संकट शरण
By Admin | Updated: January 10, 2015 13:10 IST2015-01-10T13:10:31+5:302015-01-10T13:10:31+5:30
माणसे जितकी घाईत, अर्थसत्तेने जितकी संपन्न, राजसत्तेने जितकी प्रबल आणि स्वभाव-वृत्तीने जितकी बेदरकार, तितकी मनातून धास्तावलेली, न सुटणार्या प्रश्नांनी पिचलेली आणि हतबल असतात की काय? नाहीतर मन:शांतीसाठी पैसे मोजायला तयार असणार्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढतेच आहे, याला काय म्हणावे?

संकट शरण
त्र्यंबकेश्वर हे तीर्थाचे क्षेत्र. नाशिकपासून या गावापर्यंत जाणारा २८ किलोमीटरचा रस्ता काही महिन्यांपूर्वीपर्यंत जुन्या, प्राचीन वृक्षांच्या सावलीने आच्छादलेला होता. पण आता सहा महिन्यांवर आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातले साधू-महंत आणि भाविकांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी ही सारी झाडे तोडून विकासाचा घाट घातलेला आहे. तेव्हा रस्ता रुंदीकरणाचे खड्डे वाटेत लागतील.
गावात वाहन पार्क केलेत की (तुमचा एजंट बरोबर असला तरी) तीन-चार लोक तरी येऊन चिकटतीलच.
‘क्या शिवजी का दर्शन करना है?’ अशी राष्ट्रभाषेतली विचारणा प्रवेशद्वारापासूनच सुरू होईल.
मग तुमच्याबरोबरचा एजंट बाकी सगळ्यांना हाताने वारून देईल आणि तुम्ही एका अनाकलनीय, अजब अशा गुहेत प्रवेश कराल.
गोदावरीला जन्म देणार्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीतले त्र्यंबकेश्वर हे इटुकले गाव. लोकसंख्या बारा हजारांच्या आसपास. परंतु गावात होणारी उलाढाल कोट्यवधी रुपयांची. गावाचा महिमाच असा की, त्याला भक्कम पौराणिक अधिष्ठान लाभलेले आणि इथले अर्थकारण मात्र थेट देश-विदेशातून येणार्या श्रद्धाळू भक्तांशी बांधलेले.
त्र्यंबकेश्वरी पुरोहितांची सुमारे २५0 ते ३00 घरे आहेत. पौरोहित्य हा त्यांचा पिढीजात व्यवसाय. गावात टॅक्सी-रिक्षाने भाविकांना घेऊन येणार्या चालकांपासूनच गावातील अर्थकारणाला प्रारंभ होतो.
पावणेदोन कि.मी. क्षेत्रात वसलेल्या त्र्यंबकेश्वरात पाऊल ठेवले की जगच जणू बदलते. कुशावर्त ते त्र्यंबकराजाच्या मंदिराच्या टापूत असलेल्या घर-वाड्यांतून वेदमंत्रांचा जयघोष कानावर पडू लागतो. येथे नारायणबली-नागबली, कालसर्प, त्रिपिंडी आदि विधींच्या माध्यमातून वर्षाकाठी करोडो रुपयांची उलाढाल होते. अनेकांच्या उपजीविका त्यावर चालतात.
त्र्यंबकेश्वरी पोचलात की, मध्यस्थ पुरोहितांकडे जाण्याची वाट दाखवतात. आधीच अपॉईंटमेंट ठरली असली, तर प्रश्नच मिटला. मग सुरू होते यात्रा- पापमुक्तीची. संकटमोचनासाठीच्या धर्मकृत्यांची.
नारायण नागबली हा तीन दिवसांचा विधी. रोज साधारण अडीच तासांचे काम असते. त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्प शांती हे विधीही अडीच-तीन तास असे एकाच दिवशी होतात. हे तीनही विधी वेगवेगळे. त्यामुळे ज्या व्यक्तीला दोष आहे, त्या प्रत्येकाला वेगवेगळा विधी करावा लागतो.
