बिट्विन दी लाईन्स
By Admin | Updated: January 17, 2015 17:02 IST2015-01-17T17:02:16+5:302015-01-17T17:02:16+5:30
कधी ऐश्वर्या, प्रियांका, लावण्य, अशी स्वच्छ, थेट भारतीय नावं. कधी अगम्य स्पेलिंगची, उच्चार करताना ततपप करायला लावणारी फ्रेंच, तर कधी इंग्रजी!

बिट्विन दी लाईन्स
- चंद्रमोहन कुलकर्णी
- ब्युटी पार्लर
कधी ऐश्वर्या, प्रियांका, लावण्य, अशी स्वच्छ, थेट भारतीय नावं.
कधी अगम्य स्पेलिंगची, उच्चार करताना ततपप करायला लावणारी फ्रेंच,
तर कधी इंग्रजी!
भर रस्त्यावर टिपिकल रोलिंग शटरवाल्या दुकानात असेल तर ऐश्वर्या राय नाहीतर प्रियांका चोप्रा, राणी मुखर्जी, गेला बाजार विद्या बालनचा किंवा कधी एकदमच एखाद्या अनोळखी इंग्लिश बाईचा, नाहीतर बाजारात चलती असलेल्या हिंदी सिनेमातल्या नटीचा (मराठी सिनेमातल्या नाही) ब्लोअप दरवाज्याच्या काचेवर चिकटवलेला.
कर्मशिअल बिल्डिंगमधे असेल तर एन्ट्रीलाच एअर कर्टन.
कधी बंगल्याच्या आऊटहाऊसमधे तर कधी कॉलनीत, वाड्यात, चाळीतल्या दोन खोल्यांमधल्या एका खोलीत पार्लरचा संसार. पार्लर चालवणार्या बाईंचा स्वत:चा संसार आतल्या एका खोलीत, विनातक्रार. ना ओनरची तक्र ार, ना क्लायंटची. काम झाल्याशी मतलब. कधीकधी तर अशा ठिकाणीच छान सर्विस तीही स्वस्तात मिळते. थोड्या घरगुती, क्वचित खाजगी गप्पा. नेहमीच्या जाण्यायेण्यानं शेअरिंग वाढलेलं.
फ्लॅटमध्ये असेल तर जरा वेगळं वातावरण. मॉलमधे असेल तर आणखीनच वेगळं. कुठेकुठे क्लायंटच्या प्रकारानुसार उच्च रंगसंगती, कर्टन (पडदे नव्हे!) खुच्र्या, सोफ्याचं कुशन नजाकतीनं निवडलेलं वगैरे.
नुसतं नावातच फक्त इंस्टिट्यूट असेल तर माहोल थोडा दिखाऊ. खरोखरचं इन्स्टिट्यूट असेल तर नजारा जरा अलग असतो. एखाद्या कंपनीचं, एअरकंडिशन्ड असेल तर अँप्रनच्या कलरस्कीमपासूनच फरक. बाहेरच्या सेमी ओपेक काचेवर गोल्डन लोगो.
ब्यूटी पार्लर. घरगुती सो सो असो, अँव्हरेज कामचलाऊ असो, की प्रोफेशनल मॉडर्न असो की अल्ट्रामॉडर्न. प्रकार गमतीचा.
ऐसपैस झोपता येईल अशा खुर्च्या. बसून, हातापायांवर, पेडिक्युअर, ब्राईडल, मेहंदी (अहं, मेंदी नव्हे!) काम करता येईल अशा लहान, हाताच्या, बिनहाताच्या, प्लॅस्टीकच्या, तर कधी फोमच्या, गुबगुबीत. सोफे, छोटी स्टुलं, काऊंटर. लांबट टेबलं. फेशियल, हेअरसाठी वॉशबेसिन, इलेक्ट्रिकचे ड्रायर्स. लहानसहान, छोटीमोठी यंत्नं. मोठमोठे इटालियन ग्लासचे, राऊंड, स्क्वेअर, डेकोरेटिव्ह, प्लेन, उंच आरसे. कात्र्या, चिमटे, प्लकर्स, दोरे, दोर्या, निरनिराळ्या प्रकारची हत्यारं. उंच, बुटक्या, गोल, त्रिकोणी, चौकोनी, इव्हन-अनईव्हन आकाराच्या फ्लुरोसंट रंगाच्या, पांढर्या, गोल्डन, सिल्व्हर डब्या. डबे. खोकी. बॉक्सेस. फोटो. पोस्टर्स. कंगवे. ब्रश. पिना.
कशाकशानं खच्चून भरलेली कपाटं. फर्निचर. नॅपकिन्स. गाऊन्स. अँप्रन्स. रिबिनी. बॅण्डस. पट्टे. थोडक्यात सांगायचं तर प्रॉपर्टी.
बहुतेक सगळा बायकाबायकांचाच व्यवहार, त्यामुळे वातावरण आपसुकच सैलावलेलं, मोकळं. निरिनराळ्या क्लाएंट स्त्रिया. सर्व्हिस प्रोव्हायडर कारागीर, कधी स्वत: मालकिणी, कधी वर्कर, जाड, मध्यम, लुकड्या, सुटलेल्या. मुली, वयस्क, तरूण, मध्यमवयीन.
लक्षपूर्वक काम करतानाच्या, करवून घेतानाच्या होत असलेल्या शारीरिक स्थिती- कधी अवघडलेल्या, कधी विपरीत, मजेदार, चेहर्यावरचे बदलते, गमतीशीर हावभाव, प्रत्येकीची देहबोली निराळी, एक्सप्रेशन्स निराळी, निरनिराळ्या वेषभूषा, केशभूषा, फॅशन, अँटिट्यूड, कपड्यांचे रंग, प्रकार, पॅटर्न!
इथं येण्याची अनंत कारणं, अगणित उद्देश.
ब्यूटी पार्लर- एक जिवंत ठिकाण, फुल्ल ऑफ जिंदगी !
एक इंटिमेट, विशेष ठिकाण.
हालचाल, आवाज, गडबड, अँक्टिव्हिटी.
सौंदर्याची देवाणघेवाण. कुणाचंतरी दिसणं, सौंदर्य कुणाच्यातरी (शब्दश:) हातात!
सौंदर्य या गोष्टीबद्दल पुनिर्वचार करायला लावणारं ब्यूटिपार्लर.
सौंदर्याची व्याख्या तपासून पहायला लावणारं ब्यूटी पार्लर.
सौंदर्याची व्याख्या आकुंचित करणारं, कदाचित विस्तृत करणारं ब्यूटी पार्लर.
शहरी, निमशहरी समाजजीवनाचा एक रसरशीत तुकडा.
जिमसारखाच. शरीराशी संबधित. म्हणून मनाशीदेखील.
चित्न काढायला मजबूर करणारा.
(हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होईल.)