'बॅट्समन' आऊट, ‘बॅटर’ इन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 06:02 AM2021-10-10T06:02:00+5:302021-10-10T06:05:06+5:30

‘जेंडर न्यूट्रल’ भाषेचा आग्रह सध्या क्रिकेटमध्येही धरला जात आहे. त्यामुळे ‘एमसीसी’नं ‘बॅट‌्समन ’ हा पुरुषवाचक शब्द न वापरता फलंदाजाला ‘बॅटर’ म्हणणं सुरू केलं आहे. काही माध्यमांनीही ‘थर्ड मॅन’ऐेवजी ‘थर्ड/डीप-थर्ड’, ‘नाइट वॉचमन’ऐवजी ‘नाइट वॉचर’ असे शब्द वापरायला सुरुवात केली आहे.

'Batsman' out, ‘batter’ in! | 'बॅट्समन' आऊट, ‘बॅटर’ इन!

'बॅट्समन' आऊट, ‘बॅटर’ इन!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘फक्त जेंटलमन्स गेम’ असलेलं क्रिकेट आता बदलतं आहे आणि पुरुषी असलेलं क्रिकेट महिला क्रिकेटलाही मान्यता देतं आहे.

- अनन्या भारद्वाज

बॅट्समन आऊट, ‘बॅटर’ इन! - ही विकेट पडली ऑफ द फिल्ड. बॅट्समनला कायमचं आऊट करण्याचा नियम लंडनच्या मेलबर्न क्रिकेट क्लबने (एमसीसीने) घेतला. एमसीसीची क्रिकेट समिती क्रिकेटचे नियम बनवते, बदलते. आयसीसीसह सर्व क्रिकेट खेळणाऱ्या देशांना ते अर्थातच स्वीकारावे लागतात. महिला क्रिकेटची वाढ लक्षात घेऊन आणि महिला क्रिकेटपटूंना सामावून घेणारी ‘समावेशक’ भाषा वापरायची म्हणून क्रिकेटची परिभाषा अधिकाधिक लिंगभेदरहित (जेंडर न्यूट्रल) करावी असा या शब्दबदलाचा हेतू असल्याचं एमसीसीने आपल्या पत्रकात नमूद केलं. हा बदल वरकरणी छोटा दिसत असला आणि बॅट्समनला ‘बॅटर’ म्हणून असा काय फरक पडणार आहे असा प्रश्न पडत असला तरी ‘फक्त जेंटलमन्स गेम’ असलेलं क्रिकेट आता बदलतं आहे आणि पुरुषी असलेलं क्रिकेट महिला क्रिकेटलाही मान्यता देतं आहे असं सांगणारा हा बदल आहे.

बॅट्समन हा शब्द क्रिकेटच्या परिभाषेत १७४४ पासून वापरला जातो आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेट रुजू लागलं तसंतसं फक्त पुल्लिंगी शब्दांचा वापर अनुचित वाटू लागला. बॅट्समन, थर्ड मॅन,

नाइट वॉचमन हे शब्द बदलावेत अशी मागणी होवू लागली. काही इंग्रजी वृत्तसंस्थांनी आपल्या लेखनात आणि व्हीडिओतही बॅट्समन ऐवजी बॅटर, थर्ड मॅन ऐेवजी फक्त थर्ड/डीप थर्ड, नाइटवॉचमन ऐवजी नाइटवॉचर असे शब्द वापरायला सुरुवात केली. हे शब्द क्रिकेटच्या परिभाषेत समाविष्ट करावेत, काॅमेण्ट्रीतही बंधनकारक असावेत अशी मागणीही करण्यात येऊ लागली. मात्र तुर्त तरी नियम बदल म्हणून एमसीसीने ‘बॅट्समन’ न म्हणता ‘बॅटर’ म्हणायचं असा शब्दबदल स्वीकारला आणि त्वरित लागू केला आहे.

हा बदल स्वागर्ताह आहे असं म्हणत क्रिकेट जगानं त्याचं स्वागत केलं. पुढेमागे बाकीचे शब्दही बदलत क्रिकेटची भाषा लिंगभेद टाळेल अशी अपेक्षाही आहे.