पहिल्या दिवशी पहाटे उठून थंडगार पाण्याचे गोदास्नान. पुरोहिताने गवताची पाती असलेल्या दर्भाची मुंदी (अंगठी) यजमानाच्या बोटात अडकवली, की हळूहळू श्रद्धेची वळसे चढत जातात. या एका भावनेभोवतीच शेकडो वर्षांपासून त्र्यंबकेश्वरनगरीचे अर्थकारण फिरते आहे. प्रत्येक पुरोहिताकडे कमी-अधिक फरकाने मुहूर्ताच्या तिथींना एकाचवेळी सामूहिक पद्धतीने १00 ते १५0 विधी चालतात. देशातील विविध प्रांतांतून विशेषत: शहरी भागातून याठिकाणी लोक विधीसाठी येतात. संकटनिवारणासाठी येणार्या या गर्दीत फाटका माणूस दिसणे विरळाच. त्यात बड्या राजकारण्यांपासून ते उद्योगपती, जुन्या संस्थानांचे माजी राजे-रजवाडे ते थेट अगदी बॉलिवूडमधल्या तारे-तारकाही असतात.
आपल्या व्यक्तिगत सुख-दु:खांवर आकाशातील ग्रह-तार्यांचा, आपल्या ग्रहस्थितीचा अगर गतजन्मीच्या हिशेबांचा काही संबंध असतो असे मानणार्या प्रत्येकच व्यक्तीचे कनेक्शन कुणातरी ज्योतिषाशी जोडलेले असतेच. त्यामुळेच त्र्यंबकेश्वरीच होणारे हे विधी आणि त्याभोवती फिरणारे अर्थकारण यात ज्योतिषांचे महत्त्व मोठे. हे विधी काही व्रतवैकल्यांशी जोडले जाणारे नाहीत. त्यामुळे स्वेच्छेने त्या मार्गाला जाणारे विरळच. त्रासात सापडलेली व्यक्ती संकटनिवारणाच्या मार्गांच्या शोधात कुणा ज्योतिषाच्या आश्रयाला जाते, तेव्हाच संकटनिवारणाचे प्रिस्क्रिप्शन म्हणून हे विधी सुचवले जातात. त्यामुळेच गावोगावी असलेले ज्योतिषी आणि त्र्यंबकचे पुरोहित यांच्यातील लाग्याबांध्यांची गेला काही काळ चालू असलेली दबक्या आवाजातली चर्चा आता आणखी जोर धरते आहे.
नारायणबली आणि नागबली हे विधी केवळ त्र्यंबकेश्वरीच होतात, असा दावा करणार्या येथील पुरोहितांनी आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ काही धर्मग्रंथांतून तसे आधारही शोधून ठेवले आहेत.
या विधींसाठी पूर्वापार लोक येथे येतात. परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षांत येथे वाढलेली भाविकांची गर्दी अचंबित करणारीच आहे. पूर्वी महिन्याकाठी नागबली-नारायणबलीचे साधारणत: ३0 ते ४0 विधी व्हायचे, त्यांची संख्या आता हजाराच्या आसपास जाऊन पोहोचली आहे. नारायणबली-नागबली, कालसर्पादि विधींचा इंटरनेटसह अन्य माध्यमांतून होणारा प्रसार व प्रचार यापाठीमागचे प्रमुख कारण असले, तरी समाजात वाढलेली असुरक्षितता आणि त्यातून उद्भवणार्या भयगंडाने पछाडलेली माणसे स्वत:हूनच या विधींकडे खेचली जात आहेत.
त्र्यंबकेश्वरी अलीकडे या विधींचे व्यावसायिकीकरण झाल्याची कबुली काही बुजुर्ग पुरोहित खासगीत देतात. त्र्यंबकेश्वरी होणार्या विधींना आलेले पॅकेजचे स्वरूप आणि या विधींभोवती फिरणारे गावातील अर्थकारण याचा धांडोळा घेतला, तर कर्मकांडावर आधारित एक इंडस्ट्रीच उभी राहिलेली दिसते. या विधींच्या हेतूंबाबत अनेक शंका-कुशंका घेतल्या जातात; परंतु या विधींमुळे गावात आणि पंचक्रोशीतील अनेकांच्या हातांना रोजगार मिळाला आहे, हे वास्तव मात्र नाकारता येणार नाही.
उलाढाल कोट्यवधींची, पण ती एका विशिष्ट गटाशी संबंधित असल्याने यात्रेकरूंच्या गर्दीचा भार पेलून मेटाकुटीला आलेले गाव मात्र बकाल. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे साडेसहा कोटी रुपये इतके(च) आहे. बारा वर्षांनी येणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त जो काही निधी मिळेल त्यावरच उभे राहिलेले काही विकासाचे प्रकल्प एवढाच गावाचा आधार.
