धन्य कल्याण

By Admin | Updated: July 5, 2014 14:14 IST2014-07-05T14:14:22+5:302014-07-05T14:14:22+5:30

कल्याणस्वामींचे अवघे जीवनच सद्गुरुभक्तीचा आदर्श, प्रेमळ आणि अलौकिक आविष्कार आहे! आषाढ शुद्ध त्रयोदशी, दि. १0 जुलै रोजी कल्याण स्वामींची तीनशेवी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या श्रेष्ठ सद्गुरुभक्ताच्या जीवनाचा वेध ..

Blessed Kalyan | धन्य कल्याण

धन्य कल्याण

 रोहन उपळेकर

 
आजवरच्या भारताच्या देदीप्यमान इतिहासात फार थोर गुरू-शिष्य होऊन गेलेले आहेत. मत्स्येंद्रनाथ- गोरक्षनाथ, नवृत्तीनाथ- ज्ञानेश्‍वर, गुरू नानक- गुरू अंगददेव, मुक्ताई-चांगदेव अशा स्वनामधन्य गुरू-शिष्य जोडगोळय़ांमध्ये एक स्वतेजाने तळपणारी   आणखी एक जोडगोळी म्हणजे सर्मथ रामदास-कल्याणस्वामी ही होय! 
राष्ट्रगुरू सर्मथ रामदासांचे प्रथमशिष्य असे अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी तथा कल्याणस्वामी हे सर्मथ संप्रदायात पूजनीय मानले जातात. अंबाजींची सर्मथांशी पहिली भेट इ. स. १६४५ मध्ये कोल्हापूर येथे झाली. त्या वेळी त्यांचे वय अंदाजे बारा वर्षांचे असावे. सर्मथांच्याही मनात या हरहुन्नरी, सालस व गुणी मुलाने घर केले असावे. प्रत्येक कामातले त्याचे कौशल्य, कल्पकता व टापटीप, नेटकेपणा, तीव्र स्मरणशक्ती पाहून सर्मथ खूश झाले अंबाजीसोबत त्याच्या मातोश्री रखमाबाई व बंधू दत्तात्रेय हेही सर्मथ सेवेत रुजू झाले. सर्मथ संप्रदायाच्या इतिहासात मसूर गावी घडलेली झाडाच्या फांदीची गोष्ट प्रचलित आहे. सद्गुरू आ™ोचे तंतोतंत पालन करण्यासाठी उलट्या बाजूने अंबाजीने फांदी तोडली; पण त्यामुळे फांदीसह तो विहिरीत पडला. सर्मथांनी त्याला ‘‘कल्याण आहेस ना?’’ असे विचारले. तेथूनच पुढे हा पट्टशिष्य ‘कल्याण’ नावाने ओळखला जाऊ लागला. सर्मथ रामदास हे फार विलक्षण विभूतिमत्त्व होते. त्यांचा साक्षेप, त्यांचे सूक्ष्म निरीक्षण, त्यांचे अलौकिक व्यवस्थापन कौशल्य, त्यांची दूरदृष्टी, समाजहिताची तळमळ, त्यांचा स्वधर्म व स्वराष्ट्राविषयीचा तीव्र प्रेमादर, सारेच अद्भुत होते. त्यांच्या सर्व सद्गुणांचा दुसरा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे कल्याणस्वामी होत! सर्मथांना अभिप्रेत असणारा खरा महंत कल्याणांच्या रूपाने त्यांच्या अखंड सोबत वावरत होता!
कल्याण स्वामींना ही स्थिती काही फुकट मिळालेली नव्हती. सर्मथ रामदासांनी या शिष्याची वारंवार परीक्षा घेऊन, तावून-सुलाखून त्याला तयार केलेले होते. कल्याणस्वामींच्या यशस्वी कारकीर्दीत सर्मथांचे प्रयत्न व श्रेय नक्कीच महत्त्वाचे आहे. कल्याणस्वामी इ. स. १६७८ पर्यंत सर्मथांच्या सावलीसारखे सोबत वावरले. त्यांना सर्मथांचे मार्गदर्शन ३६ वर्षे लाभले. सर्मथांचाही आपल्या या पट्टशिष्यावर पूर्ण विश्‍वास होता. त्यामुळे आपल्या पश्‍चात हाच आपला संप्रदाय व उभारलेले ११00 मठांचे संघटन व्यवस्थितरीत्या सांभाळू शकेल, याची खात्री वाटल्याने आपल्या देहत्यागाच्या तीन वर्षे आधी सर्मथांंनी कल्याणस्वामींना लोकोद्धारासाठी डोमगावकडे रवाना केले. 
