रंगीत माणसे.
By Admin | Updated: January 23, 2016 14:56 IST2016-01-23T14:56:06+5:302016-01-23T14:56:06+5:30
वाढत्या वयात वेश्या, गुंड आणि ठेवलेल्या बायका या तीन शब्दांबद्दल मला एक न संपणारी आसक्ती होती. या शब्दांचे अर्थ मला माहीत होते, पण त्यांच्याशी भेट कधी झाली नव्हती. आपल्या आजूबाजूला असे कुणी का नाही? ते असे का करतात? कितीतरी प्रश्न विचारायचे होते मला. त्यांची वाट पाहणो सोडले तेव्हा ही माणसे आपोआप येऊन भेटली.

रंगीत माणसे.
- सचिन कुंडलकर
वेश्या, गुंड आणि ठेवलेल्या बायका या तीन शब्दांबद्दल मला वाढत्या वयात एक न संपणारी आसक्ती होती. कारण मी ज्या वातावरणात वाढलो तिथे या तीनही शब्दांचे अर्थ माहीत असूनही, त्याचे प्रत्यक्ष क्रि येत रूपांतर करणा:या व्यक्ती मी कधी पाहिल्या नव्हत्या. हिजडा हा अजून एक शब्द होता. पण मी रस्त्यावर पुरेसे हिजडे पाहिले होते. रिक्षाने इथेतिथे जाताना सिग्नलला ते येऊन गाणी म्हणत आणि माङो गाल कुस्करून आईकडून दोन पाच रुपये नेत. तेही शुद्ध मराठीत बोलून. आमच्या इथला एक हिजडा तर चक्क ‘हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे’ हे गाणो म्हणत असे. आमच्या शाळेत आम्ही ‘हिजडा असणो’ म्हणजे नक्की काय यावर तासन्तास चर्चा करून स्वत:च्या गोंधळात भर पाडली होती. पण वेश्या, गुंड आणि ठेवलेली बाई यांची काही केल्या भेट घडत नव्हती.
हिंदी सिनेमामध्ये वरील कामे करणा:या तीनही व्यक्ती सतत भेटत. पण आपल्या आजूबाजूला असे कुणी का नाही? किती प्रश्न विचारायचे होते मला. का करता? कसे करता? कसे वाटते? मी तेव्हा अनिल अवचट यांची पुस्तके वाचून फार भारावून गेलो होतो आणि फार प्रश्न विचारणारा मुलगा बनू लागलो होतो. कारण तेव्हा आमच्याकडे माहिती मिळवायला गूगल नव्हते. माङया एका आजीला मी एकदा भर चैत्रगौरीच्या हळदीकुंकवात, ‘आजी, आईला कावळा शिवलाय म्हणजे काय झाले आहे?’ असे मोठय़ांदा विचारून तिच्या तोंडाला फेस आणला होता. कारण त्या दिवशी आई बाजूला बसून होती आणि कशालाही शिवत नव्हती.
आमच्या समोरचे ज्ञानेश्वरकाका गुंड आहेत असे घरात बोललेले मला कानावर पडे. पण ते माङयाशी फार प्रेमाने वागत. सतत टापटीप कपडय़ात असत आणि त्यांच्या पानाच्या टपरीसमोरून गेले की ते मला नेहमी लवंग वेलदोडे खायला देत. ते गुंड असतील यावर माझा विश्वास बसत नसे. पण ते खरंच होते म्हणो. त्यांनी दोन खून पचवले होते. आणि असा माणूस आपल्याला लवंग वेलदोडे देतो याचे मला फार भारी वाटे. पण तरीही माङयासाठी ते गुंड नव्हते. खरा गुंड म्हणजे तेजाबमधल्या अनिल कपूरसारखा. ज्ञानेश्वरकाकांच्या हाताखाली काम करत असणार असे अनिल कपूरसारखे लोक. त्यांच्यात माझी ऊठबस, जमल्यास थोडे लवंग वेलदोडे - चहा गप्पा असे काही होतच नव्हते. फार रटाळ सपक बालपण चालूच होते.
वेश्या मला पहिल्यांदा दिसल्या त्या लक्ष्मी रस्त्यावर, आईसोबत कापड खरेदीला गेलो तेव्हा. सिटीपोस्टाचा चौक लागला की आमच्या शहराच्या हवेतले रंग आणि वास बदलू लागत. पाच मिनिटावर असणा:या आमच्या सदाशिव पेठेपेक्षा पूर्ण वेगळे. गजरेवाले, भेळवाले, अत्तरे विकणारी दुकाने, त्या तसल्या फिल्म दाखवणारे श्रीकृष्ण टॉकीज, उकडलेली अंडी विकणारे फेरीवाले. तो भाग जवळ येऊ लागला की आई माझा हात घट्ट धरून ठेवी आणि त्या भागातून झपझप चालत असे. तिथे त्या उभ्या असत. रस्त्याच्या दुतर्फा. तोंड भडक रंगवलेल्या. आत बुधवार पेठेत त्यांची मोठी वस्ती होती. आई पुढे खेचून नेत असताना मी मागे वळून त्यांच्याकडे पाहत राही. मला फार भेसूर आणि भयंकर काहीतरी वाटत असे.