गावात लक्ष्मी गोदेच्या पाण्यासारखी धो-धो वाहते आहे. पण गावातील अहल्या-गोदा संगम ते कुशावर्त आणि त्याभोवतालचा परिसर सोडला तर गावठाणचा भाग विकासापासून कोसो दूर आहे.
काळानुरूप व पिढीगणिक बदलणारे त्र्यंबकेश्वरचे अर्थकारण जितके अनाकलनीय, तितकाच या गावातून फिरताना दिसणार्या यात्रेकरूंच्या गर्दीचा चढता आलेख. माणसे जितकी घाईत, अर्थसत्तेने जितकी संपन्न, राजसत्तेने जितकी प्रबल आणि स्वभाव-वृत्तीने जितकी बेदरकार, तितकी मनातून धास्तावलेली, हतबल असतात की काय, अशी शंका त्र्यंबकेश्वरातले हे चित्र पाहून कुणाही विवेकी माणसाला यावी.
आता पुरोहितांची नवी, टेक-सॅव्ही पिढीही या पिढीजात व्यवसायात उतरली आहे. वेबसाइट्स आणि ऑल पेड फॉर पॅकेजेस या याच पिढीने शोधलेल्या क्लृप्त्या आहेत. त्यातल्या अनेकांना ना शास्त्राधारांशी काही घेणे, ना विवेक-अविवेक, श्रद्धा-अंधश्रद्धांच्या चर्चा-आखाडे लढवण्यात काही स्वारस्य! त्यांच्या द्ृष्टीने हा एक खात्रीचे उत्पन्न मिळवून देणारा चोख व्यवसाय आहे आणि मन:शांतीसाठी पैसे मोजायला तयार असलेले लोक हे ग्राहक! दिवसागणिक वाढत जाणारी ही श्रद्धेची बाजारपेठ नव्या जगाच्या नियमांनुसारच चालते. त्यात लोभात पाडणारी आमिषे आहेत, अशी आमिषे देणार्यांच्या विरोधात लढणार्या विचारधारा आहेत आणि स्वत:च्या पायाने त्या चक्रात अडकणारे ग्राहकही!
‘‘माणसे स्वत:हून हे विधी करायला येत असतील, तर त्यात आमचा काय दोष? केरळमध्ये निसर्ग पर्यटनाला जाणार्यांना सेवा पुरवतात, त्यांना तुम्ही हटकता का? - आमचेही तसेच आहे. मी उत्तम सेवा देईन आणि त्यातून कमाई करीन.’’ - हे एका तरुण पुरोहिताचे उद्गार सारेच काही सांगून जाणारे आहे. संकटांपायी श्रद्धेला शरण गेलेल्यांची वाढती वर्दळ असणार्या या गावात सारे सुरळीत सुरू आहे. आमीरचा पीके नावाचा सिनेमा पाहिलेली आणि तो आवडल्याचे सांगणारी माणसे हातात मुंदी घालून कालसर्प योगाच्या विधीसाठी घाईने जाताना दिसतात. या दोहोत काही विसंगती आहे, हे त्यांच्या गावीही नसते.
- शास्त्राधाराच्या चर्चा आणि जीवनातल्या संकटप्रसंगी विवेकाने निर्णय करण्याची आर्जवे आहेत ती या गावाच्या वेशीबाहेर!
ज्योतिषी विरुद्ध पुरोहित : एक नवा सामना
नारायणबली- नागबली, कालसर्प आदि विधींना काहीही शास्त्राधार नसून ते निव्वळ थोतांड असल्याचा घणाघात करत काही ज्योतिषीच पुढे येऊ लागले आहेत. नुकत्याच झालेल्या ज्योतिष परिषदेत ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासकाने त्यावर टिपणी केल्याने मोठे वादळ उठले. ज्योतिषांच्या मते, कुणाच्याही पत्रिकेत असणारा कालसर्पयोग (राहू आणि केतू कुण्डलीतील एकाच घरात स्थिर असणे) हा केवळ अनिष्ट फळ देणारा नसून तो उत्कृष्ट फळ देणाराही आहे. अनेक शुभ योगांनी युक्त असलेल्या पत्रिकांकडेही केवळ कालसर्प योगामुळे संशयाने पाहिले जाते. शांतीच्या नावाखाली सामान्य माणसांची पिळवणूक केली जाते. ज्योतिषांच्या या मतांना पुरोहितांचा अर्थातच तीव्र विरोध आहे. त्यावरून चाललेले वाद हिंसक वळणे घेतानाही अलीकडे दिसले आहेत.