कल्याणस्वामींचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तीव्र स्मरणशक्ती व सुरेख हस्ताक्षर हे होय. व्यवहारामध्ये असे म्हणतात, की शारीरिक बळ आणि बौद्धिक बळ कधी एकत्र जात नाही; पण कल्याणस्वामी हे याला मोठाच अपवाद होते. बलदंड शरीर आणि कुशाग्र बुद्धी, विशेष प्रज्ञा यांचा सुरेख संगम कल्याणस्वामींच्या ठायी झालेला होता. तोच इतर शिष्यांना सप्रमाण दाखवून द्यावा म्हणून एकेदिवशी सर्मथांनी लीला रचली. दासबोधातील एक ओवी सांगून ती कोणत्या समासातली कितवी ओवी आहे, हे सर्मथांंनी विचारले. दासबोधाची निरंतर पारायणे करणार्‍या शिष्यांनाही आठवेना. सर्मथ म्हणाले, ‘‘कल्याणाला विचारा!’’ एक शिष्य धावत गेला. कल्याणस्वामी कोठी घरात सुपार्‍या निवडत होते. त्या शिष्याने ओवी उच्चारताच कल्याणस्वामींनी एका क्षणात त्या ओवीचा समास व क्रमांक सांगितला. सगळेच शिष्य अचंबित झाले. सर्मथांंनी कल्याणांना बोलावून विचारले, ‘‘कधी वाचलास रे दासबोध?’’ कल्याणस्वामी नम्रपणे उत्तरले, ‘‘स्वामी, रोजच्या कामात वेळ कुठे होतो? आपण सांगितलात तेव्हा लिहून घेतानाच तेवढा वाचला मी दासबोध!’’ आपल्या पट्टशिष्याची जगावेगळी स्मरणशक्ती पाहून सर्मथही मनोमन सुखावले.
कल्याणस्वामींनी त्यांच्या शिष्य परंपरांमध्ये लेखनक्रिया रोजच्या रोज झालीच पाहिजे, असा दंडकच घातला होता. कल्याणांचे सर्वच शिष्य एकटाकी, सुंदर व देखणे लेखन करण्यात पटाईत होते. त्या परंपरेतील दासबोधाच्या प्रतींचा सर्मथभक्त शंकरराव देवांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. याशिवाय कल्याण-परंपरेतील मठांमधून ज्ञानेश्‍वरी, संतांचे गाथे यांच्याही सुंदर हस्तलिखित प्रती आजही पाहायला मिळतात. 
छापखाने अस्तित्वात नव्हते. त्या काळात अत्यंत दूरदृष्टीने कल्याणस्वामींनी चालविलेला हा ग्रंथ संवर्धनाचा उपक्रम मोलाचा ठरतो! बलभीम मारुतीरायांची उपासना करणार्‍या कल्याणस्वामींनी त्या काळात शारीरिक व बौद्धिक अशा दोन्ही प्रकारांनी बलवान, सशक्त समाज घडवण्याचे केलेले कार्य फारच महत्त्वाचे मानायला हवे. आपले स्वत्वच विसरू लागलेल्या समाजाला पुन्हा जागृत करण्याचे व त्याला सार्मथ्य देण्याचे मौलिक कार्य या सर्मथशिष्याने नेमकेपणे केलेले दिसून येते.
उभी हयात गुरुवचनाचे तंतोतंत पालन करण्यात घालविलेल्या कल्याणस्वामींनी आपली ही गुरुनिष्ठा शेवटच्या क्षणीही कायम ठेवली. सद्गुरू सर्मथांंचा अस्थिकलश चाफळ मंदिरातील वृंदावनात ठेवलेला होता. त्या अस्थींचे विसर्जन करण्याविषयी उंब्रज मठाच्या केशवस्वामींनी कल्याणांना वारंवार विचारले; पण ‘पुढे पाहू,’ असेच उत्तर मिळे. 
शेवटी इ. स. १७१४ मध्ये केशवस्वामींनी विसर्जनाची परवानगी मिळेलच या खात्रीने तो पवित्र अस्थिकलश वृंदावनातून उचलला आणि डोमगावकडे प्रयाण केले. पण घडले आक्रितच! ज्याक्षणी इकडे तो अस्थिकलश जागेवरून हलवला त्याचक्षणी तिकडे डोमगांवी सर्मथांंच्या कल्याणानेही सद्गुरुस्मरणात आपला देह ठेवला. डोमगावला पोहोचल्यावर केशवस्वामींना घडलेली घटना समजून अतीव दु:ख झाले; पण गुरु-शिष्यांनी आपली जोडगोळी तिथेही सोडली नाही. शेवटी दोघांच्याही अस्थी एकत्रच गंगेमध्ये विसजिर्त झाल्या. येत्या १0 जुलैला याच भाव-मनोहर प्रसंगाला तीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. कल्याणस्वामींचे भावोज्ज्वल आणि देदीप्यमान जीवन व कार्य केवळ सर्मथ संप्रदायच नाही, तर सर्वांंनाच अनंतकाळपर्यंंत प्रेमभक्तीच्या सोज्ज्वळ दीपाचा शांत-स्निग्ध 
ब्रह्मप्रकाश देऊन भक्तिमार्गावर अग्रेसर करीत राहील, यात शंका नाही! 
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Blessed Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.