भीषण प्रश्न खालच्या गाळात

By Admin | Updated: December 31, 2016 13:17 IST2016-12-31T12:34:25+5:302016-12-31T13:17:33+5:30

बदलत्या, बहुपदरी वास्तवाचा परीघ जाणतेपणानं पेलणारे लेखक-पत्रकार आसाराम लोमटे ‘आलोक’ या कथासंग्रहासाठी त्यांना नुकताच प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी सन्मान जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद

Below the horror questions | भीषण प्रश्न खालच्या गाळात

भीषण प्रश्न खालच्या गाळात

बदलत्या, बहुपदरी वास्तवाचा परीघ जाणतेपणानं पेलणारे लेखक-पत्रकार आसाराम लोमटे ‘आलोक’ या कथासंग्रहासाठी त्यांना नुकताच प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी सन्मान जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद

तुमच्या कथा वाचताना जाणवतं की भवतालाकडे पाहण्याची एक स्वत:ची अशी नजर तुमच्याकडे आहे. ती तुम्ही कशी मिळवलीत? त्यासाठीचा रियाज तुम्ही कसा करत आलात? 
मी लिहू लागलो, तोवर ग्रामीण भागासंबंधी लिहिणाऱ्यांची नजर ठरलेली होती. खेडं किती छान.. डोलणारी हिरवीगार शेती, दांडातून खळाळणारं पाणी.. चोहीकडं रम्य वातावरण असं चित्र त्या लिखाणातून उभं असायचं. पण मी जेव्हा आसपास पाहतो तेव्हा निसर्ग दिसतोच पण त्यामागची सतत अव्यक्त राहणारी, राबत्या हाताच्या माणसाची वेदना मला महत्त्वाची वाटते. मी गौरवीकरण नाकारलं. ग्रामीण भागाचं बटबटीत चित्रण करण्याची रूढ वाट नाकारली. एक धारणा अशीही दिसते, की पूर्वी खेडं खूप छान होतं. मग जागतिकीकरण आलं आणि सगळं बिघडलं. हे अगदी ठोकळेबाज आहे. ग्रामीण भागात वंचितांचं शोषण करणारी एक यंत्रणा आधीपासूनच अस्तित्वात होती. आपण केवळ जागतिकीकरणावरच सगळा ठपका ठेवत मोकळे झालो, तर उतरंडीचं काय? 
तथाकथित आधुनिकीकरण येण्याआधीही दुबळ्यांच्या शोषणाची एक पद्धतशीर व्यवस्था कार्यरत होतीचं. गावोगावी जी सत्तेची बेटं उदयाला आली आणि त्यांना पुढे बाळसं चढलं, त्याच्या गाभ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपल्याकडे किती वेळा होतो? आधुनिकीकरणाच्या लाटांकडेच जर आपली नजर असेल तर मग आतल्या सगळ्या खळबळीकडे डोळेझाक तर होणार नाही ना हेही पाहिलं पाहिजे. जर खेड्यांचा चेहरा उद्ध्वस्त झाला आहे तर तो का झाला, ही वाताहत केली कुणी, हेसुद्धा दिसायला पाहिजे. आपल्याकडे गावच्या लेखनात शोषण दिसतं पण शोषकांचा चेहरा दिसत नाही. शोषितांचं जगणं दुष्कर झालंय. या अशा तळातल्या माणसाच्या जगण्याबद्दल बोललं पाहिजे, असं वाटतं. 
‘इंडिया विरुद्ध भारत’ ही पुन्हा एक मांडणी. मला सर्व प्रकारच्या चळवळींबद्दल आस्थाच आहे. अगदी शेतकरी चळवळीलाही मी जवळून पाहिलंय, शेतमजूर-कामगारांची आंदोलनंही जवळून पाहिलीत. पण ‘भारता’त सगळं छानच होतं. आणि ‘इंडिया’ने ‘भारता’चं शोषण केलं ही मांडणी मला चुकीची वाटते. मी आधीपासूनच अस्तित्वात असलेले शोषणाचे स्तर शोधत राहिलो. 
माझ्या कथांमधलं पर्यावरण अनागर आहे. पण केवळ त्या कारणानं मी त्या कथेला ‘ग्रामीण कथा’ म्हणत नाही. मराठीतली ग्रामीण कथा एकेकाळी किस्सेबाज पद्धतीनं लिहिली गेली. त्यातली पात्रं साधारण इरसाल वृत्तीची असत. 
अशी एकरंगी ‘ग्रामीण कथा’ बदनाम झाली. मधल्या काळात या प्रकारच्या कथेनं मध्यमवर्गीयांच्या मनोरंजनाची बाजारपेठ शोधली. माझ्या मते, ही कथा ग्रामीण जगण्याचा विपर्यास करते. जुन्या मराठी चित्रपटांमध्ये भानगडी आणि इरसाल राजकारण यातून जो पट उभारला गेला तोही ग्रामीण वास्तवाचा विपर्यास करणाराच होता. 
मी कधीच ‘ग्रामीण कथा’ लिहितो असं म्हणत नाही. मी माणसांची कथा लिहितो. मी लेखक म्हणून ग्रामीण, दलित असे भेद मानत नाही. ते अभ्यासकांनी त्यांच्या सोयीसाठी केलेले आहेत. आपल्या आस्थेचा परीघ संकुचित असू नये असं मानणारा मी लेखक आहे. बऱ्याचदा मराठी लेखक राजकारण, समाजकारण, चळवळी यांच्यापासून अंतर ठेवूनच राहतो. पण मी या सगळ्यांना लेखनातून भिडण्याचा माझ्यापरीनं प्रयत्न केला. 
नेमाडेंनी कथा हा साहित्यप्रकार गौण, क्षुद्र अशी मांडणी एका विशिष्ट काळात केली होती. तुम्ही म्हणत असता की त्यानंतरचा बराच काळ मराठी कथा न्यूनगंडात गेली होती. तुम्ही आजवर केवळ कथा हाच प्रकार घेऊन ताकदीनं व्यक्त होत आलाय. हाच प्रकार तुम्हाला जवळचा का वाटला? 
गोष्ट सांगणं, गोष्ट ऐकणं याचीही मोठी परंपरा आपल्याकडे आहे. लीळाचरित्र, कथासरित्सागर यातूनही कथालेखनाचे तत्कालीन संदर्भ मिळतात. ही मराठी कथा मध्यमवर्गीय सापळ्यात सापडली तेव्हा जरा खुजी वाटू लागली. मी मध्यमवर्गीय जगण्याला गौण मानत नाही. पण त्या कथेनेच मोठा पैसा व्यापला. रविवार पुरवण्या, नियतकालिकांतून, दिवाळी अंकांतून याच कथा सालोसाल येत गेल्या. नेमाडेंचं विधान त्या पार्श्वभूमीवरचं होतं. संकुचित कथेच्या बजबजपुरीबाबत ते तसं म्हणाले होते. बाबूराव बागुल, भाऊ पाध्ये, भास्कर चंदनशिव हे मोठ्याच ताकदीचे कथाकार. त्यांची कथा सर्वश्रेष्ठच आहे. आज रविवार पुरवण्यांतून कथा छापल्या जात नाहीत. आणि कथा प्रकाशित करणारी नियतकालिकंही मोजकीच आहेत. ही कथेच्या दृष्टीनं अतिशय छान गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण केवळ हौस म्हणून कथालेखन करणारे लोक त्यामुळं आपोआपच मागे पडलेत. त्याउलट गांभीर्यानं कथा लिहिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. आजची पिढी लिहित असलेली मराठी कथा बहुस्तरीय आणि बहुमुखी आहे. ती वेगवेगळ्या बोलीत, अनेकानेक समूहांतून येते आहे. लेखकांच्या कथनशैलीतसुद्धा वैविध्य आहे. आतापर्यंत आलेली माझी दोन्ही पुस्तकं कथांचीच असली तरी माझा पुढचा मुक्काम कादंबरी असणार आहे. 

