शुल्लक निमित्त, क्षुब्धित वडवानल
By Admin | Updated: July 5, 2014 14:49 IST2014-07-05T14:49:15+5:302014-07-05T14:49:15+5:30
तब्बल साडेचार वर्षे चाललेल्या पहिल्या युरोपीय महायुद्धात ९0 लाख सैनिकांची आहुती पडली. त्याचे मूळ कारण मात्र अत्यंत क्षुल्लक असे होते. विसाव्या शतकाच्या आरंभीच्या आर्थिक महासत्तांची ही खेळी होती. पहिल्या महायुद्धाला कारण ठरलेल्या घटनेच्या शताब्दीनिमित्त त्या इतिहासाला उजाळा..

शुल्लक निमित्त, क्षुब्धित वडवानल
- शशिकांत पित्रे
विश्वातील गंभीर गंडांतरांचे मूळ अत्यंत क्षुल्लक प्रसंगात दडलेले असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑस्ट्रिया-हंगेरीचे राजपुत्र आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनांड यांच्या २८ जून १९१४ ला झालेल्या शिरकाणावरून भडकलेला पहिल्या महायुद्धाचा वडवानल. तब्बल साडेचार वर्षे चाललेल्या या प्रामुख्याने युरोपीय महायुद्धात ९0 लाख सैनिकांची आहुती पडली. विसाव्या शतकाच्या आरंभीच्या आर्थिक महासत्तांची ही खेळी होती. एका बाजूला इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया ही दोस्त राष्ट्रे (अलाइज) आणि दुसर्या बाजूला र्जमनी, ऑस्ट्रिया, हंगेरी या केंद्रवर्ती सत्ता (सेंट्रल पॉवर्स) नंतर इटली, जपान आणि अमेरिका हे देश दोस्त राष्ट्रांना मिळाले, तर ओस्मानी साम्राज्य (ऑटोमन एम्पायर) आणि बल्गेरिया हे विरुद्ध पक्षात सामील झाले. या युद्धात ७ करोड सैनिकांनी भाग घेतला, त्यातील ६ करोड युरोपीय होते.
या युद्धात रणगाडा, लढाऊ विमाने, मशीनगन आणि क्रूझर युद्धनौकांसारखी भयानक शस्त्रास्त्रे रणांगणावर प्रथमच अवतरली. त्यांच्यामुळे युद्धाचे स्वरुपच कायमचे पालटून गेले. हॅप्सबर्गच्या राजघराण्याचे वारस फ्रान्झ यांनी राजघराण्याच्या रुढीविरुद्ध सोफी शोटेक या सौंदर्यवतीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. सोफी ही उच्च राजघराण्यातील नव्हती, ती एका सरदाराची कन्या होती. त्यामुळे राज्यपदाची वारसदार ठरू शकणार नव्हती; परंतु सोफीलाही राजसन्मान प्राप्त नव्हता. २८ जून १९00 ला फ्रान्झ आणि सोफी यांचा विवाह झाला. सोहळा अगदी साधा व हर्षोल्हासविरहित होता. स्वामिनिष्ठ राजसत्तावाद्यांच्या मनात मात्र पाल चुकचुकत होती. त्यांना तो अपशकून वाटला. त्यांची अभद्र वाणी खरी ठरली. बरोबर चौदा वर्षांनी याच मुहूर्तावर फ्रान्झ फर्डिनांड आणि त्याची पत्नी मृत्यूच्या वेदीवर चढणार होते. एवढेच नव्हे, तर लाखो सैनिकांच्या बलिदानाला कारणीभूत ठरणार होते.
