बिनघंटेची शाळा
By Admin | Updated: August 23, 2014 11:58 IST2014-08-23T11:58:29+5:302014-08-23T11:58:29+5:30
‘सगळीकडे मिट्ट काळोख दाटलेला असताना काही ठिकाणी मात्र मिणमिणता का होईना, प्रकाश देत मोजकेच दिवे तेवत असतात.’ एखाद्या आदर्शवादी कादंबरीतच शोभेल अशा या वर्णनाची प्रत्यक्ष अनुभूती गारगोटी (कोल्हापूर, ता. भुदरगड) येथील दोन शिक्षकांनी चालवलेली शाळा पाहिली की येते. दिवसाचे सलग १२ तास चालणार्या या शाळेला घंटा नाही. त्यांच्यापासून प्रेरणा घेत अनेकांनी त्या भागात असे आशादीप सुरू केले आहेत. शिक्षणक्षेत्रातील या अनोख्या उपक्रमाविषयी..

बिनघंटेची शाळा
>शिवाजी सावंत
शाळा म्हटलं, की घंटा ही आलीच. ‘शाळेची घंटा आणि घंटेवर चालणारी शाळा’ असे समीकरण शाळा अस्तित्वात आल्यापासून आहे; पण या घंटेच्या समीकरणाला छेद देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात ‘बिनघंटेची शाळा’ अस्तित्वात आली असून, हा अभिनव प्रयोग इतर शाळांमध्यहीे सुरू झाला आहे. लवकरच तो राज्यासाठी स्वीकारला जाण्याची शक्यता आहे.
भुदरगड तालुक्यातील गारगोटी शहरानजीक डोंगराच्या कुशीत वसलेले जेमतेम सहाशे बारा लोकवस्तीचे गाव ‘शिंदेवाडी’. या गावात पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. ही शाळा द्विशिक्षकी असून, शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत असणारे हे गाव कारागिरांचे (गवंड्यांचे) गाव म्हणून प्रसिद्ध आहे. उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने अनेकांनी उदरनिर्वाहासाठी बांधकाम करण्याचा व्यवसाय पत्करला. अशा या गावातील विद्यार्थी अधिकारी व्हावा, या उदात्त हेतूने शिक्षक एम. जी. देवेकर आणि त्यांचे तत्कालीन सहकारी शिक्षक डी. के. कोटकर यांनी २00६मध्ये ‘बिनघंटेची शाळा’ ही संकल्पना मांडली.
या संकल्पनेला विरोध झाला; पण या शिक्षकांनी ही कल्पना तिथल्या पालक, शिक्षण समिती, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमोर मांडल्यानंतर समाजविरोधाची धार कमी झाली. मात्र, त्याच वेळी या शिक्षकांवर जबाबदारीचे ओझे वाढले. त्यांना जाणीव होती, की आपण मांडत असलेल्या नवविचारामुळे आपल्या खासगी जीवनावर र्मयादा येणार आहेत. आपण दिवसातील बारा तास बांधले जाणार आहोत. शिक्षक बारा तास देण्यास तयार आहेत, तर आपण का मागे हटायचे? असा विचार करून पालकांनी संमती दिली. आता खरी कसोटी लागणार होती, चोवीस तासांतील बारा तास शाळेत!
‘गवंड्यांचे गाव’ असणार्या या गावातील विद्यार्थ्यांच्या हातात ‘विद्येचे सूत’ देण्यासाठी नवीन प्रयोगाची सुरुवात होणार होती. शाळेची घंटा काढून ठेवण्यात आली; त्यामुळे शिक्षकांचेही वेळापत्रक बिनघंटेचे झाले. सकाळी साडेसात वाजता शिक्षक शाळेत येऊन ते सायंकाळी सात वाजता शाळा बंद करू लागले. सकाळी मुलेही साडेसातपासून नऊ वाजेपर्यंत येऊ लागली. इयत्ता चौथीत असणारी मुले लवकर येऊ लागली. त्यामुळे प्रज्ञाशोध (स्कॉलरशिप)चा अभ्यास शाळेत सुरू झाला.
विद्यार्थी शाळेत अधिक वेळ असल्याने शिक्षकांना त्यांच्या व्यक्तिगत प्रगतीकडे लक्ष देण्यास वेळ मिळू लागला. परिणामत: शैक्षणिक प्रगती होऊ लागली. इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीचे विद्यार्थी चौथीच्या विद्यार्थ्यांचे अनुकरण करू लागले. त्यामुळे
सर्वच विद्यार्थी नऊच्या आत शाळेत येत. त्यांना जेव्हा भूक लागेल, तेव्हा त्यांनी जेवायचे, कोणतेही बंधन नव्हते.
बंधमुक्त वातावरणात मुले मुक्तपणे अभ्यास करू लागली. त्या वेळी शिक्षकांनी सात दिवसांचा व संपूर्ण वर्षभर चालणार्या कार्यक्रमांचा आराखडा तयार केला. यामध्ये पंचवीस वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली. त्याचे साप्ताहिक, नियमित, दैनंदिन, प्रासंगिक, वर्षभर, दर शुक्रवारी, दीपावली आणि मे महिन्यातील सुटीत, असे वर्षाचे नियोजन करण्यात आले.