काय आहे नारायण-नागबलीचा विधी?
‘गोदावर्या कुशावर्ते त्रिसंध्या क्षेत्र भूमीषु। पीडानां परिहारार्थ कार्यो नारायण बली:।।’ हा श्लोक स्कंद पुराणात आहे. पापांतून-शापांतून मुक्ततेसाठी त्र्यंबकेश्वरी ग्रहशांती, नारायणबली, नागबली यांसारखे विधी करावेत, याचा हा शास्त्राधार असल्याचे शास्त्री-पुरोहित सांगतात. नारायणबली आणि नागबली हे दोन्ही विधी स्वतंत्रपणे किंवा एकत्रही करता येतात. पिडेच्या स्वरूपावरून ते ठरविले जाते. पूर्वजन्मात व्यक्तीच्या हातून सापाची वा नागाची हत्त्या झाली असेल, तर त्याच्या शापाने पुत्रसंतती होत नाही, यासाठी नागबली हा विधी धर्मशास्त्राने सांगितल्याचे पुरोहित सांगतात. त्यामध्ये विष्णू श्राद्ध, नाग दहन आदि विधींचा समावेश असतो. विधीच्या काळात उपवास, सुतक पालन सांगितलेले आहे. तिसर्या दिवशी ब्राह्मण भोजन आणि दक्षिणा दानाने पूजेची सांगता होते. विधी समाप्तीनंतर सुवर्ण नागाचे दान करावे, असा संकेत आहे.
त्र्यंबकेश्वर डॉट कॉम
त्र्यंबकेश्वरी भिक्षुकी-पौरोहित्य करणे ही मागच्या पिढीची अपरिहार्यता असावी; परंतु आताच्या पिढीने त्याला प्रोफेशनल टच दिला आहे. त्र्यंबकेश्वरी घरटी पौरोहित्याचा व्यवसाय चालत असला, तरी कुटुंबात उच्चशिक्षितही आहेत. कुणी आयएएस, तर कुणी इंजिनिअर झालेले आहेत. उच्चशिक्षित असूनही कुटुंबातील काही सदस्यांनी आपला पारंपरिक पौरोहित्याचा व्यवसाय सोडलेला नाही. या नव्या पिढीनेच आता विधींना हायटेक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. इंटरनेटवर विधी व गुरुजींसंबंधी माहिती देणारी अनेक संकेतस्थळे (वेबसाइट्स) उपलब्ध आहेत. काही संकेतस्थळांवर गुरुजींकडे विधीसाठी येऊन गेलेल्या बड्या राजकीय नेत्यांचीही छायाचित्रे अपलोड करण्यात आलेली आहेत. पूर्वी पुरोहिताच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मोडी लिपीतील फलकाची जागा ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम’ अशा नव्या पाट्यांनी घेतली आहे.
पिंडांच्या पाट्या, सुपल्या आणि गोवर्या
श्राद्धविधीसाठी भाताचे पिंड बनविण्याचे कंत्राट देण्यात येते. अहल्या-गोदा संगमावर असलेल्या धर्मशाळेत पिंडदानादि श्राद्धविधी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पाडले जातात. याठिकाणीच पिंडांच्या पाट्या गरजेनुसार पुरोहितांना पुरविल्या जातात. गावातीलच मातंग समाज सुपल्या पुरवतो. आजूबाजूचे आदिवासी गोवर्या विक्रीसाठी घेऊन येतात आणि धर्मशाळेच्या आवारातच पाच गोवर्यांचा वाटा करून ठेवला जातो. त्यातून आदिवासींना दिवसभरात किमान दोनशे ते अडीचशे रुपयांची कमाई होते.