बोस्निया आणि हर्सेगोविना हे तुर्की मालकीचे देश १८७८ पासून हॅप्सबर्ग साम्राज्याच्या व्यवस्थापनाखाली होते. त्याचे बहुसंख्य नागरिक दक्षिण स्लाव, सर्ब आणि क्रोट जमातीचे होते. त्यांना सर्बियामध्ये सामील व्हायचे होते. १९0८ मध्ये दोन्ही देश ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्यात बळेच विलीन केले गेल्यावर त्यांचा असंतोष आणखीनच वाढला. तरुणांच्या बंडखोर संघटनांनी सरकारच्या प्रतिनिधींची हत्या करण्याचे सत्र हाती घेतले; परंतु त्यात त्यांना फारसे यश प्राप्त झाले नाही. अचानक आर्चड्यूक फ्रान्झ यांच्या बोस्निया भेटीची बातमी पोहोचली. आर्चड्यूक पत्नीबरोबर ऑस्ट्रियाच्या राजधानी व्हिएन्नामध्ये राजसमारंभावेळी उजळ माथ्याने वावरू शकत नसत. त्यांनी एक पळवाट शोधून काढली होती. ते फील्डमार्शल आणि अँस्ट्रो-हंगेरियन सैनेचे सरसेनापती होते. लष्करी भूमिकेत वावरताना मात्र त्यांच्या पत्नीला पूर्ण सन्मान उपलब्ध असे. त्यामुळे सैन्याची पाहणी करण्याच्या निमित्ताने ते पत्नीसह वेगवेगळ्या तुकड्यांना भेट देत असत. बोस्नियाला भेट देण्यासाठी त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला होता. फर्डिनांड यांच्या भेटीची वार्ता ऐकल्यावर अजून मिसरुडही न फुटलेल्या पाच -सहा तरुणांनी त्यांना ठार मारण्याचा बेत रचला. एका गुप्त बंडखोर संघटनेचा म्होरक्या अपिस याने त्यांना मदत करण्याचे वचन दिले. आपल्याला कधीच जमले नाही ते ही पोरं काय करणार, हे पूर्ण माहीत असूनही केवळ सरकारला खोड्यात टाकण्याचा अपिसचा उद्देश होता. त्या तरुणांनी फ्रान्झला मारण्याचे वेगवेगळे प्रयत्न करण्याचे ठरवले होते.
आर्चड्यूक आणि त्यांची पत्नी गाडीने २८ जूनला सपायेवोमध्ये दाखल झाले. त्याबरोबर तरुणांनी पूर्वयोजनेची अंमलबजावणी सुरू केली. पहिला बंडखोर ऐनवेळी आपले रिव्हॉल्व्हर बाहेर काढू शकला नाही. दुसर्याला तर सोफी पाहिल्यावर तिची कणव आली. तिसर्याने मात्र धीर करून बॉम्ब फेकला, पण त्याचा नेमच चुकला आणि गर्दीत एकच गोंधळ माजला. फ्रान्झ टाऊन हॉलला पोहोचले तेव्हा ते अतिशय क्षुब्ध होते. सगळ्या रंगाचा बेरंग झाला होता. त्यांनी टाऊन हॉलमधून परतायचे ठरवले; परंतु त्यांच्या गाडीचालकाला नीट आदेश मिळाले नाहीत. त्याने एक चुकीचे वळण घेतले. जाणीव झाल्यावर तो ‘रिव्हर्स’ घेऊ लागला. त्याच वेळी चौथा तरुण गॅवरिलो प्रिन्सिप परत जात होता. थांबलेली गाडी अचानक दृष्टीस पडल्यावर तो हरखून गेला. पळत जाऊन तो फुटबोर्डवर चढला, त्याने पती-पत्नीवर एकामागून एक गोळ्या झाडल्या आणि तो पसार झाला.
हा केवळ राजकीय खून नव्हता, तर ऑस्ट्रिया-हंगेरीच्या बोस्नियावरील अधिपत्याला ते कडवे आव्हान होते. फ्रान्स, र्जमनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, रशिया आणि इंग्लंड या पाच सत्तांमध्ये धुमसणार्या स्फोटकाला हवी असलेली ती ठिणगी होती. ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याने सर्बियाला निर्वाणीचा खलिता धाडला आणि युद्धाची नांदी केली.