आजचं ग्रामीण जग बहुस्तरीय बदल आणि पडझडीला सामोरं जातं आहे. त्या सगळ्यातली गुंतागुंत तुम्ही केवढ्या तरी ताकदीने आणि चपखल शब्दांत समोर आणता. हे सगळं टिपण्यासाठी पत्रकार म्हणून कार्यरत असणं ही गोष्ट अनुकूल ठरली का?
मी महाविद्यालयात बी.ए.च्या वर्गात शिकत असल्यापासून पत्रकारितेत आलो. त्यावेळी मिळणाऱ्या मानधनातून शिक्षणाचा खर्च भागायचा. पत्रकारितेनं माझ्यासमोर एक खुले असे अवकाश ठेवले. पत्रकार असल्याकारणाने मी समाजवास्तवाकडं बारकाईनं पाहू शकतो हे नक्की. जगण्यातले संघर्ष, प्रश्न, पेच, आंदोलनं, समाजकारण, राजकारण हे असं सगळं मला खूप अनुभवायला मिळतं. हा ‘कच्चा ऐवज’ त्यातून मिळतो असं म्हणता येईल. मी कधीही कप्पेबंद झालो नाही ही मला पत्रकारितेनं दिलेली महत्त्वाची उपलब्धी वाटते. मात्र, पत्रकारिता नुसता ‘कच्चा ऐवज’ देऊ शकते. त्याला कलात्मक रूप देणं हा वेगळा भाग उरतोच. वास्तवाची ‘कार्बन कॉपी’ म्हणजे साहित्य नाही. साहित्यानं केवळ वास्तवाचं चित्रण करू नये, असं मी मानतो. त्यानं संवेदनेला आवाहन करावं. माणसाला आतून हलवावं. श्रेष्ठ मानवी मूल्यांना साहित्यानं स्पर्श करावा. त्या दिशेनं त्यानं समाजाला न्यावं. 