मात्र क्रिकेटतज्ज्ञांचं एक मत असंही आहे की, हा बदल फार ‘प्रतीकात्मक’ आहे. महिला क्रिकेटसाठी आम्ही काहीतरी करतो आहोत, आम्ही किती ‘संवेदनशील’ आहोत हे दाखवण्यासाठी आहे. महिला क्रिकेटची वाढ, लोकप्रियता आणि स्पॉन्सर्स पाहता आता महिला क्रिकेटमध्ये आपण काहीतरी करतो आहोत असं वरवरचं दाखवण्यासाठी हा बदल आहे. प्रत्यक्षात ‘लॉर्ड्स’वर अजूनही महिला क्रिकेट कसोटी सामने होत नाहीत. आजवर जेमतेम १५ एकदिवशीय सामने खेळवण्यात आलेले आहेत. ( भारतातही इडन गार्डनवर फक्त ५ महिला आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत.) पुरुष क्रिकेटसाठी मानाच्या जागा असलेल्या जगभरातल्या स्टेडिअमध्ये अजूनही महिला क्रिकेटला शिरकाव करु देण्यात आलेला नाही असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

अर्थात क्रिकेट तज्ज्ञांचं म्हणणं काहीही असलं तरी ‘लिंगभेदी भाषा’टाळा असा आग्रह असलेला जेंडर न्यूट्रल लॅग्वेंज तज्ज्ञांना मात्र हा बदल मोठा वाटतो. क्रिकेट लोकप्रिय आहे, त्याची परिभाषा बदलते, लिंगभेद टाळते यातून जाणारा भाषा समानतेचा संदेश मोठा आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. जगभरच सध्या जेंडर न्यूट्रल भाषा मुलामुलींना शिकवावी, तसे शब्द अंगवळणी पडावेत म्हणून प्रयत्न सुरु आहेत.

क्रिकेटने एक पाऊल पुढे टाकत बॅट्समनला आऊट करत ‘बॅटर’ला स्थान दिलं..

त्यातला स्त्री-पुरुष भेदाभेद पुसून टाकला, ही चांगलीच गोष्ट आहे.

काय असते जेंडर न्यूट्रल भाषा?

ज्याची सत्ता त्याची भाषा हा जगाचा नियम आहे. सत्तेच्या खुर्च्यांमध्ये कायम पुरुषच असल्यानं त्यांना सोयीचे असे शब्द निर्माण झाले. अनेक क्षेत्रं तर बहुतांश काळ पुरुषप्रधानच होती. उदा. आधी वेटर आले, त्या जगात महिला काम करु लागल्यावर ‘वेट्रेस’ असा शब्द आला. सेल्समन होते मग सेल्सवूमन आला, पण हे शब्द लिंगभेद करतात. काम समान तर लिंगभेदी उल्लेख कशाला असाही एक प्रश्न होता. त्यातून मग इंग्रजीने लिंगभेद न सांगणारे, व्यक्तीचं केवळ पद आणि काम सांगणारे शब्द स्वीकारायला सुरुवात केली. उदा.

मॅन-वूमन-परसन

चेअरमन-चेअरपरसन

वेटर-वेट्रेस-सर्व्हर

स्टुअर्ड-स्टुअर्डेस-फ्लाइट अटेंडन्स

सेल्समन-सेल्सवुमन-सेल्सपरसन किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह

हजबंड-वाइफ-स्पाऊज

फादर-मदर-पॅरेण्ट

हे शब्द इंग्रजी कार्पाेरेट संवादाने फार चटकन स्वीकारले. आता ‘गुगल’ही अशा जेंडर न्यूट्रल भाषेचा वापर करत आहे. जगात अनेक प्रगत भाषा स्त्री-पुरुष भेद टाळून समान संधी-समान आदर यासाठी लिंगभेद न दर्शवणारे शब्द स्वीकारत आहेत. अर्थात त्यालाही अपवाद आहे. फ्रेंचमध्ये हा प्रयोग झाला. पण नुकतेच फ्रेंचच्या शिक्षण मंत्र्यांनी पत्रक काढले की, अशी जेंडर न्यूट्रल भाषा मुलांना शिकवू नका, फ्रेंचचे अस्सलपण त्यानं धोक्यात आहे, भाषा भ्रष्ट होते आहे.

त्यावर आता वाद सुरु आहेत..

मात्र जग जेंडर न्यूट्रल भाषेचा विचार करते आहे हे नक्की..

(मुक्त पत्रकार)

Web Title: 'Batsman' out, ‘batter’ in!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.