१९ व्या शतकात प्रमुख युरोपीय साम्राज्य सत्ता समतोल राखण्याच्या आटोकाट प्रयत्नात होत्या. प्रथम प्रशिया (र्जमनी), रशिया आणि ऑस्ट्रिया-हंगेरीमध्ये संघटन (होली अलायन्स) झाले; परंतु बाल्कन देशांबाबत मतभेद झाल्यावर रशिया बाहेर पडला. १८७९ मध्ये र्जमनी आणि ऑस्ट्रियादरम्यान झालेल्या युद्धकरारात १८८२ मध्ये इटली सामील झाला. त्यांना शह देण्यासाठी फ्रान्स व रशिया १८९२ मध्ये एकत्र आले. १९0४ मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये करार झाला. १९0७ मध्ये रशिया व इंग्लंडमध्ये सोयरिक झाली. दोन परस्परविरोधी शस्त्रसज्ज युती योग्य संधीची वाट पाहत होत्या. ती फर्डिनांड फ्रान्झ यांच्या हत्येकरवी लाभली. ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सर्बियावरील आक्रमणाने २८ जुलै १९१४ ला युद्धाचा आरंभ झाला. रशियाने सैन्याचे ‘मोबिलायझेशन’ केलेले पाहताच र्जमनीने बेल्जियम आणि लक्झेम्बर्ग व्यापले आणि फ्रान्सच्या दिशेने आगेकूच करू लागले. ते पाहून ब्रिटनने र्जमनीशी युद्ध जाहीर केले. र्जमनीचे आक्रमण पॅरिसच्या उंबरठय़ावर थोपल्यानंतर परस्पर क्षयाची लढाई (बॅटल ऑफ ऑट्रिशन) चालू झाली. हे रेंगाळणारे खंदकयुद्ध १९१७ पर्यंत चालू राहिले. दरम्यान, रशियाने ऑस्ट्रियाला चितपट केले; पण तो ईस्ट प्रशियाकडे वळल्यावर र्जमनीने त्याची घोडदौड थांबवली. नोव्हेंबर १९१४ मध्ये ऑटोमन
साम्राज्य युद्धात सामील झाले. त्यामुळे कॉकॅसस, मेसोपोटेमिया आणि सिनाईच्या आघाड्या उघडल्या. इटली आणि बल्गेरियाने १९१६ मध्ये युद्धात उडी घेतली, तर अमेरिकाही १९१७ मध्ये रणांगणात उतरली.
रशियन साम्राज्य १९१७मध्ये कोसळल्यावर युद्धाचा अंत दृष्टिपथात आला. ४ नोव्हेंबर १९१८ला अँस्ट्रो-हंगेरी साम्राज्य तहाला तयार झाले तर र्जमनीने ११ नोव्हेंबरला हार मानल्यानंतर महायुद्ध संपुष्टात आले. युद्धमुळे युरोप आणि नैऋत्य आशियाचा नकाशाच बदलला. र्जमनी रशिया, ऑस्ट्रीया-हंगेरी आणि ओस्मानी साम्राज्ये विलयास गेली. पुन: युद्ध होऊ नये, म्हणून राष्ट्रसंघाची (लीग ऑफ नेशन्स) स्थापना झाली. परंतु पुढच्या युद्धाचे बीज आधीच्या युद्धात पेरले जाते. उद्दाम युरोपीय राष्ट्रीयत्व आणि मानखंडित र्जमनी यांच्या संघर्षामुळे दोन दशकांनंतरच पुनश्च अधिकच भयानक दुसरे विश्वमहायुद्ध जुंपले.
(लेखक भारतीय लष्करातील मेजर जनरल पद भूषविलेले नामवंत अधिकारी व युद्धशास्त्राचे अभ्यासक आहेत.)