सकाळी साडेसातपासून रात्री आठपर्यंत मुलांना शाळेत खिळवून ठेवणे हे एक दिव्य होते. ते पार पडत असताना त्यांची शैक्षणिक व अभ्यासातील प्रगती लक्षणीय करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मेंदूला नवीन खुराक देणे आवश्यक होते. म्हणून ज्ञानभिंती, वाचन मंडळ, रात्र अभ्यासिका, एक दिवस शिक्षक, नावीन्यपूर्ण वर्गसजावट, ई-लर्निंग, श्रुतलेखन, भाषिक खेळ, स्पर्धा परीक्षा वर्ग, संस्कारक्षम कथामाला, अनमोल खजिना, नावीन्यपूर्ण परिपाठ, कवायत, योग, पालकांसाठी उद्बोधन वर्ग, बालआनंद मेळावा, कार्यानुभव, ऐतिहासिक स्थळांची माहिती, कचेरी, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, बँका यांची माहिती व भेटी, कलाकार, कवी, लेखक यांच्या भेटी व मुलाखती, स्नेहसंमेलन असे एक वर्षातील दीपावली व मे महिन्यातील सुटीसह इतर कार्यक्रम तयार करून त्याप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात आली.
विद्यार्थ्यांनाही शाळेतील अभ्यासाव्यतिरिक्त जगातील नवनवीन गोष्टींची माहिती मिळू लागली. नेहमीच नवीन गोष्टींतील अनुभूती मिळू लागल्यामुळे ‘आज नवीन काय?’ या आवडीने मुलेसुद्धा वेळेवर शाळेत येऊ लागली. सुटीखेरीज वर्गाबाहेर जाण्याची मुभा असल्याने भूक लागली, की ती जेवत अथवा शारीरिक गरजेनुसार इतर विधी पार पाडत. त्यामुळे शिक्षणात त्यांचे पूर्ण लक्ष राही.
या उपक्रमामागे विशिष्ट उद्दीष्ट होते. शिक्षकांच्या मते, सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत शाळा असते. तो दृष्टिकोन बदलणे, शाळेत समरस होण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ देणे, कमी शिकलेल्या अथवा अज्ञानी पालकांचा शाळेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. ‘मला वेळ आहे, मला ते जमणार आणि ते मी करणारच!’ असा शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे, ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम २00६-0७ शैक्षणिक वर्षात सुरू झाला.
याची फलश्रुती सकारात्मक येऊ लागली. २0१0मध्ये पडताळणी केली असता, शिक्षक बारा तास शाळेत उपलब्ध. शिक्षकांची उपस्थिती आणि जादा वेळ मिळत असल्यामुळे अप्रगत मुलांची संख्या रोडावली. घरचा अभ्यास शाळेत पूर्ण होत असल्यामुळे मुलांच्या मनावरील ताण कमी झाला. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण झाली. मुलांचे हस्ताक्षर सुधारले. विद्यार्थी कृतीतून शिकत गेल्याने पाया पक्का झाला. गरीब विद्यार्थ्यांंना लेखनसाहित्य नसले तरी शिकता येऊ लागले. शिक्षकांची प्रशासकीय व इतर कामे वेळेवर होऊ लागली. शाळेचे नाव पंचक्रोशीत झाल्याने गारगोटी शहरातील विद्यार्थी शिक्षणासाठी या शाळेत जाऊ लागले. त्यामुळे पटसंख्या वाढली.
या उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व सहायक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांनी शाळेला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले आणि तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, शिक्षण विस्तार अधिकारी अजय बिरगणे, विश्वास सुतार यांना हा उपक्रम तालुक्यातील निवडक शाळांमध्ये राबविण्यासाठी उद्युक्त केले.
भुदरगड तालुक्यात हा उपक्रम कडगाव, करडवाडी, कूर, गंगापूर, गारगोटी, दासववाडी, दिंडेवाडी, पाटगाव, पिंपळगाव, मडूर, मिणचे खुर्द, वेसर्डे, शेळोली, हेदवडे या चौदा केंद्रांतर्गत असणार्या तिरवडे, नांदोली, दोनवडे, कुंभारवाडी, निळपण, मुदाळ, नाधवडे, व्हणगुत्ती, तलाव वसाहत, सोनाळी, कलनाकवाडी, खानापूर, आंबवणे, पाळ्याचा हुडा, उकीर भाटले, दिंडेवाडी, लहान व मोठे बारवे, पाटगाव, वाण्याची वाडी, बेगवडे, बामणे, पिंपळगाव, शिंदेवाडी, पेठ शिवापूर, पुष्पनगर, महालवाडी, बसरेवाडी, म्हसवे, अप्पाचीवाडी, मोरस्करवाडी, दारवाड, अंतिवडे, कारीवडे, न्हाव्याचीवाडी, नवले, पाळेवाडी, कोळवण, मोरेवाडी, भुमकरवाडी या चाळीस गावांमध्ये राबविला जात आहे.
शिंदेवाडी शाळेने सुरू केलेला हा अभिनव उपक्रम सध्या एम. जी. दिवेकर व एस. एच. गुरव हे दोन शिक्षक चालवीत आहेत. वेळेनुसार अनेक शिक्षणाची दालने विकसित केल्याने एका पठडीत असणारे शिक्षण बंद होऊन वैविध्यपूर्ण शिक्षण सुरू झाले आहे. प्रत्येक दिवसाचे नियोजन ठरले असल्याने सुटीतही आनंददायी उपक्रम सुरू असतात.
हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी केवळ पगारासाठी नोकरी न करता सर्मपित भावनेने केलेले त्यांचे कार्य म्हणजे थोर देशसेवा आहे. ज्ञानदानासारखे पवित्र कार्य मनापासून केल्यास
‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती।
तेथे कर माझे जुळती।।’
या काव्यपंक्तींची यथार्थता पटते.
(लेखक लोकमतचे गारगोटी येथील वार्ताहर आहेत.)