच्या प्रतिष्ठा देत नाही. रुग्ण आणि वैद्यकीय व्यावसायिक यातील संबंध आत्मीयतेचे असावेत, हे केवळ संस्कारातून शक्य आहे. जेथे आत्मियता संपते तेथे नीतीची मूल्ये कार्यवाही होतात आणि आताच म्हटल्याचे जेथे नीती संपते तेथे कायदा सुरु होतो.
शेवटी, नीतिमत्ता जोपासणे ही समाजाच्या एकाच घटकाची जबाबदारी नसते. संपूर्ण समाज नीतीला मानेल तर त्यामुळे घटक नीतीने वागतील. वैद्यकीय व्यावसायिक आपल्याच समाजाचे घटक आहेत. समाजातील व्यवहार जितक्या नीतीने चालतील तेवढय़ाच नीतीच्या पातळीवर वैद्यकीय व्यवसाय चालेल हे प्रत्येक समाजघटकाने जाणले पाहिजे. प्रत्येक व्यवहाराला नीती ही कसोटी लागली पाहिजे. प्रत्येक घटात नीतीचे धडे दिले गेले पाहिजेत. कट प्रॅक्टिस थांबविण्यासाठी कायदा आवश्य करावा पण तो मार्ग कट प्रॅक्टिस थांबविण्यात पुरेसा पडेलच असे मानण्याचे वाटत नाही. कायदा करावा पण तो पाळण्याची सक्ती करण्याचा प्रसंग न आला तर बरा. या साठी सर्वत्र नीतीमत्ता प्रचलीत हवी. अशी नीतीमत्ता आणि आत्मियता सर्वत्र जोपासली जावो, अशी प्रार्थना करतो.
(लेखक वैद्यक क्षेत्रातील ज्येष्ठ जाणकार, जनरल फिजिशियन असून 
महाराष्ट्र अँकेडमी ऑफ सायन्सचे फेलो आहेत.)

Web Title: Cut Practice 'Cut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.