दर्भाच्या गवताचे पवित्र भारे
नारायणबली-नागबली हा विधी प्रामुख्याने स्मशानविधी आहे. ऋग्वेदात देव व ऋषींचे आसन म्हणून दर्भाच्या गवताचा वापर केल्याचे सांगितले आहे. दर्भ हा गवताचा एक प्रकार असून, त्याला पांढरे तुरे येतात आणि खालच्या भागाचा धार्मिक विधीसाठी वापर केला जातो. त्र्यंबक परिसरातील आदिवासी दर्भाच्या गवताचे भारे पुरोहितांना विक्रीसाठी घेऊन येतात. विधीला बसताना भाविकाच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात दर्भाची आठच्या आकाराची मुंदी (अंगठी) तयार करून बसविली जाते. त्यामुळे संपूर्ण विधी पवित्र होतो, अशी धारणा आहे.
तीनशे किलो सुपार्या, अडीचशे पोती नारळ
त्र्यंबकेश्वरी किराणा मालाची सुमारे चाळीस दुकाने आहेत. या दुकानांमधून महिन्याला सुमारे ३00 किलो सुपार्या आणि सुमारे २५0 पोती नारळांची विक्री होत असते. गंगापूजनासाठी एक नारळ आणि पाच सुपार्या लागतात. त्यामुळे प्रत्येक किराणा दुकानात प्रामुख्याने नारळ-सुपार्यांची मागणी हमखास ठरलेली असतेच. मुहूर्तांच्या दिवशी शेकड्यांनी होणार्या विधींसाठी गव्हाचा आटा आणि तांदळाच्या कण्या यांचीही मोठय़ा प्रमाणावर विक्री होते. सर्वसाधारपणे एका दुकानातून महिन्याला ५0 ते ६0 कट्टे आटा आणि २५ ते ३0 कट्टे तांदळाच्या कण्यांची विक्री होते.
सोन्याच्या नागांचे रांजण
नारायण-नागबलीच्या विधीसाठी सव्वा ग्रॅम सोन्याचा नाग आवश्यक मानला जातो; परंतु यजमानाच्या आर्थिक कुवतीनुसार यथाशक्ती सुवर्णनाग आणण्याची सूचना पुरोहित करत असतात. अलीकडे पुरोहितांनीच स्वत:कडील सुवर्णनागाची प्रतिमा यजमानांना पॅकेजमध्ये देऊ केल्याने सराफांकडे खरेदीदारांची गर्दी कमी झाली आहे. गावातल्या काही घरांमध्ये सुवर्णाच्या नागांचे रांजण भरलेले असल्याचे सांगतात.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर : संकटमुक्तीचे मार्ग शोधत देश-विदेशातून येणार्या गर्दीचे अनाकलनीय आणि ‘ऑनलाइन’ विश्व
अर्थकारण :
नारायणबली-नागबली, त्रिपिंडी श्राद्ध आदि विधींसाठी त्र्यंबकेश्वरी तीन दिवस मुक्काम ठोकावा
लागतो. देशभरातून आणि आता तर परदेशातूनही येणार्या या भाविकांच्या पूजाविधींपासून खाण्या-पिण्याच्या-राहण्याच्या सोयी, प्रवास आणि मनोरंजनाच्या गरजा याभोवतीच या गावाचे अर्थकारण फिरते.
अन्न :
पंजाबी, गुजराथी, चायनीज, महाराष्ट्रीयन म्हणाल त्या स्वादाचे अन्न गावात गल्लोगल्ली मिळते. शिवाय पुरोहितांच्या घरीही यजमानांच्या भोजनाची व्यवस्था होते. त्यासाठी खास आचारी, स्वयंपाकी यांना भोजनाची कंत्राटे दिली जातात. पुरोहितांच्या घरची भट्टी रोजच तापलेली असते.
वस्त्र :
प्रत्येक विधीसाठी नवे वस्त्र आणण्यास सांगितले जाते. बव्हंशी भाविक सोबत ओझे न नेता गावातच वस्त्रांची खरेदी करतात. त्यामुळे गावात कापड दुकानांचीही चलती आहे.
निवारा:
पुरोहितांनी आपल्या घर-वाड्यांनाच लॉजिंगचे स्वरूप दिले आहे. विधीच्या दक्षिणेव्यतिरिक्त आलेल्या यजमानांकडून खोलीचे भाडे वसूल केले जाते. शिवाय धर्मशाळा आहेतच. धनवंत यजमानांसाठी जवळच्याच नाशकातल्या पंचतारांकित व्यवस्था उपयोगी पडतात.
dhananjay.wakhare@lokmat.com