मी विचारलेल्या कोण्याही प्रश्नाला उत्तर देणो माझी आई टाळत नसे. मला कसलाही संकोच वाटू नये याची ती काळजी घेत असे. ‘त्या बायका आहेत म्हणून आज शहरातील आमच्यासारख्या बायांची आयुष्यं सुखरूप आहेत. त्या नसत्या तर विचार कर, पुरु षांच्या भुका त्यांनी आमच्यासारख्या बायकांवर भागवायला सुरु वात केली असती’ - तिने मला सगळे शांतपणो आणि स्पष्ट सांगितले. ‘त्या बायका फार दुर्दैवी असतात. त्या ख:या देवासारख्या आहेत’ - आई शांतपणो म्हणाली. मीरा नायरचा ‘सलाम बॉम्बे’ हा सिनेमा मी आणि आईने टीव्हीवर एकत्र पाहिला. त्यानंतर काही वर्षांनी सुमित्र भावे ‘जिंदगी जिंदाबाद’ हा एड्सवरील चित्रपट करत असताना मी सहायक होतो आणि एक संपूर्ण दिवस बुधवार पेठेत वेश्यांनी बजबजलेल्या एका इमारतीत आम्ही शूटिंग करत होतो. त्या दिवशी मला जे दिसले त्यामुळे माङयातला पेठेतला पुणोकर मरून जायला मला मदत झाली. माङो सर्व प्रश्न उत्तरीत झाले. आणि मी आपण सोवळे, जग ओवळे या मानसिकतेतून कायमचा बाहेर आलो. मी त्या दिवशी नरक म्हणजे काय याचा अनुभव घेतला. अशा जागी जाऊन कुणाला शारीरिक तृप्ती कशी मिळत असेल? मला तिथल्या लहान लहान मुली पाहून गोठून गेल्यासारखे झाले. आई कस्टमरसोबत आत गेल्यावर बाहेर खेळत बसणा:या.
ठेवलेल्या बायका मला दिसायला आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कयायला जरा वेळ लागला. पण मी ज्या ज्या ठेवलेल्या बायकांना भेटलो त्या सगळ्या मजेत, गुबगुबीत असलेल्या बायका होत्या. हिंदी सिनेमात अशा बायकांना ‘रखेल’ म्हणतात आणि त्या संसार उद्ध्वस्त करतात अशी त्यांची ठरलेली प्रतिमा माङया मनात होती. पण मी अशा ज्या बायकांना भेटलो त्या बायका फारच स्वावलंबी, हुशार आणि कर्तृत्ववान होत्या. आमच्या कुटुंबातल्या काही पुरु षांनी, काही मित्रंनी ठेवलेल्या बायकांना मला भेटायचा योग आला. पण मला वाटत होते तितक्या या काही दु:खी बायका नव्हत्या. त्या कितीतरी श्रीमंत होत्या. केवळ सोबत आणि प्रेम असावे म्हणून त्यांनी दुय्यम जागेचे हे नाते स्वीकारून आयुष्याशी तडजोड केली होती. एकदोन ठिकाणी तर मला हे दिसले की त्या पुरुषाच्या कुटुंबाने त्यांना काळासोबत मूकपणो स्वीकारलेदेखील आहे. त्यांना अदृश्य ठेवले जाते, त्यांचे उल्लेख टाळले जातात; पण त्या बायकांना कुटुंबाच्या वेशीवर का होईना, एक जागा दिली गेलेली असते.
मी एकदा पॅरिसमध्ये माझा क्लास संपवून मित्रच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो. एका छोटय़ा कॅफेमध्ये त्याचे दहा-बारा मित्र जमलेले. एका मुलीने संत्र्याची साल घातलेला त्याचा आवडता केक बनवून आणलेला. जेवताना गप्पा मारत होतो तेव्हा ती मला शांतपणो म्हणाली, मी वेश्या आहे. मी पोटापाण्यासाठी ते काम करते. माझा चमचाच खाली पडला. ती म्हणाली, त्यात काय आहे लाजण्यासारखे? ते माङो काम आहे. मी काहीतरी नवीन शिकून, कायमचा नवा जॉब मिळेपर्यंत हे काम करतीये. मग सोडून देईन. मी माङया मित्रकडे पाहून तिला विचारले, त्याला हे माहिती आहे? ती म्हणाली, हो. तो माझा जवळचा मित्र आहे. ऑफकोर्स त्याला हे माहिती आहे. तिने तो विषय तिथे सहज सुरू झालेला तिथेच शांतपणो संपवला. कारण तिच्या दृष्टीने त्यात अजून काही बोलण्यासारखे नव्हते. ती फोटोग्राफीचा अभ्यास करत होती. ती भारतात येऊन गेली होती. तिला गाणो शिकायचे होते. आणि निदान सहा मुलांना मी जन्म देणार आहे असे ती म्हणाली. तिला आई व्हायचे होते.
नाशिकला एकदा माङया भावासोबत एका ठिकाणी मिसळ खायला गेलो असता त्याच्या एका मित्रने बेसिनपाशी जाऊन हात धुताना खिशातले रिवॉल्व्हर बाहेर काढून पुन्हा आत नीट खोचून ठेवले. मी गप्पगार. आम्ही गेला अर्धा तास केवढय़ा गप्पा मारलेल्या आणि हसलेलो. तो आत्ताही हसत होता आणि मी वेगळ्याच तंद्रीत. गुंड आहे हा! भेटलाच शेवटी आपल्याला! वाह. मला फार म्हणजे फारच बरे वाटले. आपण वाट पाहणो सोडले तेव्हा जगातली ही रंगीत माणसे आपोआप येऊन भेटली की आपल्याला.
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com