ग्रामीण भागात सततचे भूसंपादनाचे तडाखे, शेतमालाला हमीभाव न मिळण्यातून आलेली हताशा, स्त्रियांची प्रचंड घुसमट, तारुण्याची विफलता या सगळ्याची परिणती काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं?
लेखकाला वाटतं की शोषणाला जगात कुठंच थारा असू नये. कोणत्याही लेखकाच्या आत त्याचं स्वत:चं एक जग असतं. ते शोषणमुक्त असतं. लेखकाच्या उरातल्या जगात माणूस मुक्त असतो. लेखकाच्या भवतालचं जग मात्र भीषण, कसोटी पाहणारं आणि प्रश्नांनी भरलेलं असतं. या दोन भिन्न जगांचा कायम लेखकाच्या आत झगडा चाललेला असतो. त्याचं लिहिणं त्यातून येतं. त्याला खुपणाऱ्या, विद्ध करणाऱ्या गोष्टी तो मांडत जातो. साहित्य या आतल्या झगड्यातून येतं. 
आपल्यासमोर बहुतांश वेळा ‘शेतकरी विरुद्ध शेतमजूर’ असं चित्र उभं केलं जातं. पण आज गावागावांत चारदोन जमीनदार वगळले तर उर्वरित सगळे अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी आणि शेतमजूर यांत फार फरक उरलेला नाही. अनेकजण तीन दिवस स्वत:च्या शेतात राबून तीन दिवस दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जातात. त्यांना कुठल्या वर्गात टाकणार? बीड जिल्ह्यात शेती असलेले लोकही दर हंगामात ऊसतोडीला पश्चिम महाराष्ट्रात जातात. सगळ्याच समूहातल्या वंचितांचं जगणं कठीण होत चाललंय. केवळ काळी-पांढरी वगर््वारी आता करता येणार नाही. सोपी उत्तरं देता येणार नाहीत. कारण आज गाव कुठं संपतं आणि शहर कुठं सुरू होतं याची सीमारेषाच निश्चित आखता येत नाही. 

गेल्या काही काळात मोर्चे-प्रतिमोर्चे आणि त्याच्या हव्यानकोशा पडसादांनी ग्रामीण भाग अक्षरश: ढवळून निघालाय. तुम्ही समाजाच्या या सगळ्या क्रिया-प्रतिक्रियांकडे कसे पाहता? 
आज जमिनी घशात घालणारे दलाल, वाळूमाफिया, स्थानिक पातळीवर दुबळ्यांना टाचेखाली रगडणारे सत्तावान हे आता वेगवेगळ्या समूहांतूनही येत आहेत. सर्व जातीतला हा उद्दाम नवश्रीमंत वर्ग सारखाच वागतो. अशावेळी जातींच्या आधारावर परस्परांना ललकारण्यातून जीवनमरणाच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होऊ नये. एकमेकांवर दोषारोपण करण्यातून आपण तात्पुरती भ्रामक उत्तरं शोधू नयेत. सध्याच्या अस्वस्थ आणि धुमसणाऱ्या काळात नेमकी खदखद काय हे लक्षात घेतलं पाहिजे. 
वरवर फेसाळणाऱ्या अस्मितेचे बुडबुडे नका पाहू. खरे भीषण प्रश्न खाली गाळात आहेत. दिवस असे आहेत, की प्रत्येकालाच परस्परांची टोकदार अस्मिता आणि विखार लक्षात राहतोय. सर्व जातिसमूहातले वंचित हे वर्ग म्हणून एकत्र कसे येतील त्याकडे सर्वांचे लक्ष जायला हवं, हे मी महत्त्वाचं मानतो.

मुलाखत - शर्मिष्ठा भोसले 

sharmishtha.2011@gmail.com

Web Title: Below the horror questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.